Login

का एक झाले ऊन आणि सावली..?(भाग १ ला)

Fight of Avani against destiny..

# का एक झाले ऊन आणि सावली...?( भाग १ ला)

©® आर्या पाटील..

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

कोकणातील देऊळगावला लाभलेला समुद्रकिनारा प्रकाशाचा सोनेरी रंग उधळत होता.सरत्या संध्येला डोळ्यांत साठवत हळू हळू समुद्रकिनाऱ्यावरील तुरळक गर्दी पांगू लागली होती.किनाऱ्यावरील वाळूशी पाठशिवणीचा खेळ खेळून दमलेल्या लाटाही जलदेवतेच्या गर्भात परतत होत्या. ओहोटी फक्त समुद्रालाच नव्हती लागली पण परिस्थितीच्या समुद्रात बुडालेल्या तिच्याही आयुष्याला लागली होती जणू.सुखाची ओहोटी.

समुद्रकिनारी असलेल्या काही अगदी मोजक्या डोक्यांमध्ये ती ही होती. ती 'अवनी सावंत'.आपली कैफियत आपल्या बालपणीच्या मित्राला 'सागराला' ऐकवत. 

त्याच्या गर्द निळाईला डोळ्यांत साठवतच तर मोठी झाली होती ती. त्याच्या वाळूत खेळता खेळताच तर स्वप्नांचे इमले बनवायला शिकली होती.खारा वारा उरात भरत त्या सागराकडूनच उधाणता घेतली होती तिने. त्याच्या सोबतीने अनेक वादळे झेलली होती. आणि म्हणूनच तर निडरता अंगी रुजली होती तिच्या.पण या वेळेस तिच्या आयुष्यात धडकलेली त्सुनामी मात्र तिला नेस्तनाभूत करू पाहत होती..

विचारांत रमलेली ती एकटक क्षितिजावर नजर रोखून होती.धरेला प्रकाशाने न्हाहून काढणारा गभस्ती एव्हाना निळ्यागर्द सागरावर सांजप्रकाश पसरवून परतीला निघाला होता..

' तू ही असाच निघून गेलास ओल्या आठवणी मागे सोडत. वास्तवाचा अंधार दाटत असतांना सगळ्यात जास्त गरज होती तुझी. पण तु मात्र सजू पाहत असलेल्या सहजीवनाच्या क्षितिजावर मला एकटं सोडून गेलास. तुझी तरी काय चुकी म्हणा. पवित्र असलेल्या सीतेला अग्निपरिक्षा चुकली नाही मग मी तर आधीच अपवित्र झालेली.या अपवित्र तुळशीला आपल्या जीवन वृंदावनात कोण देवीचं रुप देणार..? तु ही शेवटी त्याच नराधम पुरुष जातीतला. तुला माझं दुःख कसं कळणार..?' तिच्या मनाच्या खोल डोहात विचारांनी थैमान घातलं होतं. 

' मी जगले तर आईवडिलांची इज्जत जाईल आणि भित्रेपणाचा मुखवटा पांघरुण मला मरायचेही नाही. आता तुच आधार माझा. ये सारंगा मला सामावून घे तुझ्यात.. तुझ्या खाऱ्या पाण्यात माझ्यातील मलिनताही वाहून जाऊ दे.' स्वगत होत ती ओहोटी लागलेल्या सागराच्या दिशेने निघाली.

सूर्य अस्ताला गेला.. मागे राहिलेला संधीप्रकाशही लोप पावू लागला. अवनीला मात्र कसलेच भान नव्हते. ती मनोवेगे विचारांच्या आणि वायुवेगे सागराच्या अधिन होऊ पाहत होती.. शेवटी सागराला गाठल्यानंतर ती सुखावली. त्या पाण्यात स्वतःला झोकून देऊन ती पुढे चालू लागली.. गुडघ्यापर्यंत पाण्यात पोहचल्यानंतर मात्र अचानक तिच्या दंडाला धरून कोणीतरी मागे खेचले. ती पटकन भानावर आली. अंधार होऊ लागल्याने त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण त्याच्या डोळ्यांतील राग मात्र तिच्यापासून सुटला नाही.

"ओ मॅडम, तुमच्या आईवडिलांनी यासाठीच जन्म दिला का तुम्हांला..? आत्महत्या करण्यापूर्वी निदान त्यांचा तरी विचार करा.." तिला पाण्यापासून दूर नेत तो म्हणाला.

'आत्महत्या..? मी आत्महत्या कशी करू शकते..? नाही ते शक्यच नाही. मी खंबीर आहे आलेल्या संकटाशी दोन हात करायला. यात माझी काय चुकी..?त्याला स्वतःच्या पुरुषार्थाला आवर घालता आली नाही. भित्रा तो होता मी नाही. रात्रीच्या अंधाराची गरज त्याला लागली स्वतःची वासना क्षमवायला ते ही मी बेशुद्धावस्थेत असतांना. शुद्धीत भेटला असता तर वासनेची लक्तरे करून त्याचा पुरुषार्थच गाढून टाकला असता..' विचारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आता मात्र तिच्या डोळ्यांत प्रतिशोधाची आग पेटली.

" ओ मॅडम, तुमच्याशी बोलतोय मी.. काही उत्तर द्याल की नाही. घरी आईवडिल नाहीत का..?" पुन्हा रागावत तो म्हणाला.

तशी ती भानावर आली..

" माफ करा.. पण तुमचा गैरसमज होतोय मी आत्महत्या नव्हते करत.विचारांच्या तंद्रीत कधी पाण्यात पोहचले कळलेच नाही.." ती नजर चोरत म्हणाली.

" एवढा विचारही बरा नाही की आपण कुठे चाललो आहोत याचं भानही न रहावं. नशिब मी होतो. नाही तर काय झालं असतं कळतय का तुम्हांला.?" आपली दुमडून वर केलेली पॅन्ट नीट करत तो म्हणाला.

"धन्यवाद आणि तुम्हांला झालेल्या मनस्तापाबद्दल क्षमस्व.." म्हणत ती परतीला निघाली.

" ओ मॅडम, हे बरं नाही.. तुम्हांला वाचविण्यासाठी मी पाण्यात उतरलो. त्या गडबडीत माझे मित्रही पुढे निघून गेले. आता या गावात मी अनोळखी त्यात तो 'विसावा- द ग्रीन हेरिटेज' कुठे आहे हे ही मला माहित नाही. त्यात मदत करायची सोडून तुम्हीही पाठ फिरवून निघून चाललात. माणुसकी आहे की नाही जिवंत. तशी तर कोकणातली माणसं माणसाळ असतात म्हणे. तुम्ही अपवाद वाटता काहिश्या. तुम्ही इथल्याच ना..? की विचारांच्या नादात मुंबईहून इथपर्यंत पोहचलात..?" म्हणत त्याने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

" चला माझ्या सोबत..." फक्त एवढच काय ते म्हणत ती पुढे निघाली.

" आहो पण माझी गाडी.?आपण माझ्या गाडीने जाऊया. चालेल ना.?.." तिच्या मागे धावत तो म्हणाला.

" पर्याय आहे का दुसरा..? चला." ती रागातच म्हणाली.

तो तसाच पुढे गेला. पार्किंग एरियातून गाडी मेन रस्त्यावर काढली. तोवर ती ही पोहचली होती.

त्याने मागचा डोअर तिच्यासाठी ओपन केला. ती मात्र फ्रन्ट डोअर ओपन करित पुढे बसली.

गाडीतल्या प्रकाशात त्याने ओझरता कटाक्ष टाकला तिच्यावर.

" मिस्टर गाडी स्टार्ट करा. मी घाबरत नाही अनोळखी लोकांना आणि आता घाबरण्यासारखं काहीच तर नाही राहिलं.आधीच जवळची पायवाट सोडून मुख्य रस्त्याने यावं लागतय.." गाडीत बसताच तिने त्याच्या कटाक्षाला प्रतिउत्तर दिले..

" नक्कीच.. तुम्ही फक्त चुकलेल्याला वाट दाखवा आणि ध्येयापर्यंत पोहचवा. बाय द वे मी राजवीर मोहिते. तुम्ही..?" म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली.

यावर तिने टाकलेला रागीट कटाक्ष त्याला मात्र गप्प करून गेला.दोन तीन गल्लांतून वाट काढित शेवटी ते त्या ठिकाणाला पोहचले. कोणतीही प्राथमिक चौकशी न करता चौकीदाराने गाडी आत सोडली.

'विसावा- द ग्रीन हेरिटेज'.चार पाच इकोफ्रेन्डली कॉटेजचा समूह होता तो. गाडी फाटकातून आत जाताच रांगेत उभ्या असलेल्या कॉटेजने त्याचे लक्ष वेधले. अंधार असल्याने निसर्ग सौंदर्य जरी डोळ्यांत भरत नसले तरी गाडीतून उतरताच थंड गार वाऱ्याची झुळूक त्या सौंदर्याची जाणिव करती झाली. लाटांचा तालबद्ध आवाज जवळ असलेल्या समुद्राची भूरळ घालता झाला.

" वॉव..! खूप आल्हाददायक आहे हे.. उगाच नाही कोकणाला स्वर्ग म्हणत.." वारा उरात भरत राजवीर म्हणाला.

प्रतिउत्तराची अपेक्षा करित त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने पाहिले. पण अवनी केव्हाच गाडीतून उतरत कॉटेजला लागून असलेल्या दुमजली घराकडे पोहचली होती.

" बाबा, कोणी गेस्ट आलेत.." बाहेरूनच तिने तिच्या बाबांना शरदरावांना आवाज दिला.

लागलीच शरदराव बाहेर आले.

" काय गं कुठे होतीस एवढा वेळ..? मुंबईवरून आली तशी तिकडे समुद्रावरच गेलीस.. आई काळजीत आहे. जा जाऊन भेट तिला.." तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवित शरदराव म्हणाले आणि राजवीरकडे वळले.

" या साहेब तुम्हांला कॉटेज दाखवतो.." म्हणत शरदरावांनी राजवीरला कॉटेजच्या दिशेने नेले.

मघासचे त्यांचे संभाषण राजवीरच्या कानावर पडले होते.

" ह्या तुमच्या कन्या का..?" चालता चालता तो शरदरावांना म्हणाला.

" हो माझी अवनी. मुंबईत असते नोकरीला. सुट्टीला घरी येते. आता लग्न जमलय. मुलगाही मुंबईतच राहतो. लक्ष्मी नारायणाची जोडी आहे दोघांची.." शरदराव म्हणाले.

त्यांच्या उत्तरातून कोकणातील लोकांना साधीभोळी का म्हणतात याची जाणिव झाली.

" मी रस्ता चुकलो होतो. त्यांनीच वाट दाखवली इथली.." म्हणत राजवीर त्यांच्या मागून निघाला.

शरदरावांनी कॉटेज दाखवलं. घरगुती नाश्ता अन् जेवणाचीही माहिती दिली. बघता क्षणी राजवीरलाही तिथली व्यवस्था आवडली. आठ दिवसांच बुकींग करित त्याने बॅग आत ठेवली.

" का हो साहेब जास्तच कंटाळलेले दिसता तुमच्या शहरातल्या गर्दीला..?" त्याची आठ दिवसांची बुकिंग पाहून शरदराव सहज म्हणाले.

" कंटाळलो तर आहे.शहरातल्या गर्दीपेक्षा मनातील विचारांच्या गर्दीला.फक्त इथेच विश्रांती मिळेल असे वाटतेय..." शून्यात नजर रोखत तो म्हणाला.

" मिळेल मिळेल.. दर्याराजा नविन उत्साह देईल बघा.. उद्या सकाळी उठल्यावर आधी सागरकिनारा गाठा. येथून पाऊलवाटेने हाकेच्या अंतरावर आहे बघा. तुर्तास फ्रेश व्हा. मी रात्रीच्या जेवणाचं बघतो.." म्हणत शरदराव निघून गेले.

पुन्हा एकदा त्या आल्हाददायक वातावरणाला उरात भरत तो फ्रेश होण्यासाठी आत गेला.

इकडे अवनी आईला न भेटता तशीच रुममध्ये शिरली. पुरुषी अत्याचाराचा बळी ठरलेली ती कितीतरी वेळ आपल्या वेदनेला अश्रूंच्या रुपात शॉवरच्या पाण्याखाली लपविण्याचा प्रयत्न करित होती.

शरदरावांनी घरात येत अवनीच्या आईला सविताताईंना ती केव्हाच आल्याचे सांगितले आणि जेवणाचा निरोप दिला.

" अशी कशी ही पोर..? अजून बाहेर का येत नाही..?" काळजीने सविताताई तिच्या रुममध्ये पोहचल्या.

" अवनी, काय गं अजून किती वेळ.? पटकन बाहेर ये पाहू. धड तोंड पण दाखवलं नाहीस आल्यापासून.." म्हणत त्या तिथेच पलंगावर बसल्या.

त्यांच्या आवाजाने भानावर येत लागलिच आंघोळ आवरून ती बाहेर आली. आईला समोर पाहताच मात्र पुन्हा गहिवरली. वायुवेगे आईच्या कुशीत शिरत त्यांना घट्ट मिठी मारली.

" ये छकुली, काय झालं गं..? कोणी काही बोललं का..? श्रीधररावांशी भांडलीस का..?" तिला अश्या प्रकारे भावनिक झालेलं पाहून त्या म्हणाल्या.

डोळ्यांतून पुन्हा एकदा वेदना बरसू लागल्या. शब्द मुके झाले आणि भावना कोसळू लागल्या.

" बोल ना गं. काय झालं तुला..?" बोलता बोलता आता त्यांचेही डोळे भरून आले.

त्यांना असे अगतिक पाहून तिने मात्र स्वतःला सावरले.

" लग्न करून तुम्हांला कायमचं सोडून जावं लागेल याचीच सल बोचते मनाला. मी गेल्यानंतर तुम्ही दोघे कसे राहणार..? ही एकच चिंता सतावते.." आपलं दुःख लपवित तिने पाठवणीचा खोटा शेला पांघरला.

" तिच तर जगरहाटी आहे.. ती न कोणत्या स्त्री ला चुकली न चुकेल.. आपला जन्मच परक्याचं धन म्हणून झालेला." तिला कुशीत घेत त्या म्हणाल्या.

" पण प्रत्येक वेळेस स्त्रीच का..?अजून कुठपर्यंत सहन करायचं. आपली आई, बहिण, लेक नाही का आठवत त्या पुरुषांना..?" पुन्हा एकदा वास्तवाने डोकं वर काढलं आणि ती गंभीर झाली.

" बाळा, अगं काय बोलतेस तु..? इथे पुरुषांचा काय संबंध.?" त्या गोंधळलेल्या स्वरात म्हणाल्या.

ती चाचपडली.

" अगं म्हणजे प्रत्येक वेळेस आपणच का त्याग करायचा त्यांनी का नाही असे म्हणायचे होते मला.." म्हणत तिने विषय सावरला.

" मग तर काय बरोबर म्हणते ती.. आता फोन लाव श्रीधररावांना आणि सांग बरं तुझं म्हणणं. की मी लावू.?" आत येत शरदराव म्हणाले.

तशी ती गोंधळली..

" फोनवर कशाला प्रत्यक्षातच सांगेन की..? आता मला भूक लागलीये. आई पटकन काहीतरी खायला दे.." म्हणत तिने तात्पुरता मोडलेल्या लग्नाचा विषय टाळला पण अजून किती वेळ टाळणार ती हे सगळं..?

शरदरावांना आपल्या मोडलेल्या लग्नाविषयी सांगू शकेल का अवनी..? आपल्यावर झालेल्या अत्याचाराला किती वेळ लपवेल ती..? राजवीर या सगळ्यात आशेचा किरण ठरेल का..? तिच्यावर अन्याय करणाऱ्या नराधमाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल का..?

या सारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागात..

क्रमश:

©® आर्या पाटील