# एक झाले ऊन आणि सावली ?(भाग ३ रा)
©® आर्या पाटील
अवनी तेथून गेल्यावर काहीवेळात राजवीरही किनाऱ्यावरून निघाला.कॉटेजवर पोहचताच त्याला समोर पुन्हा ती उभी दिसली. फर्स्ट एड बॉक्स समोरच्या टेबलवर ठेवून तिने इशाऱ्यानेच राजवीरला बसायला सांगितले.
" खरच नको मॅडम. फक्त खरचटलं आहे. मी लावेन ॲण्टीसेप्टिक तुम्ही ठेवा." तो पुन्हा एकदा नजर चोरीत म्हणाला.
" तुम्ही बसता की बाबांना सांगू ? काल तुम्ही केलेल्या मदतीची परतफेड समजा हवं तर.आता गप बसा इथे." फर्स्ट एड बॉक्स उघडत तिने हुकूम दिला.
तसंही उजवा हाताला लागल्याने त्याला मलमपट्टी करता येणार नव्हतीच. मग तिचा आदेश शिरसावंद मानून तो ही खुर्चीवर बसला. त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत तिने जखम डेटॉलने साफ केली.
" काय नाव म्हणालात तुमचं ?हा राजवीर. हे असं शोभत नाही हो तुमच्यासारख्या तरुणाला. प्रेम असेल तुमचं तिच्यावर पण ते यशस्वी झालं नाही म्हणून ही अशी शिक्षा.खूप बालिश वाटतय सगळं.." ती अजूनही गंभीर होती.
" तुम्हांला नाही कळायचं ते. आणि आपल्या मनाचे तर्क लावून उगाच उपदेश देणं बंद करा कारण आपणही तोच बालिशपणा करीत आहात." त्यानेही तिला तिच्याच भाषेत उत्तर दिले.
" माइन्ड युवर ओन बिझनेस.उचलली जीभ लावली टाळ्याला एवढच जमतं ना. माझ्याबाबतीत जे घडलय ते काय माहित आहे तुम्हांला ?बालिशपणा म्हणे." ती रागातच म्हणाली आणि कापसाचा बोळा तसाच टेबलावर आपटत तेथून निघून गेली.
तिच्या अश्या निघून जाण्याचे राजवीरला काहीच वाटले नसावे कदाचित.अगदी काहीच घडलं नाही या आविर्भावात तिने फेकलेला बोळा उचलित तो डाव्या हाताने जखम साफ करण्याचा प्रयत्न करू लागला.
इकडे त्याच्या बोलण्याने दुखावलेली अवनी आपल्या प्रारब्धाचा विचार करीत तशीच घरामध्ये आली. पण हळवं मन तिच्यातील माणुसकीला शांत बसू देईना.
" बाबा, तुमच्या त्या गेस्टना हाताला लागलय. जमल्यास मलमपट्टी करून द्या." सोफ्यावर पेपर वाचत बसलेल्या शरदरावांना म्हणत ती तशीच रुममध्ये शिरली.
शरदरावही लागलिच पेपर बाजूला ठेवून राजवीरच्या कॉटेजपाशी पोहचले.
" काय हो ? आता हे काय झालं ? कशाचं लागलं ? आणा मी मदत करतो. ते बरं मला अवनी म्हणाली नाहीतर कळलं ही नसतं.." काळजीने म्हणत त्यांनी त्याच्या हातातून कापूस घेत जखम साफ करायला सुरवात केली.
' रागीट आहात पण तेवढ्याच हळव्याही. दुसऱ्याला त्रासात नाही पाहवत आणि स्वतःमात्र आतून जळत आहात.'राजवीरने मनातच अवनीला आठवले.
" कसं लागलं हो ?" शरदराव पुन्हा म्हणाले. त्यांच्या बोलण्याने अवनीत रमलेला राजवीर भानावर आला.
" राहू द्या काका. मी करेन. तुम्हांला उगाचच त्रास." म्हणत त्याने उत्तर देण्याचे टाळले.
शरदराव थोडेच ऐकणार होते. त्यांनी जखमेवर मलमपट्टी करून देत राजवीरला काळजी घेण्याचे सांगितले. राजवीरनेही मान हलवित त्यांना होकार दिला.
इकडे रुममध्ये बसलेल्या अवनीला सविताताईंनी किचनमध्ये बोलावून घेतले.
" बाळा मला मदत करशील का नाश्ता बनवायला ? हा म्हणजे श्रीधररावांचा फोन येणार असेल तर नको. तु बोल त्यांच्याशी मी बनवेन." सविताताई हसत म्हणाल्या.
श्रीधरचा विषय निघताच ती पुन्हा हळवी झाली.
'किती अभिमानाने बाबा सांगत होते नातेवाईकांना की लाखमोलाचा जावई मिळाला आहे त्यांना. तुझ्या सोबत लग्न जमल्यानंतर आभाळाएवढा आनंद झाला होता त्यांना.फक्त उच्चशिक्षित नाही तर सद्गुणी नवरा मिळाला आहे तुला असे किती अभिमानाने म्हणायचे बाबा. तु ही तसाच होतास ना.माझी प्रत्येक पडती बाजू सावरून घेणारा.पण जेव्हा मी पूर्णपणे कोलमडले तेव्हा साथ तर नाहीच निदान मदतीचा हात देवून माणुसकी का नाही दाखवलीस ? त्याने शरीरावर बलात्कार केला आणि तु मनावर. तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही मला. पण जेव्हा आईबाबांना हे कळेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल ही कल्पनाही असहनीय होते.' ती पुन्हा आपल्याच विचारत रमली. सविताताईंच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही.
" अवनी, कसला विचार करत आहेस ?आल्यापासून पाहते चेहऱ्यावरचं तेजच हरवलं आहे तुझ्या.लग्न जमल्यानंतर चेहरा तेजाळून निघतो प्रत्येक मुलीचा. तु ही त्याला अपवाद नव्हतीस.तुझ्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतांना पाहिलाय मी.नव्या चाहूलीने बहरतांना अनुभवलय. पण या वेळेस मात्र तो आनंद, तो तेजोमय चेहरा, ते बहरलेलं रुप सारच कुठे तरी हरवलय. सतत वाटतय तुला त्रास होतोय कसला तरी. पण कसला हे कळत नाही. बेटा काहीही असेल तर स्पष्ट बोल. श्रीधरराव आवडतात ना तुला ?" आईच्या काळजीने म्हणत त्यांनी अवनीच्या डोक्यावरून हात फिरवला.
आईचा स्पर्श होताच हृदय गहिवरलं. भरून आलेलं भावनाचं आभाळ डोळ्यांतून अश्रू सरींच्या रुपात बरसायला आतुर झालं.आईच्या कुशीत शिरत तिथेच सुरक्षेच्या उबदार वलयात स्वतःला लपवून घ्यावेसे वाटले. पण तिने मात्र स्वतः पेक्षा त्यांच्या भावनांना प्राधान्य दिले. खंबीर होत स्वतः ला सावरले.
" असं काही नाही आई. थोडी कामाची दगदग झाली आहे. डॉक्टरांनी आठ दिवस सक्तीचा आराम करायला सांगितला म्हणून लागोलाग सुट्टी घेवून आली इकडे. बाकी काही नाही. आणि श्रीधरचा मघाशीच कॉल येऊन गेला. आज महत्त्वाच्या मिटिंगमध्ये असल्याने दिवसभर तसाही त्याला वेळ मिळणार नाही. तु उगाचच काळजी करतेस." म्हणत तिने पोह्यांसाठी कांदा कापायला घेतला.
" अगं मग हे कधी सांगणार ? तुला बरं नाही आणि आम्हांला काहीच सांगितलं नाहीस. आता लगेच चल पाहू डॉक्टरकडे. त्या शिवाय चैन पडणार नाही मला. लग्न तोंडावर आलय आणि तु अशी आजारी पडलीस तर कसं चालेल. काय म्हणतील श्रीधररावांच्या घरचे ?" तिच्या हातातून कांदा घेत सविता ताई काळजीने म्हणाल्या.
" अगं आई बस कर श्रीधरपुराण. आल्यापासून तेच ऐकून कंटाळा आला आहे. मी ठिक आहे. डॉक्टरकडेही जाऊन आली आहे." असे म्हणत ती रागातच किचनबाहेर पडली.
सविता ताईंना तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.
तसा तिचा हेकेखोर स्वभाव त्यांना माहित होता पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही म्हणेल याची कल्पना नव्हती. एरवी श्रीधरवर कौतुकसुमने उधळणाऱ्या लेकीला त्याच्याच बाबतीत रागावलेलं पाहून सविताताई आणखी धास्तावल्या.
किचनमधून बाहेर अवनी तडक जवळच असलेल्या गणपती मंदिराकडे निघाली. देऊळगावची शोभा असलेलं गणरायाचं मंदिर तिच्या श्रध्देच्या जवळचं. किंबहुना प्रत्येक गावकऱ्याचं श्रध्दास्थान. गावातील लोकांनी नवस बोलावा आणि नवस पूर्ण झाल्यानंतर नवसपूर्तीचा उत्सव सजावा एवढं जागृत देवस्थान होतं ते. मंदिराची बांधकामशैली शिवकालीन होती. घडीव चिऱ्यांच्या भिंती, त्या भिंतीपासून बनविलेला मुख्य गाभारा, त्यावर तोलून धरलेला चिरेबंदी घुमट. गाभाऱ्यात आयताकृती शीळेवर विराजित गणरायाची सुबक मुर्ती.सारं काही ऐतिहासिक.मनाला सकारात्मक ऊर्जा देणारं.गाभाऱ्यापुढील कौलारू सभामंडप त्या बांधकामशैलीला कोकणी साज चढवित होता.
शहराच्या धाकधुकीत दमलेल्या अवनीला इथे मनःशांती मिळे.
आजही तिथे पोहचताच तिने मंदिरालगत असलेल्या विहिरीतून पाणी काढून पाय स्वच्छ केले.
मंदिरासमोर असलेल्या तुलसी वृंदावनाचे दर्शन घेतांना मात्र ती भारावली.मागच्या वेळेस जोडीने घेतलेले दर्शन आठवले. पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत तिने मंदिरात प्रवेश केला. दुःखाची आरोळी घंटानादामध्ये विरली. दुभंगलेली ती लाडक्या बाप्पाला भेटायला आतुर होती पण मलिनतेच्या जाणिवेने पावले मात्र जड झाली. तोच
वाऱ्याची मंद झुळूक तिला स्पर्शून जात दैवत्वाच्या प्रचितीची जाणिव करून देती झाली.
सात्विक मनाने तिने गाभाऱ्यात प्रवेश केला. समईत उजळून निघालेली बाप्पाची मूर्ती पाहताच नयनांनी सोबत सोडली.डोळ्यांतून वाहतं पाणी देवाशी हितगुज साधू लागलं.
विघ्नहर्ता असूनही आपलं विघ्न का हरलं नाही ? एवढीच काय ती तिची तक्रार होती.
तेवढ्या घाईत बागेतून आणलेली जास्वंदाची फुले तिने गणराया चरणी अर्पण केली.
' देवा,या फुलांप्रमाणे मलाही घे तुझ्या चरणाजवळ कायमची. इथेच फुलणे आणि इथेच मरणे अनुभवू दे.
डोळ्यांसमोर फक्त अंधार आहे. या अंधारात एक तर आशेचा किरण तरी दाखव नाही तर मलाच यात सामावून घे कायमचं.' डोळे मिटून तिने गणरायाला आर्जव केले.
तोच झालेला घंटानाद तिला जागृत करून गेला. देवानेच सादेला प्रतिसाद दिल्याचे वाटले क्षणभर.
पण फक्त क्षणभरच.नजर मागे वळताच मात्र तळपायाची आग मस्तकात गेली. राजवीरला मंदिरात पाहून ती पुरती रागावली.
' देवा, संकटातून सुटका करण्याचं साकडं घातलं पण तु तर दुसरच संकट समोर उभं केलस." नजरेच्या कटाक्षात बाप्पाला व्यापत ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.
राजवीर आत गाभाऱ्यात येण्याआधी आपण निघावं म्हणून ती माघारी वळली.
" तुम्ही इथेही ?आता मलाच असे वाटत आहे की तुम्ही मुद्दामहून माझा पाठलाग करता." गाभाऱ्या बाहेर येणाऱ्या अवनीला पाहून राजवीर म्हणाला.
" पाठलाग करणारी व्यक्ती नंतर येते आधी नाही." म्हणत तिने बाप्पाला पुन्हा एकदा नमस्कार केला.
" तिकडे तुमच्या आई काळजीत आहेत. तुम्ही असं सगळ्यांशी तुसडेपणानेच वागता का हो ?" तिथेच तिच्या बाजूला उभं राहत त्याने हात जोडले आणि डोळे बंद केले.
" ओ प्लिज.." रागाने ती पुढचं काही बोलणार तोच तिची नजर त्याच्या शांत मुद्रेवर स्थिरावली.देवाजवळ आत्मियतेने आपलं गाऱ्हाणं मांडणारा तो तिला खूपच भोळा वाटला. त्याच्याविषयीचा राग क्षणभरासाठी निवळला. मनातलं दुःखही क्षणभर दूर झालं आणि मानसिक स्थिरता मिळाली.
असं काय होतं त्याच्यात ज्याच्यामुळे ती शांत झाली ?
त्याचं तिच्या आयुष्यात येणं ही सुखाची चाहूल असेल का ? तिचं विखुरलेलं आयुष्य त्याच्या येण्याने सावरेल का ?
कळेल पुढच्या भागात.
©® आर्या पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा