Login

कथा-जुनाच संसार नव्याने भाग ३ अंतिम

Story About Two Wedding Persons
कथा-जुनाच संसार नव्याने भाग ३ अंतिम


टाळी एका हाताने वाजत नाही



गोविंद रावांचा सहकारी मित्र धीरज ने, त्यांची ही अवस्था पाहिली.तसेही त्याचे त्यांच्याकडे आधीपासून जाणे येणे होते. तो रोहिणी ताईंना ओळखत होता. त्याला कल्पना सुचली. चला बघूया! एक प्रयत्न करायला काय हरकत आहे...

आज रविवार.रोहिणी ताई निवांत आराम खुर्चीत बसलेल्या... गोविंदरावांचा मित्र धीरज त्यांच्या पुढ्यात उभा....
दोघांची तोंड ओळख होतीच. "कसं काय येणं केलं धीरज जी? या बसा"." मॅडम आपणाकडे जाई जुई खेळायला आलेल्या आहेत. त्यांच्याशी बोलायला आलो होतो" ."हो का! बसा चहा ठेवते".

धीरज ने घराचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. किती मजेत राहतात या! 'एकटा जीव सदाशिव'.
यांच्याकडे शब्द टाकायला हवा.

मनाच्या निर्धाराने त्याने, चहाचा घोट घेत घेत रोहिणी ताईंशी बोलायला सुरुवात केली.
"मॅडम, तुमच्याकडे जाई जुई छान खेळतात. चांगलाच लळा लागला की त्यांना तुमचा! कुणीतरी घरात बोला चालायला पाहिजे, असे नाही का वाटत तुम्हाला"? "आजवर तुम्ही एकटे राहून स्वतःला आपल्या कर्तव्यात गुंतवून घेतलं. पुढे हे त्रासदायक वाटेल तुम्हाला"... धीरजने त्यांना बोलतं केलं. "राग नका मानू. पण तुमचा भाऊ या नात्याने थोडसं सांगावसं वाटतय".

"तुम्ही एकट्या राहता. चाळीशी उलटून गेलेली... तुम्हाला पुढे मायेचा, जवळीकतेचा आधार हवा असं वाटेल. एकटेपणाचा कंटाळा आला, संवाद आणि सोबत हवीशी वाटेल तर"...

"तुम्ही जाई जुईच्या बाबांशी गोविंद रावांशी जुळवून घेऊ शकता.
पहा विचार करा". धीरज तिथून बाहेर पडला.

रोहिणी ताई थोड्या बावचळल्या .खरेच! आपण हा विचार कधी केलाच नाही. आपण एकटेपणाचा निग्रह आणि सुख आजवर मनसोक्त उपभोगून घेतलं. आपण गोविंदरावांचा अर्ध्यावर मोडलेला सारी पाटाचा डाव पुन्हा जुळवला तर... दोघांनाही उतार वयात एकमेकांचा आधार, सोबत प्रेमाची भूक... जाई जुई मोठ्या होतील तेव्हा आपल्याला त्यांचीही साथ मिळेल.


"मावशी आम्हाला भूक लागली. बाबांनी आज स्वयंपाक नाही केला. आता ते कुकर लावत आहेत.कधी होणार ती खिचडी"? त्यांनी मुलींना थोडं खायला दिलं .जाई जुई विषयीची आत्मीयता त्यांना स्वस्थ बसू देईना.

गोविंद रावांची ऑफिसला जाण्याची वेळ व रोहिणी ताईंची कॉलेजला जायची वेळ एकच होती. दोघेही एकमेकांकडे पाहत. परंतु बोलण्याची हिंमत दोघांमध्येही होत नव्हती.

आज धीरज ने स्वतःहून गोविंदरावांकडे गोष्ट काढली. रेखाताईंच्या आजारपणात रोहिणी ताईंनी केलेली धडपड त्यांच्या लक्षात होती. त्यामुळे थोडे का होईना दोघांचा संवाद झालेला होता.

धीरजने त्यांचा होकार घेतला. आता रोहिणी ताई काय म्हणतात, यावर सर्व अवलंबून होते. धीरज ने प्रयत्न सुरूच ठेवले.
बाहेर चौकातील नेहमीच्या गप्पा करणाऱ्या कट्ट्यावरही शंका कुशंका सुरू झाल्यात. "का हो! गोविंदराव एकटे राहतील, की दुसरे लग्न करतील ?""अहो बायको शिवाय कसे राहणार ते" ? दोघी मुलींना सांभाळायला मायेचा ओलावा हवा.‌त्यात त्यांनी वयाची पन्नाशी आत्ताच ओलांडली. जुनाच संसार नव्याने मांडतील का ते"?

अहो!त्यांच्या दोघी मुली रोहिणी ताईंकडेच असतात. त्यांचा खूप जीव आहे त्या मुलींवर. रोहिणी ताई एकट्या आहेत. दोघांचेही सूर जुळले तर...

पुढील आठवड्यात धीरज ने त्यांच्याच कार्यालयात ताईंना नेऊन दोघांचे अर्ज भरून घेतले. साक्षीदार म्हणून धीरज होताच.
'शुभ मंगल सावधान मंत्र गरजले.'आप्तेष्टांच्या साक्षीने रोहिणी आणि गोविंदराव विवाह बंधनात बांधल्या गेलेत.


समाप्त

छाया राऊत बर्वे अमरावती ८३९००८६९१७
0