# एक झाले ऊन आणि सावली ?( भाग २ रा)
©®आर्या पाटील
शरदरावांनी जेवणाचं ताट राजवीरच्या रुममध्ये पोहचवलं.त्याची सगळीच व्यवस्था अगदी घरातल्या सदस्यासारखी केली होती.हेच त्यांच्या कॉटेजचं वैशिष्ट्य होतं.
प्रवासाचा शीण आल्याने राजवीरला जेवल्यानंतर लगेचच झोप लागली.अवनी मात्र ना धड जेवू इच्छित होती ना झोपू. आईबाबांना काही कळू नये म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न सुरु होता.झोपेचं कारण देत जेवणानंतर लागलीच ती रुममध्ये आली.दर्पणात पडलेलं स्वतःचं अगतिक प्रतिबिंब तिला नकोसं झालं.
' मी उद्ध्वस्त झाले आहे एखाद्या भग्नमूर्तीसारखी. शालीनता, लज्जा, सौंदर्य हे तर स्त्रीत्वाचे दागिने.वासनेचा राक्षस मात्र या दागिन्यांवर गरळ ओकता झाला.सगळच संपलं आता.स्त्रीत्वाचा अभिमान वाटावा की स्त्री म्हणून जन्माला आल्याचं दुःख ?' ती पुन्हा स्वतःच्या दुःखात रमली.
हातांना देहाभोवती लपेटून घेत तिने डोळे गच्च मिटले.डोळ्यांपुढे पुन्हा स्वत्व हरण झालेली स्वतःची प्रतिमा तरळू लागली. उत्साहाचं वादळ असलेल्या आपल्या देहाला असं वेदनेने बरबटलेलं पाहून डोळ्यांना भरती आली. आवाजाला कंठातच दाबत ती ओक्साबोक्सी रडू लागली. मोकळं रडण्याचा अधिकारही त्या नराधमाने काढून घेतला होता जणू. डोळ्यांत वेदनाच काठोकाठ भरली होती मग झोप तरी कशी सामावणार..?
आई बाबा झोपल्याचा कानोसा घेऊन ती दुमजली घराच्या टेरेसवर पोहचली. चांदण्यांच्या जगात दुःखाला रितं करण्याच्या प्रयत्नात.
रात्रीचे बारा वाजले असावेत.
तिकडे शांत झोपलेल्या राजवीरला अचानक दरदरून घाम फुटला. मोठ्याने काही तरी ओरडत तो झोपेतून उठून बसला. हातांची ओंजळ करीत त्यात चेहरा झाकला.चेहऱ्यावर फुटलेल्या घामाला हातानेच टिपत कॉटेज बाहेर पडला. वाऱ्याची थंडगार झुळूक स्पर्शून जाताच चेहऱ्यालाच नाही तर मनालाही शीतलता मिळाली. तिथेच खुर्चीत बसत त्याने स्वतःला विचारांच्या तावडीतून मुक्त केले.त्या चांदरात्रीने, थंडगार वाऱ्याने अन् सागराच्या निनादाने क्षणिक का होईना पण मनाला उभारी मिळाली.
काही काळ टेरेसवर घालवून अवनी झोपायला निघून गेली. मी सावरेन स्वतःला हा दृढ निश्चयाचा शेला पांघरुण तिने निद्रादेवीला आळविले.ठिक वाटल्यानंतर राजवीरही झोपायला आत आला.आजकाल त्याचं असं झोपेतून दचकून उठणं खूप वाढलं होतं.
रात्री उशीरा झोपूनही राजवीरला मात्र सकाळी लवकरच जाग आली. सकाळचे सात वाजले होते.लाटांचा आवाज मनाला भुरळ घालू लागला. कॉटेजमधून बाहेर येताच निसर्गाच्या अस्मानी सौंदर्याला पाहून त्याची नजर जागेवरच खिळली. कॉटेजच्या समोर पसरलेली नारळाची मोजकी झाडे, कुंपणाच्या सीमारेषेवर मोहरलेली आंब्याची वनराई.सोबतच फणस आणि काजूची काही तुरळक झाडे. कॉटेजला लागूनच फुललेली अबोली. सारं अस्सल कोकणी सौंदर्य.इतरही आर्टिफिशियल झाडे होती सजावटीसाठी पण त्यांच सौंदर्यही आर्टिफिशियलच वाटलं त्याला.
तोच शरदरावही बाहेर आले.
" साहेब, निवांत उठायचं की. चांगले आठ दिवस मुक्कामाला आहात ? झोप झाली ना व्यवस्थित ?" घरच्याप्रमाणे चौकशी करीत ते म्हणाले.
" हो अगदी व्यवस्थित. काका एक विनंती होती. मला प्लिज साहेब वैगेरे म्हणू नका. मी तुमच्या मुलाच्या वयाचा, घरच्यासारखी सगळीच काळजी घेता मग साहेब बोलून का परकं करता ? मला राजवीरच म्हणा." म्हणत राजवीरने मनाचा मोठेपणा दाखवला.
" तुमच्यासारखे फार थोडे भेटतात हो. शेवटी आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे. ठिक आहे राजवीरच म्हणेन तुम्हांला. आता उठलाच आहात तर जाऊन समुद्रावर फेरफटका मारून या. पहाटेचा समुद्र आणखी सुंदर दिसतो. इथून सरळ पाऊलवाटेने जाल तर थेट समुद्रावर पोहचाल." कॉटेजच्या मागच्या बाजूला असलेली पाऊलवाट दाखवित शरदराव म्हणाले.
हातात पाण्याची बॉटल, नॅपकिन अन् कानात हेडफोन घालत राजवीर त्या दिशेने निघाला.वाढत जाणारा लाटांचा आवाज त्याला आणखी आतुर करीत होता. पावलांची गती वाढवित त्याने काही मिनिटांतच समुद्रकिनारा गाठला.त्या देखण्या जलाशयाला डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत होता. किनाऱ्यालगत ऐटीत उभ्या असलेल्या ताडा माडाच्या रांगा आपल्या सौंदर्याची भूरळ घालित होत्या. निसर्गाच्या अदाकारीने खुश झालेला तो आधुनिक युगातला तरूण हेडफोनवर गाणं ऐकायलाही विसरला. लाटांच्या तालांवर वाऱ्याने सुर छेडिले अन् निसर्गदेवतेला स्वरांचा नजराणा बहाल केला. मग राजवीरही रसिक श्रोत्यासारख्या त्याच स्वरांत आकंठ बुडाला.
तोच मागून कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज त्याची तंद्री तोडता झाला. त्याने काळजीने मागे पाहिले. पाठमोरी कोणी एक तरुणी हातांच्या ओंजळीत चेहरा झाकून जोरात ओरडली आणि ओक्साबोक्सी रडू लागली. कदाचित राजवीर तिथे आहे याचा अंदाज तिला आला नसावा.
तिला असे रडतांना पाहून राजवीरची पाऊले आपसूकच तिच्या दिशेने वळली.
" ओ मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का ? काही मदत हवी असल्यास सांगा." तिच्याजवळ जात तो म्हणाला.
तशी ती सावरली. चेहऱ्यावरून हात बाजूला घेत तिने ओली नजर त्याच्या दिशेने रोखली.
" तुम्ही ?" दोघांच्या तोंडून एकाच वेळी एकच शब्द बाहेर पडला.
काल जरी अंधूक प्रकाशात भेटले होते तरी तिच्या डोळ्यांतील अगतिकता आणि त्याच्या डोळ्यांतील राग एवढच पुरेसं होतं त्यांना एकमेकांना ओळखायला.
" मॅडम, तुम्ही रडत आहात. काही समस्या आहे का ? काल मला फक्त शंका होती आज मात्र खात्री पटली आहे.तुम्ही नक्कीच काही प्रॉब्लेममध्ये आहात." अगदिच आपलेपणाने तो म्हणाला.
" तुम्ही इथेही आलात ? का माझा पाठलाग करता आहात ?" डोळे पुसत तिने विषय बदलला.
" सॉरी...काय म्हणालात पाठलाग ? मॅडम मी इथे कोणाचा पाठलाग करायला नाही आलो. काल पाण्यात आणि आज इथे तुम्हांला हे असे रडतांना पाहून माणुसकीच्या नात्याने विचारले फक्त. काय बुवा एवढीही माणुसकी नाही का दाखवायची ?" तो ही आक्रमक होत म्हणाला.
" मला कोणाच्या माणुसकीची गरज नाही आणि पुरुष प्राण्याची माणुसकी नकोच नको. मी समर्थ आहे स्वतःची समस्या सोडवायला." म्हणत तात्काळ ती त्याच पाऊलवाटेने घराकडे निघाली.
तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीला नजरेआड होईस्तोवर न्याहाळत तसाच थांबला.
ती लगबगीने घरी पोहचली.
आन्हिके आवरून मोर्चा परसबागेत वळवला. दाटीवाटीने फुललेली लालबुंद जास्वंदीची फुले तोडत देवघरातील गणरायाला अर्पण केली.हात जोडून येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची शक्ती एकवटली.
" ते राजवीर रस्ता तर विसरणार नाहीत ना ? सविता, मी आलो गं त्यांना पाहून." शरदरावांनी बाहेरून आरोळी दिली.
" बाबा, काय झालं ? कुठे निघालात ?" बाहेर येत अवनी म्हणाली.
" अगं काल ते साहेब.." बोलता बोलता त्यांनी जीभ चावली.
" बघ पुन्हा साहेबच आलं तोंडात. त्यांनी सकाळीच सांगितलं मला साहेब म्हणू नका नावाने आवाज द्या म्हणून." भोळेपणाने ते म्हणाले.
" मग त्यांचं काय ?" तिने रागातच विचारले.
" समुद्रावर गेलेत केव्हाचे. अजून परतले नाहीत. वाट विसरले की काय कोण जाणे ? मी आलोच त्यांना बघून." असे बोलून शरदराव जाण्यासाठी वळणार तोच तिने त्यांना अडविले.
त्याने बाबांना आपल्याबद्दल काही सांगितले तर सगळच संपेल या विचाराने ती जागृक झाली.
" बाबा, तुम्ही थांबा. मी जाते त्यांना शोधायला. जरा पायही मोकळे होतील." म्हणत शरदरावांचं प्रतिउत्तर न ऐकताच ती जाण्यासाठी वळली.
पाऊलवाटेने निघत पुन्हा एकदा किनारा गाठला. नजर राजवीरला शोधू लागली.
तेथून थोडे दूर पूळणालगत असलेल्या खडकावर बसलेली त्याची आकृती पाहून तिचा जीव भांड्यात पडला.
तशीच चालत ती त्याच्याजवळ पोहचली. पण समोरचं दृश्य तिला चलबिचल करून गेलं.
बसलेल्या खडकावर उजव्या हाताची मूठ रागात आदळत असलेला राजवीर पाहून ती जोरात ओरडली.
" ओ, हे काय करता ? हातातून रक्त येत आहे." म्हणत ती त्याच्या दिशेने झुकली. त्याचा हात हातात घेत त्याला तसं करण्यापासून थांबवलं..
तिच्या मोकळ्या केसांच्या बटा वाऱ्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर विसावल्या.तिचा आखिव रेखीव चेहरा डोळ्यांत भरला. मनातल्या समुद्राला अचानक कसल्याश्या जाणिवेची भरती आली. तो त्यात हरवणार तोच तिचा झालेला स्पर्श मात्र त्याला हळवा करून गेला.
" मी ठिक आहे." तिच्या हातातून आपला हात बाजूला घेत नजर चोरतच तो उठला.
" मघापासून मला तत्वज्ञान शिकवीत होता. मग आता हे काय आहे ?" ती त्याच्या हाताकडे पाहत रागाने म्हणाली.
" समस्या फक्त तुम्हांलाच असतील का ? प्रत्येक वेळी चेहऱ्यावरून व्यक्ती आनंदी असल्याचे ठरवू नये." हाताच्या वेदना लपवित तो म्हणाला.
" मग समस्या सांगावी आणि मोकळं व्हावं.त्रास कमी होतो. प्रेयसीचं लग्न झालं वाटतं. प्रेमातच कोणी हे असलं काही करू शकतं.." म्हणत तिने अंदाज बांधला.
" तुम्ही सांगितला का तुमचा प्रॉब्लेम ? मग दुसऱ्याकडून का अपेक्षा ठेवता ? मी ठिक आहे आणि समर्थही माझी समस्या सोडवायला." तिला तिच्याच भाषेत उत्तर देत तो म्हणाला.
त्याच्या उत्तराने तिने आपसूकच त्याच्याकडे पाहिले. गव्हाळ वर्ण,उंचीला साजेशी शरिरयष्टी,खोल भाव असलेले डोळे.. एखाद्या परिकथेतल्या राजकुमारासारखाच होता तो.
'विरहाचं दुःख असेल बहुतेक.' त्याला न्याहाळता न्याहाळता ती स्वतःशी पुटपुटली.
आता मात्र त्याने नजर तिच्याकडे वळवली. नजरेला नजर भिडताच तिने पटकन मान फिरवली.
" काय पाहत होता ? प्रेमात बिमात पडला का ? अरे हो पण तुमचं तर लग्न ठरलय ना.म्हणजे तुमच्या बाबांनी सांगितलं तसं." आपला हात पाहत तो म्हणाला.
तशी ती पुन्हा अगतिक झाली.
" काल आणि आज जे काही तुम्ही पाहिलय त्याबद्दल बाबांना काहीच सांगायचे नाही. हवं तर विनंती समजा.." पुढच्याच क्षणी अथांग सागराकडे नजर रोखत धीरगंभीर होऊन ती म्हणाली.
" होणाऱ्या नवऱ्याशी भांडलात का ?" तो दबक्या आवाजात म्हणाला.
त्यानंतर मात्र तिने टाकलेला रागीट कटाक्षच पुरे होता त्याला गप्प बसायला.
" बरं. नाही सांगणार. पण तुम्हीही माझ्या हाताबद्दल सांगायचं नाही कोणाला." त्याने आपली बाजू सावरली.
" आता चला. नाहीतर बाबा येतील." होकार देत ती घराच्या दिशेने निघाली. तो ही आज्ञाधारकपणे तिच्या मागे चालू लागला..
अजून किती वेळ लपविणार अवनी सत्य ? सत्य कळल्यानंतर कोणतं नविन संकट येऊन धडकणार ? राजवीर असं का वागला असेल ?
लवकरच कळेल कथेच्या पुढच्या भागात.
©® आर्या पाटील
