Login

कधी व्यक्त होऊन तर बघ.. भाग अंतिम

Love Is All About How You Express Your Feelings
भाग ३:

काही दिवसांनंतर श्रेयाला तिच्या डेस्क वर एक पत्र दिसते.कुणी बरे आता हे पाठवले असेल असा तिला प्रश्न पडतो.ते ती उघडते आणि वाचू लागते.

प्रिय बायकोस,

किती रागवशील डियर,करमत नाही आता.पुरे हा अबोला.आज तुझ्यासाठी मनापासून सुचले ते लिहिले आहे बघ ह्या पत्रात.

अगं दिवस उजेडायच्या आधी तुझी सकाळ होते. हळूच उठतेस तू, कोणाची झोपमोड होणार नाही याची काळजी घेतेस, पटापट आवरायला घेतेस.

मुलांच्या, माझ्या आणि तुझ्या डब्यात अगदी पोळी भाजी पासून वरण-भात ते सलाड पर्यंत सगळं बनवतेस. आवरत आलं तुझं की मुलांना उठवतेस त्यांना आवरून बसजवळ सोडतेस.

परत आली की गरमागरम चहा करतेस मग मला उठवतेस. थोडा चहा तेव्हा तू घेतेस. आवरून माझ्यासोबत ऑफिसला निघतेस.

ऑफिसची जबाबदारीही तू चोख पार पाडतेस.. घरी आलीस की पुन्हा कामाला लागतेस. मुलांचा अभ्यास, त्यांचे वेगवेगळे क्लास त्याच वेळापत्रक तूच संभाळतेस. घरातील बाकीची सगळीच छोटी मोठी कामं चोख करतेस.

रात्री गरम-गरम जेवण बनवून जेवायला वाढतेस.

स्वतः मात्र सकाळचं काही राहिलं असेल ते आधी संपवते. त्यातही मी म्हणून जातो, अगं त्या बाजूच्या कसं बनवतात कारलं शिकून घे, तेव्हा तुझ्या डोळ्यात नकळत पाणी तरळते.ते माझ्या नजरेतून सुटत नाही बरं का?

सगळं आवरून उद्याची तयारी करून तू सगळे झोपल्यावर झोपायला येतेस.बघायला गेले तर सगळ्यात जास्त लवकर झोपायची गरज तुला असते. प्रत्येक सणवार उत्साहाने साजरे करतेस. मुलांना आपली संस्कृती आणि सणवार समजावे याकरीता किती प्रयत्न करतेस. हि लिस्ट खूप मोठी आहे काय काय लिहावं तितके कमीच आहे.


खरचं तू किती करतेस.

वाटतं विचारावं कधी.इतकी ताकद कुठून आणतेस??

कसं जमत तुम्हा बायकांना सगळकाही.

दिसतं मला तुही रात्री किती थकलेली असतेस.तरी रोज पहाटे सगळ्या जबाबदारीची जाणीव तुला वेळेत उठवते.

स्वतःची काळजी घ्यायला मात्र तू नेहमीच विसरतेस. इतकंच सांगणे आहे तुला या पत्रातून स्वतःची काळजी घेत जा थोडा वेळ व्यायामाला, योगाला देत जा त्याने तुझा दिवसभराचा उत्साह अजून द्विगुणित होईल.
एकदा जरी आजारी पडली तू तरी घराची दशा होते आणि माझ्यासकट मुलांचीही तारांबळ उडते. तेव्हा तुझे महत्व खूप जाणवते.

अगं, तुम्ही स्त्रिया होतातच सुखकिर्ती आहात आणि कायम राहणार. सगळी आव्हनं पेलणाऱ्या झाशीच्या राणीसारख्या आणि तितक्याच मायेच्या ओलाव्यानी पुरेपूर भरलेल्या.उत्साहाचा खळखळता झरा आहात तुम्ही.

स्त्रीया पूर्वीच्या, आजच्या आणि उद्याच्या सगळ्याच सक्षम होत्या आहेत आणि राहतील.
मी व्यक्त करण्यात कमी पडलो असेल पण असं समजू नकोस आम्हा पुरुषांना तुमची किंमत नसते. अगं तुमच्याविना आमचे एक पानही कुठे हलते. तू आहेस म्हणून कुटुंब आहे, तू आहेस म्हणून घराला घरपण आहे. तू घराचा श्वास आहेस.
- तुझाच रोहन


ह्या पत्रातील एक एक शब्द वाचताना श्रेयाच्या डोळ्यात पाणी तरळत होते.तिचा राग, होणारी चिडचिड जणू त्या अश्रुंच्या एक एक थेंबागणिक तिच्या आत साठलेल्या कित्येक भावनांना मोकळी वाट मिळते.

आयुष्यात आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करावं लागतं. त्यासाठी नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांसाठी वेळ आणि संवाद असणे गरजेचे असते.आपण प्रेम करतो,समोरच्याचा आदर करतो ते कृतीतून आपल्या वागण्यातून देखील दाखवावे.हे आज रोहनला कळून चुकते.श्रेयाला देखील जाणवते की रोहनला आजही आपल्यावर प्रेम आहे फक्त तो मागच्या काही दिवसात कामात खूप व्यस्त झाला होता.त्यामुळे तीही ठरवते की काहीही झाले तरी आता सतत चिडचिड करायची नाही.दोघे पुन्हा एकदा आपल्या नात्याला नव्याने सुरुवात करत एकमेकांना घट्ट मिठी मारतात. जणू नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात.

-✍️सुप्रिया शिंदे महादेवकर
आपला अनमोल अभिप्राय द्यायला विसरू नका.शेअर करायचा असेल तर नावासाहित शेअर करा.

धन्यवाद.

🎭 Series Post

View all