Login

काचघर भाग ३

काचघर भाग ३
जलद कथालेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
काचघर
भाग ३

" साहिल, या नवीन बँकिंग सिक्युरिटी मॉडेल मध्ये मला त्रुटी दिसतायत. मला वाटतंय तू मुद्दामहून हे प्रोजेक्ट डिले करतोयस जेणेकरून माझं नाव खराब व्हावं. तुझी ही क्रिएटीव्ह वृत्ती आता कंपनीसाठी घातक ठरतेय ! "

तुषारने मीटिंग रूममध्ये बसलेल्या पाच वरिष्ठ सदस्यां समोर साहिलवर हा आरोप केला. साहिल शांत होता, पण त्याच्या आत एक ज्वालामुखी धुमसत होता. साहिलने संथ स्वरात विचारले,

" तुषार, नेमकी कोणती त्रुटी तुला वाटतेय ? तांत्रिक भाषेत सांगशील का ? "

तुषार गोंधळला, कारण त्याला तांत्रिक गोष्टीं मधलं अ ही माहित नव्हतं. तो सावरून घेत म्हणाला,

" ते... ते युजर इंटर फेसचं लॉजिक ! ते खूप गुंतागुंतीचं आहे. क्लायंटला सोपं हवंय. तू उद्यापर्यंत हे पूर्णपणे बदलून मला दे, नाहीतर मी बॉसला सांगून तुला या प्रोजेक्ट मधून बाहेर काढायला लावतो ! "

साहिल काहीच बोलला नाही. त्याने आपले सामान भरले आणि तो बाहेर पडला. त्याला आता तुषारच्या ओरडण्यापेक्षा स्वतःच्या आतल्या शांततेची जास्त भीती वाटू लागली होती.

साहिल कंपनीच्या त्या चकाकत्या ऑफिसमधून बाहेर पडला, तेव्हा पुण्याचा पाऊस सुरू झाला होता. पाऊस अंगावर घेत तो पार्किंगमध्ये उभा राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. तुषारने ज्या मॉडेलला चुकीचे म्हटले होते, तेच या प्रोजेक्टचा आत्मा होते. पण तुषारला ते समजण्याची कुवतच नव्हती.

घरी पोहोचल्यावर साहिलने पाहिले की हॉलमध्ये शुभ्रा आणि कृत्तिका काहीतरी बनवत होत्या. शुभ्राने एक मोठे कार्डबोर्डचे घर बनवले होते.

" बाबा, बघा ! मी हे मॅजिक हाऊस बनवलंय. यात जे कोणी जातं, त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स गायब होतात. तुम्ही जाणार का यात ? " शुभ्राने निरागसपणे विचारले.
साहिलने तिला जवळ घेतले आणि त्याचे डोळे पाणावले.

" बाळा, बाबाला अशाच एका मॅजिक हाऊसची गरज आहे गं !b"
रात्री जेवण झाल्यावर कृत्तिकाने साहिलला बाल्कनीमध्ये नेले.

" साहिल, आता अति होतंय. आज तुम्ही जेवलात सुद्धा नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले आहे. काय चालले आहे ऑफिसमध्ये ? " साहिलने तिला सर्व सांगितले.

" कृत्तिका, तुषार आता माझ्या कामावर प्रश्नचिन्ह उभे करतोय. तो अपात्र आहे हे अख्ख्या टीमला माहिती आहे, पण बॉसला फक्त त्याचे गोड बोलणे ऐकायचे आहे. मला भीती वाटतेय की माझी इतकी वर्षांची मेहनत तो एका मिनिटात मातीत मिळवेल."
कृत्तिका शांतपणे म्हणाली,

" साहिल, एक गोष्ट लक्षात ठेवा. सोन्याला कितीही चिखलात टाकलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. तुषार फक्त पद मिळवू शकतो, तुमचे ज्ञान नाही. जर ते ऑफिस तुम्हाला तुमची किंमत विसरायला लावत असेल, तर ते ऑफिस तुमच्या लायकीचे नाही."
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक मोठी घटना घडली.

ज्या आंतरराष्ट्रीय क्लायंटसाठी हे सिक्युरिटी मॉडेल बनवले होते, त्या क्लायंटचा अचानक कॉन्फरन्स कॉल आला. त्यांना काही तांत्रिक शंका होत्या. तुषारने घाईघाईत साहिलला डावलून स्वतः मीटिंग अटेंड करायचे ठरवले, कारण त्याला वाटले की तो आपल्या बोलण्याने क्लायंटला भुरळ घालेल.

मीटिंग सुरू झाली. क्लायंटने एक अत्यंत किचकट प्रश्न विचारला,

" तुमच्या सिस्टीम मध्ये जर डेटा ब्रीच झाला, तर तुमचे हे नवीन मॉडेल त्याला सेकंदाच्या कितव्या भागात रोखू शकेल ? "

तुषारची बोबडी वळली. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि काहीतरी थातुर मातूर उत्तर द्यायचा प्रयत्न केला.

" सर, आमची सिस्टीम खूप स्ट्रॉन्ग आहे... आम्ही खूप मेहनत केली आहे..." क्लायंट चिडला.

" मिस्टर तुषार, मला मेहनत नकोय, मला लॉजिक हवंय ! तुम्ही ज्या आर्किटेक्चर बद्दल बोलताय, त्यात एक मोठी तांत्रिक त्रुटी दिसतेय. जर तुम्ही हे स्पष्ट करू शकत नसाल, तर आम्ही हा करार आत्ताच्या आत्ता रद्द करतोय ! "

ऑफिसमध्ये सन्नाटा पसरला. बॉसचा चेहरा पांढरा पडला. त्याने तुषारकडे रागाने पाहिले. तुषार घाम पुसत साहिलच्या केबिनकडे धावला.

" साहिल... साहिल प्लीज ! ते क्लायंट काहीतरी विचारतायत. मला ते समजत नाहीये. तू प्लीज मीटिंगमध्ये येऊन त्यांना उत्तर दे ना ! मी तुला पुढच्या वेळी नक्की प्रमोशन मिळवून देईन, प्रॉमिस ! "

तुषार अक्षरशः गयावया करत होता.
साहिल खुर्चीतून उठला. त्याने शांतपणे आपला लॅपटॉप बंद केला. त्याने तुषारच्या डोळ्यात पाहिले. तिथे आता अहंकार नव्हता, तर भीती होती. साहिल म्हणाला,

" तुषार, मघाशी तूच म्हणाला होतास ना की माझं लॉजिक चुकीचं आहे आणि मला या प्रोजेक्ट मधून बाहेर काढणार आहेस ? मग आता माझ्याकडे का आलास ? ज्या खुर्चीवर तू बसला आहेस, त्या खुर्चीची जबाबदारी झेपत नसेल, तर ती दुसऱ्याची आयडिया चोरून मिळत नाही."

साहिल मीटिंग रूममध्ये गेला नाही. त्याने सरळ आपल्या एच.आर. कडे जाऊन एक लिफाफा सुपूर्द केला. तो त्याचा राजीनामा नव्हता, तर त्याने बनवलेल्या मॉडेलचा पूर्ण रिपोर्ट होता, ज्यात त्याने आधीच सर्व धोके स्पष्ट केले होते. जे तुषारने कधी वाचलेच नव्हते.

साहिलने ठरवले होते की, तो आता या काचघरात अधिक काळ राहणार नाही. पण बाहेर पडण्यापूर्वी तो तुषारचा मुखवटा सर्वांसमोर उतरवणार होता.
त्या संध्याकाळी साहिल जेव्हा घरी आला, तेव्हा त्याचे पाऊल हलके होते. त्याने शुभ्राला उचलून घेतले आणि जोरात गोल फिरवले.

"काय झालं साहिल? इतके खुश?" कृत्तिकाने आश्चर्याने विचारले.

"आज मी एक युद्ध जिंकलो कृत्तिका. स्वतःशी आणि त्या राजकारणाशी. मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नाहीये, पण मी माझा स्वाभिमान परत मिळवला आहे. आता खेळ माझ्या अटींवर होईल ! "

साहिलच्या या निर्णयामुळे ऑफिसमध्ये काय खळबळ उडाली ? आणि तुषारचा हा पराभव त्याला शांत बसू देईल की तो अधिक विखारी रूप धारण करेल ?