काळोख्या रात्रीच्या अंधारात रातकिड्यांची किरर्ऽऽऽ काळजात चिरून जात होती. त्यात सळसळत्या पानांच्या आवाजासोबत दम टाकत जीवांच्या आकांताने पळणारे ती दोघं आणि ते.... घुबडांचा आवाज अन् भयानक वास्तव्य त्या जंगलात, त्यात गेल्यावर जीवंत बाहेर पडू की नाही याची कल्पना नसतानाही ती दोघं मिळेल ती वाट पकडून जीव मुठीत घेऊन धावत होते. अचानक भयंकर एका किंकाळीने त्या साम्राज्यात शांतता पसरवली अन् तिला अचानक जाग आली. घामजलेल्या शरीराने ती थोडी थरथरत उठली. बाजूला पाण्याची बाटलीतून थोडं पाणी प्यायली. श्वास जास्त चढलेला अन् डोकं आज परत सुन्न झालं होतं. तिच्या सोबत काय घडतंय तिला ठाऊक नव्हतं अन् अशा स्वप्नाला ती वैतागून ही गेली होती. अनेकदा तिची सकाळ या स्वप्नाने पूर्ण व्हायची अन् तो दिवस तिचा रहस्यमयी जायचा.
सकाळची नित्यनेमाची कामे उरकून कॉलेजची तयारी करत बसली होती. तितक्यात आईने आवाज दिला.
"लाडू.... बाळा खाली ये नाश्ता तयार आहे"
"हो आले..."
काहीवेळाने नाश्ता करून तिच्या स्कुटीवर बसून निघाली. काही अंतरावर गेल्यावर तिची मैत्रीण शिखा भेटली आणि दोघी एकत्र कॉलेजला गेल्या.
लेक्चर बेल झाली आणि दोघी पळत क्लासरूमच्या दिशेने धावल्या. शिखा लेक्चर मध्ये सुद्धा हळू हळू बोलत होती पण ती आज गप्प होती. ना लेक्चर मध्ये लक्ष ना शिखाच्या बोलण्याकडे तिचं लक्ष होतं. काही वेळा लेक्चर संपलं आणि तिच्या गर्क विचारांतच क्लासरूम बाहेर पडली.
"शिवन्या...शिवन्या..." शिखा पाठून धावत येऊन हाका मारायला लागली पण तिचं लक्ष अजूनही गेलं नव्हतं. तिच्या पाठीत जोरात धपाटा शिखाने मारला तेव्हा ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली.
"आ! आई ग! ए शिखा काय आहे.. एवढ्या जोरात कोणी मारत का? आई.. आई.. गं केवढं लागलं जोरात. आता बोल ना शिस्तीत काय झालं?" शिवन्या कळवळत शिखाला ऐकवत होती.
अगं तुझं लक्ष कुठे आहे कधी पासून तुला आवाज देत आहे पण तुझं हूंऽऽऽ की चूऽऽऽ नाही मग मी काय करावे? तुचं सांग म्हणून एक घातला धपाटा पाठीत... सॉरी." बारीक आवाजात शिखा म्हणाली.
"अच्छा ! मी पण सॉरी, माझंही लक्ष नव्हतं ते जाऊ दे. तू बोल काय बोलत होतीस?"
"अगं शिवन्या, आपल्या कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टी ठेवली आहे आणि त्यात एक अट आहे की पार्टीत एन्ट्री तेव्हाच देणार जेव्हा आपण आपल्या पार्टनर सोबत जाऊ, म्हणजे पार्टी है तो पार्टनर तो बनता है ना बॉस.....शिवन्या अगदी एक्साईटेड होऊन शिवन्याला सांगत होती. तरी तिचं लक्ष थोडं तिच्या बोलण्यात आणि थोडं विचारांमध्ये भरकटत होतं.
"शिखा.. शिखा ऐक ना आपण निघूया का ग?"
"हो ग, चल लवकर कॅन्टीन मध्ये नाही तर अक्का कॅन्टीन परत बंद करायची." शिखा बोलल्यावर दोघी हसत हसत कॅन्टीनच्या दिशेने जातात.
"ए ! ऐक ना शिवा आता आपली पार्टी येतेय तर आपण शॉपिंग मॉलला जाऊया का?" भजीपाव खाता खाता शिखा शिवन्याशी बोलत असते.
"हो जाऊया. पण येत्या रविवारी लगेचच आज नाही समजलं ना?"
अशाच गप्पा गोष्टी करत दोघी घरी जायला निघतात. काही अंतरावर गेल्यावर शिवन्याला विचित्र वाटायला लागतं. तिला भास व्हायला लागतो तरी ती गाडी चालवण्याकडे लक्ष केंद्रित करत असते. अचानक ब्रेक मारते आणि शिखा जाऊन तिच्यावर आदळते. पाठीमागून शिखा चिडून तिला ओरडते पण ती अजूनही संभ्रमात असते की नक्की आता तिच्यासोबत काय घडलं? तितक्यात तिला तिच्या कानापाशी आवाज येऊ लागतो.
'तो आला आहे.... विनाश शक्ती वाढत चालली आहे. त्याचा संहार करण्यासाठी तो आला आहे.'
'तो आला आहे.... विनाश शक्ती वाढत चालली आहे. त्याचा संहार करण्यासाठी तो आला आहे.'
शिवन्या भयंकर घामाघूम झाली असते आणि शिखा तिला हलवून पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करते. एका क्षणात असं काही घडलं ज्यामुळे शिवन्याला सकाळच्या स्वप्नाची परत आठवण यायला लागते.
"शिवा काय झालं आहे गं? तुझं सकाळपासून तु खरंच खूप वेगळी भासते आहेस." पण शिवा तिला काही नाही एवढंच बोलून वेळ मारून नेते. दोघीही त्या सुनसान रस्त्यावरून निघतच असतात की तिला तो आंधळा दगडावर काहीतरी कोरत असताना दिसतो आणि तिचा थरकाप उडतो.
शिवन्या मनातच विचार करू लागते, 'हा माणूस इथे कसा? आणि का म्हणून मला अशी विचित्र स्वप्न पडत आहेत? आणि तो आवाज ? नक्की कुठला प्रकार समजायचा? कोण येतो आहे?' अनेक प्रश्न तिच्या विचारात घोळत होते.
क्रमशः
© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा