Login

जॉब हजार्ड पार्ट. 2

स्टील प्लांट मध्ये काम करतांना आलेले थरारक अनुभव.
जॉब हजार्ड पार्ट २
काही काही स्टील प्लांट मधे कंटिन्युअस कास्टिंग मशीन असतं. आता ही मशीन म्हणजे एक तीन मजली लोखंडी स्ट्रक्चर असतं. याच्यात सगळ्यात वरच्या मजल्यावर १६५० डिग्री टेंपरेचर असलेलं लिक्विड पोलाद असलेली लॅडल म्हणजे १० फुट व्यासाची आणि १०-१२ फुट उंचीची बकेट ठेवलेली असते. या लॅडल मधून खालच्या बाजूला एक वाल्व असतो, त्याला स्लाइड गेट म्हणतात, तिथून लिक्विड पोलाद खालच्या छोट्या टाकी मधे सोडले जाते आणि तिथून मोल्ड मधे. हे मोल्ड ४ X ४ इन्चाचे किंवा ६ X ६ इन्चाचे असतात, त्यांच्या मधून लिक्विड पोलाद गेल्या नंतर बिलेट तयार होते. आणि ही प्रोसेस कंटिन्युअस असते.
आमचा एक हुशार मित्र होता. मेटलर्जी मधे M.TECH केलं होतं गणेशन नाव होतं. तो त्या दिवशी रात्र पाळी मधे ड्यूटि वर होता. रात्रीचे दोन वाजले होते, कास्टिंग मशीन चालू होतं. सर्व काही सुरळीत चालू होतं. मध्येच मोल्ड ऑपरेटर ने कंपलेंट केली की लिक्विड पोलाद चे टेंपरेचर कमी वाटतंय. लिक्विड पोलाद चे टेंपरेचर कमी म्हणजे क्वालिटी मधे गडबड. हे ऐकल्यावर गणेशन मशीन वर सगळ्यात वरच्या मजल्यावर चढला. तिथून अजून वर जायला एक छोटी शिडी आणि २ फुट X ३ फुटांचा प्लॅटफॉर्म होता. त्याची लेवल लॅडलच्या वरची असते. गणेशन त्या प्लॅटफॉर्म वर चढला. त्याच्या मागे एक हेल्पर टेंपरेचर मोजण्या साठी ऑप्टिकल पायरॉमिटर घेऊन चढला. तो शिडी वर उभा होता. गणेशन वेल्डिंग ग्लास घेऊन लिक्विड पोलाद च्या टेंपरेचरचा अंदाज घेत होता. अंदाज घेतल्यावर मागे वळून त्याने ऑप्टिकल पायरॉमिटर साठी हात पुढे केला, आणि त्याच क्षणी त्याचा पाय घसरला आणि तो १६०० डिग्री टेंपरेचरचं लिक्विड पोलाद असलेल्या लॅडल मधे पडला. क्षणार्धात, होत्याचं नव्हतं झालं. तूफान आरडा ओरडा झाला. मशीन बंद केल्या गेलं. साहेब लोक धावत आले. इतक्या तपमाना मधे लॅडल मधे काही सांपडणं शक्यच नव्हत.
खूप वाईट वाटलं. आम्ही आमचा एक मित्र त्यांची काहीही चूक नसतांना गमावला होता. बायकोला जेंव्हा हे कळलं तेंव्हा ती चांगलीच हादरली. म्हणाली,
“इतक्या खतरनाक वातावरणात तुम्ही गेली १० वर्ष काम करता आहात?” बरेच दिवस ती दचकून उठायची. पण नंतर हळू हळू सावरली.
दिलीप भिडे