मला कधी वाटले नव्हते. मला जादू केल्यागत काहीतरी शक्ती प्राप्त होईल. तसे मी स्काॅलर, चतूर, चंट, घमंडी, चुटकीसरशी काहीही आत्मसात करणारी...नाटकी, अजिबात नाहीये. गैरसमज नसावा!
दुसरे म्हणजे, मला माहित नाही ह्याला काय म्हणावे. पण न मागताच भरभरुन सगळं मिळालं माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये, तू 'हे..' कर म्हणजे तुला पुढे 'असं..' करता येईल. असे कुणीही काहीही म्हंटले नाही. तसेही मी निरुपद्रवी प्राणी. त्यामुळेही कदाचीत कुणी हात धुवून मागे लागले नाही!
माझ्या मध्ये 'जन्मताच..' असे कुठलेही विशेष नव्हते. सर्वसाधारण मुली असतात त्यापैकीच मी एक होते...दुर्लक्षित, म्हणजे हिच्यापासून फायदाही नाही कि तोटाही नाही. हाहाहा!
आपल्याला स्वतःवर हसताही यायला हवे. आणि रडत न बसता आलेली परिस्थिती समजून घेऊन त्याचे दुःख न करता त्यातून मार्ग काढायला हवा. हेच मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याकडून अनुभवाने शिकले आणि अजूनही शिकतेच आहे.
सुरुवात माझ्या बाबांपासून करते. माझ्या बाबांचे आयुष्य संघर्षात गेले. अठराव्या वर्षी चौदा वर्षीय आई सोबत लग्न झाले. बाबा शेतकरी कुंटुंबातले. त्याकाळात बाबा त्यांच्या आईवडीलांपुढे बोलू शकत नव्हते. त्यामुळे जुजबी शिक्षण घेतल्यावर त्यांना शेती कामासाठी प्रोत्साहित करण्यात आले. पण त्यांचे मन शेतीत रमत नव्हते. लग्नं झाल्यावर तर त्यांनी मनोमन ठरवले आणि आईला माझ्या मोठ्या दोन बहिणींसोबत बहाण्याने माहेरी पाठवून, कुणालाच न सांगता मुंबईला निघून गेले. खरेतर त्यांचे काका तेथे असल्यामुळेच गेलेत. आणि इथेच त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले. भगवंताला माझ्या सारखे दुर्मीळ नक्षत्र हे महानगरी मुंबईत जन्माला यावे असे वाटत असावे...कदाचीत!
थोड बस्तान बसल्यावर आईला बोलावून घेतले. संघर्ष सुरुच होता. माझा जन्म जेजे हाॅस्पीटलला झाला. त्याचवेळेस त्यांना सेंट्रल गर्वमेंटची बीएआरसी मध्ये नोकरी मिळाली. म्हणून मला ते लकी समजायचे{माझं लक बघा, तिसरीही मुलगीच तरी...माझाच विश्वास नाहीये...}बालपण वरळी कोळीवाडा गावात गेले. मी नेहमीच बाबांच्या लाडाची लेक होते. त्यानंतर दोन भाऊ झालेत. म्हणूनही माझा पायगुण चांगला समजायचे बाबा{हेही सहजच झाले. माझा काहीच वाटा नाही. तरीसुद्धा पायगुणही चांगला समजल्या गेला...}.
मुळात मी फारच कमी बोलायचे. हो, नाही मध्ये मान डोलावणे. एवढेच माहित होते. मला कुणी रागावले, माझी चूक नसली तरिही मी काहीच बोलायचे नाही. त्यामुळे, 'भल्लीच बह्याड पोरगी हाये बाप्पा..!' माझी आज्जी म्हणायची. आईची आई...!
अर्थात तुमच्या लक्षात आले असेलच, 'घरकी मुर्गी दाल बराबर' हे वाक्य इथे अगदी फिट्ट बसतं.
मी दहा वर्षाची असे पर्यंत वरळी कोळीवाड्यात वाढत होते.
लहानच नां मी..? दोन मोठ्या बहिणी. सर्वात मोठी बहिण म्हणजे, घरातील 'दादा' माणूस...बाबांच्या नंतर, आम्हा बापड्या भावंडांसाठी...तिने आॅर्डर दिले ते सगळे पूर्ण करायचेच.
तेव्हा वडीलांच्या पुढे बोलायची हिंमत नसायची. गरजेचं जे लागेल ते आईला सांगायचे मग ती बाबांना सांगणार त्यांना वाटले तर आमची मागणी मान्य नाहीतर नाही.
पण नंतर ह्यातली लबाडी कळली होऽऽ
तेही मोठे झाल्यावर. बाबा तर अगदी कोमल ह्रदयी...त्यांच्या नावाचा गैरवापर मुलींना, मुलांना धाकात, काबूत ठेवायला, आईचे ते 'बीनधारेचे' हत्यार असायचे...!
आता मी कशी? हे ऐकाऽऽ अभ्यासाचा मला भारीच कंटाळा. माझी मोठी बहिण माझ्यावर लक्ष ठेवून असायची. शाळेतही जायचा मला कंटाळा यायचा. शाळेच्या नावाने माझे सकाळीच पोट दुखायला लागायचे. कधी कधी तर कंटाळून शाळेतही पोट दुखायचे. आणि मी अर्धी शाळा करुन घरी परतायचे. तेव्हा मी ज्या काळात होते. ज्या वातावरणात वाढत होते. तेव्हा कुणी हात धरुन नां शाळेत घेऊन जात होतं नाही कुणी घ्यायला गेटवर ताटकळत उभे राहत होतं. आपल आपणच बुवा जाण येण करायचं. {बघा किती डेअरींग लहानपणात...} तर, अर्धी शाळा करुन परत आलेल्या लेकीला आई प्रेमाने समजून घ्यायची. मात्र नेमके माझी ही सर्वात मोठी बहिण सगळ हेरुन घ्यायची. हेर कुठली...मग पुन्हा मला आल्यापावली आईचे पण काहीही न ऐकता, शाळेत पोहोचवून द्यायची. नंतर, 'अभ्यास कर हां चांगला. आज मी तुझा अभ्यास तपासणार...' सांगून मोकळी व्हायची. ही माझी बहिण अभ्यासात फार हूशार.
