Login

काचघर भाग २

काचघर भाग २
जलद कथालेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

काचघर भाग २

"साहिल, हे काय आहे ? याला तू क्रिएटिव्ह कोड म्हणतोस ? हे तर अगदी प्राथमिक स्तरावरचं काम आहे. मला वाटलं होतं तुझा अनुभव काहीतरी कामाला येईल, पण तू तर आता सुमार दर्जाचं काम करायला लागलायस ! "

तुषारने भरल्या ऑफिसमध्ये, साहिलच्या डेस्कपाशी उभं राहून ओरडत फाईल टेबलावर फेकली. आजूबाजूचे सहकारी माना खाली घालून आपापल्या लॅपटॉपमध्ये बघू लागले. साहिलला जाणवलं की, हे ओरडणं कामासाठी नव्हतं, तर त्याला मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी होतं.
साहिल शांतपणे म्हणाला,
" तुषार, क्लायंटच्या रिक्विझिट्स प्रमाणे हे डिझाइन एकदम परफेक्ट आहे. तुला हवं तर मी लॉजिक पुन्हा समजावून सांगू शकतो."

" मला शिकवू नकोस ! आता मी तुझा रिपोर्टिंग मॅनेजर आहे. उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत हे पूर्ण रि-डिझाइन करून माझ्या डेस्कवर हवंय. नाहीतर विसरून जा की तुला या कंपनीत काही भविष्य आहे," तुषार विजयाच्या आविर्भावात तिथून निघून गेला.

साहिलच्या हाताची मुठ आवळली गेली. त्याला ऑफिसच्या भिंती आता अंगावर आल्या सारख्या वाटू लागल्या. पुण्याच्या त्या हाय-टेक एसी केबिन मध्येही त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यालाच कॉर्पोरेट भाषेत गॅस लाइटिंग म्हणतात, हे त्याला उमजत होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता.

रात्रीचे साडेदहा वाजले होते. बाणेरच्या ऑफिसमधून बाहेर पडताना साहिलचं डोकं ठणकत होतं. त्याने लॅपटॉप बॅग खांद्याला अडकवली आणि पार्किंगच्या दिशेने चालू लागला. वाटेत त्याला आरशात स्वतःचा चेहरा दिसला. डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावरचा तो नेहमीचा उत्साह हरवला होता.

घरी पोहोचल्यावर घराचं वातावरण प्रसन्न होतं, पण साहिलच्या मनात मात्र अंधार होता. शुभ्रा झोपली होती. कृत्तिका त्याची वाट पाहत जेवणाचं ताट वाढून बसली होती.

" पुन्हा उशीर ? आणि चेहरा असा का झालाय ? खूप त्रास दिला का आज त्याने ? " कृत्तिकाने काळजीने विचारलं. साहिलने लॅपटॉप बॅग कोपऱ्यात फेकली.

"तो माणूस मला काम करू देत नाहीये कृत्तिका. तो प्रत्येक गोष्टीत अडथळे आणतोय. त्याला हवंय की मी चिडून नोकरी सोडावी, म्हणजे माझं सगळं श्रेय तो आरामात लाटेल.
माझ्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात. मला झोप येत नाही, भूक लागत नाही. असं वाटतंय की मी एका काचघरात अडकलोय, जिथून बाहेर पडायचा कोणताही रस्ता नाहीये."

" साहिल, शांत व्हा. तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचं मानसिक आरोग्य का खराब करून घेताय? आपण दुसरी नोकरी शोधूया ना ? " कृत्तिकाने त्याचा हात हातात घेतलं.

" दुसरी नोकरी ? आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे ? आणि या वयात, या हुद्द्यावर दुसरीकडे जाताना पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची ? माझ्याकडे पर्याय नाहीये कृत्तिका, मला हे सहन करावंच लागेल," साहिलचा आवाज हतबलतेने थरथरत होता.

त्या रात्री साहिलला दोन वाजेपर्यंत झोप लागली नाही. जेव्हा केव्हा तो डोळे मिटायचा, त्याला तुषारचा तो हसणारा चेहरा आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या नजरा आठवायच्या. त्याला जाणवलं की त्याची क्रिएटिव्हिटी आता मरू लागली आहे.

ज्या कोडमध्ये तो पूर्वी कविता शोधायचा, तोच कोड आता त्याला एखादं ओझं वाटू लागला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ्राने त्याला उठवलं.

" बाबा, उठा ना! आज माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची होती ना बॅडमिंटनची ? "

साहिलने अर्धवट डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं.
" सॉरी बाळा, बाबाला आज ऑफिसला लवकर जायचंय. खूप काम आहे."

शुभ्राचा चेहरा पडला. तिने हळूच कृत्तिकाकडे पाहिलं. साहिल उठून तयार होऊ लागला, पण त्याचे हात थरथरत होते. त्याला ऑफिसला जाण्याची प्रचंड भीती वाटत होती. पाय जणू साखळदंडाने बांधले गेले होते.
ऑफिसला पोहोचल्यावर त्याला समजलं की, तुषारने साहिलच्या आधीच्या सर्व चांगल्या कामांचे क्रेडिट स्वतःच्या नावाने हेड ऑफिसला पाठवले आहे आणि साहिलच्या नावे परफॉर्मन्स वॉर्निंग काढण्याची तयारी सुरू केली आहे.

साहिलच्या मानसिक कोंडीचा हा कळस होता. आपली बुद्धिमत्ता, आपला अनुभव आणि आपला स्वाभिमान या तिन्हींचा लिलाव होताना पाहणं त्याला आता असह्य होऊ लागलं होतं.