Login

कडक लक्ष्मी कंडक्टर

लेडी कंडक्टर जी वरवर जरी कडक असली तरी मनाने वेगळी

कथे चे नाव :- कडक लक्ष्मी कंडक्टर

विषय :- स्त्री व परावलंबीत्व

फेरी - राज्यस्तरीय लघु कथा स्पर्धा


प्रवास म्हटल की निरनिराळी माणसं भेटणं हे स्वाभाविक आहे. किती तरी लोक आपल्या अवतीभोंवती येतात आणी त्याचे ठिकाण आले की निघून जातात . आपलं लक्ष देखील जात नाही पण काही व्यक्ती अश्या असतात ज्या कायम मनात कोरली जातात . अशीच एक व्यक्ती प्रवासात भेटली आणी कायमची लक्षात राहिली.


सकाळी पुण्याला निघालो आणी धावत पळत एस्टी स्टॅण्ड ला पोहोचलो . नशिबाने बस फलाट ला उभी होती . मी पहिल्याच सीट वर बसलो . ड्राइव्हर त्याच्या जागेवर होता . मी सहज विचारले की बस कधी निघणार् .
" सात तीस चा टाईम आहे , काळजी करू नका बस बरोबर टाईमला निघणार "
मी आजू बाजूला पहिले पण कंडक्टर कुठे दिसला नाही
" आहो पण कंडक्टर आजून दिसत नाही "

ड्रायव्हर हसत बोलले
" कडक लक्ष्मी आहे ती , टाईम चुकणार नाही आणि आली कि ललकारी येईल , पार्थ रथ मार्गस्त करा "

" तुमचे नाव पार्थ आहे का ? "

" छे ! छे ! आहो पार्थ म्हणजे कृष्ण , सारथी , आम्ही सारथी ना म्हणून ती प्रत्येकाला पार्थ म्हणते "

इतक्यात ललकारी आलीच .
" चला पुणे पुणे पुणे ....... पार्थ सुरु करा तुमचा रथ , मार्गस्थ व्हायची घटका आली . "

साधारण चाळीशी उलटलेली स्त्री . मध्यम बांधा . चुडीदार घालून वर कंडक्टर चा शर्ट चढवलेला . उंटांचा मुका घेन्या एव्हडी उंच हि नाही कि दोन बटणात शर्ट संपेल इतकी बुटकी हि नाही . मोठी उभी टिकली हसरा जरी असला तरी कणखर चेहरा . तशी शांत वाटत होती पण मग हिला कडक लक्ष्मी का म्हणत असतील असा माझ्या डोक्यात विचार आला आणि त्याचे उत्तर देखील क्षणात मिळाले . बस निघताना एका प्रवाशाने खूप जोरात दरवाजा बंद केला तशी हि बोलली
" ओह राजे , जरा प्रेमाने दार ओढा , ते बस चे दार आहे तुमची सासू नाही जो राग काढताय "

दार बंद करणारा ओशाळला आणि एक हलकी खसखस पिकली . बस स्टॅन्ड च्या बाहेर पडली आणि अचानक समोरचा मोठा खड्डा मध्ये आदळली . तिने स्वतःला सावरले आणि ओरडली
" पार्थ तुला गाडी पुण्याच्या वाटेला लाव म्हणाले होते तू आमची वाट का लावतोय ? "

ड्रायव्हर बाजू सांभाळत आणि तिची कळ काढत म्हणाला
" सॉरी सॉरी काकू "

ती डोळे मोठे करत म्हणाली
" मुडदा बसवला तुझा , मी इतका चांगलं पार्थ म्हणते आहे आणि तू मला काकू म्हणतो ? तुला तर नंतर बगते "

नंतर ती प्रवाश्याकडे वळली . बाजूच्या सीट वर एक थोडी वयस्कर स्त्री बसली होती तिने नोट पुढे करत म्हणाली
" एक सिनियर सिटीजन हाफ द्या "

लक्ष्मी कंडक्टर ने वय विचारले आणि कार्ड मागितले प्रवासी हसली तर लक्ष्मी म्हणाली
" वय विचारले तर आजून हि लाजताय आणि सिनियर सिटीजन चं तिकीट हवं आहे . बघू कार्ड "

पुढच्या प्रवासी ने पाचशे ची नोट दिली . तशी माथ्या वर आठी आणत ती बोलली
" वीस रुपये तिकीट आणि पाचशे रुपये देताय साहेब , माझ्याकडे नोटा छापायची मशीन असती तर दोन हजार चे पण सुट्टे दिले असते पण प्रत्येकाला सुट्टे कुठून देणार आणि कंडक्टर ने सुट्टे पैसे नंतर देतो म्हणालो कि अशे बघतात जसे कि मी चालत्या गाडीतून पैसे घेऊन पळूनच जाणार आहे ."

बस मध्ये गर्दी होती आणि एक मुलगा एक मुलीच्या मागे उभा होता . त्याच्या हरकती लक्ष्मीच्या तीक्ष्ण नजरेतून लपली नाही आणि ती त्याच्या जवळ जात म्हणाली .
" बस हलते तर सगळे लोक हलतात पण तुला बस जरा जास्तच हलवल्या सारखा दिसतंय . चला मागे चला "

मुलाने थोडा नकार दिला तर ती एखाद्या वाघिणी ने डरकाळी मारावी तशी बोलली
" बस मध्ये लोक मारायला लागले तर पळायला पण जागा नसते आणि फार वाईट तुडवतात , माझ्या यसटीतल्या बाया पोरी बाळी ह्याची जवाबदारी माझी आहे "

मुलगा तरी उद्धटपणे बोलला
" मग गाडी थांबवा , मी इथेच उतरतो "

लक्ष्मी बोलली
" इथे उतरणार आणि पुन्हा दुसऱ्या गाडीत बसणार आणि हेच करणार , एक तर तू सगळ्यात मागच्या सीट जवळ उभा रहाशील नाहीतर बस पोलीस स्टेशन ला थांबवते बोला काय करायचे ? "

मुलगा गपगुमान मागे जाऊन उभा राहिला . मला काहींतर बोलतील म्हणून मी बरोबर तिकिटाचे सुट्टे पैसे काढून दिले . ति एकदम खुश .
" वा , याला म्हणायचे जंटलमन , लास्ट टाईम अचूक पैसे कोणी तरी दिले होते हे देखील आठवत नाही , मनःपूर्वक आभार साहेब "

इतक्यात बस एक खेडेगाव जवळ थांबली आणि एक जक्खड म्हातारी चढली . बस मध्ये एक सीट देखील रिकामी नव्हती . लक्ष्मी बोलली
" आजी पावसा पाण्याचे घरात राम राम करत बसायचे सोडून कुठे निघालीस "

वर वर चिडलेली दिसत असून सुद्धा तिने स्वतःची सीट तिला बसायला दिली . वाटेत बस चहा नाष्ट्या साठी थांबली . हॉटेल वाल्याने मुद्दाम कळ काढली
" लक्ष्मी ताई सगळे कंडक्टर माझ्या कडे भजी समोसे खातात कधी तर तुम्ही पण घ्या ? "

लक्ष्मी फुत्कारली
" ए बाबा तुझे भजी समोसे खाऊन तर माझे धनी वर पोहोचले , ते बसले आहेत तिकडे रंभा उर्वशी बरोबर नैन मटक्का करत आणि मी इकडे प्रवाश्याचे तिकीट फाडत बसले आहे . तुझ्या भाजी सामोसे तुम्हाला लखलाभ मी घरून जेवण आणले आहे "

मी बस ड्रायव्हर ला विचारले तर कळले कि याचे यजमान आधी ड्रायव्हर होते . पदरात तीन मुलं टाकून हृदयविकाराने कमी वयात गेले . सपोर्ट ला कोणी नाही तरी लक्ष्मी डगमगली नाही आणि तिने हि नौकरी स्वीकारली . मी काळजीपूर्वक तिला पाहत होतो . ति वरवर जरी कडक लक्ष्मी दिसत असली तरी मनाने खूप कोमल होती . सगळी तिकीट काढून हिशोब झाल्यावर ति शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होती . मला उगाच वाटले कि ति विचार करत असेल कि ड्युटी संपवून कधी एकदाचे घरी जाऊ कारण तिची लहान मुलगी जी पाच वर्षाची होती ति जीव डोळ्यात आणून तिची वाट पाहत असेल .

नियती ने तिला परावलंबी केल होत पण तिच्या इच्छा शक्तीने आणी मातृत्वान तिला स्वावलंबी बनवलं.


समाप्त

उज्वल बायस

टीम लातूर