Login

जीवनी आधार तू ( भाग ३ )

भक्तीच्या आयुष्यात वादळ येते पण तिच्या पतीने तिला समजावून घेतले.


भक्ती भूतकाळात शिरली होती आणि आता अचानकपणे तिला चैतन्यबरोबर कोर्टात केलेल्या रजिस्टर लग्नाची आठवण आली आणि मनावर दडपण येऊन तिला उभ्या उभ्या भोवळ आली. ती चक्कर येऊन खाली पडणार इतक्यात शुभंकर गाडी पार्क करून तिथे पोहचला होता त्याने तिला पटकन सावरले.

" भक्ती ए भक्ती, अग कशामुळे तुला चक्कर आली ? अग सावलीत तरी उभं राहायचं होतंस. ये इथे ये ह्या सावलीत बस जरावेळ. थांब मी पाणी आणतो." शुभंकरने पाण्याची बाटली आणून भक्तीला पाणी पिण्यास दिले.

" भक्ती, तू ठीक आहेस का ? तुला बरं वाटतं नसेल तर आपण जाऊया पहिलं डॉक्टरांकडे. मॉलमध्ये येऊ नंतर."

शुभंकर तिची काळजी घेत होता त्याने भक्तीला एकदम भरून आले, " मी ठीक आहे शुभंकर. आता नको जाऊया डॉक्टरांकडे. वाटलं तर जाऊ लगेच. पण आता मॉलमध्ये जाण्याचं कॅन्सल नको करूया. घेऊया पटापट सगळ्या वस्तू."

मॉलमध्ये शिरून भक्तीने ज्या हव्या होत्या त्या वस्तू भराभर घेतल्या. शुभंकर तिची काळजी घेत होता. त्याला जाणवत होतं की भक्तीमध्ये नेहमीचा उत्साह नाही. पण त्याला वाटलं की, भक्तीला अचानक भोवळ आली म्हणून तिचा मूड खराब झाला असेल.

भक्ती आणि शुभंकर खरेदी करून घरी आले. त्यापूर्वी शुभंकर जबरदस्ती भक्तीला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी थोडा बीपी लो झाला आहे असे सांगून भक्तीला आराम करायला सांगितला. त्याही परिस्थितीमध्ये भक्तीने न चुकता सासू - सासऱ्यांच्या वस्तू आणल्या. शुभंकरने भक्तीला चक्कर आल्याचे घरी सांगितल्यावर सासूसासऱ्यांनी काळजीने तिला आराम करण्यासाठी बेडरूममध्ये पिटाळले.

भक्तीने अंथरुणावर अंग टाकले. \" का मला आज हा चैतन्य दिसला ? मी सगळं काही विसरून गेले होते. हा दिसला आणि मी विसरले होते ते पुन्हा प्रकर्षाने आठवले. शुभंकर आणि आईबाबा किती प्रेम करतात माझ्यावर. त्यांना माझा भूतकाळ समजला तर ? मला माफ करतील का सगळे? \"

भक्तीचे मन पुन्हा भूतकाळात शिरले. भक्ती आणि चैतन्यने रजिस्टर लग्न करून ठेवले होते. भक्तीच्या घरी या गोष्टीचा काही थांगपत्ता नव्हता पण तरी देखील भक्तीवर कडक निर्बंध घातली गेली होती. तिच्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी भक्तीची आई तिला कॉलेजमध्ये सोडत असे आणि तिथेच कॉलेजच्या परिसरात थांबून भक्तीला घरी नेत असे. भक्तीला आता आईच्या वागण्याने काही फरक पडत नव्हता कारण तिने चैतन्य बरोबर लग्न करून ठेवले होते. चैतन्य भक्तीपेक्षा एक वर्षांनी पुढे असल्याने तो शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन नोकरीधंद्यासाठी बंगलोरला निघून गेला. तिथे जाऊन नोकरीबरोबर पुढचे शिक्षण करसपॉंडिंग द्वारा घेत होता.