तिच्या धाकानेच मी मात्र तिला दाखवायसाठी, पाटीवर काही चित्र काढून ठेवायचे. बाईने काही लिहायला सांगितलेले पुसल्या जावू नये म्हणून जीवापाड जपून ठेवायचे. ती घ्यायला आली की, पटकन तिला पाटी दाखवायचे. {अचूक बाण मारल्यासारखा माझा चेहरा खुललेला असायचा तेव्हा...} आणि शाब्बासकी मिळवायचे...!
आता वाटतेय, तिचा धाक होता म्हणून काही लिहायला शिकले तरी...नाही तर काला अक्षर भैस बराबरही झालं असत बाप्पाऽऽ अशीच म्हण आहे नां? नाहीतर तुम्ही माझ्या लिखानाला मुकलेच असते...!
फक्त माझ्या मैत्रिणींमध्ये माझे तोंड उघडायचे, मी भरभरुन बोलायचे. खडपांचा तट असलेला अरबी समुद्र आणि त्याच्या विरुद्ध दिशेने असलेल्या वाळूच्या समुद्रात जमेल त्या रविवारी पोहायला, मोठ्या बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणीं सोबत जायचे. अर्थात तरिही मी पट्टीची जलतरणपटू कधी बनलेच नाही हो...!
बालपण सर्व धर्मीयात गेले. सगळेच एकत्रित सगळ्याच सणवारात सामील असायचे. एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण मी तिथे अनुभवले.
त्यानंतर एका उन्हाळ्यात आईबाबा गावी लग्नाला गेलेतं. सोबत शेंडेफळ आणि मोठी बहिण होती. मधले आम्ही तिघे घरीच होतो. काही दिवसाने बाबा एकटेच परत आले...अनपेक्षित पणे मोठ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेवून...!
काकांच्या लग्नांतच तिच्या होणार्या जीवनसाथीचे पिताश्री आले होते. मग आईबाबांना एक निर्णय घ्यावा लागला. कारण लग्नानंतर मुंबईहून अमरावतीला यायचे जायचे...परवडणारे नव्हते. तिचे सणवार करायला म्हणून गावी स्थायीक व्हायचा निर्णय झाला.
यथासांग बहिणीचे लग्न झाले.
गावी घरी आलोत. बडनेरच्या शाळेत पाचवीला अॅडमीशन झाली. जीवन पुन्हा एकदा बदलले. पहाटेच चार पाचलाच उठून रात्री सहा सात वाजता जेवण आटोपून जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत मुलं, लोक झोपले असायचे. दररोजचे मनोरंजन तर नाहीच नाही. पण आमची आज्जी अजून बाजूच्या दोन चार आज्जी, काकी काका, भाऊ बहिणी मिळून गमती जमती चालायच्या. कधी कथा सांगायच्या. भूताखेताच्या गोष्टींपासून एकमेकींच्या तरुणपणातील संघर्षाच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या.
मुंबईला गणपतीत पडद्यावरील पुष्कळ सिनेमे बघितलेत. ऋषी कपूर नीतू सिंगची शूटिंग बघितली. तर गावी साधा टिव्ही सुद्धा कुणी बघितला नव्हता. तसे तीन किलोमीटरवर बडनेरला छोटी परमनंट टाॅकीज होती.
जसे जसे वाढत गेले. वेगवेगळ्या विचारसरणीची लोक भेटत गेले. वेगवेगळ्या थरातील लोकांशी संपर्क आला.
ताईचे लग्नं झाले. तिच्या लग्नात तेव्हाचे खासदार नंतरचे राज्यपाल रा सु गवई साहेब सपत्नीक गावी आले होते. माजी आमदार सासरे आणि शिक्षिका सासूबाई असलेल्या घरची ती सून झाली. पण जेव्हा कधी ती सणा निमित्त घरी आली. मी वचकून असायचे. पण आश्चर्य असे की, पहिल्या वेळे पासूनच ती पुर्णतः बदलली. हळूहळू तर ती एका प्रेमळ बाईत रुपांतरीत झाली.
आमचा कोळीवाडा सुटला. तसे बाबांना मानखुर्दच्या अणुशक्तीनगरला काॅर्टर मिळाले. इकडे आम्ही चार भावंडे आई समवेत गावी सेट होत होतो. कुठे मुंबई आणि कुठे गाव. सगळीकडे मातीची घरे. सडासंमार्जन पहाटेच. आमचा मुंबईचा पितळेचा स्टोव्ह आता धाबल्यावर जावून बसला होता. मधल्या वेळेत अचानक शहरातून कुणी आल्यास चहापाणी करण्यासाठी तो खाली यायचा. त्यात टाकायला एखाद लिटरची कॅन राॅकेल भरुन ठेवून असायची.
गावात सगळे सणवार पुन्हा एकदा नव्याने कळले. दिवाळीत येत असलेली 'गवळण' हा प्रकार तर फारच आवडला. त्याचबरोबर, नागपंचमीला 'नाग' अंगात येतो. हेही तिथेच कळले. झपाटणे काय असतं. भूत कसं लागतं आणि भूताला अंगातून कसे बाहेर काढतात. तेही तिथेच बघितले. मनोरंजनासाठी त्याकाळी, 'पोवाडा' हा प्रकार फारच प्रचलित होता. आपल्या मातीतील शूरवीरांचे किस्से, पोवाड्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचे ते एक माध्यम होते जुन्याकाळी म्हणजे आमच्याही आधीच्या पिढीसाठी. अधून मधून 'नाटक' बघायला मिळायचे. बडनेरला, एक दोनदा मुशायरा बघितला. त्यातली जुगलबंदी खुपच भावली होती मला. आॅर्केस्र्टाही अधून मधून बघितलेत बडनेरला.
मी बडनेरच्या शाळेत जायचे. आमच्या गावात सातवी पर्यंतच शाळा होती. तीन किमी पैदल जायचे आणि पैदलच यायचे. सकाळी उठल्यापासून शाळेचीच तयारी करायचे. परतीला संध्याकाळ व्हायची. त्यामुळे स्वयंपाक वगैरे कधी मला आईने करु दिला नाही.
आई गावी आल्यावर शेतकरीण बनली होती. सगळी कामे ती स्वतःच करायची. मुख्य म्हणजे आईला कामाचा अजिबात अनुभव नव्हता. पण बाकीच्यांचे बघून ती शिकली. आई अमरावतीच्या मराठी होली क्राॅस ख्रिश्चन शाळेत बोर्डींग मध्ये राहून सातवी पर्यंत शिकली होती.
मोठ्या ताईनंतर दुसर्या ताईचेही लवकरच लग्नं झाले. तिचे सासरे शिक्षक होते. पण तिच्या लग्नाआधीच निवर्तले होते. ती औरंगाबादला गेल्यावर मग सगळी कामे आईवरच पडली. शिवाय दोन्ही मुलींचे सणवार करायचे. बाळंतपण करायचे. माझी हवी तशी मदत तिला कधी झाली नाही. किंबहूना तिला मी शाळेत पायी जाते येते. थकते मी फार..असे वाटायचे. म्हणून ती मला काम सांगत नसे.
तू अभ्यास कर म्हणायची.
पण माझा अभ्यास घेणारे किंवा मला मार्गदर्शन करणारे घरी कुणीच नव्हते. बाबा दिवाळी, होळीला फक्त गावी यायचे. त्यांची महिन्याला मनीआॅर्डर यायची. तीन मुलींचे फार टेंन्शन होते दोघांनाही. त्यामुळे जेवढी होईल तेवढी बचत करीत असत. शिवाय सुरक्षेची चिंता असे. त्यामुळे मुली वयात आल्या काय...नी चांगली स्थळं चालून आलीत की लावले लग्नं...आणि पटापट जबाबदारीतून मोकळे व्हायचे.
काही दिवस मी बाबांच्या माजी आमदार काकांच्या घरी थांबले होते. मी तेथल्याच राजेश्वरी युनीयन हायस्कूल आणि ज्युनीयर विद्यालयात शिकत होते. टायपिंग क्लास आणि ट्यूशन तिथेच होती. त्यानंतर अचानक एक दिवस आबाजींच्या ओळखीतल्या मुख्यसेविका, त्यांच्या डाॅक्टर भावा सोबत तिथे आल्या. चहापाणी नाश्ता झाला.
त्यानंतर बाबा मुंबईहून आले. काकीला म्हणाले,'संगीताला साडी नेसवं. आज मुलगा बघायला येणार आहे.' आबाजींच्या त्याघरी नाही तर आमच्या शेतालगतच्या त्यांच्या मळ्यातच पाहूणे येणार होते. तिथेच जेवणाची व्यवस्था केली होती. प्रशस्त घर होते मळ्यात. काकीने मला साडी नेसवली. 'तू कशासाठी चाललीस माहित आहे का तुला ?' काकीने मला विचारले. मी डोके नकारार्थी हलवले. 'अगं मग विचार नां बाबांना...!' ती हसत म्हणाली. मळ्यात जाताना रिक्षात बसले होते. ''बाबा आपण कशासाठी जातोय शेतात..?'' सहजतेने पण चाचरतच विचारले. ''तुला काय करायचे....?'' उत्तर ऐकून चूप बसले मी.
स्वतःला एक्सप्रेस करता येत नव्हते. एवढे मात्र होते. आमच्या घरात किंवा बाजूच्यांच्या घरात बल्ब गेले की लावायचे काम माझे. टेपरेकाॅर्डर मध्ये कॅसेट अडकली की मी त्या मध्ये पेन्सिल टाकून व्यवस्थित पुन्हा गुंडाळणार. टेबल फॅन लावणे म्हणजे वायरच्या दोन तारा, इलेक्र्टीकच्या खोबणीत टाकून माचीसच्या काडीने फिट्ट बसवून बटण दाबणे, टेबलफॅन उघडून साफ करणे, माझे काम असायचे. विशेष म्हणजे, गावात सुरुवातीला काही महिने आम्ही कंदीलाच्या प्रकाशात काढले. मग घरी वीज आली. त्यानंतर पहिला टेपरेकाॅर्डर घरी आला.{तेथे मला मी खुप मोठी टेक्निशीयन वाटायचे}
घराजवळ सरकारी विहीर होती. ते पाणी पिण्या योग्य नव्हते.
मग दुसर्यांच्या विहीरीवरुन पिण्यासाठी पाणी शेंदून आणावे लागे. त्यानंतर गावाच्या मध्यभागी, ग्रामपंचायत कडून हापशी{बोरींग} बसवण्यात आली. पाणी हापसण्यात हातखंडा होता माझा...लागेल तेवढे पाणी, शाळेतून आल्यावर भरुन ठेवायचे.
मुंबईत मी, चंपक, चांदोबा वाचायचे. विक्रम आणि वेताळ, मायापुरी चाचा चौधरी और साबू वाचायचे. मला हायस्कूल मध्ये असताना वाचनाची जास्त गोडी निर्माण झाली. लायब्ररीतून मिळतील त्या कादंबरी, गोष्टींची पुस्तके वाचायचे. वाचन असे की, पुस्तक उघडल्यावर ते पुर्ण संपल्या शिवाय मी बाजूला ठेवत नसे.
आमची काकी नाॅवल विकत घेवून वाचायची. तिच्या जवळ हिंदी मराठी कपाट भरुन नाॅवल होते. मला आठवतं शेयरलाॅक होम्स, वेदप्रकाश मिश्रांचे तिच्या कडचे सगळेच नाॅवल तेव्हा मी अधाश्यासारखे वाचलेत. जासूसी नाॅवल जास्त आवडायचे. लहान मुलांच्या कथा असलेले तर फेवरेट होतेच. असेच खुप सारी आणि मिळेल ती पुस्तके लगेच वाचून काढायचे. माझे हिंदी आणि मराठी वाचन छान होते. त्यात मनाजोगे मार्क्स मिळायचे. क्लासमध्ये मला वाचायला सांगायचे, तेव्हा उभे राहून खड्या आवाजात मी धडा वाचायचे. हिंदीच्या टांगसाळे मॅडम नाकातून उच्चार करतं माझे कौतुक करायच्या. "तुम्हा सग्या शिंगारें मधून ही बघा कशी छान वाचते..." असे त्या म्हणायच्या. आम्ही सात शृंगारे बहिण भाऊ एकाच क्लास मध्ये होतो.
शाळेतील शिक्षक मी मुंबईवरुन आलेली. बोलण्यात मुंबईचा टोन. शिवाय बाबांचे काका माजी आमदार सर्वांच्या परिचयाचे होते. त्यामुळे वागणूक छान मिळायची. आबाजीं मुळेच राजकारणी व्यक्ती सुद्धा जवळून अनुभवायला मिळालीत.
खरेतर मी न पाहीलेले स्वप्नं सत्यात उतरले. म्हणूनच मी तुम्हाला आताच सांगून ठेवते. ''आता ह्या घडीला मी मात्र काही स्वप्नं पाहिली आहेत. आणि ती मी पुर्ण करणारच. ती जेव्हा पुर्ण होतील तेव्हा नक्कीच मी ईरावर शेयर करणार!"
तर, आता पुन्हा माझ्या बघण्याच्या कार्यक्रमाकडे वळते. तुम्हाला जरा वरचा पॅरा पुन्हा आठवायचा असल्यास बघा हाहाहाऽऽ सकाळची वेळ सांगूनही वेळेवर न आल्यामुळे, पाहूण्यांची वाट बघून कंटाळलेले आम्ही...सुस्तावलो होतो. तेव्हढ्यात डुगडुगडुगडुग करत एक बुलेट येऊन थांबली. बारीकशी अंगकाठी म्हणजे ब्रुसली सारखी असलेला सावळासा मुलगा. सोबत बडनेरला आजोबांच्या घरी आलेल्या ताई आणि त्यांचा लहान मुलगा उतरले. {ब्रुसलीचे फॅन आणि कराटे ब्राऊनबेल्ट आहेत थोरात सर म्हणून ब्रुसलीचा उल्लेख केला} बुलेटच्या आवाजाने सगळ्यांची पळापळ झाली. तिकडे आजोबांनी माझ्या नावाचा पुकारा केला. पाणी घेवून ये लवकर...मी तशीच विस्कळीत झालेली साडी कंबरेला खोचून. केस हाताने निट केले. आणि हातात, गडवा ग्लास घेवून सगळ्यांना पाणी पाजले. नंतरचे सोपस्कार झाले. माझ्याशी बोलणे झाले. जेवण करुन मंडळी गेली. दुसर्या दिवशी तिकडून होकार आला...!
माझे गावातील घरदार न बघताच मुलाने होकार कळवला.
लगेच महिन्याभरात लग्नं करायचे ठरले. काही मागणी असेल तर सांगा...आजोबांनी मुलाला विचारले. मला काहीही नको. पण रिवाजा प्रमाणे मुलीला कपडे आणि दागिने मी घेतो म्हणाले. पण बाबांनी कपडे, चेन, अंगठी नवर्यामुलाला दिली. त्याकाळी हुंडा पद्धती होती. मुलगा नोकरदार म्हंटला की, त्यांची तेवढीच मोठी मागणी असायची. आईवडील असे जावई मिळविण्या साठी कितीही हुंडा मोजायला तयार असायचे. मला अपेक्षा न ठेवताच चिफसाहेब नवरा मिळाला होता.
बोर्डाच्या एक्झामचा रिजल्ट लागायच्या आधीच माझ्या जीवनाचा निकाल लागला होता. मी एमपीएससी मार्फत पहिले आलेल्या अत्यंत हुशार, हरहुन्नरी पीएसआयची सहचारिणी बनले होते.
पुन्हा एकदा माझे जीवन बदलले होते. लहान वयातच मोठ्ठ्या घरात मी लग्नं होवून गेले. सगळी नाती मोठ्ठी होती. घरातील सगळेच उच्च शिक्षित, सासरे शिक्षक होते. माझ्या लग्नाआधी निर्वतले होते. शिक्षणाचा थोरात परिवारात बोलबाला होता. माझे सासर तळेगावातील प्रतिष्ठीत परिवार होता. सासूबाई आणि डाॅक्टर दिर फक्त गावी होते. बाकी मंडळी नोकरी निमीत्ताने वेगवेळ्या ठिकाणी होते. माझ्या मनावर एकदमच दडपण आले होते. सगळ्यात वयाने लहान होते मी. समज नव्हती मला हवी तशी.
सुरुवातीला नवर्याने इकडच्या तिकडच्या गप्पा सांगितल्या की, हो नाही म्हणायचे. माझी माहेरची जीवनशैली वेगळी होती. आणि ह्यांची एकदमच वेगळी. अधिकार्याचा थाट होता. इकडून तिकडून पोलीस आले की सॅल्यूट ठोकणार. जिकडे तिकडे मान सन्मान...आदर सत्कार...दडपणातही ते नेतील तिकडे जायचे. तोंडाला कुलुप असायचे माझ्या. 'फारच कमी बोलतात बाईसाहेब' काहीजण म्हणायचे. हे हसायचे...मी पण हसायचे. आतील 'गोम' माझी मला ठावूक....!
माझ्या जवळ बोलायला काहीच नसायचे. काॅलेजमध्ये अॅडमिशन घेवून झाली. पुस्तकं येवून पडलीत. माझ्याशी जेव्हा बाकीच्या स्त्रीया बोलायच्या, मी मूक दर्शक असायचे. त्या आपापसात भरपूर इकडच्या तिकडच्या गप्पा करायच्या. मी मनात म्हणायचे,'हे एवढे ह्यांना अनुभव कसे...? कश्या काय एवढ्या गप्पा करतात ह्या बाया..?' दुसरे म्हणजे माझे काॅमीक्स वाचणे अजूनही बंद झाले नव्हते. भाचे मंडळीं सोबत मजेत मी काॅमीक्स वाचायचे.
त्यातच पहिली मुलगी झाली. संसाराची जबाबदारी सांभाळायला शिकतच होते की, बाळ पदरात आले. काॅलेजचा रस्ताही विसरले मी. पुढल्या वर्षी पुन्हा अॅडमिशन झाली. नंतर लगेच ट्रांन्सफर...अरे, आता कुठे तिथल्या बायांना मी ओळखायला लागले होते. पुस्तकात डोके घालायचे होते....तेव्हढ्यात दुसरीकडे गेलो पण. तिथे थोडेफार बोलायला, काही पदार्थ शिकायला सुरुवात झाली. लायब्ररीतून घरपोच पुस्तक यायला लागली. न्यूजपेपर तर १५० किलोमीटरचा प्रवास करुन संध्याकाळी चार वाजता वाचायला मिळायचा. ब्लॅक अॅन्ड व्हाईट पोर्टेबल टिवी आणि शंभरेक फुटाचा भरपूर दांड्या असलेला अँटीना हलवून अॅडजस्ट करुन कसेबसे ठरावीक वेळेत मोजके कार्यक्रम बघायचे. तेवढे ते मनोरंजनाचे साधन. माझे तेव्हा जीवनात 'लक्ष्य' नव्हते कुठलेही. किंबहूना कुणी माझ्यामध्ये ते निर्माण केले नाही. त्यामुळे जशी परिस्थिती येईल तसे मार्गक्रमण सुरु होते.
नवर्याला अजूनही पुर्णपणे मी जाणले नव्हते. पोलीस खात्यातील नोकरी. ठाणेदार असल्यामुळे कधीही समस्या आल्या की, जावे लागायचे. त्यांच विश्व तर माझ्या कल्पने पलिकडचे. तरीही जाणून घ्यायची इच्छा व्हायची. पण ते एवढ्या घाईत असायचे की, त्यांना बोलायला किंवा एखादी गोष्ट समजवायला वेळच नसायचा. यदाकदाचीत त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितले तर, ते माझ्या डोक्यावरुन जायचे....!
हळूहळू त्यांनाही माझी महान बुद्धीमत्ता कळून चुकली होती. म्हणून ते मला समजवण्याच्या भानगडीत पडत नसतं...पण जेव्हा मी दुसरे नवरा बायको बघायचे, मला वाटायचे हे कसे काय इतके छान बोलतात एकमेकां सोबत..? नवर्याचा इशारा बायकोला समजतो. बायकोचा इशारा नवर्याला समजतो...!
मला वाईट वाटायचे. आपल्या डोक्यात का नाही जात ह्या गोष्टी..? स्वतःला प्रश्नं करायची.{पण आता परिस्थिती बदललीये}. नवीन आणि चांगले ते सगळे मी आत्मसात करत होते. अश्यातच दुसरी मुलगी आणि त्यानंतर तिसरे अपत्य मुलगा झाला. बहिणीला भाऊ असावा. हे माझे स्वप्नं पुर्ण झाले.
हळूहळू मी स्वतःला स्वतःच पुढे नेत होते. एव्हाना तेरा वर्षात दहा ट्रांन्सफर झाल्या होत्या. नवीन ठिकाणचे अनुभव गाठीला येत होते. बुलढाण्याला असताना. तिथल्या जिल्हा स्तरावरील महत्वाच्या पोस्टवर असणार्या अधिकार्यांच्या पत्नींच्या ग्रुपमध्ये सामील झाले. आणि हळूहळू माझी कळी खुलली. मला खुप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. मला व्यक्त होता येवू लागले.
दरम्यान मी, विणकाम शिकले. ब्युटीशीयनचा कोर्स केला. कपडे डिझाईन करुन शिवायला शिकले. त्याच बरोबर लेदर बॅग डिझाईन करुन शिवणे शिकले. केकतर लग्नाआधीच कुकरमध्ये रेतीभरुन त्यात करायला काकीकडून शिकले होते.{ती एकमेव उपलब्धी लग्नाआधीची} आईस्क्रीम ते नवीन पदार्थ बनवायला शिकले. टुव्हिलर-ड्रायविंग शिकले. स्विमींगचा क्लास लावला पण नंतर ते स्वप्नं अधूरेच राहिले. कितीही वाजता माझ्याकडे आलेला पाहूणा कधीच उपाशी राहिला नाही. पंधरा वीस लोकांचा स्वयंपाक मी करुन घ्यायचे. कारण तेव्हा आजच्या सारखे हाॅटेल, स्वीगी उपलब्ध नव्हते. पोलीस स्टेशनच्या इंन्सपेक्शन मध्येतर खुप भार पडायचा स्वयंपाकाचा. मला सांगायला आवडेल, 'अन्नपुर्णा' म्हंटले होते मला त्यावेळेस एका सरांनी!
बरं, ह्या धावपळीत वाढलेल्या वजनाने नंतर लक्ष वेधले. मग जीम सुरु झाले. व्यायामाचे सगळे प्रकार करुन वजन कमी केले आणि नंतर दुपटीने पुन्हा वाढवले सुद्धा...
इथे मी नमूद करु इच्छीते. माझी लढाई माझ्या सोबतच होती. कुठे तरी कमी पणाची भावना मनात होती. मी काही वाक्ये ऐकली होती. माझ्या समोर काही जणांच्या चर्चा व्हायच्या, त्यांच्या बोलण्यात हे असायचे. कमी शिकलेल्यांना बुद्धी जास्त नसते. आणि म्हणून त्यांनी कुणाला शिकवण्याची गरज नसते. कमी शिकलेल्यांशी कसेही वागले तरी त्या इतरांशी चांगल्या वागतात. कसे, मानी असायला हवे. मानसन्मान मिळायलाच हवा. हे कमी शिकलेले आपल्याला शिकवणार का ? इत्यादी.
इथे मी वाचकांना सांगू इच्छीते. अश्या कमेंट्सने आपले खच्चीकरन होऊ देऊ नये. कुणाला कमी लेखू नये आणि कुणालाही चॅलेंज द्यायची गरज नाहीये. आपल्यासाठी फक्त स्वतःसाठी चांगले ते नेहमीच आत्मसात करण्याकडे कल असावा. कुणाला पदवीचा नोकरीचा गर्व असेल तर, ते त्यांचे त्यांच्या जवळ...आपण माणूसकीत अव्वल राहायचे. उच्च संस्कार अंगिकारावे कारण हे संस्कार तुम्हाला आयुष्यभर पुरतात. आणि पुढे आपल्या भावी पिढीला आपोआपच मिळतात.
माझा वावर उच्चशिक्षित आणि नवरा अधिकारी असल्यामुळे त्या लेव्हलच्या परिवारात होत होता. माझी सवय चांगले ते ग्रहण करण्याची होती. त्यामुळे मी सगळ्यांकडून आपोआप शिकत होते...
नागपूरला बदलून येईस्तोवर मी चांगलीच तयार झाले होते. आपण कुठेही न घाबरता बोलू शकतो...हे एव्हाना कळले होते मला. पुढे तर मुलांच्या काॅलेज अॅडमीशनला मुलांसोबत पुण्यापर्यंत गेले आहे. प्राचार्यां सोबत बोलणे चर्चा करणे आणि त्यानंतर तुम्ही कुठे जाॅब करता? हे ऐकायला फारच छान वाटायचे.
मी अभ्यासात यथातथाच, तरीसुद्धा मुलाचा अभ्यास चौथी पर्यंत घेतला. मुलगा पहिल्या दुसर्या नंबरने पास व्हायचा. नंतरचा आयसीएसई अभ्यासक्रम माझ्या आवाक्या बाहेरचा होता. त्याचा तोच करायचा. तीनही मुले काॅन्वेंन्ट शिक्षित आहेत. थोरात सरांनी अॅडमिशन करुन दिली की पुढे पेरेंट्स मिटींग आणि सगळे सोपस्कार मी पार पाडायचे. मला सांगायला आवडेल नवर्या प्रमाणेच माझी तीनही मुले हूशार आहेत. ह्या बाबतीत माझ्यावर अजिबात गेली नाहीयेत...!
२००४ मध्ये नागपूरला बदलून आलोत. आता पर्यंत छोट्या सीटीत आणि खेडेगावात पोस्टींग झालेल्या होत्या. पुन्हा एकदा जीवनशैली बदलली. एक एक करुन महिलांच्या अनेक ग्रुप मध्ये मी सामील झाले. सर्वसमावेशक स्त्रियांमध्ये उठणे बसणे वाढले. माझ्या ज्ञान्यात भर पडतच होती. नागपूरातल्या जवळ जवळ सगळ्याच कानाकोपर्यात माझ्या ओळखीच्या स्त्रिया आहेत.
जमेल तशी माझ्या आवाक्यातील कुणाला मदतीची गरज असेल ती करत असते. थोडे समाजकार्य करत असते. मी कमावती नाहीये. म्हणून मग माझ्या आवाक्यातीलच काम करते. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या कडे काम करणार्यांच्या मुलांना वर्षभराचे पुस्तके बुक्स आणि इतर साहित्य द्यायचे. {आता घरची कामे स्वतःच करते}
दुसर्यांच्या भावना समजून चांगले वागावे...स्वाभिमान बाळगावा पण तुटेल एवढे ताणू नये. असे माझे मुलांना सांगणे असते. अंधश्रद्धेला कधीही आमचा परिवार खतपाणी घालत नाही. माझी मुलं उच्चशिक्षित आहेत. भारताचे चांगले नागरीक घडावे असा माझा प्रयत्न होता आणि आहे.
मी नागपूर मध्ये पोलीस अधिकार्यांच्या पत्नींचा ग्रुप स्थापन केला. आजही तो ग्रुप आहे. वेळे अभावी माझी हजेरी बर्याच ग्रुप मधून कमी झाली आहे आता...
माझ्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. खरे आणि प्रामाणीक वागायची आवड आहे. मला दुसर्यांचे कौतुक करताना अजिबात अखरत नाही. मनापासून आनंद होतो. आणि तो माझ्या शब्दांतून व्यक्त होतो. मला त्रास झाला तर चालेल. माझ्यामुळे दुसर्यांना त्रास नको व्हायला, असं मला वाटतं. मैत्रीमध्ये दूजाभाव करणार्या व्यक्ती मला आवडत नाहीत. जे आवडत नाही ते जबरदस्तीने कुणीही माझ्याकडून करुन घेऊ शकत नाही. खोटी तारीफ कधीच माझ्या मुखातून निघत नाही. मी मुद्दामहून बेअदबी करत नाही. माझ्यासोबत तसे वागलेले मी खपवून घेत नाही. माझ्या आवाक्यातील गोष्टीत इतरांना मदत करायला आवडते आणि नाही जमल्यास स्पष्टपणे सांगते. पण, आजकाल पुन्हा एक बदल होतोय. मन खुप हळवं होतय. आजूबाजूचे दुःख बघवत नाहीये...सगळ्यांना आनंद नाही मिळू शकत का जगात...?
जगावर कोरोनाने आघात केला. फिरत फिरत आपल्या पर्यंत येऊन पोचला. हा महाभयंकर काळ होता. अगदी फोनवर सुद्धा बोलायला लोकं घाबरायचे. आॅनलाईनचीच ह्या वातावरणात साथ बाकी राहीली होती. सगळ्यांनी आॅनलाईनचे महत्व जाणले. कुठेतरी नेहमीचा मार्ग बंद झाल्यास आपण पर्यायी मार्ग शोधतोच. त्याप्रमाणेच फेसबुक, वाॅट्सअपचा मार्ग लोकांना व्यक्त व्हायला मदत करु लागला. एकट्या दुकट्याच्या मनाला उभारी देवू लागला.
