काढा (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
काढा

रामाने राजाला सर्व कार्यक्रम अगदी चोख पार पडेल असे वचन दिले असले तरीही त्याची तब्येत बघता राजा जरा साशंक होता.

“सगळं काही नीटच झालं पाहिजे. हा कार्यक्रम म्हणजे विजयनगरच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. जा! आता स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्या आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापनही बघा. आम्ही आता येतो.” राजा म्हणाला आणि निघून गेला.

“रामा सगळे राजे असेच असतात का? एवढे शिष्ठ, शिस्तप्रिय? फक्त दोन वाक्याचा आदेश देऊन गेले.” बंधूने विचारलं.

“महाराज आहेत ते बंधू! त्यांना तसेच राहावे लागत असेल ना. कठोर, शिस्तप्रिय.” रामा म्हणाला.

राजाच्या पाठोपाठ बाकी महत्त्वाच्या हुद्द्यावर असलेले लोक निघाले. आचार्यने एकदा त्या विदेशी महिला क्लाराकडे पाहिले आणि तोही निघाला.

रात्र झाली होती. बाहेर काळे ढग जमा झाले होते, विजा कडकडत होत्या आणि कोणीतरी खिडकीजवळ उभे राहून पण बाहेर बघत बडबडत होतं; “चंद्रमणी मिळवण्याची हीच संधी आहे. तो चंद्रमणी मिळवून मी सगळ्यात श्रीमंत होईन आणि कोणाला संशयही येणार नाही हे काम तुझे आहे. हा…हा…हा..”
**************************
इथे रामा त्याच्या घरी पोहोचला होता. त्याच्या घरचे सगळेच म्हणजेच अम्मा, गुंडप्पा, शारदा आणि रामा वाफ घेत बसले होते.

“अहाहा! खूप बरं वाटतंय.” रामा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून अम्माने डोक्यावरचे कापड काढले आणि शारदाला देखील हलवून काढायला लावले आणि ती खुणा करू लागली.

“एकतर सगळ्या घराला आजारी पाडले आणि आता बरं वाटतंय असं म्हणतोय.” शारदा तिच्या वतीने म्हणाली.

“सगळ्यात संधी दडलेली असते. यातही आहे.” रामा म्हणाला.

“आता यात काय आहे? काय तालू आहे तुद्या दोक्यात लामा?” गुंडप्पाने विचारलं.

“आत्ता मला ही सर्दी झाली आहे त्याचा मी फायदा करून घ्यायचं ठरवलं आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? चंद्रमणीची सुरक्षा आणि त्याला सगळ्यात जास्त धोका बाहेरून आलेल्या लोकांपासून आहे. बाहेरून आलेत ते पाच कलाकार. हीच संधी साधून मी महालात जे पाहुणे आले आहेत त्यांना काढा द्यायच्या निमित्ताने त्यांची भेट घेईन आणि बोलण्यातून त्यांच्या कोणाच्या मनात तो चंद्रमणी हिरा चोरी करण्याचे नाहीये ना हे पाहीन.” रामा म्हणाला.

यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “कधीकधी आपण वाघाच्या भीतीने झाडाच्या आडोशाला जातो पण हे विसरतो तिथून एखादा जाणारा छोटासा विंचू त्या वाघापेक्षा जास्त जीवघेणा असतो. त्यामुळे फक्त बाहेरच्या लोकांची पारख करून चालणार नाही. जर घरचाच कोणी भेदी असेल तर?” अम्मा म्हणाली.

तिचे बोलणे ऐकून रामा एकदम खुश झाला.

“अम्मा जरा इथे ये.” त्याने तिला पुढे बोलावले.

ती पुढे वाकली तसे रामाने प्रेमाने तिचा गालगुच्चा घेतला.

“व्वा अम्मा! काय बोलली आहेस. अरे कोणीतरी काळा टित लावा. नजर नको लागायला.” रामा म्हणाला.

तसे तिनेच स्वतःच्या डोळ्यातील काजळ काढून स्वतःलाच लावले.

“आता सुरुवात माननीय आचार्यांच्या घरापासून करतो. बरेच दिवस त्यांचा रक्तदाब सामान्य आहे.” रामा म्हणाला.
***************************
इथे आचार्यच्या घरी धनी आणि मणी गप्पा मारत बसले होते.

“मणी तू बेडूक बघितला आहेस का?” धनीने विचारलं.

“हो.” मणी म्हणाला.

“तो म्हातारा बेडूक नाही. जंगली बेडूक. जो आपली लांब जीभ काढून दूर बसलेल्या किटकाला खातो.” धनी म्हणाला.

“हा आपला म्हातारा तसलाच तर बेडूक आहे. आज दरबारात पाहिलं नाहीस? त्या विदेशी कलाकार महिलेकडे तसाच बेडकासारखा बघत होता.” मणी म्हणाला.

इतक्यात त्या दोघांचं लक्ष समोर गेलं. तिथे आचार्य उभा होता.

“गेलो आता! संपलो! दोघंही आता मार खाणार.” धनी म्हणाला.

ते दोघे घाबरत घाबरत हात जोडून आचार्य समोर आले.

“गुरुजी.” दोघांनी त्याला हाक मारली पण त्याचं लक्ष नव्हतं. तो शून्यात नजर लावून स्मित करत उभा होता.

“या म्हाताऱ्याने काही ऐकलं नाहीये धनी.” मणी म्हणाला.

“कशावरून?” धनीने विचारलं.

“ते बघ. हा म्हातारा अजून त्या विदेशी महिलेच्या विचारात आहे.” मणी त्याला आचार्यच्या हातात असलेलं कानातलं दाखवत म्हणाला.

दोघांनी त्याच्या डोळ्यासमोर टीचक्या वाजवल्या तरीही तो भानावर आला नव्हता. शेवटी मणीने त्याच्या हातातील कानातल्यावर टिचकी वाजवली आणि त्या हालचालीने तो भानावर आला.

“गुरुजी हे कानातले तर त्या विदेशी महिलेचे आहे ना?” मणीने विचारलं.

“हो! ती गायन सादर करायला आली असताना तिला शिंक आली तेव्हाच ते पडले होते.” आचार्य म्हणाला.

“आणि तुम्ही ते उचलले.” धनी म्हणाला.

“हम्म. भाग्याने आम्हाला तिला पुन्हा भेटण्याची संधी दिली आहे. हे कानातले परत करण्याच्या निमित्ताने ती आम्हाला पुन्हा भेटेल.” आचार्य म्हणाला.

इतक्यात तिथे त्याची पत्नी आली. त्याने पटकन कानातले लपवले.

“प्रभू! तुमच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही पूजा करून आलोय. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही प्रार्थना केली आहे प्रभू. आणि हो! बाहेर ते पंडित रामाकृष्णा आलेत तुम्हाला भेटायला.” ती म्हणाली.

आचार्य आणि धनी, मणी लगेच बाहेर आले. रामा तिथेच असणाऱ्या एका हरणाच्या मुर्तिशी खेळत होता. त्याला बघून त्याने ती होती तशी ठेवली.

“प्रणाम आचार्य.” रामा म्हणाला.

“कसे येणे केलेत?” आचार्यने विचारलं.

“उत्सवाचा दिवस जवळ येत चालला आहे म्हणून म्हणलं जमतील तशी कामे हातावेगळी करूया. तुम्ही जी पूजेच्या सामग्रीची यादी दिली होती त्यानुसार यादी बनवून घेऊन आलो आहे. मी संमती दिलेली यादी दाखवून तुम्ही उद्या राजकोषातून धन घेऊ शकता.” रामा म्हणाला आणि त्याने आधी आचार्यने दिलेली यादी त्याच्या हातात दिली.

आचार्यला वाटले बरे झाले आपलीच यादी आहे त्यामुळे तो खुश झाला.

“धनी, मणी ही घ्या यादी आणि उद्या धन घ्या.” आचार्य म्हणाला.

“नाही नाही आचार्य! ती तुम्ही केलेली यादी आहे. ती यादी दाखवून तुम्हाला धन मिळणार नाही. ही यादी दाखवून तुमच्या शिष्यांना धन घेता येईल.” रामा दुसरी लहान यादी त्याच्या हातात देत म्हणाला.

आचार्यने ती दोन तीन वेळा खेचून बघितली. एवढी लहान यादी पाहून तो संतापलाच!

“मी सर्व काही नीट पाहिले आहे आचार्य. कदाचित चुकीमुळे तुमच्या यादीत काहीकाही जिन्नस दोन, तीन वेळा लिहिले गेले होते तर काही काही सामानाची गरजच नव्हती. ज्या वस्तू आधीच महालात उपलब्ध आहेत त्यांना मी काढून टाकले आहे आणि तुमच्या यादीत काही ठिकाणी शून्यही अधिक लागले होते तेही कमी केले आहेत.” रामा म्हणाला.

“एवढ्याश्या सामानात महापूजा कशी होणार? यात तर आमचे श्राद्धही होणार नाही.” त्याने रागात विचारलं.

“शुभ शुभ बोला आचार्य. श्राद्ध होवो तुमच्या शत्रूंचे. तुम्ही तर पापी दीर्घायुषी आहात. चला येतो.” रामा म्हणाला आणि तिथून निघाला.

आचार्य खुश होऊन तिथल्या मंचकावर बसला.

“बघितलं! आमचा कसा दरारा आहे? आमच्यापेक्षा लहान आहे तरीही आशीर्वाद देऊन गेलाय.” आचार्य म्हणाला.

“कसला आशीर्वाद गुरुजी? तो तुम्हाला पापी म्हणून गेलाय.” मणी म्हणाला.

“हो! त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की, पापी लोकांना दीर्घायुष्य मिळतेच. देवालाही त्यांच्या दारी ते नको असतात म्हणून इथेच पृथ्वीतलावर सडतात.” धनी म्हणाला.

“पंडित रामाकृष्णा! आता बघतोच.” आचार्य रागाने म्हणाला.

इतक्यात कोतवाल तिथे आला.

“आचार्य! काहीतरी करा. त्या पंडित रामाकृष्णामुळे आमची कमाई तर बंद झालीच आहे तुमचीही बंद होईल अश्याने.” कोतवाल म्हणाला.

“त्यासाठीच तुला बोलावलं आहे. बस.” आचार्य म्हणाला आणि तो बसला.

धनी मणी देखील तिथेच खाली मांडी घालून बसले.

“आम्हाला माहीत आहे त्या रामाने तुला घरी बसवलं आहे. आमच्याकडे एक कल्पना आहे. सध्या त्याच्याकडे सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती आहे?” आचार्य म्हणाला.

“सर्व आयोजनाची.” कोतवाल म्हणाला.

“आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चंद्रमणी हिऱ्याची सुरक्षा. जर तो चंद्रमणीच चोरीला गेला तर त्याची जबाबदारी कोणाची असेल?” आचार्य म्हणाला.

“त्या पंडित रामाची पण तो चोरी कोण करणार?” कोतवाल म्हणाला.

“आम्ही! आम्ही चोरणार चंद्रमणी.” आचार्य म्हणाला.

“हे काय बोलताय आचार्य? हे कसं शक्य आहे? यात धोका आहे.” कोतवाल घाबरून म्हणाला.

“उठ! उठ! उठ आणि निघ इथून. अश्या घाबरट माणसाला आम्ही आमच्या योजनेत सामील करून घ्यायचा विचार केला हेच चुकले.” आचार्य रागाने म्हणाला.

कोतवालने लगेच त्याचे पाय धरले.

“माफ करा आचार्य. मला असे दूर लोटू नका. मला तुमच्याच छत्र छायेखाली राहू द्या.” तो गयावया करत म्हणाला.

आचार्यने त्याला उठायला सांगितले आणि बोलू लागला; “ठीक आहे. आता महालात जाऊन चंद्रमणी ठेवलेल्या कक्षाचे नीट निरीक्षण करून आराखडा तयार करायचा.”

“त्या कक्षातून तर बाहेर पडायला अनेक मार्ग आहेत.” कोतवाल म्हणाला.

“तेच आपल्याला बघायचे आहेत. आम्ही कोणत्या मार्गाने बाहेर पडू शकतो ते आम्हाला पाहायचे आहे. चला महालात.” आचार्य म्हणाला.
*********************************
इथे रामा आणि गुंडप्पा काढा घेऊन महालात आले होते.

“तुझ्या लक्षात आहे ना गुंडप्पे काय करायचं आहे ते?” रामाने विचारलं.

“हो लामा. तू सगल्यांना काला देनाल तेवा मी बोलता बोलता चंदलमनी चोलायचे त्याच्या मनात नाही हे बगनाल.” तो म्हणाला.

“अरे नाही गुंडप्पे! तू काढा द्यायचा आणि मी बोलणार. नीट लक्षात ठेव आता.” रामा म्हणाला.

“हा तेच.” तो म्हणाला.

दोघे पहिल्या पाहुण्याच्या म्हणजेच मथुरा दासच्या कक्षाजवळ आले. तो रियाज करत बसला होता पण सर्दीमुळे त्याचा सुर लागत नव्हता.

“काय मान्यवर कसा सुरू आहे अभ्यास?” रामाने विचारलं.

“कोण?” त्याने विचारलं.

“रामाकृष्णा मान्यवर! विसरलात का? सकाळी तुमच्या स्वागतासाठी द्वारावर उभा होतो.” रामा म्हणाला.

“हा. हा. काय सांगू तुम्हाला? या सर्दीमुळे काहीच होत नाहीये. एवढी चांगली संधी आली आहे ती अशी सोडून चालणार नाही.” तो म्हणाला.

“संधी? कसली संधी?” रामाने जरा संशयाने विचारलं.

“महाराज श्री कृष्णदेवराय यांच्या राज्यात त्यांच्या समोर आपली कला प्रदर्शित करण्याची संधी.” तो म्हणाला.

“हो बरोबर बरोबर. हे बघा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हा काढा घेऊन आलोय. हा काढा माझ्या अम्माने स्वतः घरच्या औषधिंपासून बनवला आहे. गुंडप्पे त्यांना काढा दे.” रामा म्हणाला.

लगेच त्याने मडक्यावरचे कापड काढले आणि तिथे असणारा पेला आणला. रामाने त्यात काढा ओतला आणि त्याला दिला. त्याने काढा पिला.

“खूप छान वाटतंय. काढा पिल्यावर लगेच आराम पडतोय. आता आम्ही रियाज करायला मोकळे.” तो म्हणाला.

गुंडप्पा त्याच्या हातातून पेला घेत होता पण तो काही त्याच्याकडे बघत नव्हता.

“काही उपयोग नाही गुंडप्पे. यांना रात्रीचे दिसत नाही.” रामा म्हणाला.

“तुला काय माहित?” त्याने विचारलं.

“असतो काहीकाही माणसांना असा आजार. थांब दाखवतो.” रामा म्हणाला आणि त्याच्या समोर उभं राहून तो नाचला तरीही त्याला ते समजलं नाही.

गुंडप्पा देखील हसत होता.

“चला महोदय आता आम्ही येतो. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा.” रामा म्हणाला आणि ते दोघे तिथून निघाले.

आता आचार्य देखील महालात पोचोहचला होता.

“गुरुजी! तुम्ही तर महालाचा कोपरा अन् कोपरा ओळखता मग इथे येण्याची काय गरज होती?” मणीने विचारलं.

“ही दूरची विचारसरणी आहे. नाही कळणार राहू दे.” आचार्य म्हणाला.

“तरीही सांगा ना.” धनी म्हणाला.

“आम्हाला त्या पंडित रामाकृष्णाच्या दृष्टीने सगळी व्यवस्था बघायची आहे. तो सुरक्षेसाठी काय काय करतो हे पाहून आम्ही आमची योजना तयार करणार आहोत.” तो म्हणाला.

“म्हणजे गुरुजी?” मणी म्हणाला.

“सांगितलं ना नाही समजणार.” आचार्य म्हणाला आणि पुढे चालू लागला.

त्याचा पाय अडखळला आणि ते कानातले खाली पडले. त्याने ते पटकन उचलले.

“आत्ता समजलं गुरुजी. इथे येण्याचं खरं कारण ती आहे.” धनी म्हणाला.

“गप्प बसा आणि चला.” आचार्य म्हणाला आणि तितक्यात मागून कोतवाल आला.

ते महाल बघत फिरत होते. आचार्य त्यांची नजर चुकवून अतिथी कक्षाकडे जायला बघत होता पण त्याची ती योजना अजूनतरी सफल झाली नव्हती. तर दुसरीकडे रामा काढा देण्यासाठी दुसऱ्या कक्षात जायच्या आधी त्याला कोणीतरी घोंगडी घेऊन आत जाताना दिसले म्हणून तो आणि गुंडप्पा लपून बघत होते.