# का एक झाले ऊन आणि सावली ( भाग ६ वा)
©® आर्या पाटील
राजवीरचं असं अचानक अवनीला मागणी घालणं आणि अवनीने त्याच्यासोबत बोलण्याची गळ घालणे शरदरावांसाठी अनपेक्षित होतं. थोडा वेळ विचार करून शरदरावांनी तिच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सविताताई अजूनही डोळ्यांना पदर लावून लेकीला न्याहाळीत होत्या. शरदरावांचा निरोप घेऊन ती रूमबाहेर पडली. राजवीरनेही शरदरावांवर दृष्टिक्षेप टाकला. त्यांनी मानेने होकार देताच तो ही तिच्यामागे बाहेर पडला.
" आहो, अजून वेळ गेलेली नाही आपण श्रीधररावांची माफी मागू आणि हे लग्न.." सविताताई पुढे बोलणार तोच शरदरावांनी त्यांना शांत केले.
" सविता,मला राजवीर चांगला मुलगा वाटतो पण पूर्ण शहानिशा केल्याशिवाय या लग्नाला मी मान्यता देणार नाही तु निश्चिंत रहा." सविताताईंना समजावित ते म्हणाले.
पण आईचं मन ते लेकीच्या सुखासोबतच तिच्या सन्मानासाठीही आसुसलेलं. नातेवाईक, गावातील लोकं काय म्हणतील ही विवंचना नव्या नात्याआड येत होती. शरदराव मात्र या विवंचनेतही लेकीच्या सुखाला प्राधान्य देत होते.
हॉस्पीटल बाहेर एका छोटेखानी गार्डनच्या बाकावर बसत अवनीने शून्यात नजर रोखली. राजवीरही येऊन तिच्या बाजूला बसला. थोडा वेळ तसाच शांततेत गेला.
" तुम्ही का असे वागता आहात ? काय माहित आहे तुम्हांला माझ्याबद्दल ? कसलाही विचार न करता सात जन्माच्या सोबतीचा निर्णय कसा काय घेऊ शकता ?" अजूनही शून्यातच पाहत ती म्हणाली.
" माझं स्वतःचं असं स्वतंत्र आयुष्य आहे. माझी स्वतःची स्वप्ने आहेत आणि त्याच स्वप्नांना सामावून घेणाऱ्या जोडीदारासोबत लग्न करणे हा माझा निर्णय. बाकी तुम्हांला माझ्याबाबतीत काहीही प्रॉब्लेम असल्यास स्पष्ट बोला." तो ही तिच्याकडे न पाहताच म्हणाला.
" प्रॉब्लेम तुमच्यात नाही माझ्यात आहे म्हणूनच तर लग्न मोडलं माझं. ते कारण जाणून न घेताच एवढा मोठा निर्णय कसा घेतला हेच कोडं. पण मला आयुष्य कोड्यात नाही सुरु करायचं. मुळात मला लग्नच नाही करायचं. त्यामुळे प्लिज हा विषय इथेच थांबवा." हात जोडत ती त्याच्या दिशेने वळली.
अजूनही तो तसाच स्थितप्रज्ञासारखा बसून होता.
" मी तुमच्याशी बोलत आहे." त्याची तंद्री तोडत ती म्हणाली.
" हम्म.." म्हणत त्याने तिच्याकडे नजर फिरविली. दोघांच्या ओलेत्या नजरा भिडल्या आणि खोल हृदयात एक ओळखीची घालमेळ झाली.त्याच्या डोळ्यांतील पक्का निर्धार तिला अगतिक करून गेला तर तिच्या अगतिक नजरेतील पाणी त्याचा निर्धार आणखी पक्का करून गेलं.
" मला नाही जाणून घ्यायचा तुमचा प्रॉब्लेम पण यापुढे तुमच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम येणार नाही याबाबत मी कटिबद्ध राहीन. निदान तुमच्या आईवडिलांचा तरी विचार करा. उद्या तुमच्या मोडलेल्या लग्नाची बातमी समाजात पसरली तर तो समाज सुखाने जगू देईल त्यांना ? आपल्या मुलीला सुखात पाहणं हेच तर प्रत्येक आईवडिलांच स्वप्न असतं म्हणूनच आपल्याच अंशाला एका क्षणात परके होतात ते. लेकीचं लग्न झालं, तिला समजून घेणारा जोडीदार मिळाला, तिच्या संसाराचं नंदनवन झालं तर आभाळाएवढा आनंद होतो त्यांना. तुम्ही हाच आनंद त्यांच्यापासून हिरावून घेणार आहात का ? एक मुलगी म्हणून तुमचं हेच उत्तरदायित्व आहे का त्यांच्याप्रती ? आज लग्न मोडलय तर काकांची ही अवस्था झाली आहे आणि उद्या या समाजाने दूषण द्यायला सुरवात केली तर काय होईल ?" तिच्याकडे निर्धाराने पाहत तो म्हणाला.
" प्लिज काहीही बोलू नका. माझ्या आईवडिलांना नाही पाहू शकत या अवस्थेत." डोळे गच्च मिटून कानावर हात देत ती म्हणाली. प्रत्येक शब्दासरशी मनातील भावना डोळ्यांतून गालावर ओघळल्या.
क्षणाचा अवधी की त्याने तिचे अश्रू टिपले. गालावर त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती भानावर आली. तात्काळ तिने चेहरा दुसऱ्या बाजूने वळवला.
" प्लिज मॅडम, या लग्नाने ते मायबाप सुखावतील. त्यांच्याकडून हे सुख नका हिरावून घेऊ." उठून उभा राहत तो म्हणाला.
" आणि तुमचं काय ? तुम्हांला कोणतं सुख मिळेल जेव्हा तुम्हांला कळेल की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही साताजन्माचं नातं जोडू इच्छिता ती अपवित्र आहे. लग्न झाल्यावर दोन जीव तनाने अन् मनाने एकरूप होतात पण या शरीरावर आधीच एका नराधमाने आपलं वर्चस्व गाजवलं आहे.दुर्दैव एवढच की तो नराधम कोण आहे याची पुसटशी कल्पनाही नाही. जेव्हा होणाऱ्या जोडीदाराला विश्वासाने सत्य सांगितले तेव्हा त्यानेही तात्काळ नाते तोडून टाकले. एकाने शरीरावर अत्याचार केला आणि एकाने मनावर. मग मनोमिलन तरी कसे घडेल ? मी नाही आहे तुमच्या योग्यतेची. लाथाडलेल्या वेलीला तुळस बनवून घराच्या वृंदावनात सजवू पाहत आहात तुम्ही ते कसे शक्य होईल ? काय सांगाल तुमच्या घरच्यांना ?" आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची कहाणी सांगत तात्काळ तिने आपला चेहरा ओंजळीत झाकून घेतला.
उभा असलेला राजवीर तसाच तिच्या शेजारी बसला. त्यानेही आपला चेहऱ्यावरून हात फिरवीत दिर्घ सुस्कारा टाकला. तिचे शब्द वाऱ्यापरी त्याच्या भावनांच्या आभाळाला भिडले आणि नयनांतून वेदनांचा पाऊस कोसळू लागला.
" मला माहित आहे हे सत्य कळल्यावर तुम्ही काय कोणीच मला नाही स्विकारू शकत. फक्त एवढीच विनंती करते मला नकार देतांना आईबाबांना खरं कारण
सांगू नका नाहीतर जिवंतपणीच मरतील ते." आपला चेहरा ओंजळीतून काढत राजवीरकडे पाहत ती म्हणाली.
क्षणाचाही विलंब न लावता राजवीरने तिला जवळ ओढले. डोळ्यांतील पाणी तिच्या केसांवर ओघळले. तिला हे सारेच अनपेक्षित होते. त्याच्या मुसमुसण्याचा आवाज तिला आणखी आश्चर्यचकित करीत होता.
" राजवीर, तुम्ही ठिक आहात ना ?" ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.
तशी त्याने ती मिठी आणखी घट्ट केली.
" राजवीर, प्लिज सोडा." ती स्वतःला सोडवीत म्हणाली.
" आय ॲम सॉरी अवनी. आय ॲम रियली सॉरी. " म्हणत त्याने तिला सोडले आणि उठून उभा राहत दुसऱ्या दिशेने तोंड फिरविले.
पुन्हा काही काळ तसाच शांततेत गेला.
" तुमचा निर्णय आईबाबांना सांगा पुढचं मी बघून घेईन. आज बाबांसाठी जे केलत त्यासाठी मनापासून धन्यवाद." म्हणत ती उठली आणि जाण्यासाठी वळली.
दुसऱ्याच क्षणी राजवीरने पाठमोऱ्या अवनीचा हात धरला.
" आधी हा निर्णय तुम्ही ऐका. तुम्ही ज्या प्रसंगातून गेला आहात त्या प्रसंगाची कल्पनाही असहनीय आहे. आपल्या दोघांत वेदनांचं साम्य आहे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. वेल कितीही पायदळी तुडवली तरी बहरण्याचा अधिकार नाही नाकारू शकत आणि तुळशीचं म्हणाल तर माझी आई म्हणते प्रत्येक लेक ही तुळसच असते लग्नाआधी माहेरचं अंगण सजवणारी तर लग्नानंतर सात्विकतेने सासरच्या वृंदावनात सजणारी. तुळशीचं महत्त्व अबाधित आहे आणि अबाधितच राहिल. आणखी एक गोष्ट जी व्यक्ती आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून दुःखाचा डोंगर हिंमतीने पेलून धरते ती माझ्या घरी सुखाची भरभराट नक्कीच करेल. स्वतः वेदनांच्या वादळात सापडूनही दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालणारा जोडीदार मला शोधूनही सापडणार नाही.
प्रेम करण्यासाठी आयुष्य पडलय आधी तुमचं आयुष्य व्हायचं आहे. देह नश्वर आहे भावना तेवढ्या शाश्वत आहेत आणि याच भावनांसोबत नातं जोडायचं आहे. तुमच्या दुःखाचा सोबती आणि सुखाचा हितचिंतक व्हायचं आहे. सांगा कराल लग्न माझ्याशी ?" तिच्या पुढ्यात बसत तो म्हणाला.
" माझ्यावर अत्याचार झाला आहे म्हणून कोणाचे उपकार नकोत मला ." ती अढळतेने म्हणाली.
" जिथे उपकार येतात तिथे भावना संपतात आणि मला भावनांना जपायचं आहे. मला मनापासून जोडायचं आहे हे नातं त्याला उपकाराच्या ओझ्याखाली नका दाबू. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे आणि तो फक्त अन् फक्त तुमच्यासोबतच शक्य आहे." तो ही तेवढ्याच निश्चयाने म्हणाला.
आताही ती त्याच्याकडे पाहत नव्हती. त्याच्या नजरेत पाहण्याची हिंमतच होत नव्हती.
" तुम्ही अजूनही.." ती बोलणार तोच तो उठून उभा राहिला.
" माझा निर्णय झालाय तुम्ही तुमचा निर्णय काकांना सांगू शकता मला तो मान्य असेल." तिला अडवित तो म्हणाला.
तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही खालीच मान घालून उभा होता. त्याचा निरागसपणा पुन्हा एकदा भावला तिच्या मनाला. मनाची स्पंदने हेलकावे खावू लागली. वेदनांचा महापूर क्षणभरासाठी ओसरला. सुखाची गार झुळूक मनाला स्पर्शून गेली.
" मी तयार आहे लग्नासाठी." आपसूकच शब्दांनी तिच्या ओठांचा ताबा घेतला.
तिच्या होकारासरशी त्याच्या चेहऱ्यावर उमेदीची लकेर उमटली. त्याने नजर तिच्या दिशेने वर उचलली. नजरेला नजर भिडताच पुन्हा तिच हळवी जाणिव निर्माण झाली. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ती मात्र अजूनही तेवढीच खंबीर होती. क्षणभरातच त्याने डोळे टिपले.
" फक्त एक विनंती होती तुमच्या बाबतीत जे घडलय ते माझ्या घरच्यांना सांगू नका." तो विनंतीवजा शब्दांत म्हणाला.
आता मात्र ती गंभीर बनली.
" कोणत्याही नात्याची सुरवात खोटं सांगून करणे मला पटत नाही." ती निर्धाराने म्हणाली.
" मी खोटं बोलायला सांगत नाही. फक्त ज्या गोष्टीचा त्रास होईल ती गोष्ट उघडपणे मांडायला नको सांगतोय. तुमच्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जे केलत तेच मी माझ्या आईवडिलांच्या त्रास होऊ नये यासाठी करण्याची विनंती करतो. एका मुलीला ही विनंती कळेलच." तो ही आश्वासकपणे म्हणाला.
आईवडिलांचा मुद्दा निघताच ती शांत झाली. होकारार्थी मान हलवित तिने त्याच्या विनंतीला मान दिला.
दुःखाच्या रजनीवर सुख हळुवार पणे आपली कोवळी किरणे पसरू पाहत होता. सुखाचं ऊन प्रारब्धाने थकलेल्या सावलीला उजळू पाहत होता.
पुढचे चार दिवस हॉस्पिटलमध्येच गेले.या काळात राजवीरला जवळून अनुभवलं त्यांनी. हक्काने सगळच सांभाळून घेणारा राजवीर त्यांना खूप जवळचा वाटला. मनाने सकारात्मक कौल दिला आता फक्त काळजी होती ती त्याच्या घरच्या मंडळींविषयी. आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही शरदरावांनी अवनीच्या मोडलेल्या लग्नाचं सत्य सांगितलं.राजवीरच्या रुपाने नवीन आशा तिला आंदण म्हणून मिळत आहे याचीही माहिती त्यांनी दिली. सगळ्यांनी आपआपल्या परीने शरदरावांना धीर दिला. राजवीरची माहिती काढायला मदत केली. सगळच सकारात्मक कळाल्यावर शरदरावांची काळजी मिटली आता फक्त त्याच्या घरच्यांना भेटायचे बाकी होते.
सगळं स्थिरस्थावर झाल्यावर जवळजवळ दहा बारा दिवसांनी राजवीर आपल्या घरी परतला. ठाण्यालगतच
असलेल्या एका गावात राहणारं राजवीरचं कुटुंब पिढीजात श्रीमंत. टुमदार बंगला, पंचक्रोशीत नावलौकिक, एकत्र कुटुंब आणि संस्कार जपणारी माणसं यासाऱ्याच त्याच्या जमेच्या बाजू.
एवढ्या दिवसांनी राजवीर घरी येताच त्याला कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले साऱ्यांना. तात्या आजोबा, बयो आजी, आई बाबा, काका काकू, चुलत भाऊ सारेच त्याला पाहून खुश झाले. लग्न होऊन सासरी गेलेली त्याची लाडकी ताई डॉ.विभावरीही त्याला भेटायला घरी आली.
" वीर, मित्राची आई ठिक आहे ना रे ?" तात्या आजोबा काळजीने म्हणाले.
तसा राजवीर उठून उभा राहिला. पुढच्याच क्षणी त्यांच्या समोर बसत त्याने डोके त्यांच्या मांडीवर टेकवले.
" तात्या, सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का असेल पण माझ्याबाबतीत हेच सत्य आहे. कोकणात माझी ओळख अवनी सोबत झाली. तिच्यात मला बयो आजी, आई, काकी आणि विभा ताईची छबी दिसली. तिच्या सहवासात मनाने जोडीदाराचा कौल दिला. फक्त तुम्हां सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे." त्याने अगदीच मोकळेपणाने सगळं सांगितलं.
त्याच्या या अश्या अनपेक्षित वागण्याने सगळेच आश्चर्यचकित झाले.
" वीर, आम्हांला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती." विभा ताई गंभीर होत म्हणाली.
घरचे राजवीर आणि अवनीच्या लग्नाला मान्यता देतील का ?
कळेल पुढच्या भागात.
क्रमश:
©® आर्या पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा