Login

'जीवन जगणे एक कला आहे' गीतांजली

Jivan Jagne Ek Kala Ahe Gitanjali
'अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.'
या बहिणाबाईंच्या ओळी आहेत.

अगदी असेच म्हणजे गीतांजली केसरकर हिचे जीवन आहे. नावामध्येच गीत आणि अंजलीचा संगम असलेली ही गीतमय अंजली.

माझा चार-पाच महिन्याचा ईरावरील हा प्रवास आहे.या प्रवासामध्ये अगदीच बोटावर मोजण्या इतक्या लेखिकेंचा मला परिचय झालेला आहे.त्यांच्याच कथेच्या माध्यमातून.त्या म्हणजे सारिका, शिल्पा, सुप्रिया, तृप्ती, ऋतुजा आणि रेखाजींच्या मी रेसिपीज वाचायचे, आणि या सर्वांच्या कथाही वाचायचे.
त्यानंतर आता ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2023 च्या स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायला मिळाले. पण या स्पर्धेबद्दल, मी नवीन असल्याने अनभिज्ञच होते. पण तरीही भाग घ्यायचे ठरवले, आणि या निमित्ताने 'एक वेगळ्या अनुभवाची शिदोरी आपल्याजवळ होईल' हाच हेतू मनात ठेवून.
दहा-दहा जणांची टीम ठरवण्यात आली. आणि या टीम साठी एक कॅप्टन ही ठरवण्यात आला. तर अशा पद्धतीने हे वर्क करायचे होते.
आमची टीम तयार झाली. या टीमची कॅप्टन सौ.तृप्ती कोष्टी.
या टीममध्ये आम्ही नऊ जणी आणि एक म्हणजे वेदांत. तृप्ती, सारिका, गीतांजली, रूपाली, अंजली, नीता, सविता या म्हणजे चिवचिवाट करणार्या चिमण्या, आणि रेखाजी या म्हणजे,'पडशील, सांभाळून.'असं म्हणणार्या या कुटुंबातील माई.

या सर्व चिमण्या म्हणजे गवळणी आणि त्या मध्ये एक नटखट असा,भारीच अवखळ असा
कन्हैया तो म्हणजे वेदांत.( ही कल्पना माझी नाही) आम्ही सर्व गवळणी शब्दांचे दही दूध घेऊन मथुरेच्या 'ईरा' या बाजार पेठेत जात आहोत. विचारांचे मंथन करून, कथारूपी नवनीत येते. ते नवनीत या मथुरेतील ईराच्या पेजवरून अनेक वाचकांच्या मनातील तृष्णेला शांत करते.मार्ग दाखवते.
आमच्या टीमची कॅप्टन तृप्ती कोष्टी. सगळ्यांना छान मार्गदर्शन केले.अडीअडचणीला तृप्ती आणि सारिका आवाज दिला की हजरच.कोणताही प्राब्लेम असो तो तडीस गेल्यावरच या शांत.टीम मधील सर्वच जण अनोळखी होतो. पण टीम मध्ये आल्यावर सर्वांचा छान हळूहळू परिचय झाला.
त्या मध्ये गीतांजलीशी चारोळीचा व्हिडिओ बनवताना अधिक परिचय झाला.यामुळे तीच्यामधील शांतता आणि संयमाची ओळख मला दिसली.आभासातील मैत्री का असेना? पण तिने तत्परतेने ते मला बनवुन दिले.
सगळ्याच लेखिका असल्यामुळे शब्दावर सर्वांचीच पकड होती, प्रभुत्व होते. सगळे छानच लिहीत आहेत, यात शंकाच नाही. प्रत्येकाच्या लिखाणावर एक वेगळी छाप, नकळत लक्षात येते.
तर या स्पर्धेतील सर्व फेऱ्या आता जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. आता ही शेवटची फेरी आहे. तर ती म्हणजे 'संबंध सेतू' फेरी.
तर यासाठी मी गीतांजली केसरकर हिच्या विषयी लिहावे असे ठरले.
तर गीतांजली,
ही गोरा गोमटा मुखवटा असलेली हसरी, सुंदर आणि सुकेशिनी बरं का? तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारी तिची वेणी खूपच मस्त!! म्हणजे तिला पाहिल्यावर (मी फोटोत पाहिले आहे.??)आपल्याला दक्षिणात्य अभिनेत्रींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
तर हीचा स्वभाव गोड, समजदार, कुटुंबासाठी झोकुन देणारी ही. 'जीवन जगणे एक कला आहे' असं म्हणणारी गीतांजली.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या छोट्याशा गावातील ही रहिवासी आहे. तीने सांगितलेली वडिलांची आठवण, देश प्रेमाने ओथंबलेली आहे. आणि हे वाचताना अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
बालपणीच्या खूप सुंदर सुंदर आणि हव्या हव्याशा आठवणी त्यांनी आत्मचरित्रात उलगडल्या आहेत.
' झोळी झाडाला टांगून राब राबते माऊली' (बहिणाबाई)
या काव्य प्रमाणे बांधावरच्या आंब्याला झोळी बांधून, भावाला त्यात झोपवून, शेतात काम करणारी तिची आई.
आई आणि इतर नातेवाईक या सर्वांनी मिळून, याच झाडाच्या सावलीत बसून केलेली न्याहारी! खरंच या आठवणींची शिदोरी. जगण्याला नक्कीच बळ देते, सकारात्मकता देते.
गोरी गोरी पान फुला सारखी छान, फुलासारखी छान. या ओळीप्रमाणे गोरी पान, आणि अगदी फुलाप्रमाणे नाजूकही.
म्हणून मग तिला चिडवण्यासाठी इतर सगळे तिला त्रास द्यायचे. तिने केलेले 'गोराकृष्ण' हे पात्र मनाला स्पर्शून जाते.
पुढे शालेय जीवनात म्हणजे आठवी, नववी, दहावी मध्ये असताना सुंदर असे निबंध लिहिता लिहिताच, लिहिण्याच्या प्रेमात पडली. आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली. आईने कौतुक केल्यामुळे पुढे आणखीन प्रेरणा मिळत गेली.
निसर्गामध्ये वावरताना,रमताना मग कविताही सहजच वहीत उतरू लागल्या. खळखळण वाहनार्या झर्यासम वहीच्या पाना पानावर रुणु झुनु लागल्या. गुणगुणु लागल्या.
कॉलेज मध्ये असताना तासन् तास लायब्ररीत बसुन वाचनात रमणारी गीता.
श्रीमान योगी,छावा अश्या पुस्तकांचे
वाचन वाढवल्यामुळे, भाषेवर संस्कार झाले. आणि शब्द मनात पेरले गेले. असेच करत करत शिक्षणात ग्रॅज्युएशन झाले.

त्यानंतर लग्न, पण लग्न झाले ते म्हणजे 'मोठा घर पोकळ वासा' याप्रमाणे हे घर तिला मिळाले. नवतीची नव्हाळी गळून पडली.आणि जीवन म्हणजे संघर्ष! संघर्ष!!

तिला हॉटेलसाठी काम करावं लागलं.आणि पूर्ण दिवस म्हणजे दिवसभर त्या कामांमध्येच व्यस्त असायची.त्या परिस्थितीशी तिने जुळवून घेत स्वतः ला समजावून सावरले. त्यामध्ये धीराने उभे राहून 'हे ही दिवस जातील' या आशेवर, उद्याची वाट पाहत, 'आयुष्याकडून शिकत राहणे' हेच तत्व अंगीकारले, आणि चालत राहिली.
कितीही कठीण कठीण काळ आला तरी, असणाऱ्या जबाबदाऱ्या लढण्याचे बळ देतात. आणि परिस्थिती प्रमाणे बदलवले, किंवा बदल घडवून आणला तर.. जगणे सुसह्य होते.

आणि जे वहीत उतरले आहे. ते नक्कीच इतरांना प्रेरणादायी असणार आहे. ते नक्कीच उघड, म्हणजे एक प्रकारचे मनाला समाधान मिळेल, पाहिलेले स्वप्न, चारोळ्या, सशक्तपणे सामोरे गेलेल्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा, आमच्यासाठी नक्कीच यशाचे 'दीपगृह' ठरेल. यात शंका नाही.

आणि हो गं मैत्रिणी,
तुझ्यातल्या प्रतिभेचे पंख लेवुन तुझी परी, पुढे वाटचाल करते आहे. तुझ्या अपुऱ्या स्वप्नांना तुझी ही लाडकी परी गवसणी घालू पाहते आहे.तु पाहिलेल्या स्वप्नांना रंग ही देणार आहे. रंग भरणार आहे.तुझ्यातला अभिनय रुपी वारसा, काव्यरूपी वारसा तिने उचलला आहे. नृत्याचीही तिला आवड आहे. आणि मेडिकलचे शिक्षण घेत घेत तिने हे जोपासलेही आहे. या सर्वांचे श्रेय तर तुलाच आहे ना! कारण एक खंबीर आई जेव्हा पाठीमागे हिमालयासारखी उभी राहते तेव्हा त्या लेकरासाठी, 'दिल है छोटासा, छोटीसी आशा, चांद तारो को छुने की आशा' हे नेहमीच प्रेरणेचे बळ देत राहते.
तिच्या येणार्या 'सुभेदार' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला यश मिळो,याच तिच्या साठी या मावशीच्या खुप खुप शुभेच्छा.

आणि गीतांजली, तुला, तुझ्या लेखणीने खुपच सुंदर लिखाण कागदावर उतरवून वाचकांच्या मनावर ताबा मिळवायचा आहे.आणि तो तु मिळवशीलच.
हीच सदिच्छा व्यक्त करते.
लिहिताना काही चुकले असेल तर क्षमस्व.
शेवटी ज्या मनातुन,लेखणीव्दारे कागदावर उतरते त्या मनासाठी…
कवि गुरू ठाकुर यांच्या शब्दांत.
'मन उधाण वाऱ्याचे,गुंज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते.
रूणझुणते, गुणगुणते,कधी गुंतते हरवते
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..

शेवटी तिचीच एक कविताआता श्रावण लागणार आहे.म्हणुन ही श्रावण कविता..

ग्रीष्माने भेगाळलेल्या धरीत्रीला
देतोस आलिंगन जेंव्हा,
गंधाळलेल्या मातीतून उगवतो
नवा श्वास तेंव्हा।।

तूझ्या येण्याच्या चाहूलीने कळी
प्राजक्ताची बहरते,
खळखळती सरीता
नव्याने मोहरते।।

गिरक्या घेत वारा
पक्षांसह नाचतो,
ढगांचा डोलारा
विजांसवे हसतो।।

हिरवाईचं नवं स्वप्न
धरतील गाठतं,
इवल्या इवल्या पात्यांनी
रान सारं नटतं।।

दुधाळून धबधबे
बागडू लागतात रानभर,
मानवतेचं मनंही सुगीचं दान
मागतात शेतभर......

माझ्याही मनमानसी
फुले श्रावण फुलोरा,
गितांजली आनंदाची
ओसंडते खळखळा…