विषय :- कन्फेशन
शीर्षक : कबुली..
शीर्षक : कबुली..
“काय विचारतेय मी ओंकार? असा गप्प राहू नकोस. कवितेच्या त्या ओळी तुझ्याच आहेत ना?”
अदितीचा संताप शिगेला पोहचला होता. फोनवर ती त्याला प्रश्न विचारत होती.
“अगदीच तसं नाही. म्हणजे ते.. तिच्यासाठी असं..”
ओंकार अडखळत म्हणाला तसं ती पुन्हा चिडून म्हणाली,
“असा चाचपडत का बोलतोयस? खरं बोल माझ्याशी.. माझ्यापासून तू काही लपवत तर नाहीस ना?”
कोणीच काही बोललं नाही. क्षणभर शांतता पसरली.
“मी काय विचारतेय ओंकार?”
अदितीने पुन्हा प्रश्न केला.
“हो.. म्हणजे.. हो.. त्या ओळी माझ्याच आहेत.”
तो बोलताना अडखळला.
“म्हणजे तिने सांगितलेलं खरं आहे? त्या ओळी तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी लिहल्यात. म्हणजे तो बॉयफ्रेंड तू आहेस?”
क्षणभर स्मशान शांतता पसरली. पलीकडून ओंकार काहीच बोलत नव्हता.
“अरे काय विचारतेय मी? तू तोच आहेस का? त्या ओळी तुझ्याच आहेत का?”
“हो.. ”
“काय? काय म्हणालास? कम अगेन..”
“होय.. त्या ओळी माझ्याच आहेत. मी हे सगळं तुला सांगणारच होतो पण त्याआधीच तुला हे सगळं समजलं.”
अदितीच्या डोळ्यात पाणी साठू लागलं. साऱ्या देहाला असंख्य विषारी नागांनी डंख मारावा आणि मरणप्राय यातना व्हाव्यात असं तिला क्षणभर वाटून गेलं. अचानक डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. हातपाय थरथर कापू लागले. तिने रागाने मोबाईल बेडवर फेकून दिला आणि मटकन खाली बसली.
“काय ऐकलं मी? ओंकार काय म्हणाला? नाही. नाही.. असं असूच शकत नाही. तो असं करणं शक्यच नाही. तो माझ्याशी खोटं बोलतोय.. मुद्दाम माझी मस्करी करत असेल. असं कसं असेल? त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. खोटं आहे हे सगळं.. साफ खोटं.”
अदिती जणू स्वतःशीच भांडत होती. ओंकारच्या बोलण्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता; पण तेच सत्य होतं.
“पाच सहा वर्षाचं नातं.. इतकं तकलादू? का? काय चुकलं माझं?”
तिला प्रश्न पडला. सारा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला. पाच सहा वर्षापूर्वीच्या आठवणी तिच्या नजरेसमोर पिंगा घालू लागल्या.
“किती नितांत प्रेम करायचा तो माझ्यावर! स्वतःपेक्षा जास्त माझा विचार करायचा. अदिती.. अदितीचा जणू सारखा जप सुरू असायचा. मग आता काय झालं? काय झालं नेमकं? कुठे चुकलं?”
अदितीला रडू फुटलं. ओंकारचा निरागस चेहरा डोळ्यासमोर आला. त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचं रुसणं सारं सारं तिला आठवू लागलं. डोळे ओसंडून वाहू लागले. एका साहित्यसंमेलनात त्यांची झालेली ओळख.. दोघेही निस्सीम साहित्यप्रेमी.. दोघांच्या आवडीनिवडी जवळजवळ सारख्याच. मग ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. हळहळू मैत्री बहरू लागली. वृद्धिंगत होऊ लागली.
“किती बोललो,.. किती चर्चा.. मग विषय कोणताही असू देत.. किती भरभरून बोलायचो आपण! किती कविता लिहल्या त्याने! माझ्यासाठी.. माझ्या दिसण्यावर, माझ्या असण्यावर.. किती कविता! हिशोब मांडता येणार नाही. कितीतरी गोष्टी एकमेकांना शेअर केल्या होत्या. घरातल्या, बाहेरच्या.. मित्रमैत्रिणीच्या.. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, करियर, चित्रपट, नाटकं अनेक विषयावर बोललो आपण आणि कधी कधी तर उगीच अवांतर चर्चा.. रोज बोलायचो पण कंटाळा असा कधी आलाच नाही.. नवल वाटायचं मला रोज बोलायचो तरी रोज नवीन विषय कुठून मिळायचे देवच जाणो! पण तासंतास बोलायचो.. न कंटाळता.. न दमता..”
जुन्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लेकर उमटली. ओंकार आणि अदितीची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत होती. मग याच मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे दोघांनाही समजलं नाही. दोघांनी एकमेकांजवळ आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती.
सारं काही सुरळीत सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लवकरच त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या घरी सांगून लग्नही करणार होते. दोघेही प्रचंड आनंदात होते. पण हल्ली ओंकार फारच चिडचिड करू लागला होता. त्याचं अदितीप्रती असलेलं वागणं बदलत चाललं होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांत सारखेच खटके उडू लागले होते. सुरवातीला तिला वाटलं,
“कामाचा व्याप वाढला असेल म्हणून चिडचिड होत असेल. आईबाबा, नातेवाईकांशी असलेला वाद त्यामुळे कधीतरी राग येणारच नं.. आपणच समजून घेतलं पाहिजे. त्याला आपण थोडा वेळ देऊ.. वातावरण निवळलं तर शांतपणे बोलता येईल. आता सारखा कॉल करायला नको. आपण त्याला स्पेस द्यायला नको का?”
अदितीने विचार केला आणि ती ओंकारला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली.
“त्या दिवशी ते घडलं नसतं तर? मला काहीच कळलं नसतं? त्या ओळी मी वाचल्या नसत्या तर मला कधीच कळलं नसतं. किती ओळखत होते मी त्याला! त्याच्या नुसत्या दोन ओळीवरून ते त्यानेच लिहलंय हे आपण लगेच ओळखलं.. इतकं ओळखत होते मी त्याला? की अजिबातच ओळखत नव्हते?”
अदिती स्वतःशीच पुटपुटली. त्या ओळींनी सगळं सत्य समोर आणलं होतं. ती त्याच्या आयुष्यात आली आणि अखेर तिच्या सुखी आयुष्याला, एका प्रेमळ नात्याला तिलांजली मिळाली ती कायमचीच..
“काय झालं? कोणाची चूक? कोण बरोबर? हा प्रश्नच नव्हता. चूक झाली होती हेच खरंय.. अशी चूक ज्याला कधीच माफी नाही. ओंकार, का असं वागलास? काय चूक होती माझी? तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला ही? मी कधीच तुझ्यावर अविश्वास दाखवला नाही. डोळे बंद करून तुझ्यावर विश्वास ठेवला. कधी तू कुठे आहेस, कोणाशी बोलतोस, कोण मैत्रिणी कधीच विचारलं नाही. कुठेच तुला फॉलो केलं नाही. कोण तुला बोलतं, प्रतिक्रिया देतं ते पाहिलं नाही रे.. मग माझीच फसवणूक.. माझ्याशी प्रतारणा? का ओंकार?”
अदितीचं मन आक्रोश करत होतं. काय करावं तिला समजत नव्हतं. ओंकारने जे केलं ते स्वीकारायला मन तयार होत नव्हतं. रडून रडून तिला ग्लानी आली होती.
“किती जाब विचारला तरी समाधान होत नाहीये. आणि मला माहितीये आता परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. पुन्हा पुन्हा त्या घडून गेलेल्या घटना उगाळल्या तरी नवीन काहीच निष्पन्न होणार नाही. तर का हा प्रश्नप्रपंच? का जीवाची इतकी तगमग? कशासाठी इतकी खटाटोप?”
तिची रोज चिडचिड होत होती. ओंकारशी असलेलं नातं आत पार तुटलं होतं. ती अगदी मुळासकट उन्मळून पडली होती. आणि एक दिवस ओंकारचा कॉल आला. अदितीने कॉल घेतला. हॅलो म्हणताच ओंकारने बोलायला सुरुवात केली.
“आदू, कशी आहेस?”
“काय उत्तर अपेक्षित आहे तुला?”
तिच्या कोरड्या स्वरानी तो वरमला. क्षणभर थांबून त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“आदू, मला माहितीये, तू प्रचंड दुखावली गेलीयेस.. मी तुला क्षमा मागावी इतकीही जागा मी तुझ्या मनात शिल्लक ठेवलेली नाही.”
अदितीला त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागलं. मनातला राग अंगार बनून डोळयांतून बरसू लागला. रागाने ती कॉल कट करणार इतक्यात ओंकार घाईने म्हणाला,
“थांब आदू.. प्लिज कॉल कट करू नकोस.. फक्त एकवेळ माझं ऐकून घे. त्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे.. माझं काहीही म्हणणं नाही. यानंतर आपण कधीही पुन्हा बोलू की नाही माहित नाही. प्लिज आदू.. फक्त एकदाच.. मी काय म्हणतोय ते ऐकून घे..”
“हं.. ठीक आहे बोल.. अजून काही बोलायचं, करायचं, मला दुःख द्यायचं बाकी राहिलं असेल तर तेही करून घे. मी काहीच बोलणार नाही कारण यानंतर काय घडणार आहे तुला चांगलंच माहितीये.”
“हो.. मला माहित आहे.. आणि त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही किंबहुना काही बोलण्याचा मला अधिकारच नाही. पण आदू, आज मला मनापासून तुझ्याजवळ कन्फेस करायचंय. मी केलेल्या अक्षम्य चुकीची कबुली द्यायचीय. मी चुकलो.. खरंच खूप चुकलो.. मोहाचा क्षण मला आवरता आला नाही. कसा वाहवत गेलो, कळलंच नाही. आदू, त्या दिवसापासून आजपर्यंत त्या पश्चातापाच्या आगीत मी होरपळून निघतोय. काय करावं समजत नाहीये. एका उध्वस्त करून गेलेल्या क्षणाचं ओझं सांभाळतांना एवढी दगदग होतेय नं.. सहन होत नाही आणि सांगता येत नाही.. इतका भार झालाय की, तो ताण आता सांभाळताही येत नाहीये. की कोणाला मनातलं वाटताही येत नाही. पसारा पसारा होतो सगळा.. कुणीतरी आपलेच चिटोरे करून टाकले आहेत आणि ते सगळीकडे विखुरले आहेत असं वाटतंय. स्वतःचं आयुष्य सांभाळता न आलेली माणसे आपलं आयुष्य विस्कटून टाकतात तेव्हा नक्की दोष कुणाला द्यायचा? समोरच्याला की आपल्या हाताने आपण विस्कटून टाकत राहीलो म्हणून स्वतःलाच? समोरच्याला सांभाळण्याच्या नादात म्हणून स्वतःलाच हे कळतही नाही आणि आता कळूनही त्याचा उपयोग शुन्यच. एखाद्यावर खापर फोडायला तरी माणसावर हक्क हवाच असतो. नसला तरी नजरेच्या टप्पात किमान ते माणूस राग व्यक्त करायला शाबूत तरी हवं असतं.
आदू, मी चुकलोय आणि त्याचं खापर खरंच मला कोणाच्या माथी फोडायचं नाहीये. मुळात मी मोहाचा तो एक क्षण आवरू शकलो असतो तर कदाचित हे घडलंच नसतं. सगळ्या गोष्टी अंधारात राहिल्या नसत्या तर हे पाऊल उचललंच गेलं नसतं. पण मी कोणालाच दोष देणार नाही कारण मी चुकलोय हेच सत्य आहे. आणि आता मी माझी विश्वासहर्ताही गमावून बसलोय त्यामुळे तुला माफी मागण्याचाही अधिकार मी गमावून बसलोय. खरंतर या चुकीचं शल्य आयुष्यभर कायम माझ्या मनात सलत राहील. माझ्या कबुली दिल्याने फार फरक पडणार नाही हे मला चांगलंच माहित आहे म्हणून आता मला नाही काही बोलायचं. तुझा कोणताही निर्णय मला स्वीकार आहे. अदिती, जमल्यास मला माफ कर.. गुडबाय आदू.. आय लव्ह यू.. लव्ह यू सो मच.. ”
पलीकडून कॉल कट झाला होता. ओंकारने अदितीच्या उत्तराची वाट न पाहता कॉल कट केला होता. कदाचित त्याला तिचं उत्तर माहीत असावं. अदितीचे डोळे मात्र झरत होते.
“नाही ओंकार.. मोहाचा क्षण आवरता आला नाही म्हणजे? तुझं माझ्यावर नितांत प्रेम होतं ना? मग का गेलास? का माती खाल्लीस? असाच मोहाचा क्षण मला आवरता आला नसता तर मला माफ केलं असतंस? स्वीकारलं असतंस? नाही ना? तुझ्या कन्फेस करण्याने तुझी चूक माफ होत नाही. पुसून टाकता येत नाही. असं म्हणतात की, आपल्याला आपला माणूस हवा असेल तर माफ करावं. नातं महत्वाचं असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं; पण ओंकार प्रतारणेला माफी नाही.. काही चुकांना खरंच माफी नसते. स्वाभिमान बाजूला ठेवून माफही केलं असतं पण तू माझ्या प्रेमाचा अपमान केलायस. त्या अपमानाला मुळीच माफी नाही.”
आता विचारांचं वादळ शमलं होतं. उध्वस्त झालेल्या आयुष्याला सावरण्यापलीकडे तिच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. डोळयांतून वाहणारे आसवं तिने खांद्यावरच्या ओढणीने टिपून घेतली आणि आता माघार नाही. पुन्हा परतणे नाही अशी मनाशी एक खूणगाठ बांधून ती उभी राहिली. एका नवीन दिशेने तिचा प्रवास सुरू झाला होता.. पुन्हा एकदा..