कधीतरी माझंही ऐकशील का? भाग - २
"ठीक आहे ना मग, एवढं काय रागावायचं... मी थकलो होतो म्हणून थोडा टीव्ही लावला ना...." निलेश म्हणाला.
"प्रश्न टीव्हीचा नाहीये, निलेश... प्रश्न आहे आपल्या दोघांचा. तुम्ही माझं आजिबात ऐकत नाही आता. कधीकधी मला चार शब्द तुमच्याशी बोलायचे असतात पण तुम्ही सतत त्या टिव्हीत आणि मोबाईल मध्ये गुंग असतात. आपण एकाच घरात राहतो पण वेगवेगळ्या जगात." आर्या दुखऱ्या आवाजात बोलली.
"तसं काही नाहीये आर्या. तू जरा जास्त विचार करतेस. म्हणून तुला तसं वाटतंय. मी तर बोलत असतो तुझ्याशी." आर्यन म्हणाला.
"आजिबात नाही, मी जेव्हा तुमच्याशी बोलते आणि तुमचं लक्ष तरी असतं का माझ्याकडे! तुम्ही तर मोबाईल स्क्रोल करण्यात बिझी असता. एक शब्द चार वेळा बोलावा लागतो मला. तेव्हा कुठे उत्तर भेटतं, म्हणून मी जास्त विचार करते! जेव्हा मी रात्री तुमची वाट बघते आणि ठरवते की आज आपण थोडं बोलू, आणि नेमकं तेव्हा तुम्ही म्हणता की मी खुप थकलो आहे. तेव्हा मी जास्त विचार करते!" आर्या म्हणाली. त्याचवेळी तिच्या डोळ्यात पाणी आले. पण निलेश काही न बोलता तिथून सरळ बाहेर निघून गेला. ती मात्र बराच वेळ तिथेच बसून रडत राहिली. नंतर तिनेही त्याच्याशी बोलायचं नाही हे मनाशी पक्कं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आर्याने निलेशचं ऑफिसचं सगळं आवरून दिलं. त्याला ऑफिसला जाताना घालायचा त्याचा ड्रेस टेबलवर काढून ठेवला, त्याला टिफीन दिला. पण एका शब्दानेही ती त्याच्याशी बोलली नाही. त्यानेही तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि ऑफिसला गेला. पुढचे दोन त्या दोघांमध्ये अबोलाच होता.
आज रविवार असल्यामुळे निलेशला सुट्टी होती. आर्या त्याच्याशी बोलत नव्हती, सकाळी थोडा वेळ त्याला काही वाटलं नाही पण नंतर मात्र त्याला तिच्या गप्प राहण्याचा त्रास होऊ लागला. मग तो स्वतःच तिच्याशी बोलायला गेला.
"आर्या, एवढं काय झालयं तुला? का माझ्याशी बोलत नाहीये. आता मी स्वतःहून तुझ्याशी बोलतोय, आता तरी बोल ना..." निलेश म्हणाला तसं तिने फक्त हम्म्म एवढाच रिप्लाय दिला आणि ती तिचं काम करू लागली. मग त्यानंतर दिवसभर निलेश तिच्याशी स्वतःहून बोलत होता पण आर्या तो जेव्हा दोन ते तीन वेळा एक वाक्य बोलेल तेव्हाच त्याला उत्तर देत होती आणि ते ही फक्त एका शब्दात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा