कधीतरी माझंही ऐकशील का? भाग - १
रात्रीचे दहा वाजले होते. पूर्ण घरात शांतता होती. फक्त टीव्हीवर चालू असलेली मालिका आणि त्यातले संवाद तेवढे कानावर पडत होते. टिव्हीचा आवाज खुप मोठा होता.
आर्या किचनमध्ये भांडी घासत होती. हात काम करत होते पण डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तर दुसऱ्या बाजूला तिचा नवरा निलेश, सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. आर्या जेव्हा तिच्या विचारातून बाहेर आली तेव्हा तिला त्या टिव्हीच्या आवाजाचा त्रास होऊ लागला. मग तिने तिच्या नवऱ्याला थोडा रागातच आवाज दिला.
"निलेश, टीव्हीचा आवाज थोडा कमी कराल का? माझं डोकं ठणकतंय त्या आवाजाने." आर्या म्हणाली.
"हो करतो ना... थांब." निलेश मोबाईलमध्येच बघता बघता बोलला पण त्याचाही आवाज बोलताना मोठाच होता. तो बोलला पण त्याने टिव्हीचा आवाज काही कमी केला नाही.
"काय हो तुम्ही.... आवाज कमी करतो म्हणताय पण करत तर नाही. मला खरंच शांतता हवी आहे, दिवसभर काम करता करता अक्षरशः डोकं फुटायला होतं माझं. त्यात हा टिव्हीचा आवाज." आर्या वैतागून म्हणाली. खरं तर तिला निलेश सोबत गप्पा मारायच्या होत्या म्हणून ती टिव्हीचा आवाज कमी करायला सांगत होती पण तो काही केल्या तिथून उठत नव्हता.
"पण मलाही ऑफिसमधून आलो की थोडं रिलॅक्स व्हायचं असतं, मग थोडा वेळ टिव्ही पाहिली तर काय हरकत आहे." निलेश म्हणाला. तसं आर्याने हातातलं स्टीलचं भांडं जरा जोरात आपटलं.
"तुम्ही काम करताय... ते काम, आणि माझं काय, मी कामच करत नाही का! मी पण माणूस आहे निलेश... मला पण थकवा येतो, तुम्हाला फक्त स्वतःचं बघायचं असतं पण माझं तसं नाहीये. जरा घरात शांतता ठेवली तर काय फरक पडतो." आर्या म्हणाली तसं निलेश उठला आणि किचनच्या दारात आला.
"आता पुन्हा तोच मुद्दा! सगळ्या बायकांना का वाटतं की नवरे काहीच करत नाही? मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकतो. तू घरातच असतेस ना, किती वेळ रिकामा असतो तुझ्याकडे." निलेश म्हणाला तसं आर्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
"वेळ असतो? खरंच? सकाळी साडेसहा पासून उठून मुलांच्या डब्यापासून ते तुमच्या शर्टच्या इस्त्रीपर्यंत सगळं करते मी. दिवसभर घरात राहूनसुद्धा श्वास घ्यायलाही वेळ नसतो मला." आर्या चिडून म्हणाली. नंतर थोडा वेळ दोघेही शांत राहिले. फक्त भांडी वाजण्याचा आवाज ऐकू येत होता. भांड्यांच्या आवाजाने निलेशला समजलं की आता आर्या जास्तच चिडली आहे. मग तो शांतपणे तिच्याकडे बघू लागला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा