फक्त तुझ्यासाठी!
हि कथा आहे एका मुलीच्या संघर्षाची- तिच्या व्यंगाशी अन तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठीची, हि कथा आहे भूतकाळातल्या आपल्या स्वार्थीपणाची लाज असणाऱ्या मुलीची, हि कथा आहे आपल्या प्रेमाबद्दल अतिशय गंभीर असणाऱ्या एका मुलाची अन ही कथा आहे एका गुंडाची- पश्चाताप होऊन; त्याला भाऊ मानणाऱ्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची!!
-------------
'माने; चांगलं चोपून काढा या हरामखोराला.. चामडी लोळवा याची; त्याशिवाय तोंड उघडणार नाही साला..'- इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला सूचना करत होते..
'अहो, साहेब गेले दोन दिवस चोवीस तास चोपतो आहे आपण त्याला.. पण तो त्याच्या साथीदारांची नावं काही सांगत नाहीये.. त्याची अवस्था बघा, मरायला टेकला आहे पार!! तरीही तो काहीच सांगत नाहीये.. त्याला काही झालं तर कोर्टाला काय उत्तर द्याल??'- माने हवालदारानीं इन्स्पेक्टरनां हताशपणे उत्तर दिलं तसे तेही विचारात पडले..
ते पुढे काही बोलणार तितक्यातच बाहेर सायरनचा आवाज आला आणि ते जागेवरून ताडकन उभे राहिले.. स्टेशनमधील सारे पोलिस सावध झाले होते.. तुरुंगातले सारे कैदी चळाचळा कापू लागले होते..
'सावंत तोंड उघडलं का त्या टपोरीने??'- डीसीपी रागिणी मॅडमनी कडक आवाजात विचारणा केली तसा सावंतांना पंख्याखालीसुद्धा दरदरून घाम फुटला होता..
एक धडाडीची आणि कडक शिस्तीची अधिकारी असणाऱ्या रागिणी मॅडमनी आपल्या विभागाचा कार्यभार स्वीकारताच; गुन्हेगारांना धडकी भरवली होती.. त्यांच्या आक्रमक कारवायांमुळे त्यांच्या विभागात गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास नाहीसेच झाले होते..
पण तीन दिवसांपूर्वी भर दिवसा आमदार तिवारीच्या मुलावर आणि त्याच्या दोन साथीदारांवर प्राणघातक हल्ला झाला होता.. आमदारांच्या मुलाचे; प्रदिपचे तर हात-पाय तलवारीने कापण्यात आले होते.. त्याची हॉस्पिटलमध्ये मृत्यशी झुंज चालू होती.. आमदार विद्यमान सरकारमधील मंत्री असल्याने रागिणी मॅडमवर हल्लेखोर शोधून काढण्यासाठी आत्यंतिक दबाव होता..
हल्लेखोर पिंट्या मात्र हल्ल्यानंतर लगेच पोलिस स्टेशनला हजर झाल्याने रागिणी मॅडमवरचा तेवढा ताण हलका झाला होता.. पण इतकी जीवघेणी मारहाण केल्यावरही पिंट्याने आपल्या साथीदारांची नावे तोंडावर आणली नव्हती..
'काय सावंत; अट्टलच्या अट्टल गुन्हेगार तुमच्या आणि मानेंच्या थर्ड डिग्रीला शरण येतात मग हा कसा काय टिकला??'- रागिणी मॅडमनी जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं आणि त्यांनी पिंट्या असलेल्या लॉकअपमध्ये प्रवेश केला..
'अहो मॅडम, कसली निगरगट्ट चामडी आहे याची माहिती नाही.. अहो, पहिलं काठीने बदडून काढलं.. काही उपयोग नाही.. बर्फाच्या लादिवर अख्खी रात्र झोपवलं.. उपयोग नाही.. झालेल्या जखमांवर तिखट-मीठ टाकलं पण तरीही काही उपयोग नाही.. साथीदारांची नावं विचारली तर सरळ नाही बोलतो..'- सावंतांनी आपली व्यथा मांडली..
'मॅडम, मला तर वाटतं की हा कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेला आहे.. त्या प्रदिपशी काहीतरी वैयक्तिक दुष्मनी असणार याची.. त्याचाच सूड म्हणून..'- हवालदार मानेनीं आपली शंका मांडली..
'पण याचा आणि प्रदिप तिवारीचा कधी सबंध आलाच नाही ना?? आपला तपास तर तेच बोलतो ना?? राईट सावंत?'- रागिणी मॅडम विचारात पडल्या होत्या..
'हो मॅडम.. दोघांचा एकमेकांशी कोणताच सबंध आला नाहीये.. प्रदिपच्या जखमी साथीदारांनीही तसा जबाब दिला आहे..'- सावंतांनी तपास मॅडमसमोर ठेवला..
इतक्यात पिंट्याला शुद्ध आली होती.. सुजेने बंद झालेल्या डोळ्यावर ताण देत त्याने आलेल्या लोकांना पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न केला..
'काय माने?? आज कशाने टॉर्चर करणार मग??'- रक्ताने माखलेले दात विचकत पिंट्याने प्रश्न विचारला तशी रागिणी मॅडमच्या मस्तकात रागाची एक तिडीक गेली होती..
'ये निर्लज्ज माणसा.. तुला काय वाटत की तुझं तोंड उघडणं आम्हांला जमणार नाही का?? तुझ्यापेक्षा कितीतरी निर्ढावलेल्या गुंडांना वठणीवर आणलं आहे मी.. तु तर नाक्यावरचा एक चिरकूट टपोरी.. दोन-चार दिवस सहन करशील आणि मग येशील लाईनीवर.. सांग का हल्ला केलास त्या पोरावर?? सांग..'- रागिणी मॅडमनी पिंट्याची कॉलर पकडली होती..
'हल्ला नाही शिक्षा दिली त्याला.. महाराजांनी ठरवलेली शिक्षा.. '- पिंट्या हसत म्हणाला..
'ये शहाण्या स्पष्ट बोल..'- मानेंनीं त्याचे केस ओढले तसा तो कळवळला..
'हेच जर तुम्हीं त्याच्यासोबत केलं असतं तर त्याने त्याचा अपराध कबूल केला असता, कोर्टाने त्याला शिक्षा दिली असती अन तो तुरुंगात सुखात असता..पण तुम्हीं साले मंत्र्यांच्या बुडाखालची मांजरं.. त्याच्या लोकांच्या गुन्ह्यांना उघडकीला आणण्याची हिंमत तुमच्यात आहेच कुठे?? आणि म्हणे डॅशिंग डीसीपी.. थू..'- पिंट्या अक्षरशः रागाने बाजूला थुकला होता..
'ये #^@%, तुझी एवढी डेरिंग?? थांब..'- सावंतांचे रक्त खवळले आणि त्यांनी बाजूलाच पडलेला लोखंडी रॉड उचलला..
'सावंत.. एक मिनिट थांबा.. माने बरोबर बोलले होते.. याच्या रागामागे काहीतरी खूप मोठं कारण आहे.. आपण काहीतरी मिस करतोय.. हा तु बोल.. कोणते महाराज?? आणि महाराजांच्या कोणत्या शिक्षेबद्दल बोलत होतास तु??'- सावंतांना शांत करत रागिणी मॅडमनी त्याची चौकशी सुरू ठेवली होती..
'महाराज कोण?? हिच खरी आपल्या महाराष्ट्र राज्याची शोकांतिका.. बाई, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय मी.. आणि त्यांची शिक्षा म्हणजे चौरंग केलाय मी त्याचा.. चौरंग..'- पिंट्या क्रोधाने बोलला..
'म्हणजे??'- सावंतांनी विचारलं..
'त्या मंत्र्यांचे तळवे चाटण्यापेक्षा आमचे शिवराय वाचले असते तर असले प्रश्न पडले नसते आणि माझ्यासारख्यावर ही वेळ आली नसती.. '- पिंट्याने कुत्सितपणे म्हटलं तसे सावंत पुन्हा भडकले..
'जास्त बोलू..'- सावंत त्याच्यावर हात उगारणार तोच मॅडमनी पुन्हा हस्तक्षेप केला होता..
'एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यावर मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त करण्याची परंपरा महाराष्ट्रात कधीच नव्हती.. स्त्रीचा अनादर करणाऱ्या; तिच्या स्त्रीत्वावर घाला घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला 'चौरंग' करणे हि एकमेक शिक्षा होती त्याकाळी.. व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याचे हात-पाय कलम करत त्याला जिवंतपणीच नरकयातना देण्याची पद्धत आपण विसरलो आणि म्हणूनच असे अनेक नराधम जन्माला येत आहेत..'- रागाने पिंट्याच्या नागपुड्या फुलल्या होत्या..
'पण त्याने कोणत्या मुलीवर बलात्कार केलाय??'- रागिणी मॅडमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत..
'अरे व्वा! विसरलीस बाई?? एवढया लवकर विसरलीस??'- पिंट्या आता काहीसा चिडला होता..
'तु.. तुझी हिम्मत कशी झाली मॅडमना एकेरी बोलण्याची?? हेच शिकवलं का तुझ्या महाराजांनी??'- माने न राहवून त्याच्या कानाखाली लगावली होती...
'अरे बापरे, फक्त माझे महाराज?? म्हणजे अख्खा महाराष्ट्र महाराजांना मानतो हे खोटं ठरलं म्हणायचं.. तुमच्यासारखे करंटे आहेतच की...आणि हो.. महाराजांची शिकवणून लक्षात आहे म्हणूनच यांच्याशी सभ्य बोलतोय.. नाहीतर हिची तेवढीपण लायकी नाही.. काय बाई? अनघा जाधवची केस विसरलीस का??'- पिंट्याचा आवाज वाढला होता..
अनघा पवार हे नाव ऐकताच रागिणी मॅडम जोरदार धक्का बसावा तशा मागे कलंडल्या होत्या..
'मॅडम!!'- त्यांच्या चेहऱ्यावरील अपराधी भाव पाहून सावंत चकीत झाले होते..
'तु.. तु कसा ओळखतोस तिला?? तुझा आणि तिचा काय सबंध??'- रागिणी मॅडमनी कचरत विचारलं..
'आठवली म्हणजे गरीब अनघा.. माहितेय ना तिच अनघा; जिने एक स्त्री म्हणून तुमच्याकडून कितीतरी अपेक्षा ठेवल्या होत्या.. तुम्ही तिच्यावर झालेल्या न्याय मिळवून द्याल एवढीच भाबडी आशा घेऊन आली होती ती तुमच्याकडे.. पण तुम्ही काय केलंत?? आमदाराच्या दबावाखाली शेपूट घातलीत.. एक निडर, डेअर डेव्हिल ऑफिसर...'- पिंट्या जोरात हसू लागला होता..
त्याच तस हसणं रागिणी मॅडमना भयंकर वेदना देत होत.. त्यांच्या हृदयातली एकमेव भळभळती जखम पिंट्याने आज पुन्हा उघड केली होती.. एका कडक ऑफिसरच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या आणि कसल्याशा दुःखात त्या मागे जाऊन लॉकअपच्या भिंतीला टेकल्या होत्या.. वेदनेची तीव्रता वाढली तसा भिंतीचा आधार घेत त्या खाली जमिनीवर बसल्या होत्या..
रागिणी मॅडमना तसं मानसिकरीत्या कोसळलेलं पाहून सावंत आणि माने चकीत झाले होते.. दोघेही मॅडम जवळ जाऊन उभे राहीले होते..
'सावंत, केस आठवली तुम्हाला??'- रागिणी मॅडमच्या आवाजात एक प्रकारची लज्जा होती.. लाज आपल्या कर्तव्याशी केलेल्या गद्दारीची!!
'अम्म्म.. हो.. आपण त्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकलो नव्हतो.. पण..पण मॅडम जेव्हा ती आपल्याकडे तक्रार करायला आली होती तेव्हा हा नव्हता तिच्यासोबत??'- सावंतांना आठवलं होतं..
'कारण मी पण तेव्हा एक रस्त्यावरच्या नाक्यावर उभा राहून टवाळकी करणारा टपोरीच होतो.. बट आता मी तिचा भाऊ आहे.. आणि हा भाऊ त्याच्या बहिणीला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार.. तुमच्यासारखी गद्दार, मंत्र्याची रखेल आजूबाजूला असली तरी..'- पिंट्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला आणि रागिणी मॅडमचं सर्वांग शहारले.. तप्त लाव्हा कानात ओतावा तसे त्याचे शब्द त्यांचा अंतरात्मा जाळत गेले होते..
विमनस्क मानसिक स्थितीतच त्या उठून उभ्या राहिल्या होत्या तोच एका हवालदाराने पिंट्याला भेटण्यासाठी त्याचा मित्र आणि कोणी वकील मॅडम आल्याची वर्दी लॉकअपमध्ये येत दिली होती..
सारे जण आपला चेहरा सावरून बाहेर पडले होते..
'गुड मॉर्निंग मॅडम.. मी रुचीरा साठ्ये.. हि केस मी माझ्याकडे घेतली आहे.. आणि मला माझ्या अशिलाशी या केस संदर्भात काही चर्चा करायची आहे.. हे कोर्टाचे परवानगी पत्रक..'- ऍडव्होकेट रुचिराने रागिणी मॅडमसमोर पेपर पुढे केला होता..
'आपण कोण?'- मॅडमनी रुचिरा सोबतच्या तरुणाला विचारलं होतं..
'मी निशांत साळवी.. पिंट्याचा मित्र..'- त्या तरुणाने स्वतःची ओळख दिली होती..
'माने, यांना त्याच्याकडे घेऊन जा..'- रुचिराकडील पत्रक न बघताच मॅडमनी त्या दोघांना पिंट्याला भेटण्याची परवानगी दिली होती..
दोन दिवसांच्या मारहाणीच्या खुणा पिंट्याच्या सर्वांगावर दिसत होत्या.. रक्ताने माखलेले कपडे, सुजलेला चेहरा, थकव्याने झुकलेलं शरीर पाहून रुचिरा अन निशांत जागीच थबकले होते..
'सु..सुर्या..'- रुचिराच्या तोंडून अस्पष्ट आवाज बाहेर पडला होता.. पिंट्याचे खर नाव ऐकताच निशांतने चमकून रुचिराकडे पाहिलं तर तिचा चेहरा पार रडवलेला झाला होता.. तिने डोळे मिटून घेतले असले तरी तिच्या डोळयातून बाहेर पडणाऱ्या अश्रुधारा तिला रोखता आल्या नव्हत्या...
'कोण?? अरे तुम्हीं??'- सूर्याने हसून विचारलं..
'पिंट्या सॉरी.. सुर्या.. या रुचिरा साठ्ये.. आपली केस या लढवणार आहेत.. यार, काय हालत केली रे तुझी यांनी??'- निशांतने सुर्याजवळ जात काळजी व्यक्त केली..
'साल्या सगळ्या विश्वासघातकी बायका एकाच केसमध्ये एकत्र आल्यात निशांत...'- सूर्याचा आवाज वाढला तसा निशांत चकीत झाला होता..
'मी.. मी अजून दोन-तीन दिवस नक्कीच जिवंत राहीन.. बट मी तुला आजच सांगतो.. वकील बदल.. ही बाई एक नंबरची स्वार्थी आहे.. कधी पैशासाठी आपल्या पाठीत खंजीर खुपसेल; आपल्यालाही कळणार नाही.. ही.. ही नको...'- सूर्याने मान फिरवत सांगितलं तस रुचिराला अधिकच रडू कोसळलं..
आपल्या तोंडावर हात ठेवून ती मागच्या मागे धावत तिथून बाहेर पडली होती..
क्रमशः
नवीन ठिकाणी नोकरीसाठी रूजू होत असल्याने या कथेचे सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोनच भाग येतील.. एक कट्टर मुबंईकर सर्वार्थाने पुणेकर झाल्यावर मात्र भाग नियमितपणे पोस्ट होतील..
आणि अजून एक! अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला या कथेतील कोणत्या पात्राला तुम्हाला या कथेतही वाचायला आवडेल?? सर्वात जास्त पसंतीच्या पात्राला मी या कथेत नक्कीच घेऊन येईन.. ते पात्र आपल्या कथेची सरप्राईज एन्ट्री असेल... नक्की कळवा..
© मयुरेश तांबे
कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही..
सादर कथा ही काल्पनिक असून; एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..
धन्यवाद..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा