जीवन ऐसे

सेतू बंध
सेतूबंध
लेखक :-किरण सुमन

ईरा स्पर्धेतील संबंध सेतू या फेरीमुळे आपल्या टीम मध्ये टीमवर्क हे फक्त नावाला न राहता आपल्या बरोबर सहकार्य करून टीमच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सहकारी लेखकांबद्दल लिहायला वाव मिळाला त्याबद्दल ईराचे आभारच मानायला पाहिजेत. आमच्या टीम मध्ये आम्ही एकूण नऊ लेखक, त्यात आम्ही आठ लेखिका आणि एकच लेखक आणि ते म्हणजे 'किरण सुमन' आज मी त्यांच्याच बद्दल लिहिणार आहे.

सुरवातीची ग्रुपवरील ओळख परेड, त्यानंतर नियमांवरील चर्चा, स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील कथेचा विषय आणि आशय ग्रुपवर मांडून एकमेकांचा सल्ला घेऊन आपल्या ग्रुपला जिंकवून देण्याची मेहनत करणारे आम्ही सगळे एका बंधात गुंफू लागलो होतो. आमच्या मोठ्या चॅट चर्चांमध्ये गरज वाटली तिथे येऊन आपले मत मांडणारा हा दादा.

दादांनी त्यांच्या जलद कथेत 'स्त्रीमनाला' ज्या पद्धतीने मांडले त्यावरून त्यांचे लेखन खुपचं उत्तम आहे हे दिसून आले. त्या नंतर किरण दादा आमच्यात होणाऱ्या संसाराच्या चर्चा, मुलाबाळांच्या आजारपणाच्या शाळेच्या चर्चांमध्ये असा काही मिसळून गेला याची प्रचिती त्याच्या संबंध सेतू मधील लिखाणात दिसून आली. म्हणूनच किरण दादाने आपल्या संबंध सेतूला 'मिळून साऱ्या जणी' असे संबोधले आहे.

किरण दादाने जेव्हा त्याचे आत्मचरित्र पोस्ट केले आणि आमच्या ग्रुपमध्ये भावनांचे जणू एक वादळच उठले. दादाचे आत्मचरित्र वाचून त्याचे लहानपण कळले, गरिबीत राहून केलेला स्वतःच्या भावनांचा संघर्ष, मनाला चटका लावून गेला. कोवळ्या वयात पित्याचा आधार नसताना आईच्या छत्रछायेत स्वतःच्या आयुष्याला सकारात्मक वळण देऊन स्वतःला घडवले त्याबद्दल त्याचे कौतुक वाटते.

किरण दादा समाजसेवेत कार्य करत असताना आपल्या समूहाचे हुंकार आपल्या कथांच्या माध्यमातून मुख्य धारेतील समाजाला कळावे म्हणून त्यांच्या कथांमधून मांडून एक वेगळेच प्रबोधन करतात.

या स्पर्धेतील स्तुत्य फेरीमुळे किरण दा सारख्या लेखकाला ओळखण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. ग्रुपमध्ये एकत्र आल्याने मला त्यांच्या आयुष्याची आणखीन एक बाजू कळली मी त्यांचा अतिशय आदर करते. या एलजीबीटीक्यू समूहातील लेखक आपल्या ओळखीचा लेखक आहे याचा मला विशेष अभिमान वाटतो. समाजाविरुद्ध जाणे सोपे नसते समाजाबरोबर चालणे त्याहून अवघड असते.

किरण दा ला त्याच्या पुढील कार्यासाठी आणि त्यांच्या लेखनातून होणाऱ्या प्रबोधनासाठी मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या जीवनात भरपूर यश मिळवावे आणि प्रगती साधावी अशी मी शुभकामना करते.

धन्यवाद
सौ. वैशाली