कच्च्या केळाची खीर
साहित्य: ताजे कच्चे केळ आकारानुसार १-२, तूप २-३ टेबलस्पून, साखर अर्धी वाटी, दूध अर्धा लीटर, काजू, बदाम, केसर, विलायची पावडर अथवा दूध मसाला.
कृती : कच्ची केळी स्वच्छ धून पुसून घ्यायची. सोलनीने हलके साल काढून घेऊन जाड खिसनीने खिसून घ्यायचे. कढईत २ ते ३ टेबलस्पून तूप घालून गरम झाले की त्यात केळीचा खिस छान परतून घ्यायचा. गुलाबी रंग येईपर्यंत परतले की त्यात थोडे थोडे गरम दूध घालून पाच ते सात मिनीट मध्यम आचेवर शिजवायचे. अर्धी वाटी साखर घालून पुन्हा एक उकळी आली की उर्वरीत दूध मिश्रणात सोडायचे. साखर आवडीप्रमाणे कमी अधिक घातली तरी चालते. छोट्याशा पातेल्यात अगदी थोडे तूप घालून त्यावर काजू बदामचे तुकडे हलकेसे परतून घ्यायचे. खिरीत केसर, वेलची पावडर अथवा दूध मसाला घालून एक उकळी आल्यावर त्यात तळलेले काजू बदामचे तुकडे सोडायचे. कच्च्या केळीमुळे खीर लवकरच आळून येते आणि इतर कोणत्याही खिरीपेक्षा ही खीर झटपट बनते. कच्च्या केळीची ही खीर अगदी गरमागरम खायला छान चविष्ट लागते. उपवासाला नेहमी तेच ते पदार्थ खावून कंटाळा येतो. अशावेळी फराळाच्या ताटात ही खीर अगदी लज्जत आणते. कच्च्या केळीत भरपूर आयर्न आणि फायबर असते. त्यासोबत दूध, साजूक तूप आणि ड्रायफूटस् यामुळे हा आगळा वेगळा पदार्थ फारच पौष्टीक बनतो. पाहुण्यांना, लहानग्यांना ही खीर नक्की बनवून द्या आणि त्यांची वाह वा मिळवा.
©®तृप्ती काळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा