ज्युलिया राघव शास्त्री ६

Juliya Raghav
ज्युलिया राघव शास्त्री

भाग ६

संध्याकाळ होत आली होती. रूममध्ये छान सौम्य असे सूदींग म्युझिक सुरू होते. बाजूला असलेल्या एका टेबलवर ठेवलेल्या वाफाळलेल्या कॉफीचा मस्त सुगंध खोलीभर पसरला होता. राघव हॉलमध्ये सोफ्यावर बसला, लॅपटॉपमध्ये आपले काही काम करत होता. आज ९-१० दिवसानंतर त्याला थोडे बरे वाटत होते. बरेच दिवसांनी आज त्याने स्वतःसाठी कॉफी केली होती; नाहीतर गेले काही दिवस आणि रात्र त्याने बिअर आणि ड्रिंक्सवर काढल्या होत्या. त्या थंड वातावरणात गरम गरम कॉफीचे एक एक घोट घेत, त्याची बोटे लॅपटॉपवर फिरत होती. तेवढयात त्याच्या अपार्टमेंटची डोअर बेल वाजली.

"कोण असेल आता?" बेलच्या आवाजाने त्याची तंद्री भंग झाली. हातातील मग बाजूला ठेवत, तो दार उघडायला गेला. त्याने डोअरहोल मधून बघितले आणि समोर ज्युलियाला बघून एकदम दचकला. जे प्रकरण त्याने त्याच्यासाठी मिटवले होते, ज्या गोष्टीला तो विसरायचा प्रयत्न करत होता, ज्युलियाला समोर बघून त्याला परत सगळं आठवू लागले.

तिला त्याचा पत्ता कुठून मिळाला, याचे सुद्धा त्याला खूप आश्चर्य वाटले. तिचे काम बघता, तिची कुठल्या स्थरावरील लोकांसोबत कॉन्टॅक्ट असतील, त्याला विचार करायला वेळ सुद्धा लागला नाही. आपण तिच्यावर जीवघेणा हल्ला केला तर ती बदला घ्यायला आली की काय, त्याच्या डोक्यात विचार घोळू लागले. तो धावत पळत बाल्कनीमध्ये आला. बाहेरील स्थितीचा आढावा घेत होता. ज्युलिया सोबत आणखी कोणी दिसत आहे का बघत होता. तेवढयात त्याच्या फोनची बेल वाजू लागली. आतमध्ये येत त्याने फोन बघितला तर त्यावर "अननोन नंबर" लिहून आले होते.

"हॅलो.." त्याने फोन उचलला.

"ओपन द डोअर." पलीकडून आवाज आला.

त्या शब्दांवरून त्याला पूर्ण खात्री पटली की फोनवर बोलणारी व्यक्ती ज्युलिया आहे.

"मला कोणासोबत बोलायचं नाही. यू मे गो."

"ओपन द डोअर.. टूला ओपन खरता येत नसेल टर मी खरू शखते, यू आर न्यू हीअर, आय एम नॉट. " ती थोडे कडक आवाजातच म्हणाली.

राघवने बाहेरचा आढावा घेतला आणि दार उघडले.

"तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? मला तुझ्या सोबत एकही शब्द बोलायचा नाही. यू मे गो नाउ." राघव दार उघडत थोडा रागातच म्हणाला.

"बट आय नीड टू टॉक विथ यू.. टू माझ्यावर एवढा बिग एलिगेशन लावला.. यू सेड मी मर्डरर.. मी टूला असे खसे लिव खरेल." ती पण तेवढीच चिडत म्हणाली आणि त्याला बाजूला ढकलत, दार लोटत आतमध्ये जाऊ लागली. ते बघून तो शॉक झाला.

"मला टच करण्याची तुझी हिंमत कशी झाली? यू चीप गर्ल." तिने त्याला ढकललेले बघून तो चांगलाच चिडला होता.

"शट अप." ती एका जागेवर बसत थोडे ओरडून म्हणाली आणि पायातील लाँग बूट काढत बाजूला ठेवला. अंगातील विंटर जॅकेट सुद्धा काढत हँगरला लटकवू लागली.

"धीस इज माय हाऊस." तो तिच्या मागे मागे जात घरात आला.

"हाऊ डेअर, टुला मला मर्डरर म्हणायची हिंमत खशी झाली?" ज्युलियाने आवेगाने सरळ त्याच्या टीशर्टची कॉलर पकडली आणि त्याला ढकलत मागे नेले; मागे भिंत आली आणि आता मागे जाता येत नव्हते आणि तो तिथेच थांबला.

" तू आहे मर्डरर.. तू माझ्या लहान भावाला मारले आहे." तो त्याच्या कॉलरवर असलेला तिचा हात काढून घेण्याचा प्रयत्न करत होता; पण तिची पकड खूप घट्ट होती.

"इनफ.. आय नेव्हर टच एनी मेल इवेन फिमेल, विदाउट देअर परमिशन."

"यू टच्ड मी, मी तुला परमिशन दिली नव्हती."

"यू मॅड! दॅट डे, आय वॉज ट्राईंग टू सेव्ह यू.. ट्रक येत होता. यू ब्लाइंड बॉय.. थँक्यू से करायचे तर यू आर शाऊटिंग ऑन मी? फूल."

ते ऐकून त्याला त्यांची पहिली भेट, तो दिवस आठवला.. त्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करणारी ज्युलिया त्याच्या डोळ्यासमोर आली. तिला बघितले की त्याच्या डोक्यात राग थैमान घालत, पण मन अचानक शांत होत असे.. काय होतेय त्यालाच कळत नव्हते.

"टो, टूजा ब्रदर एथे स्टे करत होटा?"

"नो."

"देन? आय नेव्हर वेण्ट टू इंडिया.. टरी टू मला किलर सांगत आहे?"

"यस यू किल्ड हीम.. यू चीप गर्ल."

"स्टे इन युअर लिमिट्स, यू डोन्ट हॅव एनी राइट्स टू जज मी." तिच्या डोळ्यात राग जमा झाला होता.

"तू आहेसच घाण, ते असले घाणेरडे काम करते. तुझ्यापेक्षा कॉल गर्ल्स चांगल्या, कमीत कमी आहे करतात ते बंद खोलीत करतात, तुझ्यासारखे नाही.. असले नीच काम करायचे, वरतून त्याचे व्हिडिओ सरेआम दुनियाभर पसरवायचे. सगळं खुलेआम असूनही मला जज करू नको म्हणतेय. अगं आता राहिलेच काय तुझ्याकडे? तू पैशांसाठी सगळं विकून बसली आहेस. तुझ्या अंगाचा एक एक भाग, छोट्यातले छोटे निशाण, तीळ सगळं सगळं सगळ्यांनी बघितले आहे..तुझे ते व्हिडिओ मधून येणारे घाण घाण आवाज, कुठे कुठे होणारे स्पर्श… याक् मला बोलावल्या सुद्धा जात नाहीये, ते तू करतेय.. तुझं स्वतःचे असे तुझ्याकडे काहीच नाही आहे..स्वतः तर पूर्णपणे बिघडलीच आहे.. बाकी लोकांना पण बिघडवते आहेस. मोठी जाऊ दे, लहान, टीनएजर्सला सुद्धा आपल्या नादी लावत त्यांचे भविष्य खराब करते आहे. तू नीच आहेस , वाया गेलेली प्रत्येकाच्या आयुष्यातील तू अंधकार आहेस, या धरतीवर तू भार आहेस, तू समाजाला लागलेली कीड आहेस. तरुणांच्या भविष्यासाठी तू श्राप आहेस. तुझ्यासोबत कोणीही खुश काय एक चांगलं मान सन्मानाचे आयुष्य जगू शकणार नाही." राघव त्याच्या डोक्यात येईल ते बोलत सुटला होता.

आजपर्यंत तिच्या बद्दल कोणाकडूनही तिने असे ऐकले नव्हते. त्याच्या बोलण्यातून ती किती वाईट आहे, किती नकोशी आहे हे तिला जाणवत होते. कोणीतरी तिचा इतका तिरस्कार करत आहे, हे तिला सहन होत नव्हते. हळूहळू तिचे डोळे पाणावू लागले होते. भरल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत होती.

"आहेस तू चीप, व्हेरी डर्टी.. काय म्हणाली होती, कोणाला त्याच्या मर्जी शिवाय टच करत नाही.. मग हे मघापासून माझ्या कॉलरला पकडून ठेवले आहे, ते काय आहे?"

ते ऐकून तिने त्याची कॉलर सोडली आणि थोडे दूर सरकली.

त्याने लगेच देवापुढे ठेवलेली एक बाटली घेतली, त्यातून थोडे पाणी काढले आणि काहीतरी पुटपुटत स्वतःच्या अंगावर शिंपडले.

"व्हॉट्स धिस्?" त्याला तसे करतांना बघून ती अचंभित झाली.

"इट्स गोमूत्र.. तू मला टच केले, तुझ्या स्पर्शाने मी अपवित्र झालो."

आधीच भरून आलेले डोळे, ते ऐकून तिच्या डोळ्यातील गालांवर भराभर ओघळू लागले. ती आपल्या पालथ्या हाताने वारंवार अश्रू पुसत होती पण अश्रू बंद व्हायचे नाव घेत नव्हते. तिला रडतांना बघतांना त्याला कसेतरी वाटत होते, हृदयात काहीतरी होत आहे, पण काय होत आहे त्याला समजत नव्हते, पण ती त्याला रडतांना बघायला आवडले नव्हते. त्याने आपली मान फिरवली आणि खिडकीतून बाहेर बघत होता.

थोड्यावेळ तिथे बरीच शांतता होती. ज्युलियाने आपले अश्रू पुसले.

"लूक मिस्टर.." म्हणत ती सरळ त्याच्या पुढे गेली, त्याला हात लावणार तोच तिला गोमुत्राची बॉटल आठवली आणि तिने आपला हात मागे घेतला. तिच्या आवाजाने त्याने तिच्याकडे मान वळवली.

"सी..मी टूझा डीरिस्पेक्ट केला आहे? मग टूला मला एनीथिंग म्हणण्याचा राईट नाही. आय सेव्ह युअर लाईफ, टू थँक्यू से करायला पाहिजे, बट दॅट्स ओके.. चांगले काम करा विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स, असे लॉर्ड रामा सेड."

"तुझ्या तोंडून देवाचे नाव पण शोभत नाही. तुला त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. जी लोकं धर्माला अनुसरून चालतात, फक्त त्यांनाच देवाचे नाव घेण्याचा अधिकार आहे." तो चिडत म्हणाला.

"व्हू आर यू, मला सांगणारा? गॉड सर्वांसाठी सेम असतो. आय एम डिवोटी ऑफ लॉर्ड रामा अँड लॉर्ड हनुमाना, टू माझ्यावर लाईफ थ्रेट हल्ला केला, मी खूप काय करू शकते पण मी काय केले नाही."

"पहिले ते टू, टुजा म्हणणं बंद कर. इट्स व्हेरी इरिटेटिंग. इट्स तू, तुझा.." त्याने मध्येच तिला टोकले.

"टूझा प्रोब्लेम काय आहे? हे नाय बोलायचं ते नाय बोलायचं."

"टू नाही.. तू.."

"दॅट्स फाईन, मी लॉर्ड रामाची भक्त आहे म्हणून अजूनपर्यंत तुला काय केले नाई. तुला पकडणं माझ्यासाठी डीफिकल्ट नाय, पण मी रिवेंज अँड व्हायोलेन्स करत नाई, अँड काय मी सामाजाला कीड आहे म्हटला तू? तुझ्या तिथे ते ॲक्टर-ॲक्ट्रेस स्मॉल ड्रेस, बिकनिज घालतात त्याने मुलं बिघडत नाई? मुव्हीजमध्ये, वेबसिरीजमध्ये खूप डिटेल इंटिमेंट सीन दाखवतात, त्याने बिघडत नाई? सेक्स अट्रॅक्शन तुमचे मूव्ही, ॲक्टर्स क्रिएट करतात, हे छान असते, ते तुम्हीच पटवून देता अँड हे व्हिडिओज तिकडे विदाऊट लायसेन्स असते सारेकडे अव्हेलेबल, एनीवन कॅन ॲक्सेस इट, त्याने तुमचे मुलं बिघडत नाई? तुमचे पॉलिटीशीयंस युथचा त्यांच्या कामासाठी एब्युज करतात, तेंच्या हातात वेपन देतात, त्याने तुमचे मुलं बिघडत नाई? यांना तुम्ही गॉड समजतात. तुमच्या देशात माझ्याचमुळे सगळे बिघडतात ओन्ली? मी सेल्फ फिजिकचा युज करते, दुसऱ्याचा वापर आपल्या फायदासाठी करत नाई. कुणाचा फायदा घेतला असता तर मी मिल्लेनियर झाली असती. मी कोणाला कील केले नाही, यू डोन्ट हॅव एनी प्रूफ दॅट आय किल युअर ब्रदर. मी कायपण काम करेल, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आय एम नॉट अ मर्डरर...गेट इट.." ती थोडे कडकपणे म्हणाली.

तो चुपचाप तिचे बोलणे ऐकत होता. त्याला बोलावे तर फार वाटत होते, पण त्याला काय थांबवत आहे, हेच त्याला कळत नव्हते.

"अँड यस.. त्या दिवशी तू सुसाईड करायला गेला होता ना त्या ट्रक समोर? अँड तू मला किल पण करणार होता. तुला काय वाटते, तू मला मारून सुटला असता? हियर पोलीस आर व्हेरी स्मार्ट, दोन तासात तुला पकडून जेलमध्ये टाकले असते. मूर्ख माणूस, हे सारे करण्याआधी तुला तुझी फॅमिली आठवली नाही का? तुझी मॉम, डॅड, ब्रदर, सिस्टर कसे राहिले असते? तू इकडे जेलमध्ये असताना त्यांनी लाईफ कसे फेस केले असते? ते आता ओल्ड होतील.. त्यांच्या ओल्ड एजमध्ये कोण त्यांचे टेक केअर करेल? हे सर्व करण्याआधी..यूज युअर ब्रेन.." परत जाण्यासाठी आपले शूज घालत ती म्हणाली आणि जायला निघाली.

"एव्हरीवन नीड ब्रेड अँड बटर. एव्हरीवन नॉट बॉर्न रीच.. तुझा शू, माझा शू डीफरेंट आहे.. सो नो वन हॅव एनी राईट्स टू जज एनीवन.. माईंड इट.." त्याच्याजवळ जात ती हळूपणे, शांततेने म्हणाली आणि बाहेर गेली.

" मी तिचे का ऐकून घेतले? बरोबर बोलत होती का ती? बरोबर बोलत असली तरी माझ्या घराची वाताहत तर तिच्याचमुळे झाली आहे. पण मग मी तिला काही का बोलू शकलो नाही? तिचे शरीर मला अजिबात आवडले नाही, पण तिचे डोळे का केविलवाणे वाटतात? का हरलेली, थकलेली वाटत होती? " तिला जातांना बघून त्याच्या डोक्यात अनेक विचार डोकावत होते. तेवढयात परत दारावर थाप ऐकू आली, तसे त्याने दार उघडले.

"परत तू? प्लीज गो नाऊ. मला तुला विसरायचे आहे. मी तुला काही म्हणणार नाही, पण आता जा.." तो ज्युलियाला पुढे बघून शांतपणे म्हणाला.

"व्हॉट हॅपेंड टू युअर ब्रदर?" तिने पण तेवढयाच शांतपणे विचारले. ती परत तर जात होती, पण जरी तो तिला दोषी मानत असला तरी राघवने त्याचा भाऊ गमावला आहे , त्याचे तिला खूप वाईट वाटत होते , म्हणून ती परत आली होती.

"ही हँग हिमसेल्फ, ही वॉज जस्ट फिफ्टीन यिअर ओल्ड." राघवच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. आईच्या साडीने गळफास घेतलेला त्याचा लहान भाऊ त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागला. घरातील सगळा आक्रोश त्याला ऐकू येऊ लागला.

"मग तरीही मी त्याला मारले, असे तू का म्हणत होता? सुसाईडसाठी दुसरे रिजन पण असू शकतात?"

"कम.. अँड सी धिस.." म्हणत त्याने तिला आतमध्ये बोलावले आणि एक लॅपटॉप ओपन करू लागला.

********

🎭 Series Post

View all