काली - एक रहस्य! ( भाग २ )

काली - एक रहस्य! कोणीही न पाहिलेलं, पण समोर न येताही मदत करणारी होती. वाचा unknown words "जानकी" लिखित कथा.
                   रॉकी त्या मुलीला घेऊन इच्छित स्थळी पोहोचला होता. बाकीची त्याची मित्रमंडळी तिचं सामान गाडीतून खाली उतरवत होती, तर तो त्या मुलीला घेऊन एका खोलीच्या दिशेने गेला. दोघेही दरवाजासमोर थांबले आणि तो दरवाजा उघडू लागला. ती फक्त आजूबाजूचं निरीक्षण करत होती. रात्र असल्याने तिथे अंधार होता आणि दारासमोर एक छोटा बल्ब लावलेला होता. त्या उजेडात जवळचं दिसत होतं, पण लांबचं काही दिसत नव्हतं. आजूबाजूला काही जास्त घरेही दिसत नव्हती. एकदम सुनसान वातावरण होतं ते. त्यात या मुलांसोबत ती एकटीच मुलगी होती, म्हणून तिला काहीशी भीती वाटायला लागली होती. तो तिला बहीण म्हणत होता, पण तरीही तिला पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता.

रॉकीने दरवाजा उघडला आणि नंतर तिच्याकडे पाहिलं. ती घाबरून कधी आजूबाजूला, तर कधी त्याच्याकडे पाहत होती. बहुतेक तिच्या मनाची ती भीती त्याने ओळखली असावी. तो हसून तिच्याकडे पाहू लागला.

" एवढी घाबरू नको गं सिस्टर. आम्ही तुला काहीच करणार नाही. ही बघ, ही एक छोटी रूम आहे. यात तू आरामशीर राहू शकतेस. आता आतमध्ये जा. कालीला तुझ्याशी बोलायचं आहे. " रॉकी तिच्या मनातली भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करत हसून म्हणाला. तिने त्याच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवली होती.

" आत काली आहे का? " तिने घाबरतच त्याला विचारलं, कारण काली किती क्रूर आहे हे तीही ऐकून होती.

आजपर्यंत कालीला कोणीही पाहू शकलं नव्हतं. गुन्हेगारांसमोरही तिचा चेहरा उघडा होत नव्हता, पण तिचं नाव मात्र सर्वश्रुत आहे.

" नाही गं सिस्टर. काली कधी कोणाच्या समोर येत नाही. अजून आम्हालाही माहित नाही ती कशी दिसते. फक्त ती खऱ्याची बाजू असलेल्या व्यक्तीसाठी लढते एवढं माहित आहे. मग तो पुरुष असो की स्त्री, ती सर्वांसाठी समानच न्याय देते. जर पुरुष योग्य असेल तर पुरुषांसाठी लढते, आणि स्त्री योग्य असेल तर स्त्रियांसाठी लढते. प्रत्येक गोष्टींची शहानिशा करूनच ती न्याय देते. तू निर्दोष आहेस, त्यामुळे न घाबरता आत जा. तिच्याशी बोलून तुला खरंच खूप छान वाटेल. " रॉकी तिच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाला.

रॉकीने रूमचा दरवाजा उघडला, तशी ती आत पाहू लागली. आतमध्येही जास्त उजेड नव्हता. रूममध्ये असलेल्या त्या लाल डीम उजेडाकडे पाहून तिने एक आवंढा गिळला. पुन्हा तिने रॉकीकडे पाहिलं, तर त्याने डोळ्यांनीच तिला धीर दिला आणि आत जायला सांगितलं. हळूहळू चालत ती आतमध्ये गेली. पुढे गेल्यानंतर मागून रॉकीने दरवाजा लावून घेतला. ती त्या अंधुक लाल उजेडात रूम निरखत होती.

" ये सखी. " त्या बंद खोलीमध्ये आणि अंधुकश्या उजेडामध्ये अचानक एक आवाज घुमला. त्या आवाजाने ती मुलगी दचकली आणि घाबरून इकडे तिकडे पाहू लागली, पण नक्कीच तो आवाज कालीचा असणार हे तिला समजलं होतं.

" घाबरू नकोस सखी, मी काली आहे. समोर मधोमध एक खुर्ची ठेवलेली आहे. त्यावर बस. " कालीने तिला समोर असलेल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तीही वेळ न दवडता त्या खुर्चीवर जाऊन बसली आणि पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली. तिला आवाज येत होता, पण समोर कोणी दिसत नव्हतं.

" काय तुझं नाव? " कालीने तिला विचारलं. तसं तर कालीला तिचं नाव आधीच माहित होतं, पण तरीही तिला बोलतं करण्यासाठी तिने नाव विचारलं होतं.

" स... स्व्... स्वाती... स्वाती... " तिने घाबरून अडखळत आपलं नाव सांगितलं, त्यावर काली किंचित हसली.

" खूप गोड नाव आहे. आणि हे काय? तू एवढी घाबरली का आहेस? " कालीने तिच्याशी नॉर्मल बोलणं सुरू ठेवलं होतं.

तिच्या मनातून असणारी भीती काढण्याचा तो एक छोटासा प्रयत्न होता. त्यानंतर ती मेन मुद्द्यावर बोलणार होती. कालीने विचारलेल्या प्रश्नावर तिच्या तोंडून उत्तर निघत नव्हतं.

" हे बघ, तुला एवढी घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. माझ्याशी जेवढी मोकळी बोलशील तेवढं चांगलं राहील. आता मला सांग, तुझ्यासोबत नेमकं काय झालं होतं? नक्कीच तू माझ्यापेक्षा लहान आहेस. मला तुझी मोठी बहीण समजून सांगू शकतेस. " कालीने तिच्यासोबत काय घडलं होतं ते माहित असूनही पुन्हा विचारलं, जणू काही तिला तिच्या तोंडून ऐकायचं होतं. कालीने तिला आपल्या बोलण्यातून बरंच रिलॅक्स केलं होतं. तिने धीर एकटवून तिला सांगायला सुरुवात केली.

" वर्षभरापूर्वी माझी एका रमेश नावाच्या मुलासोबत ओळख झाली होती. हळूहळू आमची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही एकमेकांना स्वीकारलं होतं. प्रेमाच्या वचनांची देवाण घेवाण झाली होती. सात महिन्यांपूर्वी एकमेकांसाठी आम्ही दोघेही परफेक्ट आहोत हे समजल्यानंतर आम्ही शारीरिकरित्याही एकमेकांच्या जवळ आलो होतो. सर्वकाही छान सुरू होतं. मला आईवडील नव्हते, पण त्याने त्याच्या आईवडिलांना माझ्याबद्दल सांगण्याचं वचन दिलं होतं. माहित नाही त्याने सांगितलं होतं की नाही. त्यानंतर अचानक मला समजलं की मी आई होणार आहे. ती गोष्ट मी अगदी आनंदाने त्याला कळवली. याच आशेवर की तो खुश होईल आणि आता आमचं लग्न होईल, पण क्षणाचाही विलंब न करता त्याने मला झिडकारून लावलं. ' तुझा आणि माझा काहीच संबंध नाही ' , असं त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हापासून ते आजपर्यंत मी अशीच विना सहाऱ्याची जगत होते. " स्वातीने तिच्या आयुष्यात काय घडलं हे सगळं कालीला सांगितलं. एवढ्या वेळामध्ये काली एक शब्दही बोलली नव्हती. शांतपणे तिचं ऐकून घेऊन मग ती पुढे बोलणार होती.

" ज्या ज्या लोकांना माझ्या गरोदरपणाचं सत्य समजलं होतं, त्या त्या लोकांनी टोमणे मारायला आणि आपल्यातून वेगळं करायला सुरुवात केली होती. आज तर मला घरातूनच हाकलून लावलं. " स्वाती एवढं बोलली आणि मग रडू लागली.

" तुला विश्वास होता त्या मुलावर, की तो तुझी साथ कधीच सोडणार नाही? " कालीने मऊ आवाजात तिला विचारलं. तिच्या रडण्याने तिच्यावर किती मोठं संकट आलं आणि तिने या काही महिन्यांत काय काय सोसलं हे तिला स्पष्ट जाणवत होतं.

" खूप विश्वास होता दीदी. तोही इतका चांगला वागत होता की पुढे असं काही करेल असं वाटतच नव्हतं. त्याच्यावर विश्वास होता म्हणूनच मी आमचं नातं पुढे न्यायला होकार दिला होता. " स्वातीने पुन्हा रडतच सांगितलं.

" तू काही काळजी करू नकोस. तुला लवकरच न्याय मिळेल. " काली तिला विश्वास देत म्हणाली, तसे स्वातीने लगेच आपले हात जोडले.

" तू आता आराम कर. स्वतःच्या बाळाची आणि स्वतःची काळजी घेणं सुरू ठेव. बाकीची सर्व चिंता माझ्यावर सोडून दे. " काली अगदी प्रेमाने तिला म्हणाली, तशी स्वातीने होकारार्थी मान हलवली.

" हो दीदी, थँक्यू सो मच! " स्वाती तिचे आभार मानत म्हणाली आणि तिथून उठून मागे असलेल्या बेडवर जाऊन पडली.

त्याच खोलीत राहायचं होतं आता तिला इथून पुढे. आपल्या मनातलं सगळं कालीसमोर मांडल्यामुळे तिला जरा हलकं वाटत होतं. तिला अगदी दहाच मिनिटांत झोप लागली होती.


स्वातीशी बोलून झाल्यानंतर कालीने लगेच रॉकीला फोन लावला. तो सध्या त्याच्या मित्रांसोबत मिळून स्वातीचं सामान मेन जागेवर पोहोचवत होता. फोनवर प्रायव्हेट नंबर पाहून रॉकीने लगेच फोन उचलला.

" हॅलो रॉकी, उद्याच्या उद्या स्वातीचा गुन्हेगार मला माझ्यासमोर हजर हवा. " काली किंचित रागाने म्हणाली.

" ओके दीदी, सकाळीच तो इथे हजर असेल. " रॉकी म्हणाला, तसा तिकडून फोन कट झाला.


रॉकीही मग फोन कट झाल्यावर आपल्या कामाला लागला. उद्या सकाळी कोणता तांडव होईल? रमेशला कोणती शिक्षा मिळेल? ते आता वेळच सांगणार होती.



क्रमशः



🎭 Series Post

View all