Login

ज्वारीचे फुणके

Healthy Millet Recipes : ज्वारीचे फुणके


ज्वारीचे फुणके

तृणधान्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये आणि खनिजे असतात, तसेच ती पचण्यास हलकी आणि ग्लूटेन विरहित (Gluten free) असतात. त्यामुळे ज्यांच्या प्रकृतीला गहू मानवत नाहीत असे लोकसुद्धा त्यांचा उपयोग करू शकतात. वजन कमी करण्यासाठी ( weight loss) तृणधान्ये आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही काही तृणधान्ये होत. आपल्या आहारामध्ये अशा तृणधान्यांचा समावेश असणे हे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात यावे , आणि त्यांचा उपयोग करण्यात यावा, यासाठी 2023 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून घोषित केले गेले आहे.

यापैकी ज्वारी हे शीत गुणधर्म असलेले धान्य. ज्वारीमध्ये कर्बोदके, प्रथिने, क्षार, आवश्यक स्निग्ध पदार्थ, आणि ब वर्ग जीवनसत्वे असतात. ज्वारी ही प्रोटीनयुक्त असल्यामुळे बलवर्धक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तर आपल्याकडे ज्वारीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते.

तर काही पारंपरिक तर काही नवीन \"हेल्दी मिलेट्स रेसिपीज\" (Millet Recipes) आपण बघणार आहोत. त्यापैकी आजची रेसिपी आहे ती म्हणजे ज्वारीचे फुणके. हा एक चवदार पारंपरिक पदार्थ आहे आणि तो दाल तडका किंवा फोडणीच्या वरणासोबत खाल्ला जातो.

यासाठी आपल्याला लागणारे साहित्य:
ज्वारीचा किंचित जाडसर रवा,
ताक किंवा दही,
मीठ.
अर्धी वाटी चण्याची डाळ

फुणक्याच्या फोडणीसाठी
तेल, हिरवी मिरची, कढीलिंबाची पाने, जिरे, मोहरी, हिंग इत्यादी.

तुरीच्या डाळीचे तयार वरण आपल्याला यासोबत खाण्यासाठी लागणार आहे.

कृती :

दीड वाटी ज्वारीचा रवा घेऊन त्यात अर्धी पाऊण वाटी ताजे ताक किंवा तीन चार चमचे दही टाकावे आणि रवा भिजेल अशाप्रमाणात पाणी टाकावे. हे मिश्रण फार पातळ किंवा फार घट्टही नको. रवा नीट वाफला जाईल असे म्हणजे साधारणत: ढोकळ्याच्या पिठाच्या मिश्रणाएवढे दाटसर असावे. चवीप्रमाणे मीठ या मिश्रणात एकत्र करून मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे.

चण्याची डाळ किंचित हळद आणि मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावी.

दोन तेल लावून घेतलेल्या थाळ्यांमध्ये फुणक्याचे मिश्रण एकसारखे पसरवून ते स्टीमर मध्ये 15 ते 18 मिनिटे वाफवून घ्यावे. नंतर फुणक्याची \" टूथ पिक टेस्ट \" करून फुणके नीट वाफल्याची खात्री करून घेऊन मग ते स्टीमरमधून बाहेर काढून थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे.

आता याचे पिझ्झा सारखे काप करून घ्यावे. हे फुणके मसालेदार फोडणीच्या वरणासोबत असेही खाता येते , किंवा त्याला पुढीलप्रमाणे फोडणी द्यावी.

फोडणीसाठी एका भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेऊन त्यात मोहरी , जिरे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता.

फुणके चुरून घ्यावे. त्यावर ही फोडणी आणि शिजवून घेतलेली चण्याची डाळ घालावी . बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावे.

आता हे फुणके मसालेदार वरण किंवा दाल तडका बरोबर आस्वाद घेण्यासाठी तयार !

🎭 Series Post

View all