काली - एक रहस्य! ( भाग ३ )

काली - एक रहस्य! कोणीही न पाहिलेलं, पण समोर न येताही मदत करणारी होती. वाचा unknown words "जानकी" लिखित कथा.
" अरे सोडा मला. कुठे घेऊन चालला आहात? ही काय पद्धत आहे आपल्यासोबत घेऊन जाण्याची? " रमेश मोठमोठ्याने ओरडत त्याला ओढत घेऊन जाणाऱ्या रॉकीकडे पाहत विचारत होता. तो त्याला ओळखत नव्हता आणि एक अनोळखी व्यक्ती आपल्याला असं ओढत नेत आहे म्हणून त्याला राग येत होता.

" मी तर फक्त ओढत घेऊन जात आहे. जर ती घ्यायला आली असती तर कसं नेलं असतं याची तू कल्पना देखील करू शकत नाहीस. " रॉकी रमेशला त्याच्या शर्टच्या कॉलरला धरून ओढत नेत दात ओठ खात बोलत होता.

" अरे कोण ती? कोणाबद्दल बोलत आहेस तू? आणि ती एक स्त्री असून तिची एवढी हिंमत कशी झाली? " रमेश रॉकीचा हात धरून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत विचारत होता, पण पिंट्या आणि त्याचा अजून एक जोडीदार त्याला पुढे ढकलत होते. त्या तिघांमध्ये रमेशची शक्ती कमी पडत होती.

" ती कोण? हे तर तुला आता तिच्यासमोर गेल्यानंतरच कळेल. हा प्रश्न विचारून तू खूप मोठी चूक केलीस. तुझ्या बोलण्यावरून समजलं की तू स्त्रियांना आपल्या पायाखालची धूळ समजतोस. सारा शहर तिच्या नावाने थरथर कापतो. तुझ्यापेक्षा मोठमोठ्या गुन्हेगारांना तिने यमसदनी धाडलं आहे. तिच्यासमोर तू एक छोटासा किडा आहेस. कधी ती तुला स्वतःच्या पायाखाली चिरडून टाकेल, हे तुलाच समजणार नाही. " रॉकी अजिबात न थांबता त्याला कालीबद्दल सांगत होता.

असंच ओढ ढकल करत त्या तिघांनी रमेशला गाडीजवळ आणलं. रॉकीने त्याची कॉलर सोडून गाडीचा दरवाजा उघडला.

" चल बस आत. " रॉकी रागाने म्हणाला, पण रमेश काही पुढे होऊन गाडीत बसण्याचं नाव घेत नव्हता.

" मी बसणार नाही. ती जी कोणी आहे तिला इथे यायला सांग. इथपर्यंत तुम्ही मला ओढत घेऊन आलात, पण मी गाडीत बसणार नाही. " रमेशही रागानेच म्हणाला, तेवढ्यात ध्यानीमनीही नसताना त्याच्या कंबरेवर जोरात लाथ बसली आणि तो आपोआप गाडीत फेकला गेला.

मागून पिंट्याने त्याच्या कंबरेवर जोरात लाथ मारली होती. तो सीटवर पडल्या पडल्याच आपल्या कंबरेला हात लावून कळवळत होता. उठून बसण्याचेही त्राण नव्हते.

" चल ऐ, नीट बस. आम्ही कुठे बसायचं? " पिंट्या त्याच्या पायावर चापट मारत म्हणाला.

त्या चापटीनेही रमेश कळवळला. पाच मिनिटांनी तो व्यवस्थित उठून बसला. त्यानंतर रॉकी गाडी चालवायला बसला, तर पिंट्या आणि त्याचा मित्र रमेशच्या दोन्ही बाजूला बसले.


                          अर्ध्या तासाने रॉकीने गाडी एका गेटसमोर थांबवली. गाडीतून उतरून त्याने पिंट्याला आणि त्याच्या मित्राला रमेशला बाहेर काढायला सांगितलं. हे तिघे पुन्हा तसंच ओढत त्याला गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका घराकडे घेऊन गेले. रॉकीने घराचं कुलूप उघडलं. पिंट्या आणि त्याच्या मित्राने रमेशला आत नेलं. मधोमध असलेल्या एका खुर्चीवर त्याला बसवलं आणि त्याचे हात पाय दोरीने बांधले. रमेश आपले हातपाय सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण ते काही त्याला जमेना. त्याला व्यवस्थित बांधल्यानंतर रॉकी उठून उभा राहिला आणि त्याने लगेच कालीला फोन केला.

" हॅलो दीदी, आम्ही याला इथे घेऊन आलो आहोत. पुढे काय करायचं? " रॉकी फोनवर बोलत होता.

पलीकडून काली रॉकीशी बोलत होती. रॉकी तसाच फोनवर बोलता बोलता दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा आतून व्यवस्थित लावून घेतला. हे त्याला कालीने सांगितलं होतं. नंतर रॉकीने समोर पाहिलं. भिंतीवर एलईडी टीव्ही होता. त्याने टीव्हीजवळ जाऊन टीव्ही सुरू केला. टीव्ही सुरू केल्यानंतर रॉकीने फोन ठेवला आणि रमेशजवळ आला.

" मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक. थोड्यावेळाने दीदी इथे तुझ्यासोबत गेट-टुगेदर करणार आहे. अजिबात भाव न खाता तिने विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं द्यायची. आम्ही तिघेही इथेच आहोत. तुझी हिस्ट्री आम्हाला माहित आहे, त्यामुळे एकही उत्तर आम्हाला चुकीचं मिळालं तर इकडून मी आणि तिकडून पिंट्या, त्या लाल तोंडाच्या माकडासारखं तुझंही तोंड लाल करून ठेवू. समजलास? नसेल समजलं तरी काही हरकत नाही, आम्ही व्यवस्थित समजावून सांगू. " रॉकी धमकी वजा सूचना त्याला देत होता.

त्याचा झापड हा शब्द ऐकून त्याला मघाशी पिंट्याने मारलेली लाथ आठवली. घाबरून त्याने लगेच होकारार्थी मान हलवली, पण नाकपुड्या अजूनही रागाने फुरफुरत होत्या. त्याने मान हलवल्यानंतर रॉकी त्याच्या मित्रांसहित टीव्हीकडे पाहू लागला. दोन तीन मिनिटांनी त्यावर काही चित्रे दिसू लागली. समोर पूर्णपणे काळ्या कपड्यांत असलेली एक व्यक्ती दिसत होती. तिचे फक्त डोळे उघडे होते. सर्व शरीर तिने काळ्या कपड्याने कव्हर केलेलं होतं. ती कदाचित स्क्रीनपासून थोडी लांबच उभी होती, कारण तिच्या डोक्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग दिसत होता.

" कोण आहेस तू? " रमेशने तिला प्रश्न विचारला, तसा इकडून रॉकीने त्याचा गाल रंगवला.

" तुला सांगितलं होतं ना, प्रश्न फक्त दीदी विचारणार. तुला फक्त उत्तर द्यायचं आहे. " रॉकी त्याच्या कानाखाली लावत म्हणाला, तसा रमेश पुन्हा पुढे पाहू लागला.

" रमेश दिवाण. हेच नाव आहे ना तुझं? " कालीने प्रश्न विचारला, तशी त्याने होकारार्थी मान हलवली. इकडून पिंट्याने त्याचा दुसरा गाल रंगवला.

" तोंड शिवलं आहे का तुझं? हो की नाही शब्दात उत्तर दे. " पिंट्या त्याच्या दुसऱ्या गालावर चापट मारत म्हणाला.

" हो... म...माझं नाव रमेश दिवाण आहे. " रमेश दुसरा फटका मिळाल्यामुळे एका दमात बोलला.

" स्वाती नावाच्या मुलीला ओळखतोस? " कालीने पुढचा प्रश्न विचारला, तसे रमेशचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.

" त्... तुला... तुला कसं माहित? " रमेशने विचारलं, आणि इकडे पुन्हा त्याच्या गालावर प्रसाद दिला गेला. तिसरी चापट बसल्यामुळे रमेश आता रडकुंडीला आला होता.

" सॉरी! हो मी ओळखतो स्वातीला. आम्ही रिलेशनमध्ये राहत होतो. " रमेशने घाबरून लगेच उत्तर दिलं.

" तुम्ही रिलेशनमध्ये आल्यानंतर तुझ्यामुळे तिला दिवस गेले, हे सुद्धा तुला माहित आहे? " कालीने पुढचा प्रश्न विचारला.

" हो, पण आता आम्ही एकमेकांसोबत राहत नाही. " रमेश घाबरून पटपट उत्तर देत होता. आता व्यवस्थित बोललो नाही, किंवा खोटं बोललो तर आपली धुलाई होणार याची त्याला पक्की खात्री होती.

" का? "  कालीने एका शब्दात पुढचा प्रश्न विचारला.

त्यावर रमेशला काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. तो खाली मान घालून विचार करत होता. त्याच्या कपाळावर घाम जमा झालेला होता.

" मी उत्तराची वाट पाहत आहे. " काली त्याला विचार करताना पाहून म्हणाली, तसं रमेशने पुढे पाहिलं. तो उत्तर न देता फक्त पाहत होता म्हणून रॉकी बोलू लागला.

" अरे बोल ना आता. बोल नाहीतर अजून एक... " रॉकी आपला हात उगारत म्हणाला.

" थांब रॉकी. " रॉकी रमेशला मारणार तेवढ्यात कालीने त्याला अडवलं. तिने थांबायला सांगताच त्यानेही आपले हात खाली घेतले.

" बरं ते सोड, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे. " काली म्हणाली, पण का कोणास ठाऊक रमेशला ती तोंड बांधलेलं असूनही किंचित क्रूर हसल्यासारखी जाणवली. त्याला एखाद्या संकटाची चाहूल लागली होती जणू. भीतीने त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता.

" पिंट्या, साहेबांना त्यांचं सरप्राईज दाखव. " काली म्हणाली.

" जी दीदी. " कालीची आज्ञा पाळत पिंट्या दरवाजाच्या दिशेने गेला.

जाऊन त्याने दरवाजा उघडला आणि दोन व्यक्ती आत आल्या आणि रमेशसमोर उभ्या ठाकल्या. त्या दोन्ही व्यक्तींना आपल्यासमोर पाहून रमेशला हार्ट अटॅक येणार की काय असं वाटायला लागलं होतं.

" ओळखलं का यांना रमेश? " त्याच्या अंगाची थरथर जणू कालीला त्या टीव्हीच्या पलीकडेही जाणवत होती. त्याची झालेली ती अवस्था पाहून कालीने विचारलं, पण रमेश तर एकसारखा त्या दोन्ही व्यक्तींकडे घाबरून पाहत होता.



क्रमशः

🎭 Series Post

View all