Login

कशी मी राखु तुमची मर्जी भाग 2

कौटुंबिक कथा
कौटुंबिक कथा
कशी मी राखु तुमची मर्जी
भाग -2

वीणा खोलीत जाता जाताच ठामपणे म्हणाली,"सांग तिला, आम्ही आमची वाट निवडलीय म्हणून ."

"आई..."

"हो निरज ,अरे! उगाच आपलं आपलं करत बसले.किती मोह... किती माया...

लळा जिव्हाळा शब्दच खोटे
जो तो अपुले पाही
कुणी कुणाचे नाही ....

हेच खरे.विसरलेच मी.
अरे! लग्न होऊन घरात आले तो पंचवीस माणसांचा खटला घरात.त्यातून मी सगळ्यात लहान.वरच्या सगळ्या सासवा जावा एक एक काम सांगायच्या. कुणी काही बोलायचं.मी भांबावून जायचे.हातपाय थकायचे, दिवस संपायचा, पण कामं संपत नव्हती.पण मी कधी कुणाला दुरुत्तर केले नाही की कधी जमत नाही हा शब्द ओठावर आला नाही.जमेल तसे करत गेले.एवढासा भांड्याचा आवाज झालेला चालायचा नाही.चुकून जरी थोडा आवाज झाला तर दिवाणखान्यातून आवाज यायचा "वेगळी चुल मांडायची आहे का?
एक एकाची मर्जी सांभाळत गेले आणि मनं जिंकत गेले.
स्वतःला विसरूनच गेले रे.तोंडात खडीसाखरेचा खडा अन् डोक्यावर बर्फाचा खडा तेव्हा जिंकला रे संसार, तसा नाही.एक दिवस असा आला की वीणाशिवाय कुणाचं पान हलत नाही.वीणाशिवाय घरातला कोणताच निर्णय होत नाही.
कशी राखली असेल रे मी एक एकाची मर्जी ?
संसार म्हणजे तडजोड एवढंच माहित होतं.पण कधीच कामाचा कंटाळा नाही.जेष्ठांचा आदर.
त्यामुळेच कौतुकही आलं वाट्याला.
आता एकाच्या चार चुली झाल्या तुमच्या पिढीत.तरी सांभाळणं होत नाही बाबा.
दोष तुमचा नाहीच. आम्ही अपेक्षा ठेवल्यात.किती कोती मनोवृत्ती झाली रे.मला तर सारखं वाटतंय आमची शेवटची पिढी होती जी जेष्ठांच्या आज्ञेत राहिली.आजवर सासवांचा धाक आता सुनेचा धाक.जात्याच्या दोन पात्यात भरडली जातेय आमची पिढी.आम्हीच माघार घ्यायची.संसार टिकवायची जबाबदारी घेतलीय ना शिरावर.

आज परत तेच म्हणायची वेळ यावी,
" कशी मी राखु तुमची मर्जी..."
इन मीन चार माणसांचा संसार .
कसे होईल रे ?
"आई, खरेच गं मी बघितलय डोळ्यांनी पण..."
"निरज ,मला तुला दोष द्यायचाच नाही मुळी ना नेहाला द्यायचाय.पण किती झपाट्याने कालपरिवर्तन घडून आले.का दुरावलीत नाती ?कुठे हरवले प्रेम?कुठे गेला आपुलकीचा ओलावा?शोध घ्यायचाय शांततेत.त्यासाठीच शांत ठिकाण शोधतोय."म्हणत ती स्वयंपाकघरात वळली.
निरज हताश होऊन गुडघ्यात डोके खुपसून बसला होता.

इकडे खोलीत नेहा आवाजाने जागी झालीच होती.ती कान टवकारून ऐकत होती.तिला आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
तिचा प्लॅन सक्सेस झाला होता.

ती बाहेर आली.वीणाने चहाचे आधण ठेवलेच होते.नेहाला बघताच म्हणाली," ब्रश कर पटकन.वाढवून देते एक कप."
वीणाने असे दाखवले की जसे काही झालेच नाही.
इकडे नेहाला मात्र खुमखुमी होती की वीणा काहीतरी बोलेल मग आपण बोलु.
सगळ्यांचा चहा शांततेत आटोपला.वादळापुर्वीची शांतता होती ती.
कुत्र्याचे शेपूट नळकांड्यात घातले तरी वाकडेच म्हणतात तशी गत.
नेहा तयारीतच होती .तिची देहबोली स्पष्ट दर्शवित होती तिच्या मनात काय चाललेय ते.
वीणानेच शांततेचा भंग केला."निरज ,नेहा आम्ही आज प्रदिपकाकाकडे जात आहोत.तिथून उद्या नवीन घरात. तुम्ही दोघे एकमेकांची काळजी घ्या. आनंदात रहा.नेहा जाता जाता तुझ्याशी थोडं बोलायचय. कसं आहे नं काही गोष्टी मनात तशाच राहिल्या की त्या डचमळत राहतात. वेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि त्याचा वाईट परिणाम निघतो.म्हणून मला अगदी मन मोकळं करून अगदी पिसासारखं हलकं हलकं होऊन बाहेर पडायचंय.
मी काय केलं याचा मला अहंकार नाही.प्रत्येकाचा आपआपला स्वभाव असतो.मी जवळची ,दूरची सगळीच नाती आपुलकीने जपली.मला त्यातच आनंद होता.सगळ्यांशी गोड बोलून त्याला बदलायला भाग पाडले.
आणि खरं सांगू नेहा, जी गोष्ट प्रेमाने, त्यागाने,आदराने जिंकता येते तीच गोष्ट अहंकाराने मातीमोल होते.त्या क्षणापुरता आपल्याला वाईट वाटतं मीच का बदलावं ?माझ्याकडूनच का अपेक्षा ?मीच का ऐकावं ?पण त्याक्षणी जर मनावर ताबा मिळवला आला आणि इतरांसाठी जगता आलं तर आयुष्याचं सोनं होतं हे अनुभवाने सांगते.
जिवंतपणी सेवा करा ती नसेल करता येत तर फक्त प्रेमाचे चार शब्द बोला.
मेल्यानंतर रडून काहीच उपयोग नसतो. चुका प्रत्येकाकडून होतात.चुकतो तोच माणूस. पण त्या चुकांना बोटभराचं हातभर करायचं की समजदारीने जुळवून घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मनोवृत्तीतला फरक.
माझेच खरे हा अट्टाहास कधी कधी आपलं स्वतःचच नुकसान करतो.मीच शहाणी बाकी सगळे मुर्ख ह्या अहंकारापोटी संसार उध्वस्त व्हायची वेळ येते.
तडतड बोलून नाते तोडण्यापेक्षा तोंडात खडीसाखर ठेवून नात्यात
गोडवा निर्माण करता आला तर करून बघ.मी किती जगणार ? तू किती जगणार ? कुणाला माहित आहे.जेवढे दिवस आहोत तेवढे दिवस आनंदाने जगायचं.आयुष्य खूप लहान आहे प्रत्येक क्षणाचे सोने करत जगायचे.आनंद वाटायचा आनंद मिळवायचा.सुखी जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे."

वीणाने एक दीर्घ उसासा घेतला.तिला बोलणे जड झाले होते.
नेहा अशी वागू नकोस की कुणी म्हणावे," हिच्या माहेरचे संस्कार असेच आहेत का?मला ऐकवल्या जाणार नाही गं ते.तुझं माहेर,तेच माझं माहेर. झाकली मूठ सव्वालाखाची राहावी .
क्रमशः
बाकी पुढील भागात भाग -3 मधे
©®शरयू महाजन
अष्टपैलु लेखन स्पर्धा

🎭 Series Post

View all