टिव्ही हे माध्यम होते चालू घडामोडी जाणून घ्यायसाठी. पण भडकावू, त्याच त्या बातम्या ऐकून आम्ही तर थोडा वेळ ठरावीक वेळेत बातम्या बघून टिव्ही बंद करायचो.
आम्ही पाच व्यक्ती घरात होतो. बंद दाराआड बोलून बोलून किती बोलणार..? प्रत्येकाच्या हाती मोबाईल होता. मग सगळेच मोबाईल वर व्यस्त राहू लागले.
पण टिव्ही वर राजकारणी लोकांचे आणि पुर्ण देशभरातील राजकारण्यांचे व्यक्तव्य, वागणे मनात कुठे तरी क्षोभ उत्पन्न करत होते. काळवेळ न बघता प्रक्षोभक बोलणार्यांची चीड येवू लागली. मग ती चीड वाॅट्सअपच्या स्टेट्स वर लिहू लागले. जवळचेही वाचून सहमती देवू लागले. तुमची लेखणी धारदार पणे बोलते, असेही वाक्य ऐकले.
मग काही दिवसातच मी मुलांना फेसबुक डाऊनलोड करायला सांगितले. कारण ही टेक्नाॅलाॅजी मला हँण्डल करता येत नव्हती. मुलांनी तुला जमणार नाही. चांगले नसते...म्हणून माझी बोळवण करायचा प्रयत्न केला. पण मी त्यांची आई होते. "तुम्ही फक्त मला डाऊनलोड करुन समजवून सांगा. ते चांगले की वाईट ते मी ठरवणार...!" म्हणून माझे काम करुन घेतले.
आधी माझ्या एफबी अकाऊंट वर लिहीले. नंतर आलेल्या लिंक वरुन दोन तीन साहित्यिक ग्रुपला अॅड झाले. आणि पहिला लेख मी 'चिखलदरा ट्रिपचा' लिहीला. ज्यांनी माझा अनुभव वाचला. "आम्ही त्या ठिकाणी फिरुन आलो..नजरे समोर चित्र उभे राहीले...!" अश्या काॅम्प्लीमेंट दिल्या.
हुरुप वाढून काही लेख लिहू लागले. प्रतिक्रिया मिळाल्या की छान वाटायचे. साहित्यिक ग्रुपवर असताना मला कवितांचे वेगवेगळे प्रकार दिसलेत. मग मी ते प्रकार जाणून घेण्यासाठी फेसबुकवरच काही जणांना प्रश्न विचारलेत. पण कुणी व्यवस्थित माहिती दिली नाही. माझ्या मुलीने मला गुगलचा पत्ता दिला. सर्च करुन झाले. कविता कश्या असाव्यात? त्यापुढे काहीतरी खिल्ली उडवणारे शेरे असायचे...आहेत गुगलवर!
इथे मला गुगलने माहिती पुरवली नाही.
अंगभूत टॅलेंट असणारे वेगळे. आणि कोरोना काळात सुचत असणारे वेगळेच. तरीही स्वतः समजून घेवून निरीक्षण करुन मी, चारोळी, कविता, हिंदी रचना बर्यापैकी लिहू लागले. प्रतिक्रियाही छान मिळतच होत्या.
त्यातच साहित्यसंपदाच्या आॅनलाईन विश्वविक्रमी काव्य वाचनात सहभाग घेतला. पहिल्यांदा मी लाईव आले. आणि मी नवखी वाटलेच नाही. असे बघणार्यांनी म्हंटले. साहित्यसंपदावरच नवकवींना पुस्तकांसाठी प्रेरित करणारा मेसेज वाचला. दिलेल्या नंबरवर सहजच मी मेसेज केला. माझे पुस्तक बनेल का ? म्हणून विचारले. 'का नाही बनणार..'वैभव धनावडे सरांचा रिप्लाय होता. तरीही विश्वास बसत नव्हता. म्हंटले ह्यांना माझे साहित्य पाठवते. रिजेक्टच होईल. मनाची तयारी होतीच. साहित्य पाठवले. आणि वैभव सरांनी, कमी खर्चात पुस्तक निर्मिती केली...ते त्यांचे 'एमच' होते.
गंमत अशी की, एका वेळेस माझे चारोळीबंध, कविताबंध आणि हिंदी रचना संग्रह असे तीन पुस्तके साहित्यसंपदा प्रकाशना मार्फत तयार झाले. पुढे पण गंमत अशी की, मी हे सगळे घरातील कुणालाच कळू दिले नाही. घरातल्यांना विशेष म्हणजे नवर्याला मला सरप्राईज द्यायचे होते. आणि प्रकाशन संस्थेनेही मला साथ दिली. खुपच मोठ्ठा फाफट पसारा होता पुस्तक निर्मिती म्हणजे. आणि तेही आॅनलाईन...कुणालाही पर्सनली ओळखत नव्हते. आॅनलाईन विश्वासावर हे सगळे सुरु होते. अगदी प्रस्तावना घेताना सुद्धा त्यांना सरप्राईज आहे, हे सांगूनच घेतली....महानगरपालीका आयुक्त सुधीर शंभरकर, अॅड. महेंन्र्द तायडे आणि प्रा.जेष्ठ सा.अशोक थोरात दादांची प्रस्तावना मिळवली.
बरे पुढे, पुस्तक प्रकाशन साहित्यसंपदाच्या 'डिजीटल पर्व' ह्या युट्यूब चॅनेलवर होणार होते. त्यासाठीही आॅनलाईन प्रकाशक हवे होते. मग साहित्यिक ग्रुपवर ओळख झालेल्या. डाॅ रश्मी अग्रवाल, डाॅ मुक्ता आगाशे आणि डाॅ श्रद्धा वाशीमकर मॅडमना प्रकाशना साठी म्हंटले. त्यांनीही होकार दिला. त्यानंतर निवेदीका म्हणून बीएसएनएल मध्ये अधिकारी असलेली माझी जवळची वैशाली करडे तयार झाली. अगदी घरी बसून जणू चित्रपट बनवत होते मी. आॅनलाईन असल्यामुळे स्क्रिप्ट तयार करुन शिस्तबद्ध पणे सर्व कार्य सुरु होते.
