"सायेब,...... त्या बाईंनी आजपण डबा दिलाय."
"रखमा... मी सांगितले ना तुला... त्यांना जाऊन सांग मला डबा देत जाऊ नका...... मी मेस लावली आहे... त्याचे पैसे आधीच भरले आहेत."
"सायेब, त्या पैशासाठी कुठे काय करतायत..मागे दोन वेळा तुम्ही डबा परत केला.... आता या वेळेला असे करू नका... त्यास्नी वाईट वाटेल.....तुमच्यात जीव अडकलाय त्यांचा...."
"तू काहीपण बोलू नकोस. मी त्यांना ओळखतही नाही.... कुठून आल्या आहेत त्या... मला काहीच ठाऊक नाही..... मी त्यांना कधी भेटलोही नाही याच्या आधी...."
"पण सायेब,... कुठे तरी पाणी मुरतय.... त्या बाई लई साध्या हायेत... तुमच्यासारख्या कोणीतरी मुर्दाडाने फशीवलंय त्यांना...... माझ्या समोर आला ना तो तर त्याचा मुडदाच बसवेन.... हलकट मेला... एवढी गोरी गोमटी फुलावानी सुंदर बायको सोडून जायचा त्याचा जिवच कसा झाला....."
"अ... ब... ते... आपल्याला काय करायचेय त्यांचे त्या बघून घेतील... आणि तू पण त्यांना काही सांगत राहू नको..."
"पण सायेब.... (एक हात कमरेवर आणि तळहाताची मूठ हनुवटीला टेकवत )... मला एक प्रश्न पडतोय.... त्या इतक्या गोऱ्यापान..... आणि त्यांचा न्हवरा असा तुमच्यासारखा..... सावळा..... बोंबलासारखा बारीक...."
"रखमा........."
गंधारच्या बोलण्यातला रोष ओळखून रखमाने सारवा सारव केली,
" तसं न्हाई सायेब.... मी हे तुम्हाला नाय बोलत... त्यांच्या नवऱ्याला बोलतेय....म्हंजी तो धनुष आहे ना आपल्या रजनीकांतचा जावई तसा..... त्या बाईनी लग्नचं कसे केले असेल त्याच्याबरोबर?"
"काय माहीत.... कदाचित हेच चुकले असेल त्याचे."हातातल्या फायली बॅगेत ठेवत गंधार बोलला.
"अं... काय सायब... तुमी काय बोललात?"
"रखमा.... आता तो डबा आणलाय त्यातले जेवण वाढ.... उशीर होतोय मला आज कोर्टात महत्वाची केस आहे..."
पहिला घास पोटात जाताच गंधारच्या चेहऱ्यावरचे भावचं बदलले. एक तृप्ती... एक समाधान होते त्यात.... कितीतरी दिवसांनी तो घरचे जेवण जेवत होता.
घरातली लादी पुसून झाल्यावर रखमा शूज घालणाऱ्या गंधारसमोर उभी राहिली,
त्याने मान वर करून पाहिले. तिला काहीतरी बोलायचे होते. पणं कसे बोलू तेच समजत नव्हते.
"रखमा बोल काय ते."
"सा.. सायेब.... ते शेजारच्या गावात जत्रा आहे."
"मग..... मी काय करू ते सांग."
"न्हाई... न्हाई... तुम्ही काय करू नका.... मेसच्या बाई सांगत व्हत्या की आज संध्याकाळी जेवण मिळणार न्हाई...माझ्यासारख्या त्या बी जत्रेला जाणार आहेत....आणि आज मी पण येऊ शकणार न्हाई... तवा तुमालाच चाय बनवावी लागेल...... आणि त्या बाईंनी जेवण दिले तर नको नका म्हणू...... गप गुमान घ्या."
"ते मी बघून घेईन.. काय करायचे ते."
"सायेब...."
"आता काय!" आता मात्र तो वैतागला.
"आज जत्रा आहे ना."
"हे बोललीस तू मगाशी."
"सायेब... गावात लई थोडी लोकं असतील... दरवाजा नीट बंद करून घ्या.... चोर पिसाळलेत.... माझी आई सांगत व्हती.... मावशीच्या गावात असाच जत्रेच्या वेळी लोकांनी दरोडा टाकला."
गंधारने बॅग उचलली. आणि तो म्हणाला,
"आता तुझे झाले असेल तर निघू मी.... माझी चावी माझ्याकडे आहे.... तू लॉक लावून चावी सोबत घेऊन जा...... त्या दिवशी सारखी त्या बाईंना देऊ नकोस,... त्या दिवसापासून माझी एक वस्तू मला वेळेवर मिळत नाही."
"सायेब.... इतकं झाक कपाट लावले होते तुमचे त्यांनी आणि तुमी ते इस्कटून बी टाकलात."
"तुला सांगितले तेवढे केलेस तर बरे होईल."
गंधार निघून गेल्यावर रखमा धुतलेला डबा घेऊन त्याच्या समोरच्या घरात गेली.
गंधार वकील होता. कामानिमित्त तो सोनपूरला डिस्ट्रिक्ट कोर्टात सरकारी वकील म्हणून कार्यरत होता. वर्षभरापूर्वीच त्याची मुंबईहून अनिश्चितकालाकरीता बदली झाली होती म्हणून त्याने सोनपूरमध्येच गावातील पोस्टाच्या बाजूला एक बंगलावजा घर खरेदी केले. गावात राहणारी रखमा त्याच्याकडे घरकाम करायला यायची आणि त्याबरोबर गावातील इत्यंभूत माहितीही त्याला न मागताच पुरवायची. आठ दिवसापूर्वी त्याच्या घरासमोरील घरात अरुंधती राहायला आली. परमेश्वराने भरभरून सौंदर्य तिला दिले होते. चाफेकळीसारखे नाक....हरणासारखे डोळे.... काळेभोर...लांबसडक केस....संगमरवरासारखी तुकतुकीत कांती आणि हे सर्व कमी होते म्हणून नाजूक मंजुळ आवाज!
अशी स्त्री ज्याच्या नशिबात पत्नी म्हणून येते तो खरोखरच नशीबवान असला पाहिजे. पण असे असताना ती सावळ्या रंगाच्या साधारण शरीरयष्टीच्या गंधारला तिचा नवरा म्हणत होती या गोष्टीची चर्चा पूर्ण गाव करत होते. अर्थात गावचा रिपोर्टर रखमा असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचालीची बातमी ती पूर्ण गावाला पुरवत असे. आजही जत्रेत ती आपल्या सखू आणि जना या मैत्रिणीबरोबर त्याच गप्पा मारत होती.
"काय ग रखमा ते वकीलसाहेब.... जरापण बघत नाहीत का त्या बाईंकडे?" जनाने विचारले.
"काय विचारू नकोस.... लई साधा माणूस हाय तो.... त्या बाई दिवसरात्र खिडकी उघडून त्यांची वाट बघत असत्यात... सायेब आले की लगेच मला बोलावून गरम गरम जेवण माझ्याकडे पाठवतात.......दोन वेळा सायबानी परत पाठविला डबा... आणि आज अगदी चाटून पुसून खाल्ला."
"एवढी सुंदर बायको समोर असताना तुझ्या सायबांचे मन कसे होते असे गप बसून राहायचे.... माझा हणम्या असता तर....." गरोदरपणामुळे पूढे आलेल्या पोटाला सावरत सखू म्हणाली.
"माहितेय तुझा हणम्या.... आता बास करा..... तुमच्यासारख्यांमुळे देशाचं वाटुळ होतं चाललंय..... आता ह्या तीसऱ्यानंतर टाळ लावून टाका समध्यावर..." सखुच्या पोटाकडे इशारा करत रखमा म्हणाली....
तशी सखू लाजली.
"काय बी काय बोलतेस.... ही तर देवाची देन हाय..."
"तुम्ही हात पसरूनच ठेवले तर तो तरी काय करील बिचारा..... तो दितच राहील. "
"काय गं.... तुझे सायेब...... तसले न्हाईत ना..."
जनाने वेगळाच निकष लावला.
जनाने वेगळाच निकष लावला.
"या बया..... असं वंगाळ बोलू नगस माझ्या सायबांच्या बाबतीत....देव माणूस हाय तो.... गेल्या महिन्यात माझ्या पोराच्या वाढदिवसाला सायकल घेऊन दिली त्यांनी... त्याला कॉलेजला जायला सोपं पडावं म्हणून."
"हो.... आणि चार महिन्यांपूर्वी त्यांनी शिरपतचे घर दुरुस्त करून दिलं व्हत." सखू म्हणाली.
"मी बी ऐकलं हाय तुझ्या सायबांनी पोलिसांना सांगून आपल्या गावात चोऱ्या माऱ्या थांबविण्यासाठी जास्तीचे पोलीस रात्रीच्या पाहऱ्याला पाठवायला सांगितले आहेत.". जनाने त्या दोघींच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
"मग... माझे सायेब कोर्टात वकील हायित.... वटचं आहे त्यांची तशी..."रखमा अभिमानाने म्हणाली.
"चला गं... पटपट.... जाऊ.... मला बाईंनी त्यांच्यासाठी जिलबी आणायला सांगितलेय.... बाई पण खूप चांगल्या हायेत..... माझ्या पोरांसाठीपण काहिबाही घ्यायला पैसे बी दिलेत त्यांनी."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा