कबूली #मखमली कवडसा (जलद लेखन)
कबूली - लघुकथा (भाग-२)
निशांतने पटकन गौरांग ला बोलावून घेतलं.
काय ते सगळं त्याला माहित होतं. निशांतचा सगळ्यात जवळचा मित्र होता ना! काल पासूनच्या सगळ्या घटना सांगितल्या अन जीवाची होणारी घालमेल व्यक्त करत होता.
"निश्या मला माहित आहे रे हे सगळं. . मागच्यावर्षी मंजूला पटवताना हेच सगळं टेंशन होतं ना गड्या मला! पण तू तर माझी खेचत होता ना . . मग आता पहा ?"
"गौर्या प्लीज ना रे. .. बस स्टॉपवर चल ना रे सोबत!
"आयला वेडा का बे ? मी कशाला दोघांत अडचण?"
"गौर्या, अडचण काय रे? अजून कशातच काही नाही ना !. . . तू असला तर हिंमत राहिल मला. . "
" हो ना निश्या . . ते पण हायच!. चल मग. . पण तिकडं काही अडचण वाटली माझी तर इशारा करायचा. . मी जाईन निघून !"
" डन!"
कॉलेजच्या बाहेरच्या बस स्टॉपवर दोघे उभे होते. ती आली नव्हती. स्टॉपवर जास्त गर्दी नव्हती. २-४ स्त्री पुरुष असतील.
निशांतची बेचैनी वाढत होती.
"गौरांग . . बस्स हे शेवटचं वर्ष. . महिन्याभरात मला कॅम्पस मधे जॉब मिळेल. नाहीच वाटला समाधान कारक तर पप्पाची फॅक्टरी आहेच ना. . मग तिला काय अडचण आहे?"
" मला माहित आहे रे सगळं. . पण तिला व तिच्या कुटुंबियांना पटलं पाहिजे ना!"
" हो ना रे किती साधी सरळ आहे ती. . . तिच्या मनाचा अंदाज बांधता येत नाहिय मला. . खूप नर्व्हस वाटतंय! जुईसोबत संपूर्ण भारत भ्रमण करायचय मला . . .होईल का रे गौर्या?"
गौरांगने त्याच्या पाठीवर हात टाकला व म्हणाला , "अरे निशांत, तुला लहानपणापासून ओळखतो ना मी! तुझं नियोजन किती भारी असतं , मला माहित आहे ना! आयुष्य सगळं कसं प्लॅन्ड आहे. . बस्स एवढं सुरळीत झालं की झालं!"
"हो रे अगदी बरोबर!"
२० मिनिटे तो गौरव जवळ बोलत राहिला अन क्षणोक्षणी तिची वाट पहात राहिला. . पण ती आली नाही.
"निशांत, तिला तुझ्या या हळवेपणाची किंमत नाही बहुतेक! ती आली नाही. कितीवेळची आपण दोघेच बोलत थांबलोय. . चल कॉलेजात जाऊया !"
"नाही गौर्या. . ती खूप पंक्चुअल आहे, असं प्रथमच घडतंय. ती यायला हवी होती खरंतर . . पण असेल काही अडचण! पण नकार तर नसेल ना रे. . ?"
" मला तर काही कळत नाहीत यार. . पण तू खचून जाऊ नकोस. . !"
" एक्सक्युज मी!"स्टॉपवर उभ्या असलेल्या काकू बोलल्या.
"हो काकू, बोला-"
"तुम्ही इथे कोणाची वाट पाहताय का?" त्या महिलेने प्रश्नार्थक पहात विचारले की कोणाची वाट?
गौरांग पटकन निशांतच्या कानात कुजबुजला "आता यांना काय करायचंय ? इतक्या वेळचं आपलं बोलणं ऐकतायत वाटतं!"
"बापरे. . . खरच रे ! पण आमच्या आईची मैत्रिण असू नये म्हणजे मिळवली. . . "
"मी काय विचारलं बाळांनो . . तुम्ही कुणाची वाट पाहताय का?"
" जाऊ द्या ना काकू ते आमचं पर्सनल आहे. . तुम्हाला कशाला. . ?" गौरांग कसाबसा बोलला.
"तुमचं पर्सनल आहे ते कळतंय पण तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून . . मी माझी बसपण सोडली. मग कॉफी घेवू शकतो ना समोर?"
आता मात्र निशांतला काहीच समजेना. हो म्हणावे की नाही? ती आली असती तर समोरच्या कॉफी हाऊस मधे तिला सोबत नेण्याचा प्लॅन होता. . पण हे काय आता काकूंसोबत कॉफी घ्यावी लगणार!
पण अंतर्मन मात्र काहिच नकारात्मक सांगत नव्हतं त्यामुळे चला चान्स घेवूयात असं वाटलं.
गौरांग मात्र पूर्णच हबकला.
निशांतला बाजूला नेवून तो बोलला-
"अरे निशा, कॉफी विथ जुई हा प्रोग्राम होता ना तुझा? आता काय कॉफी विथ काकू ?. . अौर कॉफी के साथ दस सवाल! जवाब दे तू. . . . अन घरी गेल्यावर फटके!"
"नाही रे असं काही! जस्ट कॉफी घेवूयात ना. . तसं वाटलं तर आपण केव्हाही उठून जावू शकयो ना !"
"असं म्हणतोस का . . ओके चल मग!"
" काय झालं मुलांनो. . ?" काकू निघण्याच्या तयारीत होत्या.
"चला काकू!"
तिघेजण कॉफी हाऊस मधे गेले.
काकूंनीच तिघांसाठी कॉफी ऑर्डर केली. ते सांगण्या अगोदर त्यांनी दोघांना नाश्ता किंवा स्नॅक्स घेणार का असं विचारलं होतं.
क्रमशः
©® स्वाती बालूरकर, सखी
पुनः प्रकाशन - ७ .१२ .२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा