Login

कडक स्वभाव भाग-१

कडक स्वभाव असणारी व्यक्ती!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: कडक स्वभाव भाग-१

"आई, मला थोडी फार भीती वाटते. कारण मी असं ऐकलं की, यांचा स्वभाव हा कडक आहे."  

"ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. हळूहळू तुला समजतच आहे आणि ऐकलेल्या गोष्टींवर तू विश्वास ठेवत जाऊ नकोस." आईने समजून सांगितले.

लग्न होऊन रेवा तिच्या सासरी गेली होती. तिचा नवरा लग्नाआधी बाहेरगावी काही कामानिमित्त गेल्यामुळे त्याच्याशी जास्त बोलणं होत नव्हते, परंतु तो शांत आणि थोडासा शिस्तबद्ध आहे, हे मात्र एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून समजत होते.

" ही भाजी तू अशी बनव. त्याला ही भाजी अशीच लागते." रेवाची सासू तिला जेवण बनवताना सूचना देत होती.

रेवामध्ये एक गोष्ट खूप चांगली होती की, ती समोरच्याच ऐकून घ्यायची, तसेच परिस्थितीनुसार बदल करणे हे तिला जमत असल्यामुळे तिचे फारसे कोणाशी भांडण होत नसे.

रेवाचा नवरा नवीन हा तिच्याशी मोजकेच बोलायचा. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, काही लोकांचा स्वभाव हा शांत आणि मोजकेच बोलणार असा असतो, असे तिला वाटायचे; त्यामुळे तिने सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.

घरातील सर्वजण रेवाशी व्यवस्थितच वागत होते, परंतु काही दिवसांनी मात्र नवीनने आपल्याशी अजून जास्त बोलावे, असे रेवाला वाटत होते.

तो ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार होता, तसेच लग्नानंतर जवळपास कुठे फिरण्यासाठी सुद्धा गेले नव्हते, सर्वजणांनी त्याबद्दल विचारून तिला हैराण केले होते; परंतु ती लाजून विषय सोडून द्यायची.

दुसऱ्या दिवशी नवीन चेन्नईला जाणार होता, त्यामुळे त्याने आपली बॅग भरण्यास सुरुवात केली.

" मी काही मदत करू का?"  रेवानी विचारले.

त्यावर त्याचे उत्तर काहीच नव्हते, परंतु कदाचित आपण मदत करावी अशी त्याची न बोलता अपेक्षा असेल म्हणून   तो खोलीतून बाहेर गेला तेव्हा, तिने आजूबाजूला असणाऱ्या वस्तू त्या बॅगेमध्ये भरण्यास सुरुवात केली होती.

जसा नवीनने आतमध्ये प्रवेश केला आणि ती बॅग भरत आहे, ते बघितले तसा लगेच त्याने बॅगेमध्ये भरलेल्या वस्तू तो बाहेर काढू लागला.

आपण एवढं बॅग भरायला मदत केली आणि त्याला ते न पटल्यामुळे त्याने पुन्हा वस्तू बाहेर काढल्या म्हणून रेवाचे मन खट्टू झाले.

"मला सगळ्या गोष्टी नीट लागतात." एवढेच काही तो म्हणाला.

" जास्त वेळ शोधण्यामध्ये लागू नये, म्हणून माझे काम मी स्वतःच करतो." दुसरे वाक्य त्याच्या तोंडातून निघाले.

त्यावर तिने आपले काहीच मत मांडले नव्हते.

प्रत्येकाला स्वतःची वस्तू नीट मिळाली नाही आणि जर ती दुसऱ्या कोणी ठेवली असेल तर त्यावरून भांडण होतात. रेवाला माहीत होतं, त्यामुळे पुढे भांडण वाढू नये; म्हणून ती शांत बसली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन लवकरच निघून गेला होता.  जाताना त्याने आपल्याला उठवायला हवे होते, असे तिला वाटले आणि आपण सुद्धा एवढे कसे गाढ झोपलो की, त्याची जाण्याची चाहूलही आपल्याला लागली नाही; म्हणून ती स्वतःचाच राग करत होती.

त्याच्याशी आधीच बोलणे कमी होत होते, त्यात आता तो लवकर दिसणार नव्हता; म्हणून तिचे मन उदास झाले होते. त्याला नेमके काय अपेक्षित आहे, हेच तिला समजत नव्हते.

सकाळी सर्व नाष्टा आणि चहा घेत असताना तिच्या सासुबाईंनी तिच्या हातात एक गोष्ट दिली.

ते दिल्यावर, त्या वस्तूकडे बघून ती चकित झाली. तसेच आता मात्र तिला त्या गोष्टीविषयी कुतूहल निर्माण झाले होते.

दुपारी सर्व काम आणि जेवण झाल्यावर त्या गोष्टीकडे तिचे लक्ष गेले आणि तिने ते उघडण्याचा प्रयत्न केला.

नंतर तिच्या लक्षात आले की, आपण तर आज मोबाईल सकाळपासून हातात घेतलाच नव्हता, म्हणून तिने आपला मोबाईल हातात घेतला आणि धडाधड मेसेजेस बघून पुन्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला.

क्रमशः

रेवाच्या सासूने तिच्या हातामध्ये काय दिले होते ?
नवीनला नक्की हे लग्न मान्य होते का ?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट करा.
0

🎭 Series Post

View all