काली - एक रहस्य! ( भाग ५, अंतिम भाग )

काली - एक रहस्य! कोणीही न पाहिलेलं, पण समोर न येताही मदत करणारी होती. वाचा unknown words "जानकी" लिखित कथा.
                                 • चार महिन्यांनंतर •


" आहऽऽऽऽऽ! आई गंऽऽऽऽऽ! " हॉस्पिटलच्या डिलिव्हरी रूममध्ये स्वातीचा कळवळण्याचा आवाज येत होता.

आज स्वातीला नऊ महिने तीन दिवस पूर्ण झाले होते. तिला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. सकाळपासून रॉकी आणि पिंट्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आता संध्याकाळ होत आली होती, तरी अजून तिची डिलिव्हरी झाली नव्हती. तिचा त्रास अधिकच वाढत चालला होता. डॉक्टरांची टीम पूर्णपणे तिच्यासाठी धावपळ करत होती. आधी तर डॉक्टरांनी आपल्या ज्युनिअर डॉक्टर्सला स्वातीची डिलिव्हरी करायला सांगितली होती, पण कालीचं नाव ऐकल्यानंतर तर डॉक्टरने स्वतः तिची डिलिव्हरी करायला घेतली होती. स्वाती सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रसूती कळा सहन करत होती.

शेवटी बरोबर संध्याकाळी सात वाजता तिला कन्यारत्न प्राप्त झाली. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने स्वातीचा जीव शांत झाला. नर्सने बाळाला तिच्या छातीवर पालथं झोपवलं. तिने बाळाच्या पाठीवरून हात फिरवला, पण अचानक तिला चक्कर आल्यासारखी जाणवली. तिने तसं डॉक्टरांना सांगितलं तर त्यांनी बाळाला उचलून घेतलं आणि एका कपड्यात गुंडाळून बाजूला ठेवलं. एक नर्स डिलिव्हरी रूममधून बाहेर गेली, तर रॉकी आणि पिंट्या बातमी मिळण्याच्या आशेने पळतच त्या नर्सजवळ आले.

" काय झालं नर्स? " रॉकीने फक्त एवढंच विचारलं.

" अभिनंदन! मुलगी झाली आहे. " नर्सने हसून त्यांना सांगितलं, तशी त्या दोघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली.

" मी मामा झालो. " रॉकी पिंट्याला मिठी मारत मोठ्याने ओरडत म्हणाला.

" मी पण... " असं म्हणत पिंट्याने तर आनंदाने रॉकीला उचलूनच घेतलं होतं. नंतर नर्सने त्या दोघांना शांत राहायला सांगितलं.

" आमची दीदी ठीक तर आहे ना? " रॉकीने काळजीने स्वातीबद्दल विचारलं. सकाळी ती वेदनेने किती तडफडत होती हे त्याने पाहिलं होतं. आता तरी तिला बरं वाटत असेल म्हणून त्याने विचारलं.

" मॅडम एकदम ठीक आहेत. सकाळपासून जास्तच वेदना होत होत्या, त्यामुळे सध्या बेशुद्ध झाल्या आहेत. शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांची परवानगी घेऊन मी तुम्हाला मॅडमना भेटायला पाठवेन. " नर्सने त्यांना माहिती दिली आणि मग तिथून निघून गेली.

पिंट्याला तिथेच थांबवून रॉकी हॉस्पिटलच्या बाहेर गेला आणि त्याने कालीला फोन लावला. पहिल्या रिंगमध्येच कालीने त्याचा फोन उचलला.

" मुलगी झाली आहे दीदी. " रॉकीने कालीला सांगितलं. ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला.

" स्वाती ठीक तर आहे ना? " कालीने काळजीने विचारलं.

" हो, पण वेदनेने बेशुद्ध झाली आहे असं नर्सने सांगितलं. तिला शुद्ध आल्यावर आम्ही भेटायला जाऊ. " नर्सने सांगितलेली माहिती रॉकीने तिला सांगितली.

" तू नाही येणार दीदी बाळ पाहायला? " रॉकीने अचानक तिला हा प्रश्न विचारला, पण आता त्याला काय सांगावं हे तिला समजत नव्हतं.

कालीला अजून कोणीही पाहिलेलं नव्हतं. जेवढ्याही स्त्रिया तिच्या आश्रयाखाली होत्या, त्यामध्ये एकही केस स्वातीसारखी नव्हती. पहिल्यांदाच तिच्या जगामध्ये कोणी बाळाला जन्म दिला होता. आता या आनंदाच्या क्षणी आपण समोर जावं की नाही या विचारात ती पडली होती. विचार करून झाल्यावर ती पुढे बोलू लागली.

" काली अजूनपर्यंत कोणाच्या समोर आलेली नाही, आणि पुढे येण्याची देखील इच्छा नाही. स्वातीची आणि बाळाची काळजी घ्या. मी फोन ठेवते. " असं म्हणत कालीने लगेच फोन ठेवला.

इकडे तिच्या बोलण्याचा विचार करत रॉकी तिथेच काहीवेळ उभा राहिला. नंतर नर्सने बाहेर येऊन त्याला स्वातीला शुद्ध आली आहे, आणि डॉक्टरांनी त्यांना भेटायला परवानगी दिली आहे हे सांगितलं, तेव्हा तो आतमध्ये निघून गेला.


• वेळ: - रात्री १ वाजता. •


                    स्वातीला ज्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं होतं त्याचा दरवाजा अलगद उघडला गेला आणि एक व्यक्ती आतमध्ये आली. रूममध्ये काहीसा अंधारच होता. स्वाती पलंगावर आणि बाळ तिच्या शेजारी शांत झोपलेलं होतं. ती व्यक्ती बाळाजवळ गेली आणि अलगद बाळाला आपल्या हातांवर उचलून घेतलं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः काली होती, तशाच आपल्या काळ्या पेहरावात आणि आपला चेहरा झाकूनच आली होती.

" किती गोड आहेस गं बाळा! नजर काढावीशी वाटते तुझी. मी येणार नव्हते इथे, पण पहिल्यांदाच या कालीच्या जगात छोटी परी जन्माला आली आहे, म्हणून रहावलं गेलं नाही. " काली अगदी हळू आवाजात त्या बाळाला आपल्या हातांवर घेऊन तिच्याशी बोलत होती. स्वातीला झोप लागलेली होती.

" तुला माहित आहे, आज कालीचा या जगात शेवटचा दिवस आहे. मी माझ्या आईला तिच्या मरणाअगोदर वचन दिलं होतं, की मी तिच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी हे गुन्हेगारी जग सोडेन. आज माझ्या आईला जाऊन एक वर्ष झालं आहे आणि तुझ्यासारख्या गोड परीचा जन्म झाला. " काली डोळ्यांमध्ये अश्रू आणत म्हणाली.

" आजपासून ही काली जगातून नाहीशी होणार आहे, पण ही काली कशी होती याच्या कथा तुला बरेच जण सांगतील. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जेव्हा तू मोठी होशील आणि तुला आजूबाजूला काही वाईट घडताना दिसत असेल, तेव्हा मात्र कालीचं रूप घ्यायला कचरायचं नाही. अन्याय सहन करायचा नाही आणि आपल्या डोळ्यांसमोर कोणावर अन्याय होताना दिसत असेल तर ते पाहत बसायचं नाही. अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आणि जिंकून दाखवायचं. तुझ्या आईसारख्याच कितीतरी मुली मी मागे सोडून चालली आहे, पण माझाही नाईलाज आहे. आईला दिलेलं वचन मला पूर्ण करावंच लागेल. तुला मात्र घडायचं आहे. इतरांना घडवायचं आहे. तू मुलगी आहेस म्हणून कमजोर पडायचं नाही. मजबूत उभी राहून पुढे चालत राहायचं. तुझी आई बघ, किती स्ट्रॉंग झाली आहे. तसंच तुलाही व्हायचं आहे. आलेल्या अनुभवातून तुझी आई तुला नक्की घडवेल, याची मला खात्री आहे. चल, जरा जास्तच बोलत बसले मी. आता मला निघायला हवं. " काली हळव्या स्वरात तिच्याशी बोलत होती.

शेवटचं वाक्य बोलून तिने बाळाच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला पुन्हा व्यवस्थित स्वाती शेजारी झोपवलं. नंतर ती तिथून निघून गेली आणि इकडे स्वातीने आपले डोळे उघडले. जेव्हा काली हळू आवाजात बाळाशी बोलायला लागली होती तेव्हाच तिला जाग आलेली होती, पण मुद्दाम ती काय बोलत आहे ते निपचित पडून ऐकत होती.

" माझ्या मुलीला मी नक्कीच घडवेन दीदी. अगदी तुझ्यासारखीच नाही, पण तुझी छबी तिच्यात दिसेल अशी नक्कीच उभी करेन मी तिला. " स्वाती काली निघून गेली त्या दिशेला पाहत रडत स्वतःशीच म्हणाली.

डोळे बंद असल्यामुळे तिला कालीला पाहता आलं नव्हतं, पण आपल्या बाळाला ती जो आशिर्वाद देऊन गेली, ते ऐकून तिनेही स्वतःशीच शपथ घेतली होती. आपल्या मुलीला कालीसारखंच घडवायचं, असा तिने निश्चय केला होता.

काली आता कायमची निघून गेली होती. तिने रेप, मर्डर, असे भयंकर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कायमचं संपवलं होतं. सर्वसामान्य लोकांना तिचा एक आधार होता. शिवाय, तिने रमेशचं काय केलं? तो जिवंत आहे की नाही? हे कोणालाही समजलं नव्हतं, आणि जर जिवंत नसेल तर त्याचा मृतदेह देखील सापडला नव्हता. एकाच दिवसात तो कायमचा गायब झाला होता.

काली नेमकी कोण होती? कशी दिसत होती? तिचं मूळ नाव काय होतं? हे प्रश्न शेवटपर्यंत फक्त प्रश्न बनून राहिले होते, पण कित्येक स्त्री असो की पुरुष यांच्यासाठी एक प्रेरणा बनली होती. अगदी कमी वयात तिने जे काही केलं होतं, ते सर्वांसाठी प्रेरणादायक होतं. शेवटी ' काली - एक रहस्य ' च बनून राहिली होती.


समाप्त!


©® unknown words "जानकी"

🎭 Series Post

View all