Login

कधीतरी माझंही ऐकशील का? भाग - ३

नात्यांना वेळ देणं गरजेचं आहे
कधीतरी माझंही ऐकशील का? भाग - ३ (अंतिम भाग)

रात्री सगळी कामं झाल्यावर आर्या जेव्हा झोपायला गेली तेव्हा निलेशही तिथेच बसून होता. तिला आलेलं बघून त्याने लगेच मोबाईल बाजूला ठेवला पण आर्याने तिचा मोबाईल घेतला आणि ती मोबाईल मध्ये काहीतरी बघत टाईमपास करू लागली. निलेश बोलत होता पण ती काही त्याला उत्तर देत नव्हती. शेवटी त्याने चिडून तिच्या हातातला मोबाईल ओढून घेतला आणि तिच्याकडे रागाने बघू लागला.

"काय चाललंय तुझं? सकाळपासून बघतोय मी, तुझं आजिबात माझ्याकडे लक्ष नाहिये. मी बोलतोय तर सरळ सरळ मला इग्नोर करतेय आणि आताही मी कधीपासून तुझ्याशी बोलतोय तर तुझं लक्ष मोबाईलमध्येच आहे. एक दिवस घरी आहे तरी तुला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये." निलेश चिडून म्हणाला तसं आर्या हलकसं हसत त्याच्याकडे बघू लागली.

"आज एक दिवस तुम्ही घरी आहात, मी तुमच्याशी बोलत नाही तर तुम्हाला एवढा त्रास होतोय. मी मोबाईल बघत होती तर तो तुम्ही ओढून घेतला. रोज जेव्हा मी तुमच्याशी बोलते तेव्हा तुम्ही माझं काहीच न ऐकता मोबाईल मध्ये गुंग असतात. तेव्हा मला काय वाटत असेल याचा विचार केलाय का तुम्ही? आता मी पण तुमच्यासारखीच वागणार, इतके दिवस तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत होती मी... पण आता तुमची वेळ आहे समजलं. द्या तो मोबाईल इकडे." आर्या म्हणाली आणि तिने त्याच्या हातात असलेला तिचा मोबाईल ओढून घेतला. तो मात्र एकटक बघतच राहिला.

"आर्या, खरंच चुक झाली माझी. आता इथून पुढे अजिबात मी तुझ्याशी असं वागणार नाही. आता तरी मला माफ कर ना..." निलेश म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर ती त्याच्या जवळ सरकली आणि बोलू लागली.

"तुम्हाला आठवतंय का, लग्नानंतर पहिल्या वर्षी आपण प्रत्येक रात्री एकमेकांशी किती बोलायचो. तुम्ही रोज तुमच्या ऑफिसच्या गोष्टी मला सांगायचा, मी माझ्या नव्या रेसिपीज, अजून दिवसभर काय केलं ते सगळं सांगायची पण आता आपण फक्त ‘डिनर झालं का?’ ‘मुलांना झोपवलंस का?’ इतकंच बोलतो. माझी फार मोठी अपेक्षा नाहीये निलेश, मला फक्त थोडा वेळ तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात. पण तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळच नसतो." आर्या म्हणाली.

"मला माहिती आहे आर्या... मलाही ते दिवस आठवतात.
कदाचित जबाबदाऱ्या, थकवा, आणि रोजची धावपळ यात सगळं हरवत गेलं असेल. पण इथून पुढे मी नाही असं वागणार, मला आज तुझी मनस्थिती आणि माझी चुक दोन्हीही कळलं आहे." निलेश तिचा हात हातात घेत म्हणाला. तसं आर्याने त्याच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांतला ओलसरपणा गेला आणि तिच्या ओठांवर हलकसं हसू आलं.

"तुम्ही माफी मागावी अशी अपेक्षा नाहीये निलेश. फक्त आता थोडं ऐका माझं... जेव्हा मी बोलते, तेव्हा फक्त हुंकार नका देऊ, माझं बोलणं ऐकून घ्या आणि मला नीट सौम्य भाषेत सांगत जा. तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे." आर्या म्हणाली.

"ठीक आहे, मी वचन देतो तुला. आजपासून मी तुझं बोलणं नक्की ऐकेन." निलेश म्हणाला. मग दोघांच्या छान गप्पा चालल्या. रात्री दोघेही बराच वेळ बोलत राहिले. मुलं झोपलेली, घरात शांतता पण या वेळी ती शांतता गोड वाटत होती. ते दोघेही जुन्या आठवणींवर बोलत होते आणि नवीन स्वप्नं रंगवत होते. आज खऱ्या अर्थाने आर्या मनापासून खुश होती.