हॉस्पिटलबाहेर अंकीतला रडू कोसळलं आणि आजूबाजूचे सर्वजण त्याच्याकडे बघू लागले. लांब उभे असलेले त्याचे वडील घाबरतच त्याच्याजवळ आले आणि म्हणाले,
"काय झालं आईला? डॉक्टर काही म्हणाले का?"
डोळे पुसत अंकित म्हणाला,
"आई बरी आहे..आज सोडणार आहेत"
वडील गोंधळले, सगळं ठीक झालं असतांना हा अचानक का रडू लागला..अंकित उठून उभा राहिला आणि त्याने आपल्या बायकोला- जुहीला फोन लावला,
"हॅलो, कुठे आहेस..?"
"हेअर सलोन मध्ये आहे, बोटोक्स करतेय आज"
"आज संध्याकाळी आईला डिस्चार्ज मिळणार आहे, घरी थांब"
"ते शक्य नाही, संध्याकाळी माझी स्किनकेयर स्पेशालिस्टकडे अपॉइंटमेंट आहे"
अंकितने राग गिळत फोन कचकन एन्ड केला. वडिलांनाही हेच अपेक्षित होतं, पण अंकितच्या अश्या रडण्याचं कारण त्यांना कळेना. त्यांनी अंकीतला बाजूला नेलं आणि विचारलं,
"तू रडत का होतास?"
अंकीतला कंठ पुन्हा दाटून आला, त्याने एकच शब्द उच्चारला..
"कल्याणी..."
तिचं नाव ऐकताच वडिलांना आतून गलबलून आलं. आज किती दिवसांनी अंकीतच्या तोंडुन तिचं नाव ऐकलं होतं. तिच्या पावली लेकच घरी आली होती, अंकीतची बायको बनून. "बाबा औषधं घेतली का? कंटाळा करू नका हं, नाहीतर मी बोलणार नाही तुमच्याशी.. आणि आई हे काय? तुमच्या केसांना काय झालं? थांबा संध्याकाळी मीच माझ्या हातांनी मालिश करून देते.."
तिच्या असण्यानेच घरात एक चैतन्य असायचं. आजूबाजूला नव्या सुनांचे इतके किस्से ऐकायचे की आपल्या एकुलत्या एक मुलाची बायको कशी निघेल याची त्यांना धडकीच भरली होती, पण कल्याणी आली आणि ते स्वतःला नशीबवान समजू लागले. खरं तर कल्याणी मोठ्या पगारावर नोकरीला, दिसायला थोडी सावळी होती पण तिच्या चांगुलपणाने तिचा सावळा रंग उजळून निघाला होता.
"सावळ्या रंगाची माणसं मायाळू असतात" असं ते सर्वांना सांगू लागले.
तिची ही वाक्य अंकीतच्या वडिलांच्या कानात घुमत होती. एकवेळ अंकित घरी नसला तर काही वाटत नसे पण कल्याणी नजरेआड झाली की त्यांना नको नको व्हायचं. पण अंकीतचं एक चुकीचं पाऊल आणि कल्याणी कायमची दूर गेली..तेव्हापासून स्वतःच्या मुलाशी त्यांनी सुनेच्या प्रेमापोटी अबोला धरला होता. पण आज अचानक अंकित आणि कल्याणीचं काय बोलणं झालं ज्याने अंकीतला रडू कोसळलं? मुळात कल्याणीने त्याच्याशी का संपर्क साधला असेल?
घरी गेल्यानंतर अंकित आणि वडिलांनी आईला तिच्या खोलीत सोडलं आणि आराम करायला लावला. वडिलांनी घरात चहूकडे पाहिलं आणि स्वतः किचनमध्ये गेले, बायकोसाठी सूप बनवू लागले. वडिलांना असं बघून अंकीतला जुहीचा प्रचंड राग आला. अपराधीपणाने त्याचं मन पूर्णपणे कलुषित झालं होतं. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याने दुसरं काय होणार?
(चार वर्षांपूर्वी)
"अंकित आजही ऑफिसमधून यायला उशीर? कल्याणी तुझ्यासाठी जागी राहते, तिलाही ऑफिस असतं.. तुझ्यामुळे तिला झोपायला उशीर होतो"
सासूबाई कल्याणीची बाजू घेऊन मुलाला रागवत होत्या,
"असुद्या आई, ऑफिसमध्ये काम असेल महत्वाचं"
"सुनबाई, इतकाही समजूतदारपणा बरा नाही..नवऱ्याला बोलत जा जरा"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा