ज्युलिया राघव शास्त्री भाग 1

Juliya Raghav Shastri
ज्युलिया राघव शास्त्री

भाग १


त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागला होता. आजच त्याच्या हळदीचा कार्यक्रम अगदी आनंदात, उत्साहात पार पडला होता आणि आता उद्या लग्न. अगदी त्याचा मनासारखे सगळे व्यवस्थित सुरू होते, तरी अस्वस्थता का वाटतेय, त्याला हे कळत नव्हते. झोपही येत नव्हती. पलंगावर या कुशीवरून त्या कुशीवर तो वळत होता. शेवटी तो उठला आणि बाजूला असलेल्या खोलीत गेला. दारावर नॉक् करणार, तोच त्याच्या लक्षात आले कदाचित ती झोपली असेल.

"तिची झोप मोडेल. नको जाऊ दे." विचार करत तो मागे फिरला. परत आपल्या खोलीत जाऊन पडला, पण त्याच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. जीव कासावीस व्हायला लागला. तिला बघून तरी येतो, विचार करत परत तो तिच्या खोलीकडे गेला. जवळच असलेल्या एक्स्ट्रा चावीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडत हळूच आतमध्ये गेला.

"हे यू? झोपला नाहीस?" तो दार लावत होताच की त्याला तिचा आवाज आला. त्याने तिच्याकडे बघितले तर ती बाल्कनीमध्ये उभी रात्रीच्या थंडगार वातावरणाचा आनंद घेत होती. क्रॉप टॉप, लूज पायजमा, हवेवर उडणारे तिचे केस आणि तिच्या ओठांवरील मोहक हास्य बघून त्याच्या हृदयाचे ठोके मंदावले. जीवाची होणारी घालमेल थोडी कमी झाली. खोलीचे दार बंद करत तो सरळ बाहेर बाल्कनीत येत, तिच्या कंबरे भोवती आपल्या हातांचा वेढा घालत, तिला पाठीमागून मिठी मारली.

"झोपला नाहीस?" तिच्या पोटा भोवती असलेल्या त्याच्या हातावर पकडत, त्याच्याकडे डोळ्यांच्या कोनातून बघत ती म्हणाली.

"नाही. तुझी आठवण येत होती."

ते ऐकून ती खळखळून हसू लागली.

"अरे, मी इथेच तर तुझ्या बाजूच्या रूममध्ये होते आणि मिस्टर खडूस उद्या आपले लग्न आहे."

"आय नो. पण तरीही तुझ्यापासून आता दूर राहवल्या जात नाही." तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवत, तिच्या कोमल गालावर आपले गाल घासत तो म्हणाला.

ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर, आपण या आयुष्यात खूप काही कमावले आहे, असे भाव उमटले. तिने पटकन त्याच्या गालावर किस केले आणि परत पुढे दिसणाऱ्या वाहणाऱ्या नदीकडे बघू लागली.

"ऑसम प्लेस! मला खूप आवडले. आपल्या लग्नासाठी वर्ल्ड मधले सगळ्यात बेस्ट लोकेशन. तुला माहिती ही नदी माझ्यासोबत गप्पा मारतेय. तिचा खळखळणारा आवाज कानाला खूप गोड वाटतोय, जसे काय आईच माझं कौतुक करतेय."

"आहेच ती आई. ते गंगा नदीचे उपपात्र आहे." त्याने माहिती पुरवली.

"यात एक डुबकी घेतली तर सगळे पाप धुलून जातात ना?"

"हो."

"तुला माहिती.."

"नाही. तू सांगणार नाहीस तर मला कसं कळणार?" तिला स्वतःकडे फिरवत, तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा आणखी घट्ट करत, तिचा चेहरा न्याहाळत तो म्हणाला.

"मघाशी खाली काही लेडीज बोलत होत्या की ही खूप पवित्र जागा आहे. इथे मरण आले तर माणूस डायरेक्ट स्वर्गात जातो. खरंय का?"

"हो, हे खूप पवित्र स्थान आहे. मी पण हे ऐकलेच आहे. पण तुला माहिती माझा स्वर्ग इथे माझ्या पुढे उभा आहे." तो जरा लाडात येत म्हणाला.

"अच्छा जी!" आपला हात हनुवटीवर ठेवत, आपली मान थोडी बाजूला वाकवत हसत ती म्हणाली.

"हांजी. तुला माहिती तुझ्या या गुलाबी ओठांवराचे हसू बघितले की माझा अगदी जीव जायला लागतो."

लाजून तिने मान खाली घातली आणि गालातच हसली. ती ब्लश करतेय, त्याच्या लक्षात आले. तिचे गालातले ते गोड हसू बघून त्याच्या ओठांची कळी सुद्धा आपोआपच उमलली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आहे, त्याला जाणवले.

"आज तू खूप सुंदर दिसत आहेस. तुझ्या चेहऱ्यावर, अंगावर खूप तेज आलेय." तिच्या चेहऱ्यावर उडणारे तिचे केस खांद्यामागे सारत तो म्हणाला.

"ते काय म्हणे.. हा, मला तुझी उष्टी हळद लावली ना, म्हणून.." बोलतांना तिचे डोळे खूप चमकत होते.

"ओह, अच्छा जी!"

"हांजी." लाजतच तिने आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवला.

"आता माझं हृदय खरंच बंद पडेल." तिचा चेहरा वर करत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"काही काय बोलतो?" तिने त्याला मिठी मारली. तिचे असे जवळ आल्याने आता परत त्याच्या मनाची घालमेल वाढू लागली.

"तुला असेच कायम जवळ घेऊन बसावे वाटत आहे." त्याने तिच्याभोवती आपली मिठी घट्ट केली.

"उद्या पासून तुझ्या मिठीतच येऊन बसणारे. साहेब आता आपल्या रूममध्ये जा. कोणी आले तर उगाच चीडेल."

"कोणी चिडणार नाही आणि हळदीच्या कार्यक्रमानंतर सगळे थकलेले आहेत. झोपले ही असतील."

"मी तुझ्यासाठी म्हणाले. माझं तर तसेही कोणी नाही. उगाच तुला बोलणी खावी लागेल."

"शsss! आता परत कधी असे बोलू नकोस. हा पूर्ण मी तुझा आहे." तो तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला.

"हो तू माझं माझं, माझं पूर्ण आयुष्य आहेस. तुझ्यासाठीच तर मी काहीही करू शकते."
ते ऐकून तो गोड हसला.

"काय ग, या हातावरील मेहंदीत माझेच नाव लिहिले आहे ना?" मेहंदीने रंगलेला तिचा हात त्याने आपल्या हातात घेतला. तो हातात घेतांना तिच्या हिरव्या चुड्याची खणखण झाली आणि त्या मोहक आवाजाने त्याच्या शरीरावर रोमांच उठलेत.

"हो, तुझंच नाव आहे, हातावर, हृदयात, इथे, इथे, सगळीकडे." ती त्याला आपले हात, हृदय, डोळे, नाक, ओठ सगळं इशाऱ्यांनी दाखवत म्हणाली.

"बघू." त्याने तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला.

"आता सगळं उद्या बघायचं." ती त्याला त्याच्या खोलीत जाण्यासाठी दूर ढकलत म्हणाली.

"आज रात्री मी इथेच थांबणार आहे. कुठेही जाणार नाही." तो बेड वर बसत म्हणाला.

"अरे हे काय हट्टपणा करतो आहे? उद्या आपण एकच होणार आहोत."

"उद्यासाठी आणखी १० तास उरले आहेत आणि मी आता एकही क्षण तुझ्यापासून दूर नाही जाणार." तो बोलतांना त्याच्या आवाजात तिला काहीतरी त्रास जाणवला. त्याचा आवाज अगदी खोल गेला होता. डोळ्यात पण कसलीशी काळजी दिसत होती.

"काय झालं? सगळं ठीक आहे ना? कोणी काही म्हणाले काय?" आता मात्र तिला सुद्धा त्याची काळजी वाटू लागली होती.

"नाही, काही नाही झाले. पण आता तुझ्या दूर जावं वाटत नाही. प्लीज आज रात्री मला इथेच थांबू दे."

"बरं, तू इथे झोप." म्हणत ती बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपली. त्याची मात्र चुळबुळ सुरूच होती. कसलीशी अनामिक भीती त्याला अजूनही जाणवत होती.

"ज्युलियाsss"

"हो.." तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघितले.

"माझ्यासाठी एकदा तयार होशील, जसे उद्या होणार आहेस, तसे?"

"आता?"

"हो, आज फक्त माझ्यासाठी."

"उद्या पण फक्त तुझ्यासाठीच होणार आहे."

"पण तरीही दुसरे लोकं तुला बघतीलच. प्लिज तयार हो, फक्त माझी वधू." तो तिच्यापुढे आर्जवे करत होता. आता मात्र तिला त्याचे मन मोडायला नको वाटले आणि ती तयार होण्यासाठी उठली आणि तयारी करायला बाजूलाच असलेल्या चेंजिंग रूममध्ये गेली.

इकडे त्याची अस्वस्थता वाढतच होती.
"असं का होत आहे? कधीच तर असे झाले नाही. हे असे अजब, विचित्र फील का होत आहे?" तो स्वतःशीच विचार करत बाजूला पडलेले मॅगझिनची पाने चाळत होता. त्यातील त्याला एकही अक्षर दिसत नव्हते. कंटाळून शेवटी त्याने ते बाजूला टाकले आणि परत बाहेर बाल्कनीमध्ये आला. अंगात घातलेल्या सुती शर्टाची वरची दोन बटण काढत, शर्ट मोकळा करत हवेत एक मोठा श्वास घेतला. नदीचा झुळझुळ आवाज सुरूच होता. तो एकटक नदीकडे बघत होता. नदीच्या वाहण्याचा आवाज कमीजास्त होत होता. जणूकाही ती नदी त्याला खुणावते आहे, काहीतरी सांगू बघत आहे, असे वाटू लागले. तो आणखीच जास्त टक लावून बघत होता.

"ज्युलिया पण म्हणत होती, नदी तिच्याशी गप्पा मारतेय, पण तिला ते कौतुक वाटत होते, मला तर वेगळाच भास होतोय." तो स्वतःशीच विचार करत होता.

छनछन….
घुंगुरुंचा कोमल स्वर त्या शांत वातावरणाला भंग करत होता. त्याने मागे वळून बघितले तर ज्युलिया अगदी नववधू रुपात उभी होती. पूर्ण सृष्टीला लाजवेल असे ते सौंदर्य होते. स्वर्गातील अप्सरांचे सौंदर्य सुद्धा तिच्यापुढे फिके पडेल, इतकी जास्त मोहक ती दिसत होती. तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघत होता.

लाल आणि सोनेरी रंगांची उधळण असलेली कांजीवरम साडी, त्यावर नाजूक नक्षी काढलेले हिरवेकंच ब्लाऊज, तिच्या नाजुक गोऱ्या रंगावर खूप खुलून दिसत होते. सुवासिक मेहंदीने रंगलेल्या हातात हिरवा बांगड्यांचा चुडा, गळ्यात कंगोऱ्यांचे अगदी बारीक काम केलेले नेकलेस, केसांची एक गुंफलेली वेणी, त्यातून काही चुकार बटा पुढे येत हवेवर उडत होत्या, डोळ्यात काजळ, ओठांवर साजेसे लिपस्टिक आणि कपाळावर चंद्रकोर.. ती या वेशात कमालीची सुंदर दिसत होती. तिला बघतांना तो स्वतःला सुद्धा विसरला होता. तिला न्याहाळताना त्याची नजर मात्र तिच्या कपाळावर अडकली. कपाळावर टिकली खाली असलेले लाल चुटुक कुंकू आणि त्याखाली लावलेली हळद.. ती हळद तिचे सौंदर्य आणखीच खुलवत होते. ते बघितले आणि त्याच्या हार्टबिट्स स्किप होऊ लागल्या.

तो काहीच बोलत नाही बघून तिने आपल्या बांगड्यांचा आवाज केला. तरीही तो त्याच्याच तंद्रीत हरवला होता.

"ओ मिस्टर खडूस." आवाज देत तिने तिच्या बांगड्या आणि चाळ दोघांचाही आवाज केला.

"ह काय?" तो एकदम दचकला.

"कशी दिसतेय?"

"काय वर्णू तुझं सौंदर्य? माझ्याकडे शब्दच नाही." तो तिच्याजवळ जात, तिचा हात आपल्या हातात घेत, तिच्या हातावर किस करत म्हणाला. ती गोड हसली.

तिचे ते गोड हसू बघून तो तिच्या मोहात पडला.

"माझ्यासाठी नेहमी असेच तयार होणार ना?"

"हांजी." तिने होकारार्थी मान हलवली.

"स्त्री साडीत सर्वात जास्त सुंदर तर दिसतेच पण त्याहून खूप शालीन सुद्धा दिसते. तू खुप गोड दिसतेय. खुप पवित्र."

"ही तुझी दृष्टी आहे, तुझी पवित्र दृष्टी, जे तुला माझ्यातील सौंदर्य दिसले. नाहीतर बाकीच्यांना तर.."

तिचे शब्द पूर्ण व्हायच्या आतच त्याने तिचे ओठ आपल्या ओठात लॉक केले.

त्याच्या या अशा वागण्याने ती एकदम अचंभित झाली. कारण इतक्या वर्षात आज पहिल्यांदा त्याने तिच्या ओठांना स्पर्श केला होता. त्याच्या त्या स्पर्शाने तिचं हृदय भरून आले होते. आपोआप तिचे डोळे बंद झाले आणि त्याचा तो तिच्या हक्काचा स्पर्श ती अनुभवत होती.

"परत कधी आता असे शब्द काढायचे नाहीत."

"हम्म." तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले.

"ज्युलिया, हे काय आहे?" त्याचा आवाजात तिला थोडे दुःख जाणवले. त्याला तिचे बोलणे आवडलेले नव्हते, तिच्या लक्षात आले.

"काय?"

"हेच.." तो तिच्या डोळ्यांकडे इशारा करत म्हणाला.

"खडूस लोकांचा किस इतका गोड असतो? डायबेटिज होणार आता." ती हसत आपले डोळे पुसत म्हणाली. ते ऐकून त्याला पण हसू फुटले. त्याने एकदम तिला आपल्या मिठीत घेतले.

"आता फक्त आपलं वर्तमान आणि.." तिचा परत एक हात आपल्या हातात घेतला.

"आणि काय?" तिने हळूच खूप आशेने त्याच्याकडे बघत विचारले.

"आणि..आणि.." त्याने बांगड्याखाली मेहंदी लावलेल्या ठिकाणी किस केले. त्याच सोबत मेहंदीचा तो सुवासिक गंध त्याच्या श्वासात भिणू लागला. आधीच तिच्या सौंदर्याची नशा त्याच्या हृदयावर चढली होतीच. त्यात आता त्याच्या ओठांना होणारा तिचा स्पर्श आणि मेहंदी, त्याचं डोकं आता हळूहळू बंद पडतेय, त्याला जाणवू लागले.

"आणि काय?"

"आणि आपला रोमान्स आणि.." तो तिच्या हातावर किसचा वर्षाव करू लागला.

"जी हुजुर, तुम्ही म्हणाल तसे.." ती आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेत म्हणाली.

"का?" तिने तिचा काढून घेतलेला हात त्याला रुचला नव्हता.

"आता गळ्यात मंगळसूत्र घातल्यावरच.. उद्या.."

"नो. मला तू माझी आजच झालेली हवी आहे."

"का हा हट्टपणा? मी इथेच आहे, तुझ्याजवळ.."

"मला तू हवी आहेस..कायमची..माझी.."

"पण हे तुझ्याच उसुलांच्या खिलाफ आहे ना?"

"मी उद्याची आता वाट बघू शकत नाही."

******

क्रमशः


सदर कथा काल्पनिक आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आधार घेऊन लिहिली आहे. विषय थोडा बोल्ड असल्यामुळे कदाचित काही लोकांना कथा रुचणार नाही. तरीही प्रत्येक पात्र समजून घेऊन वाचण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती. धन्यवाद!