काली - एक रहस्य! ( भाग १ )

काली - एक रहस्य! कोणीही न पाहिलेलं, पण समोर न येताही मदत करणारी होती. वाचा unknown words "जानकी" लिखित कथा.
" चला चला, सर्व सामान बाहेर काढून फेका या मुलीचं. " एक माणूस एका छोट्या खोलीच्या बाहेर उभा राहून बोलत होता, तर त्याच्या पायाशी एक मुलगी रडत त्याच्या पाया पडत होती.

रात्रीची वेळ होती आणि त्या चाळीमध्ये नेमकी लाईटही गेली होती. अंधारात चाललेला हा खेळ आजूबाजूचे काही लोक मोठे टॉर्च तर काही मोबाईलचा टॉर्च लावून पाहत होते.

" साहेब... असं नका हो करू साहेब. मी एकट्या मुलीने कुठे जायचं? मला ना आई ना बाप! ही एक रूमच काय ती माझा आसरा आहे. रात्रही खूप झालेली आहे, अशात मी एवढं सामान घेऊन कुठे जाऊ साहेब? प्लीज असं करू नका. मला इथून बाहेर काढू नका. " ती रडत त्याच्या पायाशी बसून पाया पडत म्हणाली, पण त्या माणसाचं हृदय जणू देवाने कठोर दगडाचं बनवलेलं होतं.

" खूप महिने झाले तू या रूमचं भाडं दिलेलं नाही. आज उद्या असं करत करत पाच सहा महिने लोटलेस तू. आता मी तुला इथे नाही ठेवू शकत. तसंही लोक तोंडावर बोलायला लागले आहेत माझ्या. 'एका तोंड काळं झालेल्या मुलीला इथे बसवून ठेवलं' , असं म्हणत आहेत. बास्स! आता कानही दुखले आहेत माझे, आणि भाडंही थकलं आहे. फुकटचं पोसू शकत नाही मी तुला. " तो माणूस अगदी निर्दयीपणे कठोर शब्दांत तिच्या मनावर घाव घालत होता.

ती बिचारी तर रडून रडून बेहाल झाली होती. काही महिन्यांपूर्वी तिच्यासोबत घडलेली ती घटना तिला आठवली. ज्यात तिचा काही दोष नव्हता, तरीही एवढी भयानक शिक्षा मिळत होती.

" साहेब, मला दुसरी खोली शोधेपर्यंत तरी इथे थांबू द्या. मी अशा अवस्थेत कसं सांभाळणार साहेब? " ती आपल्या पाच महिन्यांचा गर्भ असलेल्या पोटावर हात ठेवत पुन्हा एकदा त्याला त्याचा निर्णय बदलवण्यासाठी विनवणी करत होती. जेणेकरून त्या न जन्मलेल्या बाळाचा विचार करून तरी त्या दगडाला पाझर फुटेल.

" हे बघ पोरी, मी तुला इथे थांबू देऊ शकतो. " तो माणूस म्हणाला, तशी ती खुश होऊन त्याच्याकडे पाहू लागली. ती काही बोलणार तेवढ्यात त्या माणसाचे शब्द तिच्या कानांवर पडले.

" पण फक्त एकाच अटीवर. आत्ताच्या आत्ता सात महिन्यांचं थकलेलं भाडं माझ्या हातात ठेव आणि रहा खुशाल इथे. " त्या माणसाने तिच्यासमोर अट ठेवली, तशी ती हिरमुसली.

चेहऱ्यावरची खुशी लगेच नाहीशी झाली. त्या माणसाला माहित होतं की तिच्याकडून हे होणं शक्य नव्हतं, म्हणूनच त्याने तशी अट ठेवली होती. त्याला कसंही करून तिला इथून हाकलून लावायचीच होती, त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. झालंही त्याच्या मनासारखंच. त्याची ती अट ऐकून बिचारी लगेच उठून उभी राहिली आणि आपल्या बाहेर फेकून दिलेल्या सामानांजवळ जाऊन उभी राहिली. एवढं सामान पाहून तर तिचे डोळे अधिकच वाहायला लागले होते.

' एवढं सामान नेऊ कशी? तेही अशा अवस्थेत! ' ती मनातल्या मनात म्हणाली आणि पुन्हा त्या माणसाकडे वळली. ती पुन्हा येऊन आपल्यासमोर उभी राहिली ते पाहून तो माणूस कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहू लागला.

" साहेब, हे सामान इथून उचलण्यासाठी काही वाहन मिळालं असतं तर... " ती पुन्हा हात जोडून विनवणी करत म्हणाली.

" पैसे कोण देणार मॅडम त्याचे? मी? अपेक्षा पण ठेवू नकोस. तू ते सामान डोक्यावर ने, किंवा ओढत ने. माझ्याकडून कुठलीही मदत होणार नाही. " तो माणूस रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, तेव्हा पुन्हा ती रडायला लागली.

वळून तिथून जायला निघणार की तेवढ्यात एका छोट्या टेम्पोचा उजेड तिच्या तोंडावर पडला. आधीच लाईट गेलेली होती, त्यात अचानक उजेड तोंडावर पडल्याने सर्वांनी तोंडासमोर हात ठेवून पुढे पाहायला सुरुवात केली. तो टेम्पो येऊन तिच्या सामानांजवळ उभा राहिला. त्यातून वीस एक वर्षांचा मुलगा खाली उतरला आणि टपोरी मुलांसारखा चालत येऊन तिच्यासमोर थांबला.

" चल ऐ दिदे, तुझा भाऊ आला आहे तुला घ्यायला. " तो मुलगा टपोरीसारखा दिसत होता, पण त्याच्या बोलण्याचा अर्थ कोणालाच कळाला नव्हता. ती मुलगी सुद्धा न समजून त्याच्याकडे पाहत होती, कारण तिच्यासाठीही तो अनोळखी होता आणि अनोळखी असूनही तिला बहीण म्हणत होता.

" कोण आहेस रे तू? " त्या माणसाने थोडंसं चिडून विचारलं, तसा तो मुलगा हसला.

" आपण आपल्या नशिबात येणाऱ्या बायकोचा सोडून सर्व मुलींचा भाऊ, रॉकी भाऊ म्हणतात आपल्याला. आपल्या या नवीन सिस्टरला घ्यायला आलोय. " त्या मुलाने हसून आपल्या हटक्या स्टाईलने आपली हटकी ओळख करून दिली.

" इथे काय घडलं हे तुला कसं समजलं? तुला तर आम्ही इथे आधी कधीही पाहिलेलं नाही. तू या चाळीतही राहत नाहीस. मग तुला समजलं कसं? " त्या माणसाने संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं.

" तिला अख्ख्या शहराची खबर मिळते, म्हणूनच तिने मला इथे पाठवलं आहे. " रॉकीने सांगितलं, तशा चाळीवाल्यांच्या आणि त्या माणसाच्या कपाळावर आठ्या पडल्या. समोर उभ्या असलेल्या त्या मुलीच्याही काहीच लक्षात येत नव्हतं. ती म्हणजे कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

" ती कोण? कोणाबद्दल बोलत आहेस तू? " जे काही बोलायचं आहे ते फक्त तो माणूसच बोलत होता. जिच्यासाठी तो मुलगा इथे आला होता, ती मात्र फक्त ऐकण्याचं काम करत होती. त्या माणसाच्या प्रश्नावर रॉकी आणखी समोर आला आणि आपल्या ओठांवर काहीसं राक्षसी हसू आणत बोलू लागला.

" काली...! " त्याने फक्त तिचं नाव सांगितलं, त्या सरशी त्या माणसासहित ती मुलगी आणि पूर्ण चाळीतील लोक घाबरून, दचकून दोन पावलं मागे सरकली. त्या माणसाने पुढे कुठलाच प्रश्न विचारला नाही, कारण त्याची जणू वाचाच निघून गेली होती.

सर्वांना घाबरलेलं पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावर थोडं क्रूर हास्य पसरलं. नंतर त्याने हसतच मागे वळून गाडीकडे पाहिलं, तर त्याची दोन तीन मित्रमंडळी सुद्धा त्याच्याकडे पाहून हसत होती.

" पिंट्या... आपल्या नवीन सिस्टरचं सगळं सामान गाडीमध्ये व्यवस्थित भर. " रॉकी त्याच्या मित्राकडे पाहून मोठ्याने म्हणाला आणि त्याच्या आवाजाने ' तिचं ' नाव ऐकून कोमामध्ये गेलेले सर्वजण शुद्धीवर आले. 

" भरलं आहे रॉकी भाऊ. सिस्टरला घेऊन निघायचं बाकी आहे. " पिंट्याने आवाज देऊन सांगितलं, तसं रॉकीने पुढे वळून त्या मुलीकडे पाहिलं.

" चल सिस्टर, इथून पुढे तुला कुठल्याही दुःखाचा सामना करावा लागणार नाही. " रॉकी तिच्याकडे पाहून हसून म्हणाला, तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती त्याच्या पाया पडायला खाली वाकली. तिला तसं करताना पाहून त्याने मध्येच तिचे हात धरले आणि तिला सरळ उभी केली.

" अशा अवस्थेत खाली वाकायचं नसतं सिस्टर. " रॉकी तिला खाली वाकण्यापासून अडवत म्हणाला.

" तुमचे खूप खूप उपकार झाले दादा. नाहीतर मी एकटी स्वतःसाठी आणि माझ्या बाळासाठी काहीच करू शकणार नव्हते. " ती मुलगी रडत सरळ उभी राहून हात जोडत म्हणाली, तशी त्याने त्या माणसाकडे नजर टाकली.

" तुला पुढेही काही करण्याची गरज पडणार नाही सिस्टर. आता जे काही करायचं आहे, ते काली करणार. " रॉकी त्या माणसावर करडी नजर टाकत म्हणाला. त्याच्या त्या शब्दांनी त्या माणसाच्या अंगावर सरकन काटा आला.

त्याच्याकडे वळून पाहतच तो त्या मुलीला घेऊन गाडीजवळ गेला आणि तिला व्यवस्थित आतमध्ये बसवलं. त्यानेही गाडीत बसण्यापूर्वी पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं आणि नंतर गाडी घेऊन तिथून निघून गेला.



कोण होती ही काली? तिने त्या मुलीची मदत का केली असावी? सगळेजण तिला का घाबरत होते? पाहूया पुढील भागात...



क्रमशः


🎭 Series Post

View all