Login

जलद कथा-जुनाच संसार नव्याने भाग १

Story Of A Two Wedding Persons
जलद कथा-जुनाच संसार नव्याने भाग १


'टाळी एका हाताने वाजत नाही'


रोहिणी रंग रूपाने उजवीच होती. सुशिक्षित, जिद्दी आणि स्वाभिमानी. स्वतंत्र विचारांची असल्यामुळे तिच्या हुशारीचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. म्हणूनच स्वतःचं मनपसंत करिअर घडवून, आवडीची प्राध्यापकी करून संसारात न गुंतता, एकटीने राहणं तिनं पसंत केलं होतं. लग्नाचा विषयही तिच्या मनात कधी आला नाही. तिचं आटोपशीर घर स्वच्छ शिस्तबद्ध अन् सजलेलं असायचं.

चारित्र्य संपन्न, सुस्वभावी, सदाचारणी ,अशीच तिची वाहवा होती. हुशार, वक्तशीर म्हणून कॉलेजातही ती लोकप्रिय होती.

आज सुट्टीचा वार !रोहिणी शांततेने वर्तमानपत्र चाळत ,कॉफीचा एक एक घोट संपवित, सकाळच्या आल्हाददायक उन्हाचा आनंद घेत आराम खुर्चीत बसली होती.

"रोहिणी मावशी", "आम्ही येऊ का तुमच्या स्वीटू मांजरीला खेळवायला"?
शेजारच्या जाई आणि जुई जुळ्या मुलींनी ताईंना विचारले.
"अगं परवानगी कसली मागताय? या की. ती बघा सोप्या खाली कशी बसलेली आहे".

दोघीही स्वीटु शी खेळण्यात मग्न झाल्यात. जाई जुई नां रोहिणी मावशी खूप आवडायच्या. कधीही त्यांनी दोघींना रागवले नाही, की त्यांच्यावर ओरडल्या नाही.. दोघीही लाघवी असल्यामुळे रोहिणी ताईंचा सुद्धा त्यांच्यात जीव गुंतला होता.

"ए कार्ट्यांनो! इकडे काय खेळत बसलात? जुई! तू त्या दूधवाल्या कडून दूध घेऊन ये. आणि जाई ,तू ग! ती भांडी घे विसळून सिंक मधली... जरा म्हणून शिस्त नाही या मुलींना"...

रोहिणी ताई मनातच हसल्या. स्वतः शीच म्हणाल्या, काय बाई आहे ही! ह्या छोट्या आठ नऊ वर्षाच्या मुलींना स्वतः शिस्त लावायची की नाही! स्वतःचा तोंडाचा पट्टा चालूच असतो हिचा. हिचा नवरा कसा काय जुळवून घेत असेल कोण जाणे! जाऊ द्या. आपण का लक्ष घालावे त्यांच्यात... तसेही दोन जुळ्या मुलींना सांभाळून कंटाळत असेल ती बिचारी...

गोविंदराव सुद्धा तिच्या अशा चिडचिडेपणा मुळे वैतागले होते." रेखा, कशाला चिडचिड करतेस? आता त्यांचं खेळायचं वय आहे .खेळू दे त्यांना. आज शाळेला सुट्टी आहे .आण, मी आणतो दूध".

रेखाताईंची प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा वाढला होता. तरीही दोघांची कुरबुर व्हायचीच. त्यात जाई आणि जुई सतत आईला समजावीत . दोघी मुली अभ्यासात हुशार असल्यामुळे गोविंद रावांना व रेखा ताईंना मुलींचा अभिमान होताच.

"आई! त्या रोहिणी मावशी किती शांत आहेत, त्या कधीच कुणावर रागवत नाहीत. आम्हाला खाऊ देतात. त्यांच्याकडील स्वीटू शी आम्ही खेळतो. आम्हाला आवडतात त्या".जुई म्हणाली.

"हो का! जा मग तिथेच राहायला. मी तुम्हाला रागावते, नाही का"? रेखाताईंचा क्रोध पुन्हा अनावर झाला.

नवरा बायकोचा पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद कधीकधी शेजाऱ्यांनाही ऐकू जायचा. शेजारची बाया माणसे दोघांनाही दुषणे द्यायची. "अहो! ' एका हाताने कधी टाळी वाजते का" ? रेखाताईंचा स्वभाव आहे चिडचिडा... पण गोविंदरावांनी गप्प राहायला नको का?"



गोविंद रावांचा संसार काय वळण घेतो पाहूया पुढील भागात भाग २ मध्ये


छाया राऊत बर्वे अमरावती
0