Login

कथा जुनाच संसार नव्याने भाग २

Story Of Two' Wedding Persons
कथा -जुनाच संसार नव्याने भाग २


एका हाताने टाळी वाजत नाही



गोविंद रावांना आज ऑफिसला जायला थोडा उशीरच झाला. तिसऱ्या माळ्यावरची लिफ्ट बंद पडली, असे लक्षात येतात ते लगबगिने पायऱ्यांवरून उतरून खाली आले. त्यांची नजर रोहिणी ताईंवर गेली. किती शांत आहेत या बाई... अगदी हेवा वाटावा असं जगणं. लांब सडक केसांची वेणी. नीटनेटकी राहणी....

त्यांनी गाडी पार्किंग मधून बाहेर काढली. कार्यालयात टेबलवर फाईलींचा गठ्ठा समोर... रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासाठी आलेले वधु- वर ताटकळत उभे होते. त्यांना रोजच वधूवरांची रजिस्टर मध्ये नोंदणी करावी लागायची.
"हं... या! नाव -गाव- पत्ता लिहा या फॉर्मवर... वधू-वरांची नावे लिहा. चला, साक्षीदार या समोर. सह्या करा फार्मवर"...

"हार- तुरे आणले का? वधूवराचा एक फोटो फाईल ला लावावा लागेल. चला, फोटो काढून घ्या".

त्यांची रोजची ही कामे. त्यात भावनिक गुंतवणूक शून्य....

ते वधू-वरांनी दिलेला पेढ्यांचा बॉक्स आपल्या लेकींसाठी आणत असत.जाई जुई खुश व्हायच्या.

शाळेतून जाई जुई घरी आल्यात .पाहतात तर, आई अंथरूणावर तळमळत पडलेली. अंगात सणकून ताप भरलेला. दोघींनाही काय करावे सुचेना. जाई धावतच रोहिणी मावशीकडे गेली. त्या नुकत्याच कॉलेजमधून आलेल्या. जाई घाबरलेली पाहून त्या तिच्यासोबत तिच्या घरी गेल्या. रेखाताईंची अवस्था बघून त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करणे आवश्यक होते.
त्यांनी वेळ न दवडता रेखा ताईंना टॅक्सी करून दवाखान्यात पोहोचवलं. रेखाताई जवळ थांबणं गरजेचं असल्यामुळे, जाई जुईला त्यांनी गोविंद रावांसोबत घरी पाठविले.

"ताई! तुम्ही मला हॉस्पिटलला आणलं ,म्हणून बरं झालं." रेखाताई क्षीण आवाजात म्हणाल्या. "त्यात काय एवढं? शेजार धर्म पाळला मी बस एवढंच" ."इथली औषधं घेऊन तुम्ही नक्की बऱ्या व्हाल.विश्रांती घ्या. काही काळजी करू नका". रोहिणी ताईंनी त्यांना धीर दिला.

रोहिणी ताईंचा शांत स्वभाव पाहून रेखाताई भारावून गेल्या. प्रकृतीत तात्पुरती सुधारणा झाल्यावर त्या घरी आल्या. घरातली कामे जाई जुईनी कसे तरी उरकलेली होती. गोविंद रावांनी स्वयंपाकाचा ताबा घेतला.

"काय हो! माझी तब्येत मला साथ देईल असे नाही वाटत. मी गेल्यावर मुलींना सांभाळाल ना व्यवस्थित"?

"अगं! कशाला एवढी काळजी करतेस? काही होणार नाही तुला.आपण मोठ्या हॉस्पिटल ला जाऊ.तेथील उपचार घेऊ. मी पुढील महिन्यात ऑफिस मधून सुट्टी काढतो. तोपर्यंत ही औषधे सुरू ठेव". गोविंदरावांनी बायकोला धीर दिला.
रेखा ताईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हतीच.एक दिवस अचानक अकस्मात 'काळाचा घाला पडला'. आणि तो रेखाताईंना घेऊन गेला. 'त्यांच्या संसाराच्या चौकटीची खिळखिळी झालेली एक बाजू निखळून पडली'.

लहानग्या जाई जुई नां आई विना करमेनासे झाले. शाळेतून आल्या की, त्या रोहिणी ताईंकडे जास्त असत.

गोविंदराव एकटे पडले. त्यांच्या कार्यालयात येणारे बरेच वधू वर हे दुसरे लग्न करणाऱ्यातले असत.ते हळूहळू भावनिक होऊ लागले...


गोविंद रावांचा संसार पुन्हा फुलतो का पाहूया भाग ३मध्ये


छाया राऊत बर्वे अमरावती
0