Login

जुन्या त्याच वेदना भाग 2

Junya Tyach Vedna
जुन्या त्याच वेदना

भाग 2

व्हॅन वाला पुढे जातो नाही जात तोच त्याला सगळे पुन्हा आडवे आले ,त्या भागातील एक गुंड असलेला पण चांगला माणूस त्याला म्हणाला, "देख कुछ किया तुने तो तू भी जिंदा नही रहेगा..ये सब हमारी बेटिया है याद रख समझें.."

त्याने मुलाने माफी मागितली आणि पुन्हा करणार नाही हे सांगितले..

रियाची आईने जर गप्प बघत बसली असती आणि थोडी जागरूकता दाखवली नसती तर तो असेच नेहमी वागत राहिला असता... त्यात जनता ही धावून आली.. पोलीस ही आले..आणि त्याला धाक बसला...वचक बसला..

रिया लगेच आईला म्हणाली ,"आई तू पण कुठे ही वाद घालत बसते ,आता मला भीती वाटेल त्यांची.."

"जा पुन्हा असा काही करणार नाही तो ,पोलीस मामा आहेत ..त्याला सरळ करतील बघ.."

रियाला वाटले ,ह्यांना आई रागावली म्हणजे हे माझ्यावर तर राग काढणार नाहीत ना..!! जसे वर्गात टीचर रागवल्यावर माझ्या मैत्रीण माझ्यावर रागावतात, घरात जसे माझ्या मुळे ताईला ओरडा बसला की ती मला नंतर त्रास देते तसे..

रिया कशी बशी शाळेत आली होती ,तिच्या डोक्यात आता तर सुटले पण घरी जातांना हाच काका असेल तर नक्कीच मला त्रास देईल...मी आज घरी एकटीच जाईल..कोणाच्या ही सोबत पण व्हॅन वाल्या काका सोबत नाही जाणार..


रिया एका टीचर च्या घोळक्या जवळ येऊन थांबली होती त्या म्हणत होत्या ,"लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.. असे रेप झाले तर कसे करायचे..आपण प्रत्येक मुलीवर लक्ष तर ठेऊ शकत नाही...त्या शाळा सुटल्यावर एकट्या जातात ,पालक येतात ,गाडीने जातात ,बस ने जातात..किंवा गाडीवाल्या काका सोबत जातात तिकडे काही झालेच असे तर कोण काळजी घेणार..?"


एकीकडे शाळेतील दोन पुरुष कामगार ,चर्चा करत होते.. "बलात्कार झाला बदलापूर च्या शाळेत..कवळी पोरीला बळी पाडले..मारले तिला.."


इकडे बारावीच्या मुली ही तेच म्हणत होत्या ,आपण सुरक्षित नव्हतो पण आता ह्या छोट्या मुली ही सुरक्षित नाहीत...आपण काही करू शकत नाहीत, फक्त बघ्याची भूमिका घ्यायची..

इकडे ह्या शाळेतील चौथीतल्या छोट्या मुली ज्यांनी घरातून निघाल्यापासून ते अगदी शाळेत प्रत्येक जण हेच बोलतांना ऐकले होते, छोट्या मुलीला रेप करून मारले..त्यांना काहीच माहीत नव्हते हे काय झाले..रेप मुळे कशी मेली ती मुलगी..

त्या एकमेकींना विचारत होत्या रेप म्हणजे काय माहित आहे का ???

त्यात छोटी गौतमी म्हणाली, "काल घरात आई आजी बातमी बघत होत्या ,कुठेतरी कोणी तरी छोट्याशा मुलीला ते रेप केला ,आणि तिला मारले त्या माणसाने.."

"हो मी पण बघत होते, तर आई बाबा म्हणाले हे लहान मुलींनी बघू नये.." चित्रा

"माझी आई तर सकाळपासून बाबांना म्हणत होती, मी तुला शाळेत नाही पाठवणार जोपर्यंत शाळेत सुरक्षा वाढवली जात नाही...त्यासाठी पाऊल उचलले नाही तर..." रिया

"पण आपले बाबा आई असे का म्हणत असतील ग, त्यांना कसली भीती वाटत आहे...कोणी काहीच सांगितले नाही..पण आजी म्हणाली माझ्या चिऊला जपायला हवे..."

"अग तुम्ही का घाबरून जात आहात ग, आपल्याला आपले आई वडील असतांना कोण काय करेल...आणि शाळेत तर आपण सगळे आहोत ,टीचर आहे..मग भ्यायचे कोणाला..शाळा सगळ्यात सेफ आहे..." चित्रा

"चित्रा ती मुलगी होती ना छोटीशी ,तिला कोणी तरी शाळेतच ते करून मारून टाकले आहे ग.." रिया घाबरत म्हणाली

"म्हणजे आपली शाळा पण सेफ नाही का ,?" चित्रा

"कोणीतरी घाण काका होते त्या शाळेत,त्या काकांनी त्या मुलीला मारून टाकले असे शेजारची काकू आईला म्हणत होती..सगळ्या आया खूप रागात होत्या आज.." रिया

छोट्या छोट्या पाचवीतल्या मुली ,पण आपल्या आजूबाजूला काही तरी खूप वाईट घडले हे समजून होत्या...आई वडील ,मोठे लोक त्यांना काही कळू देत नव्हते...का तर त्यांच्या बालमनावर परिणाम नको ,त्यांच्या मनात भीती नको वाढायला..पण चिंता तर सगळ्या पालकांना खात होती..

"रिया आपण रोज आपल्या शाळेतल्या काकांशी बोलतो ,ते ही आपल्याशी बोलतात..चॉकलेट देतात..आता तर असे वाटत आहे ते ही असे घाण असतील का ?? मारतील का लांब घेऊन जाऊन.!! "

"नाही नाही , नाही..! मी आता कोणत्याच काका सोबत बोलणार नाही..मी लांब राहीन..मला नाही रेप व्हायचा...मला नाही मारायचे...मी आई बाबांना सांगेन मी एकटी नाही जाणार शाळेत ,डान्स क्लास ला, ना एकटी जाणार शाळेच्या वॉशरूम ला...मी कुठेच एकटी नाही जाणार..." असे म्हणून रिया पळत सुटली आणि तिच्या मागे तिची मैत्रीण ही पळत सुटली..

त्यांना पळतांना एका पुरुष टीचर ने पाहिले ,आणि त्या दोघींना ही पकडून थांबून घेतले...त्यांनी खूप कसकटून पकडले..आणि थांबवले..तेव्हा तर रिया अजूनच घाबरली होती.

"मला सोडा काका ,मला सोडा..मी काही नाही केले..मला मारू नका..माझा रेप करू नका" रिया घाबरून हात सोडवत होती

टीचर समजून गेले ,आज दिवसभर हीच भीती सतातवत होती मुलांना ,शाळेत हीच चर्चा होती पण हे ह्या मुलीला कोणी सांगितले..हे ऐकून ती घाबरली हे नक्की..

त्यांनी तिला समजावले ,तिची भीती कमी केली...आणि तिला तिच्या क्लास टीचर च्या कडे सोपवले...त्यांना तिची परिस्थिती सांगितली..


रिया सावंत...महेश सावंत ह्यांची छोटी मुलगी ,शेंडेफळ...खूप गोंडस होती ,लाघवी होती..सुंदर..गोरी गोरी...बोलायला लागली की कोणी ही तिच्याकडे आकर्षून जात..

आज रियाच्या स्वभावामुळे शाळेतील सगळेच तिच्यासोबत मैत्री करत...शाळेतील मैत्रीणींची तर खूप खूप खास...सगळे मोठे छोटे...शाळेतील काका ,दादा ,मावशी लोक तिला आले की बोलल्याशिवाय रहात नसत...

रिया ,स्वरा दोघी ही बहिणी ...एक नवीत होती ती स्वरा...स्वराची शाळा दुपारची आणि रियाची सकाळची..

आई वडिलांची जीव की प्राण..पण आज जे घडले त्यामुळे त्यांना रियाची खूप चिंता वाटत होती..आपली रिया परके कोण ??,आपले कोण...?? कोणाच्या मनात काय आहे..कोण कसे बोलत आहे..? कसे वागत आहे..? कसा त्याचा स्पर्श हे अजून जाणत नाही ,सगळ्यांशी आपलेच समजून वागते ह्याची जास्त चिंता खात होती...कितीदा सांगितले तरी...माणूस ओळखत नाही रिया...एक तर तिला एक वर्षाच्या आधीच शाळेत टाकले होते..इतर मुलींपेक्षा लहान होती..

"प्रकाश काका ,कसे आहात तुम्ही." रिया म्हणाली

"हे पिल्लू मी मस्त आहे,तू कशी आहेस पिल्लू.." त्या काका ने तिला मिठीत घेतले... तिला काकांची मिठी आज नाही आवडली..तिने लगेच सोडून घेतली..आणि निघून गेली..

प्रकाश काका शेजारी रहात होते..काकाला रिया खूप लाघवी ,चुलबुली वाटायची...लहान असतांना तो तिला मिठीत घ्यायचा ,चॉकलेट द्यायचा...तिची पापी घ्यायचा.. केस कुरवळायचा.. तेव्हा तिला काका चांगले लाड करणारे वाटत...

आज तिला तो नाही आवडला...घरी गेली..

आई बागेत बसली होती...आजी ही ऊन खात बसली होती...स्वरा आणि तिची मैत्रीण शाळेत निघाल्या होत्या..


"आईने तिला घ्यायला जायला हवे होते,जे घडले त्यातून अद्दल घडली पाहिजे " सासूबाई म्हणाल्या

"जाणार होते,पण ते ऑफिस मधून तिकडे जाणार असल्याने मी नाही गेले.."

रिया लगेच आत गेली...आई तिच्या मागे गेली..आजी दोघींना बघत होती....

"आईला ना बापाला काळजी आहे लेकीची.."

रियाला शाळेत जे ऐकायला मिळाले त्याने ती आता सगळ्या पुरुषांकडे , ते घाण काका ह्या नजरेतून बघत होती..

तिला प्रकाश काका तसेच घाण असतील ,ते ही आपल्याला रेप करून मारून टाकतील की काय ह्याची भीती वाटू लागली होती..

ती गुपचूप घरात येऊन बसली होती, घाबरलेली होती..स्वतःला चोरून घेऊन ,पाय पोटात घेऊन बसली होती...आणि तिच्या खोलीचे दार लावून बसली..

आई धावत पळत आली ,तिने पाहिले रियाने आल्या आल्या कोणाशी न बोलता, शाळेचा ड्रेस न काढता असे दार का लावून घेतले असेल..तिला काय झालं असेल..

आई ने दुसऱ्या चावीने दार उघडले ," काय झालं माझ्या पिल्लू ला .."

"नाही मला नाही जायचे शाळेत आजपासून, मी घरीच थांबणार .." रिया आईच्या कुशीत शिरून म्हणून लागली..

"अग बाळा आज तू एकटीच का निघून आलीस ,तू सकाळी म्हणाली ते काका त्रास देतील म्हणून घाबरलीस का त्यांना ???सांग बरं मला..." आई कुरवाळत

"हो खूप घाबरले ,आणि आता मला कोणत्या ही काकांसोबत इथून पुढे बोलायचे नाही ,ते सगळे घाण काका असतील..मारुन टाकतील मला ते.." रिया रडत म्हणाली

आईला रियाचे हे वागणे म्हणजे कसली भीती स्वार झाली आहे हिला कोणत्या ही काका बद्दल..कोणी ही वाईट नसते ,सगळेच काका घाण नसतात...हे समजून सांगायला हवे..

मुलींना समज आणि हिम्मत दिली की सगळे प्रश्न सुटतात..पण हे काम बऱ्याचदा पालक करू शकत नाहीत.. मग कोण करणार अश्यावेळी हे काम..आई आता कोणाची मदत घेईल का.??