शेवटी प्रकाशनाच्या आदल्या दिवशी घरच्यांना सांगितले. फेसबुक, वाॅट्सअप वर माहिती दिली. सगळ्यांना वाटत होते. काहीतरी एखाद्या पुस्तकात हिचे काही असेल लिहीलेले....
दुसर्या दिवशी ११ आॅगस्ट २०२१ ला प्रकाशनचा आॅनलाईन सोहळा पार पडला. एकादमात माझ्या तीन पुस्तकांचे थाटात प्रकाशन झाले. आणि मग नवर्याकडे बघितले. त्यांच्या चेहर्यावर माझ्यासाठी कौतुक होते...."कसे केले हे सगळे...? एकाच घरात बंद असताना...?"
"आॅनलाईन..." माझे उत्तर होते...!
कौतुकाची ती नजर, 'तुला कुठे काही येतं...' लग्ना नंतरच्या एवढ्या वर्षा नंतर...माझ्या मनातील कमीपणाची भावना गाळून गेली....!
त्यादिवशी मला माझी जाणीव झाली. एकटीने हे सर्व केले. माझ्यात काही तरी आहे. हे जाणवले तेव्हा...नकळत डोळ्यांतून अश्रूधारा वाहायला लागल्या. आणि माझ्या सवयीनुसार मी माझे अश्रू लपवायला बेडरुम मध्ये गेले...मला कुणाही समोर स्वतःसाठी रडायला आवडत नाही.
कोरोनाला धन्यवाद दिल्यास कुणी माझ्यावर रागावू शकतं. पण हा जिवाणू आला नसता तर, माझ्यातली कला...मलाच कधी कळली नसती. मला काहीच येत नाही. माझी हीच भावना कायम राहीली असती.
मला वाटतं तुम्हाला बोर झालं असेल...म्हणून आता थोडक्यात आटोपते. नही तो अपने पास इतना कुछ अभी भी बाकी है की, एक कादंबरी बन जाये....
त्यानंतर दुसर्या वर्षी एप्रिल २०२३ मध्ये साहित्यसंपदा प्रकाशना मार्फत 'नकळत...' ही कादंबरी आली. तिचे प्रकाशन उदगीर साहित्य संमेलनात राजन लाखे सरांच्या हस्ते केले. कळस तर हा की, 'नकळत' कादंबरीला उत्कृष्ठ श्रेणीत दोन पुरस्कार मिळाले. राज्यस्तरीय साहित्यगंध आणि आशादीप पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रकाशकांनी मला न कळवताच परस्पर कादंबरी स्पर्धेत पाठवली होती..!
तत्पुर्वी ज्या व्यासपीठावर मी माझे अंतरंग आपल्या समोर उघड केले तिच्या विषयी थोडे....कारण ही साथ कायम असणार आहे आणि पुढे लिहायला खुप काही आठवणी असणार आहेत!
फेसबुकची सैर करताना ईराच्या स्पर्धेसंबंधीची पोस्ट वाचण्यात आली. एका लेखिकेचा स्पर्धेतील अनुभव वाचत होते. हिंमत करुन दिलेल्या नंबरवर मेसेज केला. आश्चर्य म्हणजे संजना मॅमचे लगेच उत्तर आले. आणि हो, तुम्ही भाग घेऊ शकता स्पर्धे मध्ये...असा मेसेजही आला.
झाले, लगेच स्पर्धेशी जुळले. वाचकहो, 'ईरा चॅम्पीयन्स ट्राफी' हीच स्पर्धा होती आणि त्यात मी पार्टीसिपेट केले. नंतर राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला. आज पुन्हा लिहीतेय....सुरुवातीला डोक्यातील विचार कथे स्वरुपात लिहीताना व्याकरणाकडे माझे लक्षच नसायचे. पण आता बरीच सुधारणा आहे.
मला पुन्हा एकदा म्हणायचे आहे. आपल्या आजू बाजूला चांगली व्यक्ती असेल तरच आपली कामे सुरळीत होतात. फक्त आपण चांगले असून चालत नाही. माझ्या साहित्य क्षेत्रातल्या प्रवासात ज्या चांगल्या व्यक्ती भेटल्यात त्यामुळे मी व्यक्त होऊ शकले. आणि आज ईरावर लिहीतेय.
माझे कर्तुत्ववान बाबा आणि कर्तुत्ववान असूनही डाऊन टू अर्थ असणार्या नवर्यामुळे जीवनात संघर्षाची वेळ आली नाही. पण आपण घेतलेले 'शिक्षण' आपल्याला घडायला मदत करतं. हे निर्विवाद सत्य आहे.
माझ्यावर कळत नकळत माझ्या नवर्याचे संस्कार पडलेत. त्यांच्याकडून आता मिळालेली शाबासकीची थाप मला आत्मीक समाधान मिळवून गेली. पन्नाशी नंतर आत्मविश्वास दुनावला.
आता माघार नाहीच. वयाचा तर प्रश्नच नाही. ही लेखिका कायम विद्यार्थी दशेत रहायला तयार आहे. तशीच वाटचाल सुरु आहे. नवे ते करण्याकडे माझा कल असतो. आणि राहणार...शेवटी,
तुमचा बुद्यांक उंच नसला तरी, सातत्य राखून तुम्ही तुमच्या मध्ये बदल करु शकता. खचायचे नाही घाबरायचे नाही. हळूहळू अनुभवा आणि आपले नुकसान न करता ती गोष्ट आत्मसात करा. हूशार व्यक्तीत्व लगेच शिकतं आपल्याला थोडा वेळ लागेल, त्यात काय? आज मी दिवसभर बसून गप्पा मारु शकते. विविध विषयांवर बोलू शकते.
ता.क. वरील सल्ले फक्त माझ्यासारख्यांसाठीच..!
चला ही विद्यार्थीनी आता आपला गाशा गुंडाळते. खुप काही शिकायचे आहे. खुप कार्य बाकी आहे. त्याकडे वळते...!
०००
०३/०८/२३
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा