ज्युलिया राघव शास्त्री ५

ज्युलिया राघव भेट
ज्युलिया राघव शास्त्री

पूर्वार्ध :
परदेशात राघवचा अपघात होण्यापासून ज्युलियाने त्याला वाचवले. ज्युलियाला बघून त्याला ती ओळखीची वाटली. रोज तो त्याच ठिकाणी ज्युलियाची वाट बघत होता.

भाग ५

राघव रोज दुपारी त्याच ठिकाणी येऊन ज्युलियाची वाट बघत असायचा. रात्र झाली की घरी परत जात होता. आता जवळपास दोन तीन आठवडे झाले होते, पण अजूनही त्याला ती दिसली नव्हती.
आजही तो परत तिथेच उभा होता. इकडेतिकडे बघता बघता त्याचे लक्ष दूर एका घराकडे गेले.

"यस, ती.. तीच आहे.."
आजूबाजूचा मागोसा घेत, तो झपाझप पावले टाकत तिकडे जाऊ लागला.

ज्युलिया एका घरातून बाहेर पडली. बाहेर बर्फ खूप असल्याने, आजूबाजूला तशी सामसूम होती. तिने तिची गाडी दूर एका पार्किंग शेडमध्ये पार्क केली. अंगात लांब क्रीमिष रंगाचा लाँग कोट घातला होता. पायात लाँग सेम क्रीम रंगाचे लेदरचे शूज घातले होते. तिचे काळेभोर, सिल्की केस तिच्या चेहऱ्यावर फार उठून दिसत होते. थोडा स्नो पडायला सुरुवात झाली होती. अगदी मखमली कापसासारखा स्नो ती चेहऱ्यावर घेत, मधूनच गोड हसत होती. ती आपल्याच तालात चालत चालत कारकडे निघाली होती. तिने कारच्या मागच्या सीटचे दार उघडले आणि हातातील बॅग मागच्या सीटवर टाकली. ती कारचे दार बंद करणार तोच राघवने तिचे तोंड दाबून धरले आणि तिला पाठीमागून धक्का देत कारमध्ये घेतले आणि दार बंद करून घेतले.

ज्युलिया कारच्या सीटवर आडवी पडली होती. राघव तिच्यावर होता. त्याने तिचे तोंड घट्ट दाबून धरले होते. त्याचे डोळे भयंकर लाल दिसत होते. त्याच्या हावभावा वरून तो खूप घातक भासत होता.

या अचानक झालेल्या अशा हल्ल्याने ज्युलिया एकदम खूप धास्तावली होती. तेवढया बोचऱ्या थंडीतही तिच्या चेहऱ्यावर घाम जमू लागला होता. तिची घाबरी नजर त्याच्या चेहऱ्यावरून भरभर फिरत होती. त्याच्या तावडीतून सुटायची तिची धडपड सुरू होती. आजूबाजूला कुणाची मदत मिळते आहे का बघत, कारवर हातपाय मारायचा प्रयत्न करत होती.

"आय विल किल यू…" म्हणत त्याने त्याच्या जॅकेट मधून एक छुरी बाहेर काढली.

"जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीस तिहुँ लोक उजागर.."

तो तिच्यावर छूरीने वार करणारच होता की हनुमान चालीसा त्याच्या कानावर पडू लागली आणि छूरी पकडलेला त्याचा वर उठलेला हात, वरती जागीच हवेत थांबला. त्याने निरखून बघितले तर ज्युलियाने आपल्या एका हाताने आपले डोळे गच्च दाबून धरले होते आणि ती हनुमान चालीसा म्हणत होती. थोड्यावेळेसाठी तो तिच्याकडे पाहतच बसला.

राम दूत अतुलित बलधामा,
अंजनी पुत्र पवन सुत नामा॥

महावीर विक्रम बजरंगी,
कुमति निवार सुमति के संगी ll

कंचन बरन बिराज सुबेसा,
कानन कुण्डल कुंचित केसा ll

"इंडियन?" तो अचंभित होत तिच्याकडे बघत होता. तिने असे अचानक हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली तर तो एकदम बावरला होता. त्याचा राग शांत झाला नव्हता, पण ते शब्द ऐकून त्याचे डोकं एकदम बंद झाले होते; चाकू पकडलेला हात जागीच थांबला होता.

त्याचा आवाज ऐकून तिने हनुमान चालीसा म्हणता म्हणता हळूच डोळे किलकिले करत त्याच्याकडे बघितले, तर त्याचा राग बराच शांत झालेला दिसत होता. बहुतेक आता तो पुढे काही करणार नाही, याची तिला हमी वाटली. तिने आपले दोन्ही हात जोडत मनातल्या मनात काहीतरी म्हटले आणि परत डोळे उघडून त्याच्याकडे बघू लागली.

"आर यू इंडियन?" तो परत म्हणाला.

"यस हाफ.." ती घाबरत म्हणाली.

तिच्या उत्तरावर तो प्रश्नार्थक नजरेने बघत होता.

"माय मॉम इज इंडियन." ती सीट वरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अजूनही तो तिच्यावर होताच. तिची उठायची धडपड बघून तो तिच्यापासून दूर झाला. त्याचा राग कसा काय शांत होत होता, त्याला सुद्धा कळत नव्हते. कदाचित हनुमान चालीसाच्या त्या मॅजिकल शब्दांचाच परिणाम होत होता. त्याने हातातील चाकू बाजूला केला. ती सुद्धा कशी बशी उठत, आपले कपडे नीट करत बाजूला बसली. थोड्यावेळ दोघांमध्ये बरीच शांतता होती. ज्युलिया घाबरत डोळ्यांच्या कोनातून राघवकडे बघत होती. अजूनही ती हनुमान चालीसा हळू आवाजात म्हणत होती.

"तू किती घाणेरडी आहे, तुझ्या मुखातून देवाचे नाव तरी शोभते काय?" तो तिच्याकडे बघत थोड्या हळू आवाजात पण चिडत पुटपुटला.

"व्हॉट? मी खाय बॅड खरते?"

"व्हॉट? तुला मराठी येते?" तो शॉक होत तिच्याकडे बघत होता.

"आय ऑलरेडी टोल्ड यू, माय मम इज इंडियन. लॉट्स ऑफ टाईम शी स्पिक्स मराठी, वॉच मराठी ड्रामाज.." ती परत तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत कारचे दार उघडण्याचा प्रयत्न करत होती. कारण आता परत तो बराच चिडलेला दिसत होता.

"इट्स लॉक्ड अँड फर्स्ट ऑफ ऑल स्टॉप चॅन्टींग हनुमान चालीसा.. यू चीप गर्ल.." तो तिच्या गाडीची चावी आपल्या हातात दाखवत म्हणाला. झटापटीत त्याने तिची चावी कधी घेतली तिला कळले सुद्धा नव्हते.

"हाऊ डेअर यू? यू डोन्ट हॅव एनी राइट्स टू इन्सल्ट मी.." ती थोडी चिडली, पण त्याच्या हातात सध्या सगळा कंट्रोल आहे बघून तिने शांत राहण्याचा प्रयत्न केला.

"यू पॉर्न ॲक्टर.. चार पैशाला असले घाण काम करते अन् चीप म्हणू नको म्हणते.. तुला टच करून मी सुद्धा घाण झालो, पापी झालो." तो आता परत चिडला.

"यू आर मर्डरर.. यू किल्ड माय ब्रदर.." त्याने आपल्या एका हाताने तिचा गळा दाबून धरला.

"प्लीज लिव्ह मी.." ती विनवणी करत म्हणाली.

"असे कसे सोडू? तू माझ्या भावाला मारले आहेस. आज मी तुझा जीव घेणारच." त्याने तिच्या गळ्यावर आपल्या हाताचा प्रेशर वाढवला होता.

"आय डीडन्ट किल एनीवन." ती बोलायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या डोळ्यातील राग उफाळून आला होता आणि तिच्या गळ्यावर त्याच्या हाताची पकड घट्ट झाली होती.

"माय मॉम इज इन हॉस्पिटल." तो शेवटचा घाव घालणार तोच ती कशीबशी म्हणाली.

ते ऐकून तिच्या गळ्यावरील त्याची पकड सैल झाली. ती जोरजोराने खोकू लागली.

"प्लीज लिव्ह मी.. आय बेग यू.. प्लीज लिव्ह मी.." ती त्याच्यापुढे हात जोडत रडत रडत विनवणी करू लागली.

तो कारचे दार उघडून बाहेर आला. त्याने गाडीची चावी तिच्या अंगावर फेकून दिली. परत मागे वळून न बघता भरल्या डोळ्यांनी पुढे चालू लागला. पण तिच्या नजरेतून त्याचे ते अश्रुपूर्ण डोळे सुटले नव्हते. त्याच्या डोळ्यात तिने खूप वेदना वाचल्या होत्या. बऱ्याच वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत होती. थोड्या वेळाने समोर ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसत तिने गाडी सुरू केली आणि आपल्या रस्त्याने लागली.

राघव घरी आला. त्याच्या डोळ्यांपुढे वारंवार ज्युलिया आणि त्याच्या लहान भावाचा चेहरा येत होता. परत त्याला घरातील सर्व आक्रोश डोळ्यांपुढे दिसत होता. त्याला सगळ्या गोष्टी असह्य झाल्या. त्याने फ्रीज मधून ड्रिंक बाहेर काढले आणि गटागटा घशात ओतू लागला. जोपर्यंत त्याची शुद्ध हरपत नाही तोपर्यंत तो पित राहिला.

******

राघवने ज्युलियाचा विचार डोक्यातून काढून घेतला होता. ज्युलियाला भेटल्यापासून आता जवळपास ८-१० दिवस झाले होते. नंतर दोन दिवस तो ऑफिसला सुद्धा गेला नव्हता. तब्येत बरी नसल्यामुळे राघव घरूनच ऑफिसचे काम करत होता.

संध्याकाळ होत आली होती. राघव लॅपटॉपमध्ये काही काम करत बसला होता. तेवढयात त्याच्या अपार्टमेंटची डोअर बेल वाजली. तसा तो थोडा अबोलच होता. त्याचे तिथे फार मित्र नव्हते झाले. घरी फार कोणी येणारे जाणारे नव्हते; फार फार तर कुरिअर, कोणी डीलेव्हरीवालेच यायचे; त्यामुळे या वेळेला कोण आले असेल, तो विचारातच पडला. हातातील कॉफीचा मग बाजूला ठेवत तो दार उघडायला गेला. त्याने डोअरहोल मधून बाहेर बघितले आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून तो एकदम शॉक झाला.

*****
क्रमशः

🎭 Series Post

View all