जीव वेडावला भाग ५ अंतिम

"दुखत तर नाही ना?" वेदा म्हणाली. "तू आहेस ना?" विक्रम तिच्याकडे बघून हसत होता.
जीव वेडावला भाग ५ अंतिम
पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की, वेदाला खुश ठेवायची जबाबदारी विक्रमची आहे असे गीता विक्रमला समजावते.
विक्रम वेदाकडून वचन मागतो बायको नाही पण एक मैत्रीण म्ह्णून माझ्या आयुष्यात राहशील. वेदा देखील तयार होते.

वेदा आणि विक्रम दोघांचे नाते फुलायला लागते. दोघांमधील अंतर हळूहळू कमी होऊ लागतं.

वेदाला काय आवडतं? काय नाही? हे त्याला कळल्यावर तो अगदी तसाच वागू लागला होता. सुट्टीच्या दिवशी तिला पाणीपुरी खायला घेऊन जाणं, तिच्या आवडीचे चॉकलेट न विसरता रोज घेऊन जायचा. अधुनमधुन तिला छान गिफ्ट द्यायचा.

वेदा देखील त्याला काय आवडतं ह्याची पुरेपूर काळजी घ्यायची. त्याच्या आवडीचे जेवण बनवायची.

गीता चार दिवसासाठी बहिणीकडे गेली होती.
नेमकं वेदाला खूप ताप आला होता.
विक्रमने तिच्या कपाळाला हात लावून पाहिले तर खूपच अंग गरम लागत होते.

त्यादिवशी त्याने सुट्टी घेतली.
गाथाही आता चालायला शिकली होती. तिच्याकडे खूप लक्ष द्यावे लागत होते. वेदाला तर गळून गेल्यागत झाले होते.

विक्रमने त्या दिवशी जेवण बनवले. अगदी स्वतःच्या हाताने वेदाला भरवले. नंतर फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेला.

हे सारं काही तो मन लावून करत होता.

अगदी आई जशी काळजी घ्यायची तशीच काळजी त्याने त्या दिवशी घेतली होती.

तिच्या डोळ्यावर झोप होती. त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकली.

दुसऱ्या दिवशी तिला बरं वाटलं. विक्रमने सुट्टीच घेतली होती.

ती किचनमध्ये जाऊ लागली तर त्याने तिला रोखलं. सगळं काही बनवून त्याने तयार ठेवलं होतं.

"विक्रम, आज मला बरं वाटतंय. मी काम केलं असतं." वेदा.

"वेदा, दोन दिवस आराम कर. लगेच काम करायची गरज नाही. मी आहे ना. काळजी करायची गरज नाही. चल तू आराम कर." त्याने तिचा हात पकडत बेडरूममध्ये नेले.
गाथा खेळण्यासोबत खेळत होती.
विक्रम गाथाकडे पाहत म्हणाला, "गाथा, मम्माला बोल अजिबात काम करायचे नाही."

"मी खरंच बरी आहे. मला बरं वाटतंय." वेदा.

"वेदा, काय हे तुला मी म्हणतो आहे ना आराम कर, तरी लहान मुलीगत वागते?" विक्रम

तो पुढे जाणार तोच त्याच्या पायामध्ये गाथाच्या खेळण्यामधील गाडीच्या प्लॅस्टिकचा कोना घुसला. विक्रम वेदनेने कळवळला.

"आई गं!" म्हणत त्याने पायाला हात लावला.

वेदाने लगेच त्याचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतला. ती गाडी काढली. बरंच रक्त वाहत होते. तिने ओढणीने रक्त पुसले. हळद घेऊन त्यावर लेप लावला.

हे सारं करत असताना विक्रम वेदाचा चेहरा निरखून पाहत होता. 'किती काळजी करते वेदा. इतकं काही लागलं नाही तरी किती चिंता करते. ही माझ्या प्रेमात पडली की काय?'

"विक्रम, तुम्हाला खूप दुखतंय का?" वेदा काळजीच्या स्वरात म्हणाली.

"तू आहेस ना ? मग नाही दुखणार." तो हसत म्हणाला.

"हसताय काय? चला डॉक्टरकडे जाऊया." त्याचा हात धरत म्हणाली.

"तू आहेस ना?" विक्रम.

वेदाला त्याची काळजी वाटत होती आणि हा मात्र वेगळ्याच दुनियेत. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी आज त्याने प्रेम पाहिले होते. कधी वाटलं नव्हतं वेदा अशी काळजी घेईल.

अजूनही त्याचा पाय तिने स्वताच्या मांडीवर ठेवला होता. त्या जखमेवर फुंकर देत होती. तो देखील आज तिच्या डोळ्यात तीच काळजी पाहता होता जी आईच्या डोळ्यात दिसत होती.

वेदा मैत्रीच्या नात्याने का होईना खूप जवळ आली होती.

तो स्वतःला प्रश्न विचारू लागला?
'ही फक्त मैत्री आहे का?'

वेदाचे लक्ष विक्रमच्या चेहऱ्यावर गेले. तो तिला पाहून गालात हसत होता.

वेदाने त्याचा पाय अलगद उचलून खाली ठेवला.

तो मुद्दाम जोरात ओरडला.
वेदाने पुन्हा पाय मांडीवर ठेवला.

"खूपच त्रास होतोय ना?" वेदा काळजीच्या स्वरात म्हणाली.

तो पुन्हा हसू लागला.
"वेदा, गंमत केली. इतकं नाही दुखत."

"अशी गंमत करतात का? मला त्रास होतोय विक्रम." वेदा.

"वेदा, मी पाहतोय तुझा त्रास. इतकं लागलं नाही तरी स्वतःला त्रास करून घेते आहेस. मला जर जास्त काही झालं तर..."

तो पुढे काही बोलणार तोच तिने त्याच्या ओठावर हात ठेवला "विक्रम, तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकत. असं काहीच बोलू नका." वेदा.

तिच्या लक्षात आलं, आपण काय बोलून गेलो.

मी जगू शकणार नाही?

तिचं मन तिला म्हणत होतं.

'काहीच चुकीचं बोलली नाहीस. तू विक्रमशिवाय नाहीच जगू शकत. तुला तो आवडायला लागला आहे. त्याची काळजी घेणं, त्याची मैत्री. छे ही मैत्री राहिलीच नाही त्यापलीकडे हे नातं केव्हाच गेलं आहे.'

वेदाची नजर खालीच होती.

डोळ्यातून फक्त अश्रूंची धार लागली होती.

विक्रम तिच्या बाजूला बसला. तिचा हात हातात घेतला.

"वेदा, रडू नको. तुला असं मी पाहू शकत नाही. "

त्याने तिचे डोळे पुसले.

तिचं मन अजूनही तेच म्हणत होतं.
'विक्रमशिवाय मी नाही जगू शकत.'

"वेदा, तुला माहीत आहे तू वैदेहीची सावली आहे. एकदा मी वैदेहीला असंच म्हणालो होतो मला काही झालं तर. ती रडू लागली. आज जशी तू रडते आहेस ना? अगदी अशीच रडत होती.

वेदा, मला तुझ्यात नेहमी वैदेही दिसते.
तुझ्यासोबत जेव्हा असतो तेव्हा वाटतं वैदेही सोबत आहे. तुझ्याशी लग्न केलं ते गाथासाठी.

वेदा, मी आज खोटं नाही बोलणार. मी देखील तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लिज, कधीच मला सोडून जाऊ नको. मी तुझ्याशिवाय काहीच नाही."

विक्रमच्याही अश्रूंचा बांध फुटला होता.

त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला
"जोपर्यंत माझे श्वास चालू आहे तोपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. तू देखील मला सोडून कुठेच जाऊ नको. माझा श्वास आहेस तू वेदा. माझं सर्वस्व झाली आहेस."

वेदा खरंच प्रेमात पडली होती. खऱ्या प्रेमात. त्याच्याशिवाय ती जगूच शकत नव्हती.

तिचे आणि त्याचे अश्रू प्रेमाची कबुली देत होते.

"विक्रम, मला एक गोष्ट सांगायची आहे किंबहुना ती गोष्ट तुम्हाला कळायला हवी असं मला वाटतं."

"बोल वेदा, तुला काय सांगायचे आहे. मला आवडेल ऐकायला." विक्रम तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.

"विक्रम, मी माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा होता त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते. नेहमी तोच माझ्या मनात, विचारात असायचा.
एक दिवस कळलं त्याचे लग्न झाले. मी तुटून गेले. मी ती नोकरी सोडली. मला त्रास होत होता. कधी वाटलं नव्हतं की मी पुन्हा कोणासाठी जगू शकेल, पुन्हा कोणाच्या प्रेमात पडेल. एकच प्रश्न मनाला पडतो राज काय होता माझ्यासाठी?"

विक्रमला तिच्या मनाची घालमेल समजत होती.

"वेदा, समजू शकतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली नाही की काय त्रास होतो. प्रेम तर भावना आहे. ती जगता यायला हवी. तू खरं प्रेम केलं, तू ते क्षण जगली. एक मात्र आहे जे आपल्याला पाहिजे ते मिळतच असं नाही. मग जे आपल्याकडे आहे त्याचा स्वीकार करून आयुष्यात खुश राहता आले पाहिजे."

वेदा "विक्रम, बरोबर बोलताय जे माझं होऊ शकलं नाही त्यासाठी आता विचार करणार नाही. जे माझं आहे त्यातच खुश राहणार." तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं.

वेदाने त्यादिवशी विक्रमचा मनापासून स्वीकार केला होता.

गाथा मात्र दोघांना पाहून खळखळून हसत होती.

वेदाच्या मनात तिच्या आवडीचे गाणं वाजत होतं.

"नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो,तू मला मी तुला"

********समाप्त.*********

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all