काली - एक रहस्य! ( भाग ४ )

काली - एक रहस्य! कोणीही न पाहिलेलं, पण समोर न येताही मदत करणारी होती. वाचा unknown words "जानकी" लिखित कथा.
                         रमेश आता चांगलाच घाबरलेला होता. समोर उभ्या असलेल्या दोन्ही व्यक्तींना पाहून त्याच्या अंगाची थरथर व्हायला लागली होती. आळीपाळीने तो त्या दोन्ही व्यक्तींकडे पाहत होता. टीव्हीच्या स्क्रीनवर असलेली काली त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती. रॉकी, पिंट्या आणि त्याच्या मित्राला रमेशचे काय हाल होणार हे आठवूनच हसायला येत होतं. मोठ्या प्रयत्नांनी तिघांनी आपलं हसू दाबून धरलेलं होतं. पाच दहा मिनिटांनंतर कालीचा आवाज त्या सर्वांच्या कानांवर पडला.

" काय झालं रमेश? सरप्राईज आवडलं नाही का तुला? " कालीने विचारलं, पण रमेश अजूनही त्यांच्याकडेच पाहत होता.

" अरे ऐ भाऊ, इतका काय टक लावून पाहत आहेस? अरे तुझ्याच बायका आहेत त्या. विसरलास की काय त्यांना? " रॉकी रमेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तेव्हा कुठे रमेश भानावर आला.

त्या दोन्ही व्यक्ती इतर कोणी नसून रमेशच्या दोन बायका होत्या. रमेशचे दोन लग्न झालेले होते. स्वातीशी प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्याने तीन महिन्यांतच या दोघींशी लग्न केलेलं होतं. आणि आपल्या नवऱ्याचं अजून एक लग्न झालेलं आहे हे त्या दोघींनाही माहित नव्हतं. तीन महिने झाले तरी त्या दोघींना कानो कान खबर नव्हती. त्या दोघीजणी पहिल्यांदाच एकमेकींच्या समोर आलेल्या होत्या. एक जगावेगळंच टॅलेंट होतं रमेशकडे, तीन महिन्यांत दोन दोन लग्न. आपला नवरा आपला एवढा मोठा विश्वासघात करू शकतो, यावर त्या दोघींचाही विश्वास बसत नव्हता. त्याने आपला विश्वासघात केला म्हणून दोघींनाही चांगलाच राग आलेला होता.

" मला वाटलं नव्हतं रमेश की तुम्ही असं काही कराल. " रमेशची पहिली पत्नी म्हणाली, तसा तो घाबरून नकारार्थी मान हलवू लागला.

" काय कमी केली होती मी तुमच्या प्रेमात? का वागलात तुम्ही माझ्याशी असं? " रमेशची दुसरी पत्नी देखील चांगलीच दुखावली गेली होती.

" तुम्ही दोघी थांबा जरा. या भाऊने फक्त तुम्हा दोघींनाच नाही, तर तुम्हा दोघींच्याही आधी एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं. " रॉकी त्या दोघींना शांत बसवत म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून त्या दोघींना जबरदस्त झटका बसला. रॉकीने पुन्हा दरवाजाजवळ जाऊन स्वातीला आत घेतलं.

" ही स्वाती आहे. एक साधी सरळ बिन मायबापाची मुलगी. हिला देखील तुमच्या नवऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि आज ती पाच महिन्यांची गरोदर आहे. ती गरोदर आहे हे समजताच रमेशने तिच्याशी संबंध तोडले होते. तेव्हापासून ती लोकांची बोलणी, त्यांच्या वाईट नजरा सहन करत जगत आहे. " कालीने स्वातीबद्दल माहिती सांगितली, आणि ती गरोदर आहे हे समजल्यानंतर तर दोघींनी तोंडावरच हात ठेवला. रमेश गुपचूप खाली मान घालून ऐकत होता.

" आता तुम्ही दोघींनीच सांगा, काय करायचं या अशा माणसाचं? मला तरी वाटतं की हा जिवंत राहिला तर अजून आपल्या दुर्बुद्धीचा वापर करेल, आणि मेला तर... मेला तर मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाही. तुम्ही दोघी सुज्ञ आहात. मग आता ठरवा आणि मला सांगा. " कालीने रमेशसोबत काय करायचं हे त्याच्या बायकांनाच विचारलं. त्या दोघींनी आधी एकमेकींकडे पाहिलं आणि नंतर रमेशकडे पाहू लागल्या.

