Login

का रे दुरावा भाग दोन

Love story
इकडे..

गंधारला यायला उशीर झाला.  कुलूप खोलताना त्याने एकवार मागे वळून पाहिले.   नेहमीप्रमाणे अरुंधती त्याची वाट बघत खिडकीत बसली होती .  त्याने क्षणभर पाहून दुर्लक्ष केले व तो आत गेला.   काहीवेळाने अरुंधती थर्मास आणि जेवणाचा डबा घेऊन आली.

गंधार टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून सोफ्यावर मोबाईल बघत बसला होता.   तिला समोर पाहताच तो उठला.

"चहा आणलेय तुमच्यासाठी....."

"मी सांगितले ना.... हे सर्व करायची काही गरज नाही. तुम्ही तुमचा टाइम आणि एनर्जी वेस्ट घालवत आहात."

अरुंधती हसली आणि तिने जेवणाचा डबा आणि थर्मास टेबलावर ठेवले व ती जाऊ लागली.
तिने मोगऱ्याचा गजरा तिच्या लांबसडक केसात माळला होता. आणि अबोली रंगाची शिफोनची साडी तिच्या मखमली कांतीवर एकदम उठून दिसत होती. गंधार पाठमोऱ्या तिला न्याहाळत होता तसे ती वळली त्याची नजर थरथरली.  त्याने दुसरीकडे पाहिले.

"गंधार,.... चहा पिऊन घ्या.... थंड होईल नाहीतर.... तुम्हाला थंड चहा आवडत नाही ना...."

तो तिला टाळून दुसरीकडेच पाहत होता.  ती निघून गेल्यावर त्याने दरवाजा लावून घेतला.   त्या आवाजाने तिने दचकून मागे पाहिले.   बंद दरवाजाकडे पाहताना तिचे डोळे भरून आले.

ती गेल्यावर गंधार सोफ्यावर खिन्न बसला.   त्याच्या नजरेसमोर सर्व भूतकाळ उभा राहिला.

दीड वर्षांपूर्वी पाहिले होते त्याने तिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये.. त्याला नाजूक आवाजात औषधे कधी आणि कशी घ्यायची हे तिने समजून सांगितले होते. तेंव्हाच आवडली होती ती त्याला.  ती जिथे काम करीत होती त्या डॉक्टरांकडून त्याने तिचा फोन नंबर आणि पत्ता घेतला आणि तिच्या आईजवळ तिला लग्नाची मागणी घातली.

गंधार सरदेसाई ... उच्चशिक्षित, कोर्टात वकील स्वतःचा फ्लॅट गाडी..... आणि शिवाय एकटाच .... वडील लहानपणीच वारलेले आणि आई आदल्या वर्षी.... घरी कोणी नाही.... असे स्थळ आयते चालून आल्यावर तिच्या आईने ताबडतोब होकार सांगितला.

लग्न करून ती जेंव्हा घरी आली तेव्हा शेजारच्या वहिनींनी औक्षण करून आणि उंबरठ्यावर माप ठेऊन तिला घरात घेतले.   एवढी सुंदर बायको आपल्याला मिळेल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.

लग्नाच्या रात्री ती बेडवर बसली होती तो जवळ आला तशी ती संकोचली.   मग त्याने समजूतदारपणे तिला सांगितले.   तू जेंव्हा मनापासून तयार होशील तेंव्हाच पुढच्या गोष्टी घडतील.

दिवसांमागून दिवस जात होते.  अरुंधती जेवण खूप छान बनवायची.  गंधार तिची भरभरून तारीफ करायचा.   पण का कुणास ठाऊक ती त्याच्याबरोबर कधी दिलखुलास हसलीच नाही.

त्यांच्या लग्नाला चार महिने झाले होते.  आज गंधारचा वाढदिवस होता.  अरुंधतीने त्याच्यासाठी छान जेवण बनविले.   ती दोघंही एकत्र जेवले.   तो नेहमी कोर्टात काय काय झाले ते तिला रंगवून सांगत असे.   ती फक्त ऐकायची आणि कधी कधी हसून त्याला साथ देत असे.  जेवून झाल्यावर त्याने कोर्टरूममधील किस्से सांगायला सुरुवात केली..... ती हसत होती ...आणि मोहाच्या एका गाफिल क्षणी त्याने तिचे चुंबन घेतले...... लग्नाची बायको होती ना ती त्याची..... तिने पटकन त्याला मागे ढकलले.

"मला वाटले.... तुम्ही तुमचा शब्द राखाल.......
प्रत्येक मुलीचे स्वन असते...... तिचा स्वप्नातला राजकुमार....... रुबाबदार.... Handsome... देखणा असावा..... पण........... ज्यांचे वडील नसतात... आई हॉस्पिटमध्ये आया असते.... घरी शाळेत जाणारी दोन भावंडे असतात.... अशा मुलींना स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो ...... येईल त्या पहिल्या स्थळाशी लग्न कले जाते त्यांचे.... नकार द्यायचा प्रश्नच नसतो...."

गंधारला तिच्या मनात असलेल्या त्याच्याबद्दलच्या तिरस्काराची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्याने मनापासून प्रेम केले होते तिच्यावर.


गंधार  विचारांच्या चक्रात हरवला. अचानक लाईट गेली.  तो Emergenchy light शोधत होता तितक्यात अरुंधतीच्या खोलीतून तिच्या किंचाळण्याचा आवाज झाला.  त्याने तत्परतेने दरवाजा खोलला व तो धावतच तिच्या घरात गेला.   घराचा दरवाजा उघडाच होता.  तो आतमध्ये शिरताच त्याला धक्का मारून कोणीतरी तिथून पळाले.   गंधार त्याच्या मागून धावला.   पण तो विजेच्या वेगाने धावत गेला आणि अंधारात नाहीसा झाला.  गंधार लगबगीने अरुंधतीच्या खोलीत गेला.

"अरु"

....काहीच आवाज न आल्यामुळे त्याने परत जोरात आवाज दिला.

"अरु sss..,.. अरु  sss ..."

तो आत गेला तितक्यात अरुंधती अंधारात चाचपडत  आली.
तिचा गोरा रंग अंधारातही चमकत होता.

"अरु तू ठीक आहेस.... "तो अगदी तिच्या जवळ आला.

"अरु... मी काय विचारतोय.... तू ठीक आहे.... तू बोलत का नाहीस...."

अरुंधती पटकन येऊन त्याला बिलगली.  तिच्या डोळ्यातल्या अश्रूचे थेंब त्याच्या छातीवरच्या टी शर्टला लागले.   त्याने तिचे खांदे धरले आणि ती का रडत आहे हे विचारण्यासाठी तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर आणला.

"अरु.... चोर होता का तो... त्याने काही त्रास दिला का तुला?" गंधार चिंतीत होता.

ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. देवघरातल्या मंद दिव्याच्या उजेडात तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले.. इतक्यात light आली....

"गंधार.... आज किती दिवसांनी तुम्ही मला अशी प्रेमाने हाक मारलीत..... मला त्या चोराचे आभार मानायचे आहेत.... जे इतके दिवस मी करू शकले नाही ते त्याच्यामुळे शक्य झाले...."

गंधार क्षणभर तिच्या मोहक डोळयांत हरवून गेला. ती त्याला पुन्हा बिलगली.

"गंधार.... आपण परत जाऊया आपल्या घरी..."

गंधारने तिचे खांदे धरले.  त्याच्या डोळयांत परत राग दिसत होता.   त्याने तिला स्वतःपासून वेगळे केले आणि तो रागातच तिथून निघून गेला.  त्यांची ही भेट रखमा दारातूनच पाहत होती.  त्याला रागात तिथून जाताना पाहून ती आत आली.

"बाईं.... तुम्ही म्हणत व्हता ते समदं खरं व्हतं म्हणजे.... ते तुमचे कारभारी हायेत..." हातातली जिलेबीची पिशवी टेबलवर ठेवत रखमा म्हणाली.

अरुंधती तिच्यासाठी बंद झालेल्या त्याच्या घराच्या  दरवाजाकडे बघून रडत होती.  रखमाने तिला धरून बेडवर बसवले आणि स्वयंपाकघरातून पाण्याचे ग्लास भरून आणून तिला पिण्यास सांगितले.   अरुंधती पाणी प्यायली.

"बाईं... नक्की काय झालं.... अशी सोन्यासारखी बायको सोडून मुंबईतून हा माणूस इथे आडगावात का राहायला आला."

"चुकी माझीच आहे.... मी मूर्ख होते....माझ्या पदरात परिस होता पण त्याची कदर केली नाही मी.... त्यांना नको नको ते बोलले....त्यांच्या प्रेमाचा अपमान केला मी." अरुंधतीने झालेली सर्व हकीकत रखमाला सांगितली