जीव वेडावला भाग ४

त्याचा होणारा स्पर्श वेगळाच होता. त्याला पश्चाताप झाला होता. त्याने तिचे हात घट्ट पकडले होते
जीव वेडावला भाग ४

पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की वैदेही आणि विक्रमचे लग्न होते. वेदा जेव्हा कंपनीत रिजॉईन होते तेव्हा तीला कळतं ज्या राजच्या प्रेमासाठी ती वेडावली होती त्याचे आधीच एका मुलीवर प्रेम होते. राजने त्या मुलीशी लग्न केले होते. वेदा नाराज झाली होती. तिने ती नोकरी सोडली आणि आईकडे येऊन राहू लागली. एक दिवस वैदेहीने ती आई होणार असल्याचे सांगितले. आता पाहू पुढे.

गीता आणि विक्रम वैदेहीचे सारे डोहाळे पुरवत होते. पहिलंच बाळ होतं. वैदेही स्वतःची खूप काळजी घेत होती. वैदेही पहिल्या बाळंतपणाला माहेरी आली. नऊ महिने सरले आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला; पण काळाने घात केला. बाळ झाल्यावर वैदेहीने प्राण सोडले. ही खबर जशी कळली तसं साधना, वेदा, विक्रम,गीता सगळेच रडू लागले.आनंदाचे क्षण आता दुःखात बदलले होते. वेदाला तर विश्वासच बसत नव्हता तिची ताई ह्या जगात नाही. साधना पण सतत बेहोश होत होती.

पोरीला काही असं होईल वाटलं देखील नव्हतं.
वैदेहीची मुलगी तिला तर माहीत देखील नव्हतं तिने काय गमावलं.

थोडा काळ लोटला. साधनाला वैदेहीच्या बाळाची काळजी लागून राहिली.
विक्रम कसं संभाळणार? वेदाचे लग्न विक्रमशी झालं की, त्या बाळाच्या भवितव्याची काळजी नाही. वेदाला पटेल की नाही ?

जड मनाने साधनाने हा विचार बोलून दाखवला. वेदाला तो धक्का होता. आई असा कसा विचार करू शकते? पण मग तिला तिच्या ताईचा चेहरा डोळ्यासमोर दिसला.

जणू काही ताई तिच्या बाळाची काळजी घेण्यास सांगत होती. विक्रमशी लग्न केलं नाही तर एखादी दुसरी बाई त्या बाळाला आपलं मानेल?

माझ्या भाचीला मी काहीच होऊ देणार नाही. आई म्ह्णून मी तिचा स्वीकार करणार. विक्रमची बायको म्हणून मी त्याला कधीच स्वीकारणार नाही. हे मनाशी ठरवलं. आईला विक्रमशी लग्न करण्यास ती तयार असल्याचे सांगितले.

साधनाने, गीताला वेदा विक्रमशी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. गीतालाही विक्रमची काळजी होती. माझ्या नंतर माझ्या मुलाला जपणारं कोणी तरी पाहिजेच. साधनाने जेव्हा विक्रमला ही बाब सांगितली तेव्हा विक्रम वेदाच्या घरी गेला.

तो साधनासमोर म्हणाला.
"वेदा, तू तयार असशील लग्नाला ; पण मी नाही. तुझं आयुष्य उध्वस्त करण्याचा अधिकार मला नाही. तू दुसऱ्या कोणाशी लग्न कर आणि सुखी राहा."

वेदाला माहीत होतं विक्रम असंच काही बोलणार. तिला आता काहीही करून विक्रमशी लग्न करायचे होते. ती म्हणाली.
"ताई, माझ्या स्वप्नात येऊन म्हणाली की, तू विक्रमशी लग्न कर. माझ्या बाळाचा सांभाळ कर." हे ऐकून त्याचे डोळे पाणावले.

वेदाला माहीत होतं ती खोटं बोलत आहे ;पण तेच तिला योग्य वाटत होतं.

विक्रम भावुक झाला आणि तो देखील वेदाशी लग्न करण्यास तयार झाला.

वैदेहीच्या मुलीचे नाव गाथा ठेवले होते.

वेदाने लग्न तर केले होते विक्रमशी ; पण तिने विक्रमला नवरा म्ह्णून स्वीकारले नव्हतेच. ती फक्त गाथाची आई म्ह्णून जगत होती.

कधी तरी राजची आठवण यायची; पण सारं संपलं होतं. प्रेम आपल्यासाठी नव्हतंच.

गीताला वेदाला पाहून वाईट वाटायचे. तिलाही समजायचे की, हे लग्न तिने गाथासाठी केले आहे. ती केवळ गाथाची आई म्ह्णून सारे कर्तव्य निभावत होती.

एक दिवस गीता विक्रमला म्हणाली. "विक्रम, वैदेहीचे जाणे हे आपल्या हातात नव्हतं. वेदाला पाहून वाईट वाटतं. तिचीही अनेक स्वप्न असतील. नवरा म्ह्णून तू तिची स्वप्न पूर्ण करावी. कमीत कमी ज्या गोष्टीत ती खुश होते ते तू करावं."

"आई, मी माझ्या वैदेहीला विसरू शकत नाही. तिची जागा मी वेदाला नाही देऊ शकत." रडावलेल्या स्वरात विक्रम म्हणाला.

"विक्रम, मी तुला वैदेहीला विसरायला सांगत नाही; पण वेदाचे काय? तिचं पण तर आयुष्य आहे ना? आता काहीही झालं तरी तिच्या मनाची काळजी घेणं, जपणं तुझी जबाबदारी आहे. वेदा स्वार्थी असती तर तिने तुझ्याशी लग्न नसतं केलं. सुंदर, शिक्षित मुलगी आहे. कितीतरी स्थळ तिने नाकारली. तीने तुझ्याशी लग्न केलं ते गाथाचा सांभाळ करण्यासाठी हे तुलाही माहीत आहे आणि मला; पण पुन्हा पुन्हा मी तुला एकच सांगेन तिच्यापासून अलिप्त नको राहू. ती सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे."

वैदेहीच्या जाण्याने तो देखील दुखावला होता;पण आज गीताचे बोलणे ऐकून त्याला जाणवले की, वेदासोबत कुठेतरी आपण अन्याय करत आहोत. त्याने ठरवलं वेदाला सुखी ठेवायचे.

त्याला सुट्टी होती. तो वेदाला म्हणाला
"वेदा, आपण पिक्चर बघायला जाऊया."
वेदाने नकार दिला.
"अगं वेदा जरा बाहेर पड. गाथाची काळजी मी घेते. जाऊन या बरं." गीता.

गीताला नकार देताच आला नाही.
दोघेही गेले. गाडीत बसल्यावर विक्रमने गाणी लावली. वेदा काहीच बोलत नव्हती. विक्रम तिला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न करत होता. ती मात्र शून्यात नजर लावून बसली होती.

विक्रमने गाडी बाजूला थांबवली. वेदा अजूनही शून्यात नजर लावून होती. विक्रमने तिचा हात हातात घेतला. दोन्ही हाताने तिचा हात घट्ट पकडला.
वेदा भानावर आली. स्वतःचा हात विक्रमच्या हातात पाहून ती सोडवायचा प्रयत्न करू लागली. तरीही त्याने हात सोडला नाही.

तिच्या श्वासाची गती वाढली होती. तिला वाटलं नव्हतं विक्रम असं काही करेल.

विक्रम रडू लागला. वेदालाही त्याला पाहून रडु आलं.

"वेदा, तुझे आभार मानावे तितके कमी आहेत. गाथासाठी तू तुझ्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. मला असं वाटतं मी तुझा गुन्हेगार आहे. काहीही झालं तरी तुझ्याशी मी लग्न नव्हतं करायला पाहिजे."

त्याची तगमग पाहून वेदाला फार वाईट वाटत होतं. ती देखील हुंदके देत रडू लागली.

विक्रमने तिच्याकडे पाहिले.
"वेदा, माफ करशील मला?"

वेदाला काय बोलावं सुचत नव्हतं.
एक मात्र होतं की, त्याच्या स्पर्शामध्ये एक जादू होती. विक्रम इतका छान व्यक्ती होता की, लग्नाला वर्ष झाले तरी चुकूनसुद्धा त्याने वासनेच्या नजरेने तिला कधीच पाहिले नव्हते.
आताही त्याचा होणारा स्पर्श हा वेगळाच होता.
त्याच्या डोळ्यात दिसत होतं की, त्याला किती पश्चाताप होत आहे.

वेदा म्हणाली, "विक्रम, तुमची काहीच चूक नाही. तुम्ही बायको म्ह्णून माझा स्वीकार केला ते माझ्या सांगण्यावरून. माझ्या बहिणीची शेवटची निशाणी आहे गाथा, जे देखील केलं तिच्यासाठीच. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्लिज माफी मागू नका." आवंढा गिळत ती म्हणाली.

विक्रम डोळे पुसत म्हणाला, "वेदा, मला माहित आहे तुझीही खूप स्वप्न असतील; पण एक वचन देशील बायको म्हणून जर जमत नसेल तर मैत्रीण म्हणून राहशील?"

वेदाने हो म्हणत मान हलवली.

आज ह्या संवादाने दोघेही खुप जवळ आले होते. वेदाला विक्रमविषयी वेगळीच ओढ वाटत होती. तिचं मन देखील हेच म्हणत होतं.
'मी ताईची जागा घेऊ शकत नाही; पण विक्रमची मैत्रीण बनून तर राहू शकते.'

विक्रम आणि वेदा मैत्रीपलीकडे जातील?
पुढचा आणि शेवटचा भाग वाचायला विसरू नका.