बंगलोरला जाण्याआधी त्याने भक्तीच्या मैत्रिणीकडे शर्वरीकडे भक्तीला भेटण्यासाठी निरोप दिला. भक्ती घराबाहेर आईवडिलांच्या परवानगीशिवाय पडू शकत नव्हती. शेवटी चैतन्यने शर्वरीच्या मोबाईलवर भक्तीसाठी मेसेज पाठवला.

अतिप्रिय भक्ती, मला माहित आहे तू घराबाहेर अजिबात निघू शकत नाही. आणि उगीच डेरिंग करून तू मला भेटण्यासाठी घरातून निघालीस आणि तुझ्या घरी सुगावा लागला तर आता लगेच कुठलेही निर्णय आपण घेऊ शकत नाही. तुझ्या वडिलांपर्यंत पोहचायला मला स्वतःला सिद्ध तर करू देत. मी मुद्दाम बंगलोरला जातो आहे ज्याने करून तुला थोडं बंधनातून मोकळं राहता येईल. मी माझं अस्तित्व सिद्ध करून तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागायला येईन आणि मानाने तुला माझ्या घरी घेऊन जाईन. माझ्या ह्या निर्णयाने तुझी अवस्था काय होईल हे मी जाणतो. कदाचित देव आपल्या प्रेमाची परीक्षा पाहत असेल की लांब राहून देखील आपण आपलं प्रेम निभावू शकतो का. आपल्या दोघांच्या प्रेमाची ही परीक्षा आहे असे समज. आय लव्ह यू सो मच. मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. नशिबात असेल तर लौकरच भेटू.

शर्वरी भक्तीला भेटायला तिच्या घरी गेली असता संधी साधून तिने भक्तीला चैतन्यचा मेसेज दाखवला. मेसेज वाचून भक्तीच्या डोळ्यांत पाणी तरळले. तिने चैतन्यला शर्वरीकडे निरोप दिला की, मी तुझी वाट बघेन.

भक्तीने शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आणि तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचा ध्यास धरला. भक्तीच्या मावशीने शुभंकरचे स्थळ आणले. शुभंकर लाखात एक मुलगा होता. एकुलता एक, दिसायला सुंदर, रुबाबदार, सहा आकडी पगार, गाडी, बंगला शुभंकरमध्ये नाव ठेवायला जागा नव्हती. शुभंकर त्याच्या आईवडिलांना लग्नानंतर दहा वर्षांनी झालेला. त्यामुळे आईवडिलांच्या गळ्यातील ताईत होता तो. त्या लोकांना मुलीविषयी काही जास्त अपेक्षा नव्हती फक्त शुभंकरला अनुरूप, ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण असलेली, नोकरी नसेल तरी चालेल, फक्त चांगला मिळूनमिसळून असलेला स्वभाव त्यांना मुलीमध्ये हवा होता. भक्ती त्यांच्या अपेक्षांमध्ये एकदम फिट बसत होती. भक्तीच्या आईवडिलांनी भक्तीच्या मनाविरुद्ध पाहण्याचा कार्यक्रम केला असता शुभंकर आणि त्याच्या आईवडिलांना भक्ती लगेच पसंत पडली. इथे भक्ती जीव तोडून आईवडिलांना लग्न न करण्याविषयी सांगत होती पण तिच्या आईवडिलांना अजिबात पाझर फुटला नाही. भक्ती तिच्या आईवडिलांना हे देखील बोलू शकली नाही की, तिने चैतन्यसोबत लग्न केले आहे. शेवटी भक्तीचे शुभंकरशी लग्न झाले. शुभंकरच्या आणि त्याच्या आईवडिलांच्या प्रेमळ स्वभावाने भक्ती त्यांच्या घरात समरसून गेली. इतकी की ती भूतकाळातील सगळ्या गोष्टी विसरली. सासुसासऱ्यांची अतिशय मनोभावे ती सेवा करत होती. मुलगी आणि नवरा तिचं विश्व झालं. शुभंकरमध्ये ती पूर्ण एकरूप झाली होती. आणि आज अचानक चैतन्य समोर दिसल्यामुळे तिच्या मनात पुन्हा वादळ निर्माण झाले.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all