" मी या माणसाला ओळखत नाही. माझा याच्याशी काहीच संबंध नाही. " रमेशची दुसरी पत्नी निर्विकार चेहऱ्याने बोलली. तिचं ते बोलणं ऐकून रमेशने आपली खाली असलेली मान झटकन वर केली आणि आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागला.

" मीही ओळखत नाही. मी तर विधवा आहे. " रमेशची पहिली पत्नी म्हणाली. तिचा कंठ दाटून आला होता. पुढे काही बोलताच येईना म्हणून तिने आपल्या घशावरून हात फिरवला.

" आमच्याकडून कुठलीही माहिती बाहेर जाणार नाही याची आम्ही खात्री देतो. बाकी, तुम्ही जे कराल ते योग्यच कराल. " अशी म्हणत रमेशची पहिली पत्नी लगेच त्या खोलीतून बाहेर पडली. तिच्या मागेच दुसरीही बाहेर गेली. त्या दोघींचं असं बोलणं ऐकून रमेश रडकुंडीला आला होता. आपल्या बायकांनीच संमती दिली म्हटल्यानंतर काली काही आता आपल्याला जिवंत सोडणार नाही हे त्याला समजलं होतं.

त्या दोघीजणी बाहेर गेल्यानंतर स्वाती देखील तिथून जाऊ लागली, तेवढ्यात रमेशने तिला थांबवलं.

" थांब स्वाती " रमेशने थांबवल्यानंतर ती जागीच थबकली. तिला थांबलेलं पाहून त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली आणि तो आनंदाने तिच्याकडे पाहू लागला.

" प्लीज तू तरी जाऊ नकोस स्वाती. आय एम सॉरी! मी तुझ्यासोबत जे काही वागलो, त्याबद्दल मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मी तुला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला स्वीकारायला तयार आहे. प्लीज मला इथून सोडायला सांग. मी आयुष्यात कधीच तुला दुःख देणार नाही. " स्वातीला थांबलेलं पाहून खूप मोठ्या आशेने तो तिच्याकडे पाहून बोलत होता.

त्याच्या बोलण्यावर स्वातीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. काहीवेळ पाहून झाल्यानंतर तिने टीव्हीकडे पाहिलं आणि बोलू लागली.

" दीदी, माझे कान बहिरे झाले आहेत. माझे डोळे आंधळे झाले आहेत. गरोदरपणामुळे माझं डोकं बधिर झालं आहे, त्यामुळे काहीच समजत नाही आहे. मला फक्त एवढंच समजत आहे की मी माझ्या बाळाच्या संगोपनासाठी सक्षम आहे. कोणाच्या नावाची गरज नाही की कोणाच्या आधाराची. येते मी दीदी. " स्वाती अशाप्रकारे बोलत होती जणूकाही रमेश तिथे नाहीच.

तिला त्याचं बोलणं ऐकू गेलं नाही आहे, तिला तो दिसत नाही आहे, गर्भावस्थामुळे काही सुचत नाही आहे अशी ती वागत होती. रमेश डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता, तर काली, रॉकी, पिंट्या आणि त्याच्या मित्राला समजलं होतं की स्वातीलाही त्याची शिक्षा चुकवायची नाही आहे. त्याने तिला त्रासच तसा दिलेला होता की तो स्वीकारायला तयार असूनही आपल्या पोटातल्या बाळासाठी देखील तिने रमेशच्या जीवाची भीक मागितली नव्हती. बोलून ती तिथून निघून गेली. आता शेवटचा प्रयत्न म्हणून रमेश कालीसोबत बोलू लागला.

" काली... काली, मी वचन देतो की इथून पुढे कुठल्याही मुलीला त्रास देणार नाही. प्लीज मला सोडून दे. " तो आपल्या जीवाची भीक मागत होता.

" साहेबांना पोटभर खाऊ पिऊ घाला. नंतर आपल्या जागेवर घेऊन या. मी काहीवेळाने पोहोचतेच तिथे. " काली रमेशच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत त्या तिघांना म्हणाली. त्यावर त्या तिघांनी होकारार्थी मान हलवली आणि टीव्ही बंद केला. नंतर त्यांनी रमेशला तिथून बाहेर काढलं आणि कालीने सांगितलेल्या ठिकाणी घेऊन गेले.


क्रमशः


🎭 Series Post

View all