जीव वेडावला भाग ३

"तू मला मनापासुन आवडली, लग्न करशील माझ्याशी?" विक्रम असं काही बोलेन तिला वाटलं नव्हतं.
जीव वेडावला भाग ३
पूर्वार्ध

गेल्या भागात आपण पाहिले की, वेदाच्या बहिणीला वैदेहीला मुलगा बघायला येणार होता. वेदा रात्री पुन्हा स्वप्नात राजला पाहते. तो तिला प्रपोज करत होता. राज खऱ्या आयुष्यात कधी येईल याची वेदा आतुरतेने वाट पाहत होती. आता पाहू पुढे.

संध्याकाळी पाच वाजता साधनाची मैत्रीण शामल तिच्या नंणदेसोबत म्हणजेच गीतासोबत येणार होती. त्यांच्यासोबतीला विक्रमही होताच. साधनाची तर लगबग चालू होती. तसं घर स्वच्छ आणि टापटीप होतं; पण तरीही पाहुणे येणार म्हंटल्यावर प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवत होती.

वेदा आणि वैदेही साधनाची लगबग पहात होत्या.

वैदेही म्हणाली, "आई, सगळं व्यवस्थित आहे घरात. आता तू आराम कर. सकाळपासून धावपळ करत आहेस."

वेदा म्हणाली "हो आई, ताई बरोबर बोलत आहे. आराम कर. थोडा श्वास घे. सकाळपासून किती धावपळ करते आहेस?" वेदाने आईचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवत म्हणाली.

आई बसली तोच तिच्या लक्षात आलं की, कोथंबीर आणि लिंबू राहिले. पाहुणे आले की कांदेपोहे करायचा बेत होता.

"अरे देवा ! कोथंबीर आणि लिंबू राहिलेच आणायचे. त्याशिवाय पोह्याला काही चव येणार नाही." साधना कपाळाला हात लावतच म्हणाली.

"इतकंच ना आई? मी जाते मार्केटमध्ये आणि आणते; पण तू आता आराम कर. आलेच मी." वेदा पर्स हातात घेत म्हणाली.

बरोबर पाच वाजता शामल,गीता आणि विक्रम आले. वैदेही आवरून बसली होती.
वैदेही, वेदा आणि काव्या बेडरुममध्येच बसल्या होत्या. साधनाने चहा आणि पोहे केले आणि वैदेहीला बाहेर बोलावले.

वैदेहीने छान पिस्ता कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. क्लचर लावून बाकीचे केस मोकळे सोडले होते. कानात नाजूक डायमंडचे कानातले घातले होते. विक्रम तर तिला पहातच बसला. तो तर तिथल्या तिथे क्लिन बोल्ड झाला. वेदा आणि काव्या लपून पाहात होत्या.

विक्रमने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. नेव्ही ब्लु रंगाची जीन्स. हातात टायटनचे वॉच. बोलण्यात वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. फोटोत दिसत होता त्यापेक्षाही समोर तो खुपच हँडसम दिसत होता. त्याचे डोळे फार बोलके होते. पाहताक्षणी त्याला वैदेही आवडली.

गीता मुलाचे हावभाव टिपत होती. त्याला वैदेही आवडली हे स्पष्ट दिसत होते. वैदेहीने देखील त्याला एकदा पाहिले आणि ती देखील त्याला पहात बसली.

होताच तो असा. त्याचेही बाबा देवाघरी गेले होते. घरची सर्व जबाबदारी त्याने उचलली होती. घरात तो आणि आई हे दोघेच होते. शामल म्हणाली, "साधना, मुलांना एकांतात जरा बोलू देऊया का? म्हणजे मोकळेपणाने बोलतील."

"हो चालेल." साधना.

वैदेही आणि विक्रम बेडरूममध्ये आले.
आधीच वेदा आणि काव्या तिथेच बसल्या होत्या. वैदेहीने दोघींची ओळख करून दिली.

"ताई, आम्ही पण इथेच बसलं तर चालेल ना?"
वैदेहीला ती चिडवत म्हणाली.

वैदेहीने डोळे वटारले. विक्रम गालातच हसला.
"काय गं वेदा, आपल्याला बाहेर जायचे आहे एक काम आहे , विसरली का?" काव्याने वेदाचा हात पकडून तिला बाहेर आणले.

साधनाने वेदा आणि काव्याची ओळख करून दिली.

विक्रमनेच बोलायला सुरवात केली.
"वैदेही, विसरून जा की मी तुला बघायला आलो आहे. आपण फ्रेंडस म्हणून बोलूया का?"

वैदेहीला हायसे वाटले. तिची ही पहिलीच वेळ होती. वैदेही बोलू लागली.
विक्रम देखील तिचं बोलणं मनापासून ऐकत होता.
एकटक तिला पहात होता.
अचानक तो बोलून गेला "वैदेही, तू मला मनापासून आवडली. लग्न करशील माझ्याशी?"

वैदेही तर शॉक झाली. तिला वाटलं नव्हतं की, विक्रम असं बोलेन. ती देखील दोन मिनिटं शांत बसली.

तिची नजर हेच सांगत होती की, तीला देखील तो आवडला आहे. तो ही समजून गेला.

बोलणं झाल्यावर विक्रम आणि वैदेही बाहेर आले.
वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य होते. ते पाहून साधना, वेदा दोघींना कल्पना आली की नक्कीच तिला विक्रम आवडला आहे.

गीता हळूच विक्रमच्या कानात म्हणाली, "वैदेही आवडली का?"

विक्रमने होकारार्थी मान हलवली.

गीताने शामलला सांगितले. शामलने साधनाला.
साधनाला खूप आनंद झाला.
वैदेही विक्रमला पसंत पडली होती.

शामल म्हणाली, "वैदेही, विक्रमला तू आवडली आहेस. तुला विक्रम आवडला का?"

वैदेहीने देखील होकारार्थी मान हलवली.
वेदाने तर तिला मिठी मारली.
वेदा वैदेहीच्या कानात म्हणाली, "ताई, मलाही जीजू खूप आवडले. वरपरिक्षा केंसल."

महिनाभरात लग्नाचा मुहूर्त देखील काढला.
वैदेही आणि विक्रमचे लग्न थाटामाटात पार पडले. साधना लेकीसाठी खुश होती. एका चांगल्या घरात गेली होती. विक्रम तिला खूप खुश ठेवत होता. कसल्याच गोष्टीची कमी नव्हती.

वेदाने जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा तिला कळलं की राजच लग्न झाले आहे. तेव्हा मात्र ती कोसळून गेली.

राजवर तिने प्रेम केलं होतं आणि त्याचे लग्न झाले होते.

काव्याला तिच्यासाठी फार वाईट वाटत होतं.

ती तिला समजावत होती; पण काही केल्या वेदा राजच्या विचारातून बाहेर येत नव्हती.

राजच लग्न त्याच्या गर्लफ्रेंडशी झालं होतं. पाच वर्षापासून तो रिलेशनशिपमध्ये होता. ह्याची कोणालाच खबर नव्हती. राजचे लग्न झाल्यावर हळूहळू सगळ्या गोष्टी कळू लागल्या.

वेदा खुप दुखावली होती. डिप्रेशनमध्ये गेली.
वेदाचे प्रेम अधुरे राहिले. ज्याच्यावर प्रेम केले तो आता दुसऱ्या मुलीचा झाला हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

तिचे कामात मन लागेना. तिने ती नोकरी सोडली; कारण राजला पाहिले की, खूप त्रास व्हायचा. ज्या राजला पाहण्यासाठी जीची नेहमी धडपड असायची, आता मात्र ती त्याला पाहू शकत नव्हती.

ती आईसोबत राहू लागली. तिथेच जवळपास नोकरी शोधून ती कामाला जाऊ लागली.
त्याच्यापासून दूर राहिले की, सगळं विसरेन असं तिला वाटत होतं.

दूर आली तरी त्याचे विचार जाता जात नव्हते.

वैदेहीचे लग्न होऊन सहा महिने झाले होते.
आता वेदाचेही लग्न झाले की मी मोकळी असा साधना विचार करत होती.

वेदासाठी स्थळ येत होती; पण ती नकार देत होती.

साधनाची चिंता वाढली होती. वेदा मात्र दुःखात हरवली होती.

एक दिवस वैदेहीने वेदाला फोन केला आणि सांगितले ती मावशी होणार आहे.

वेदा खुश झाली. तिने ही खबर साधनाला दिली.

साधनाचा आनंद गगनात मावेनासा झाला. किती वर्षाने घरात आनंदाची बातमी आली होती.

ह्या आनंदाला जणू नजर लागली.
काय घडलं असावं? पुढील भाग जरूर वाचा.

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.




🎭 Series Post

View all