ज्युलिया राघव शास्त्री १० ( समाप्त)

काय आहे पवित्र ची वाख्या?
ज्युलिया राघव शास्त्री

भाग 10

राघव सोबत ज्युलिया भारतात आली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर ज्युलियाला रहायला घर आणि नोकरी मिळाली होती. प्रामाणिकपणे मेहनत करत हळूहळू तिला चांगली चांगली नोकरी मिळाली होती. ती एका कॅफेमध्ये काम करत असताना तिथे फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांची नजर तिच्यावर पडली आणि तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली. तिने ती लगेच स्विकारली. साधी नोकरी करत असताना तिचे आयुष्य एका सामान्य तरुणी सारखे सुखी सुरू होते, पण तिच्या डोक्यात पवित्र व्हायचे आहे, हे असलेले भूत तिला स्वस्थ बसू देत नव्हते आणि चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी तिने लगेच स्विकारली. इथून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते, हे तिला सुद्धा माहिती नव्हते.

काही दिवसातच तिचा चित्रपट प्रकाशित झाला, त्यात तिला अगदीच साईड रोल होता, पण त्यातील तिच्यावर चित्रित एक गाणे तुफान फेमस झाले आणि ज्युलियाचे नाव खूप लोकांच्या खास करून पुरुषवर्गाच्या तोंडी बसले. प्रसिद्धी कधी कधी व्यक्तीचे नुकसान पण करत असते, हे कळायला कधी कधी वेळ लागून जातो, कळेपर्यंत आयुष्य विस्कळीत होऊन गेलेले असते आणि असेच काहीसे ज्युलिया सोबत झाले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपट निर्माते, प्रसिद्धी माध्यमे कोणत्या थराला जातील हे वेगळं सांगायची गरज नाहीच. चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी ज्युलियाची पूर्व आयुष्य अफवांच्या रुपात लोकांसमोर आणले. ती आधी एक पॉर्न स्टार होती, हे सगळीकडे पसरले आणि लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम बदलला.

राघव त्याच्या काही मित्रांसोबत जेवण करायला एका रेस्टॉरंटमध्ये गेला.

"काय यार, घरचे लग्नासाठी फारच मागे लागले आहे. आता तर कुठे लाईफ सुरू झाली, बिनधास्तपणे जगता येत आहे, घरच्यांना पहावल्या जात नाही." एक मित्र म्हणाला.

"मी तर रेडी आहे, पण कोणी मुलगी होकार देईना." दुसरा हसत म्हणाला.

राघव चुपचाप त्यांच्या गप्पा ऐकत होता.

"किती मुली याच्या मागे लागल्या आहेत, तर हा भाव खातोय. कोणती तांदळाची धुतलेली हा शोधतोय, काय माहिती? एवढया अटी आहेत, बापरे बाप." एक मित्र राघवची मस्करी करू लागला.

"भावा, आता तो जमाना गेला, आता मुली मुलांपेक्षा कमी नाही. मुलं सगळं करतील, तर त्या कशा मागे राहतील." पहिला मित्र म्हणला.

"मी तर असे काही केले नाही, असेलच एखादी माझ्यासाठी, माझ्यासारखी." तो शांतपणे म्हणाला.

"तू देव माणूस आहे." मित्र त्याच्यापुढे हात जोडत म्हणाला.

"प्रेमात नाही पडला अजून म्हणून, प्रेमात मग सगळं चालते." दुसरा मित्र त्याची मस्करी करत म्हणाला.

"हट्ट सोड, एखादी बघ आणि सेटल होऊन जा, उगाच या नादात वय वाढून जाईल.. मग ती ज्युलिया पण नाही भेटायची." तिथे टीव्ही वर सुरू असलेले ज्युलियाचे आयटम साँग बघून दुसरा मित्र म्हणाला.

जसे ज्युलिया नाव निघाले, राघवने वळून टीव्हीकडे बघितले तर खरंच त्यात ज्युलिया एका गाण्यावर नाचत होती. त्यात तिने अगदीच तोकडे कपडे घातले होते. नृत्य एक कला म्हटले तरी तिच्या नाचण्याचा स्टेप्स उगाच अश्लील वाटत होत्या.

"काय हॉट आहे पोरगी. चिकणी एकदम मलाई सारखी. एकदा टच करायला भेटले तर.. वाह!"

"अरे पॉर्न स्टार आहे, इंटरनेट वर खूप व्हिडिओ आहेत, काही मी डाऊनलोड केले आहे, पाठवतो. माल आहे एकदम."

मित्रांमध्ये सुरू असलेले हे संभाषण राघवच्या जिव्हारी लागत होते. जवळपास एक- दीड वर्षापासून त्याचा तिच्यासोबत काही कॉन्टॅक्ट नव्हता, पण आज अचानक असे टीव्हीवर बघून तो चक्रावलाच. तिला त्या तशा कपड्यात, ते दोन अर्थी गाण्यात नाचताना बघून त्याला खूप राग येऊ लागला होता. खाऊ की गिळू नजरेने तो टीव्हीकडे बघत होता.

"गाईज, आय एम डन, मला खूप महत्वाचे काम आले आहे, निघावे लागेल." म्हणत राघव मोबाईल हातात घेत तिथून बाहेर पडला.

'राघव कॉलिंग…' मोबाईलच्या स्क्रीनवर झळकणारे नाव बघून ज्युलिया एकदम अचंबित झाली, कारण इतक्या वर्षांत आज पहिल्यांदा त्याने स्वतःहून कॉल केला होता. ज्युलिया तर रोज त्याची आठवण येत होती, पण त्याने पुढे काही संबंध ठेवायचे नाही, असे सांगितल्यावर त्याच्या इच्छेचा तिने मान राखला होता. पण आज त्याचे नाव मोबाईलवर बघून तिचा आनंद गगनात मावेना झाला होता.

"हॅलो.." तिने फोन उचलला.

"तू कुठे आहे? मी येतोय." त्याचा एकदम चिडका आवाज आला.

"व्हॉट हॅपन?"

"सेंड मी ॲड्रेस." म्हणत त्याने फोन कट केला.

ज्युलियाने त्याला तिच्या नवीन घराचा पत्ता पाठवला.

थोडया वेळातच ज्युलियाच्या घराच्या दाराची बेल वाजली.

"तुला चिखलातून बाहेर काढले, तू पुन्हा त्या चिखलातच जाऊन बसली. यू चीप गर्ल.." दार लॉक नव्हते, तर दार उघडत राघव ओरडतच आतमध्ये आला.

ज्युलिया सोबत काही लोकं हॉलमध्ये बसले होते. ते काहीतरी प्रोजेक्ट बद्दल चर्चा करत होता. राघवचा आवाज आला तसे ज्युलिया एकदम जागेवर उठून उभी झाली. राघव बडबडतच आतमध्ये येत होता, समोर अचानक लोकं बघून तो चूप झाला.

"टीम, वुई विल डिस्कस इट लेटर." म्हणत ज्युलियाने त्यांना जाण्याचा इशारा केला, तशी ती लोकं तिथून निघून गेली.

"तू कधी सुधारणार नाही ना? त्या कामाची इतकी सवय झाली की करामत नाही ना? मजबुरी आणि काय काय बाता मारल्या होत्या, पण तेच आवडते हे बोलायला लाज वाटत होती ना?" त्याने सरळ आपल्या एका हाताने जोराने तिचा गळा पकडला आणि तो खूप रागाने तिच्याकडे बघत होता. मात्र त्याला खूप दिवसांनी बघितल्याचा आनंद तिच्या डोळ्यातून वाहत होता. ती काहीच आवाज न करता फक्त त्याच्याकडे बघत होती.

तेवढयात तिथे तिच्या घरची कामवाली आली, तसे राघवने ज्युलियाला सोडले आणि मान वळवत पलीकडे बघू लागला. काहीतरी बोलून ज्युलियाची बाई निघून गेली.

"हाऊ आर यू?" ती आनंदाने म्हणाली.

नेहमी प्रमाणे त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तो अजूनही बाहेरच बघत उभा होता.

"कॉफी घेशील? आय लर्न टू मेक कॉफी, तुला आवडते तशी. इव्हन आय लर्न पोहा आल्सो.." ती हसत म्हणाली, पण तो मात्र खंब्यासारखाच उभा होता.

ती सरळ किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवू लागली.

"का परत तेच काम जॉईन केले?" तो तिच्या पाठोपाठ जात म्हणाला.

"ते काम नाई ते.. ॲक्टर होत आहे." ती कॉफी फेटत म्हणाली.

"तू पागल आहेस? मूर्ख, फिल्म इंडस्ट्री खूप घाण असते. ॲक्टिंगच्या नावाखाली काहीपण करायला लावतात. तुला कळत नाही का?" तो चिडत म्हणाला.

"मला खूप बिग व्हायच आहे, खूप फेमस.. इन्शॉर्ट मला पवित्र व्हायच आहे. "

ते ऐकून त्याने डोक्यावर हात मारला.

"लोकं आणखी तुझा मजाक उडवतील. बाहेर लोकं कसे कसे बोलतात, माहिती तरी काय?"

"मला माहीत नवते माजे पास्ट ओपन होईल.."

"फेमस व्हायचं असेल तर भूतकाळ स्वच्छ लागतो, नाहीतर चुकीच्या गोष्टीसाठी फेमस होता तुम्ही. नाही तेव्हा एवढे समजदारीच्या गोष्टी करत होती, हे एवढे समजले नाही का, नालायक मुली.." राघव मनाला येईल ते बोलत सुटला होता.

"रिलॅक्स राघव शास्त्री." ती त्याच्या पुढ्यात कॉफी धरत म्हणाली.

"तू मला टच केलेलं ही मला चालत नसतांना, मी तुझ्या हातून काही खाईल, तुला हे वाटले तरी कसे?" तो रागाने म्हणाला.

"इथे गर्ल्सला तर कपड्यांवरून जज करतात, स्मॉल ड्रेस घातला तर कॅरॅक्टर सर्टिफिकेट देतात. आय इग्नोर देम, जे माज्या साठी काय काय बोलतात. मी खूप ॲक्ट्रेस लाईफचे स्टडी केले, तेंना पण इनीशियल डेज, असेच म्हणत होते." ती समजवणीच्या सुरात म्हणाली.

"तुला दलदलीतच राहायला आवडते, तू तिथेच रहा. शोभतेस तू तिथेच." तो कुत्सितपणे म्हणाला आणि जागेवरून उठला.

"आय बिलिव, व्हॉटेव्हर हॅपेन, हॅपन फॉर गूड.." ती हसत म्हणाली.

"नंगे डान्स करून काय चांगले होते, ते तुलाच माहिती."

"एक चांगली गोष्ट झाली, ते डान्सने. ते डान्स पाहून तू मला भेटला तरी, नाईतर ड्रीममध्ये पण विचार नवता.."

"गेट लॉस्ट.." चिडत तो तिथून निघून गेला.

आतापर्यंत तो तिच्या दूर होता; ती काय करतेय, याकडे त्याने कधीच लक्ष दिले नव्हते. पॉर्न सारख्या दलदलीतून बाहेर पडल्यावर ती साधे काही करेल असेच त्याला वाटले होते. सामान्य मुलीसारखे आयुष्य जगेल, असेच तो गृहीत धरून चालत होता, पण आता मात्र हे खूपच विचित्र, त्याने विचार केला त्याच्या विपरीत घडत होते. पण फिल्मच्या जगामध्ये आल्यामुळे ती वारंवार काही ना नाही न्यूजमध्ये राहत होती. कितीही दुर्लक्ष केले तरी तिच्या बातम्या, ती त्याच्या दृष्टीस पडत होती आणि नाही म्हटले तरी त्याचे तिच्याकडे लक्ष जाऊ लागले.

ज्युलिया चित्रपटात मिळेल ते काम करत होती; फक्त राघव तिला भेटून गेल्यापासून तिने तिच्या कामा बाबत काही अटी ठेवल्या होत्या, त्या म्हणजे ती किस किंवा फार जवळचे शारीरिक सीन करणार नाही आणि कपड्यांमध्ये पण ती बिकनी सारखे ड्रेस घालणार नाही, असे स्पष्ट केले होते. ती खूप उत्तम डान्सर होती त्या सोबतच हळूहळू तिचा अभिनय खूप दर्जेदार होऊ लागला, प्रेक्षकांच्या हृदयाला भिडू लागला होता. ती चांगली ॲक्टर जरी झाली होती, तरी अजूनही लोकं तिला, ती पॉर्न स्टार होती, हे विसरू देत नव्हते.

चित्रपटाच्या कामासोबतच तिला आता अवॉर्ड शोज, कमर्शियल ऍडव्हरटाईज, अनेक रिॲलिटी शोजमध्ये छोटे मोठे काम मिळू लागले होते. ती बरीच श्रीमंत होत चालली होती, भरपूर पैसे कमावू लागली होती. हळूहळू ती तिचे पैसे अनाथ आश्रमाला, गरजू लोकांसाठी दान देऊ लागली. त्या निमित्ताने ती अनाथ आश्रमात नियमितपणे जात होती. तिथल्या मुलांसोबत गप्पा करत, खेळ खेळत होती. त्यामुळे आता त्या मुलांचा सुद्धा तिच्यावर जीव जडला होता. तिथे अनाथ आश्रमात स्वतः अनाथ असलेल्या ज्युलियाला तिचा एक परिवार भेटल्या सारखे वाटत होते आणि ती तिथे खूप रमू लागली.

दुर्गा नवरात्राचे दिवस होते. राघवच्या घरी शेवटच्या दिवशी कन्या भोजन होत असे. पण त्या व्यतिरिक्त तो मुलींच्या आश्रमात जेवण देत, दान देत असे. राघव त्यासाठी मुलींच्या आश्रमात गेला तर तिथे त्याला ज्युलिया दिसली आणि आज पहिल्यांदा तो तिला बघण्यात मंत्रमुग्ध झाला होता.

ज्युलिया सगळ्या लहान मुलींसोबत तिथे पकडापकडीचा खेळ खेळत होती, त्या मुलींच्याच वयाची ती दिसत होती. त्यांच्या सोबत उड्या काय मारणे सुरु होते, खी खी करणे काय सुरू होते, त्या मुलींसोबत ती सुद्धा खूप निरागस दिसत होती. फिक्कट निळा घेरदार कॉटनचा कुर्ता, तशीच बांधणीची ओढणी, मोकळे रेशमी काळेभोर केस, कुणालाही वेड लावेल असे तिचे ते सौंदर्य दिसत होते.

"टिकली लावायला शिकली." तो गालातच हसला. तिच्या कपाळावरील ती छोटीशी चंद्रकोर त्याचे लक्ष वेधून घेत होते. आज तिचे हे भारतीय रूप त्याला पहिल्यांदा फारच भावले होते. थोड्यावेळ त्याने त्यांचा खेळ बघितला आणि ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला कळले की ज्युलिया तिथे नेहमीच येते. तिने बऱ्याच मुलींची शिक्षणं दत्तक घेतली आहेत. ते ऐकून त्याला एकदम ज्युलियाचा अभिमान वाटला. एक परदेशी मुलगी असा सुद्धा विचार करू शकते, याचे त्याला कौतुक वाटले. ती इथे कधी कधी येते, याची त्याने तिथे विचारपूस केली. तो तिची माहिती काढतोय, बघून त्यालाच स्वतःचे आश्चर्य वाटत होते.

आता जेव्हा जेव्हा ज्युलिया त्या आश्रमात येत होती, तेव्हा तेव्हा तो सुद्धा तिथे येऊ लागला होता आणि दुरून ज्युलियाला बघत बसायचे. तो तिच्यामध्ये गुंतत चालला आहे, हे त्याला कळत नव्हते, पण तिला बघितल्या शिवाय त्याला चैन पडत नव्हती.

"राघव शास्त्री, इथे काय करत आहात?"

आश्रमात एक बेंचवर बसलेल्या राघवने आवाजाच्या दिशेने वळून बघितले तर ज्युलिया आपले हात गुंडाळून, भुवया उडवत त्याला बघत होती.

"तू तर तिकडे खेळत.." तिला अचानक आपल्या समोर बघून तो एकदम गडबडला. .

"तू इथे कशाला आला?"

"ते ते.. मी.. मी इथे नेहमी येत.. असतो." बोलतांना तो थोडा अडखळत होता.

पहिल्यांदा तिच्यासमोर बोलतांना त्याची त त प प होत आहे बघून ज्युलियाला हसू येत होते.

"कडूसला वर्डस् येत नाई आये." ती भुवया उडवत त्याची मस्करी करू लागली.

"कडूस नाही ग खडूस असते ते." तो तिचा शब्द ठीक करत म्हणाला.

"ते मिनिंग तर सेमच असते." ती आपली बत्तिशी दाखवत म्हणाली.

"तुला बरा खडूस शब्दाचा अर्थ माहिती."

"ते जेंना हसता येत नाही अँड आल्वेज ह्मम ह्मम, ओके ओके करतात तेंना कडुस बोलतात."

तिची खडूस शब्दाची व्याख्या ऐकून तो जोरजोराने हसू लागला. ती एकटक त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होती.

"यू आर लूकींग मारवलसली क्यूट." ती त्याला हसतांना बघून म्हणाली. तो हसतांना अगदी लहान मुलासारखा तिला भासत होता. "एवरीटाईम असाच स्माईल करत रहा." ती म्हणाली.

"हम्म.." त्याने होकारार्थी डोकं हलवले.

"फ्रेंड्स?" त्याने तिच्या पुढे हात धरला.

ते ती चक्कर येऊन पडू लागली, तोच त्याने तिला पकडले..

"नौटंकी.." तो हसत म्हणाला.

"तू मला टच केले, तू पापी होईल."

"हो चालेल.. सोबतीने नरकात जाऊ." तो हसत म्हणाला.

"नरका मिंस?"

"हेल.."

"यू विल वॉक विथ मी?" ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती.

"जर तू अलाउ केले तर."


"माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड.. माज्या आवडीचा फ्रेंड गॉड गिफ्टेड मी.. मी गूड वर्क स्टार्ट केले ना, मिरॅकल्स होयला लागले." बोलतांना तिच्या डोळ्यात अश्रू जमू लागले, तिचे मन खूप भरून आले.

"नो, नो क्राईंग.. टीव्हीवर तर तू खूप स्ट्रॉंग दिसतेस.. तशीच छान वाटते." म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.

"कॅन आय हग यू? खूप डेज जाले मला कोणी हग केले नाई. माज्या मॉम नंतर कोणी माज्या डोक्यावरून हात फिरवला नाई. फक्त एकच टाईम, प्लीज.." तिच्या आवाजातील ओलावा त्याच्या काळजाच्या खोलवर रुतत होता. तिच्या बोलण्यातून ती खूप एकटी पडली आहे, हे जाणवत होते. त्याने लगेच तिला आपल्या मिठीत घेतले, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्याच्या मायेच्या स्पर्शाने तिच्या डोळ्यातून अश्रू गालांवर ओघळू लागले. त्याच्या मिठीत तिचे मन शांत होत होते तर त्याच्या हृदयाची स्पंदने वाढत आहेत, त्याला जाणवत होते.

"गॉड, नाऊ आय हॅव माय फ्रेंड, माय ओन फ्रेंड.. आय एम द लकीयेस्ट पर्सन इन द व्होल वर्ल्ड.. मला आता काईच नको पायजे." ती ओरडून म्हणाली. तसे सगळे तिच्याकडे बघून लागले.

"ओह, सॉरी सॉरी.." ती हसत सर्वांना म्हणाली.

"चल तुला घरी सोडू?"

"हा?" तिचे डोळे चक्रावू लागले.

"बाईक वर आवडेल काय बसायला?"

"चल." ती त्याचा हात पकडून बाहेर पडू लागली.

तो बाईकवर बसला. ती त्याच्या मागे बसली पण त्याच्या खांद्यावर हात ठेवू की नको विचारात होती.

" तू हात ठेवू शकते.."म्हणत त्याने बाईक सुरू केली आणि ज्युलियाच्या घराच्या दिशेने घेतली.

"वेट वेट. स्टॉप.." थोड्या पुढे गेले तसे तिने गाडी थांबवायला सांगितले. त्याने रस्त्याच्या एका बाजूला गाडी घेतली.

ती लगेच उतरून एका शॉपमध्ये गेली आणि एक बाटली घेऊन आली.

"तू माझ्या सोबत हेलमध्ये वॉक करायला रेडी असला तरी आय प्रे, तू हेवेनमध्येच वॉक कर.." ती एक मोठी गोमूत्राची बाटली त्याला देत म्हणाली.

"जो मनाने शुद्ध असतो, तो पवित्र असतो.. मला हे समजले आहे." तो स्मित हास्य करत म्हणाला.

"बट स्टिल, फॉर मी.. मला भेटला की हे तुज्या अंगावर, तू ऑल टाईम करतो तसा कर.. मी हॅपी होईल.. "

"ओके.. आता जायचं?"

"हो."

राघवने ज्युलियाला तिच्या घरी सोडले.

आता हळूहळू अशाच त्या दोघांच्या भेटी वाढत चालल्या होत्या. फोन वर बोलणे वाढले होते. त्यांच्यातील मैत्री फुलू लागली होती. ज्युलिया खूप खुश होती.


"हे स्टॉप स्टॉप.." असेच एकदा फिरताना तिने राघवला गाडी थांबवायला सांगितली.

"काय झाले?" तो गाडी थांबवत म्हणाला.

"ते तिकडे बघ.. " म्हणत ती गाडीवरून उतरली.

राघव तिने केलेल्या इशाऱ्याकडे बघितले तर एका झाडाच्या आड एक युगल एकमेकांना कीस करत होते. राघव त्या दोघांना बघतच होता की त्याला 'सट्याक्' असा मारण्याचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने बघितले तर ज्युलियाने एका मुलाच्या गालात जोरात एक ठेऊन दिली होती. त्या आवाजाने तिथे बरीच भिड जमा झाली. राघव सुद्धा पळत तिथे गेला.

"काय झाले?" त्या मुलाकडे बघत राघवने ज्युलियाला विचारले.

"हा बॉय ते कपल आये, तेंचा व्हिडिओ शूट करत होता.

"ओह मॅडम, ते खुलेआम रस्त्यावर असे अश्लील चाळे करतील तर व्हिडिओ नाही काढणार तर काय काढणार.. फ्री मी देखनोको मील रहा है." गर्दीतून एकजण राक्षसी हसू आणत म्हणाला.

"व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करून ते गर्लची बदनामी करणार.." ज्युलिया चिडत म्हणाली.

"त्या मुलीलाच स्वतःच्या इज्जतीची काळजी नाही, आम्ही का करू." परत एक जण बोलला.

"आरे हिचा बिजनेस कमी होईल ना, म्हणून जळली हीची.. ही तीच आहे गरम मसालेदार, पॉर्न स्टार ज्युलिया राणी." ज्याला ज्युलियाने मारले होते तो ओरडून म्हणाला. त्या नंतर तिथे उपस्थित सगळे ज्युलियाची टिंगल उडवू लागले होते. अश्लील शब्दात तिला, तिच्या शरीराबद्दल काही काही बोलत होते. राघवला ते ऐकणे असह्य झाले आणि त्याने त्या मुलाच्या थोबाडीत आणखी मारले. मारामारी सुरू झाली होतीच की तिथे पोलीस आलेत आणि त्यांनी दोघांना वेगळे केले.

त्या दिवशी राघवला झालेला त्रास बघून ती त्याच्या पासून दूर दूर राहू लागली. राघवच्या ते लक्षात आले, पण आता राघवला तिच्या भूतकाळाशी काही फरक पडत नव्हता. त्याने तिला समजावून सांगितले आणि परत त्यांची मैत्री पूर्ववत झाली.

***

चांगले काम केले, दुसऱ्यांना मदत की आपल्यासोबत चांगलेच होते, राघवच्या मैत्री नंतर तिचा त्यावर गाढ विश्वास बसला होता. याचीच प्रेरणा घेत तिने तिचे एन जी ओ सुरू केले, ज्यात अनाथ, बेघर मुलींना मदत केली जात होती. तिच्या भुतकाळामुळे तिच्यासोबत कोणी लग्न करणार नाही, हे माहिती होते. तिने पण तसे लग्नाचे स्वप्न बघणं सोडून दिले होते. त्यामुळे तिला काही मुली दत्तक घेण्याची इच्छा झाली होती, पण ती भारतीय नसल्यामुळे, मुल दत्तक घेण्यासाठी तिला परवानगी मिळत नव्हती म्हणून मग तिने सरळ मुलींचे शिक्षण, नोकरी, लग्न सारख्या जबाबदाऱ्या घेणे सुरू केले. इकडे कामात खूप मेहनत करायची आणि तिकडे अनाथ गरजू मुलींसाठी राबायचे, राघव सोबत थोडा वेळ घालवायचा, असे तिचे आयुष्य सुरु होते.

ज्युलियाच्या या चांगल्या कामांची नोंद आता मीडियावाले घेऊ लागले होते. त्यामुळे आता लोकांसमोर तिची एक चांगली इमेज तयार होऊ लागली होती. एक्टिंगमध्ये तिचे काम ओळखले जाईल, असे छान छान भूमिका तिला मिळत होत्या. आता ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती. आता तिला तिच्यासाठी बॉडीगार्ड ठेवावे लागले होते. पण अधूनमधून चेहरा बांधून ती राघव सोबत बाईक वरून फिरायला जात होती.

***

रात्रीचे ९ वाजले असावे. दोघेही नेहमीप्रमाणे बाइकवरून फिरत होते आणि एका सुमसाम रस्त्यावर त्याची गाडी बंद झाली.

"व्हॉट हॅपेनड?" ज्युलियाने काळजीने विचारले.

"डोन्ट नो.. सुरू होत नाहीये." खूप वेळ प्रयत्न करूनही गाडी सुरू होत नव्हती.

"इथेच ठेवावी लागेल गाडी."

"दॅट्स ओके, पायी जाऊ. "

"हो पुढे काही ऑटो वगैरे मिळेल." म्हणत त्याने एका दुकानाजवळ जात, दुकानदाराचे परवानगी घेत, तिथे गाडी उभी केली आणि दोघेही रस्त्याने चालू लागली.

दोघंही छान गप्पा गोष्टी करत चालतच होती की ज्युलियाचे लक्ष एका पडक्या भिंतीकडे गेले, तर तिथे एक गरीब बाई आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन थंडीने कुडकुत बसली, भीक मागत होती. ज्युलिया तिच्याजवळ गेली आणि तिने तिच्या पर्स असलेले सगळे पैसे काढून त्या बाईला दिले. तिथून वळणार तोच तिला काही जाणवले आणि ती परत तिथे गेली. तिने आपल्या अंगातील स्वेटर सारखी असणारी टीशर्ट काढली आणि त्या बाईला पांघरून दिली. त्या बाईने ती लगेच अंगात घालत, आपल्या तान्ह्या लेकराला स्वेटरच्या आतमध्ये घेत छातीशी लावले. त्या बाईने हात वर करत, न बोलताच तिला आशीर्वाद दिले.

"पैसे दिले होते, ते तिला तिच्या बाळाला खूप दिवस पुरेल. कपडे का काढून दिले?" राघव थोडा रागातच म्हणाला.

तिने त्या बाईला तिचे कपडे काढून दिल्यामुळे ती तिच्या आंतरवस्त्रावर होती, खाली जीन्स होती.

"त्या बाळासाठी ती आई तर जगली पाहिजे. थंडी खूप आहे ना.. ती ओपनली हवेत बसली होती." ज्युलिया म्हणाली.

"पण तू, ही अशी बिना कपड्याची." राघव अडखळत म्हणाला.

"मला तर पूर्ण वर्ल्डने नंगे बघितले आये, अजून थोडे बघतील.. काय फरक पडणार आये? बट त्या लेडीचे लाईफ माज्या उघडे असण्यापेक्षा जास्त इंपॉर्टन्ट आये." ती आपले दोन्ही हात आपल्या शरीराभोवती गुंडाळत म्हणाली.

बस त्याच क्षणी, राघवचा आपला चांगले असण्याचा गर्व उतरला. आपण विचारांनी, मनाने किती गरीब आहे, ते त्याला समजून आले होते. एक परदेशीय स्त्री आपल्या देशातील स्त्रीच्या चांगल्या बद्दल विचार करते बघून त्याला स्वतःचीच लाज वाटली. कारण हे काम तो पण करू शकत होता, पण त्याचं डोकं हे विचार करूच शकले नव्हते.

त्याने लगेच आपले जॅकेट काढत ज्युलियाला घालायला दिले. तिने पण ते आनंदाने घातले. दोघेही गप्पा करत, हसत हसत सोबतीने रस्ता चालत होते.

त्या एका क्षणात मात्र राघव ज्युलियाच्या प्रेमात पडला होता. आता मात्र त्याला तिचेच स्वप्न पडू लागले होते. डोक्यात सतत ज्युलियाचेच विचार येत होते. तिचा विचार आला की तोच ब्लश होत होता. आता त्याच्या टीव्हीवर सुद्धा फक्त ज्युलियाच दिसत होती.

राघव ज्युलियाला तिच्या एनजीओच्या कामात मदत करत होता. त्याने सुद्धा आपले काम वाढवले होते. तो प्रायव्हेट प्रोजेक्ट घेऊ लागला आणि पैसे कमवू लागला. आता दोघेही मिळून अनाथ मुलींच्या संस्थांसाठी काम करू लागले होते.

दोघेही आजकाल जास्त वेळ एकत्र घालवत असल्याने मीडियाने अफवा उडवली की दोघांचे प्रेमसंबंध आहे. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरू लागली होती. राघवच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहचली होती. मित्र माल आणि श्रीमंत गर्लफ्रेंड पटवली म्हणून त्याची उडवू लागले. पण त्याने त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केले. पण या अफवांचाच फायदा घेत त्याने ज्युलिया समोर आपले प्रेम व्यक्त केले. आधी तिने नकार दिला, खूप समजावून बघितले तरी सुद्धा तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. शेवटी जवळपास एक वर्षाने तिने त्याला होकार दिला. आता दोघांचेही प्रेम फुलू लागले होते.

राघव आणि ज्युलियाने मिळून दोन बिजनेस सुरू केले. ते पण खूप छान कमाई करत होते. काहीच दिवसात त्यांचा बिजनेस देशात चांगली ख्याती मिळवू लागला होता.

ज्युलिया इतका दानधर्म करत होती की चांगली चांगली श्रीमंत लोकं तिच्यापुढे फिकी पडू लागली होती. तिने एक गुरू बनवले, त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आता ती मोठमोठ्या आश्रमात पण जाऊ लागली होती. अध्यात्मात सुद्धा रुळायला लागली होती.

****
" काय झाले? सॅड का आहे?" ज्युलिया राघव जवळ बसत म्हणाली. त्याने त्याचा मोबाईल तिला दाखवला. सोशल मीडिया वर तिच्या फोटोवर मिम बनवले होते.. तिचा आश्रमातला एका फोटो होता, त्यावर लिहिले होते " खुद सुधारकर, लडकोको बिघाड दी."

"इट्स ओके.. माज्यासाठी न्यू नाई.. आता जे आये ते ऍक्सेप्ट करावे लागेल. आपला फोकस हा नाई, आपल्याला इंडीयातल्या अनाथ गर्ल्सला बेटर लाईफ प्रोवाईड करायची आये. फोकस डगमगू नाई देऊ." ती त्याला समजावत म्हणाली.

तिचा तो समजदारपणा बघून तो तिच्यापुढे अगदी नतमस्तक झाला होता.

****

असेच वर्ष जात होते. दोघांनीही आता जगात चांगले नाव कमावले होते. एका रेपुटेड लोकांमध्ये त्यांचे नावं येत होते.


राघवने आता ज्युलिया सोबत लग्नाचा निर्णय घेतला. थोड्या कुरबुरी नंतर त्याच्या घरून लग्नासाठी परवानगी मिळाली.

त्याने तिला एका मोठ्या हॉटेल मध्ये सर्वांसमोर खाली गुडघ्यावर बसून प्रपोज केले. तिने होकार दिला.

"आता फक्त एक स्वप्न राहिले. मग माझ्यापेक्षा लकीएस्ट इथे कोणतीच गर्ल नाही. " ज्युलिया म्हणाली.

"काय?"

"बेस्ट अक्ट्रेस."

"ते पण होईलच." म्हणत त्याने तिच्या हातात रिंग घातली.
सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता.. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या दिवशी ती खूप खुश होती.

दरवाजावर थाप ऐकू आली तशी ती जुन्या आठवणीतून बाहेर आली. ती वधूच्या वेशात खिडकीतून आपला राजकुमार बघत होती.

तिने दार उघडले. " मॅडम वरात आली. रेडी रहा, राघव सर कधीही येतील." पूजा तिला सांगून पळाली. ती फक्त हसली.

*********
जवळपास एक वर्षा नंतर…

"द बेस्ट अक्ट्रेस अवॉर्ड गोज टू ज्युलिया राघव शास्त्री." एका अवॉर्ड समारंभाचा हा आवाज जगभर घुमत होता.

राघव ऑडोटोरियमच्या बाहेर उभा बाहेर लागलेल्या ॲक्टरचा फोटो मधून ज्युलियाच्या फोटो कडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, ओठांवर हसू होते. गळा दाटून आला होता. शब्द फुटत नव्हते..

त्याला तो दिवस आठवला. तो लग्नाची वरात घेऊन ज्युलियाच्या दारावर गेला तर ज्युलिया आतमध्ये नव्हती. तिथे त्याला फक्त एक पत्र सापडले होते..

" डिअर राघव शास्त्री,

पवित्र व्हायचे राहूनच गेले..
देव माजे ऐकत नाही..
तेला प्रे कर..
नेक्स्ट जन्मामध्ये मला पवित्र करून पाठवशील..
पवित्र व्हायला चालले..
गंगा नदी सर्वांना आपल्यात सामावून घेते, होपफुली माझे सगले पापा धुलून जातील.

कदी रडायचं नाई..
अल्व्हेज हॅप्पी रहा…

….. ज्युलिया"

ते पत्र वाचले आणि त्याच्या पायाखालील जमीन सरकली. हातपाय लटपट कापू लागले आणि त्याला गंगा पवित्र नदी आहे, रिव्हर माझ्यासोबत बोलत आहे, आदल्या दिवशीचे तिचे हे सगळे बोलणे आठवू लागले.

तो पळतच नदीच्या काठावर गेला. पोलिस, सर्च टीम कामाला लागली होती. तो खूप आशेने नदीकडे बघत होता, माझी ज्युलिया परत येऊ दे, देवाजवळ प्रार्थना करत होता.


त्याला अशीच काही भीती वाटत होती, तर त्याने आधीच त्याच्या लग्नाच्या सर्टिफिकेट वर तिची साइन घेतली होती, ती आधीच ज्युलिया राघव शास्त्री झाली होती.


"दादा, आई तिच्यासोबत थोड्यावेळ पूर्वी बोलत होती. आईला माहिती झाले होते ती पॉर्न स्टार आहे. लग्नात जमलेल्या सगळ्या बायका, लोकं आईचा मजाक उडवत होते. ज्युलिया सारखी मुलगी घरात आणाल तर सगळी पिढी नरकात जाईल म्हणत होते. आई तिला भेटायला गेली आणि तिला म्हणाली की चांगली मुलगी बनली, बायको पण बनशील, पण चांगली आई बनू शकशील काय?आपल्या मुलांना चांगलं, सन्मानाचे भविष्य देऊ शकेल काय? सगळे व्हिडिओ पसरले आहे, मुलं विचारतील त्याबद्दल तर काय उत्तर देशील? मुलं सुद्धा तुला असे नंगे, हे घाण चाळे करतांना बघतील, तर त्यांच्या नजरेला नजर देऊ शकशील काय? मुलांचे आयुष्य मरणप्राय करशील.. हा समाज त्यांना सन्मानाने जगू देणार नाही." राघवची बहीण त्याला सगळं सांगत होती आणि राघवची नजर समोर स्थिरावली होती. ते लोकं ज्युलियाची बॉडी पाण्यातून बाहेर काढत होते. तिच्या डोक्यावर राघवने पाठवलेली त्याच्या नावाची ओढली तिने छातीशी घट्ट पकडली होती. तिला बघतांना त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते..

में तब भी तेरा ही रहूंगा
जब मैं नहीं रहूंगा

आज तिचे दुसरे स्वप्न पूर्ण झाले होते.. पण जग सोडून गेल्यावर लोकांनी तिला ती पवित्र असल्याचे कॅरॅक्टर सर्टिफिकेट दिले होते.

तो एकटक तिच्या त्या बोलक्या निळ्या डोळ्यांकडे, हसऱ्या ओठांकडे बघत अश्रू ढाळत होता.


अच्छी थी कहानी मगर दूरी रह गई
इतनी मोहब्बत के बाद भी अधूरी रह गई।।

—------------


कधी कधी चूक कोणाची नसते ..
तरी सुद्धा कुणी तरी ती भोगत असतं