Login

कधीतरी घ्यावा दुर्गेचा अवतार भाग १

Potatlya Balachya Astitvavhi Ladhai Jinknari Aai
भाग १
"हो आहेत मला मुली, म्हणून काय झालं? नेहमी नेहमी तेच तेच. एक तरी मुलगा हवाच.. वगैरे.. वगैरे"


"मुली म्हणजे दुसऱ्याचं धन." आपण ही स्त्री जातीच्या जन्माला आलोय, हे एक स्त्री असून कशा काय विसरतात कुणास ठावूक?"


"मुलगा की मुलगी.. आपल्या हातात आहे का ते?" रेवा चिडली होती.


"अगं... अगं... अगं! शांत हो.. शांत हो!"


"आईच बोलणं, एवढं काय मनावर घेतेस तू." 


"आईला काय तू आज ओळखतेयस का? आपण शहाण्या माणसाने, एका कानाने ऐकायचं... दुसऱ्याने सोडून द्यायचं" सागर समजावण्याच्या प्रयत्नात बोलला.


"गेले सहा सात वर्ष, काय करतेय? तेच करतेय, समजूनच घेतेय त्यांना. पण, समजून तरी किती घ्यावं. काही मर्यादा." रेवा अजूनच भडकली.


"अरे देवा! आता तूच काय तो मार्ग काढ?"


"या दोन बायकांमध्ये माझं सँडविच होतेय. केविलवाण्या नजरेने वर बघत त्याने हात जोडले. दोन हातात डोक धरून, मान खाली घालून तो शांत बसला....


"ओ!! हो!! हो!!" तिने पुढे येऊन, त्याचे दोन्ही हात बाजूला सरकवले आणि कमरेवर हात ठेवून पुढे येऊन उभी राहिली.... 

"सँडविच काय?"

"म्हणून च तर,  लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितलस. म्हणालस, "माझी आई लई लई लईच डेंजर." आई म्हणून अशी तर सासू म्हणुन कशी?" मी आणि बाबा, अजून तरी तिला शब्दात जिंकू शकलो नाही. आता तुझी पाळी, काय ते करा!"

"गृहप्रेवशाच्या वेळी तू उंबरठा ओलांडताना, माप ओलांडत असताना  काय कुजबुजलो होतो तूझ्या कानात, आठवतेय का?" सागर ने आठवण काढून दिली.
" हो आठवतेय ना... म्हणे वेळप्रसंगी दुर्गा व्हावं लागेल तुला...!"
"पहिल्या रात्री तर मला धडकीच भरली होती. म्हणाला होतास, अबोला धरा, भांड भांड भांडा. झिंझ्या उपटा हवं तर तुम्ही सासू  सूना एकमेकींच्या. पण त्याच वारं ही आमच्यापर्यंत यायला नको!" तू सांगून मोकळा झालास, नामानिराळा राहिलास नेहमी.

मी मात्र अडकले!" रेवा चिडक्या सुरात बोलली.


"काय करायला हवं होत मग मी?"

"आई वडील निवडण्याची संधी, तो देव देतो कुठे? तशी संधी मिळाली असती तर, पारखून नसते का घेतले?" बाबा तसे चांगले आहेत. आई तेवढी!" दहा टक्के, हेकेखोर. तुला निवडण्याची तेवढी एक संधी मिळाली या पामराला. ती का म्हणून सोडू? म्हणून मग, तुला घेऊन आलो. सागर भुवया उंचावत बोलला.


"काही काय बोलतोयस रे!!" आई वडील निवडण्याची संधी वगैरे.... तसे चांगलेच आहेत ते"


"हा!! कधी कधी आई जरा जास्तीच ओव्हर रिएक्ट करतात." रेवा शांतपणे बोलली.


------


रेवा आणि सागर... नवरा बायको..  दोघांचं लग्न, अरेंज कम लव्ह. म्हणजे, मित्राच्या लग्नात रेवाला सागरने बघितलं आणि डेस्टिनेशन वेडिंग असल्याने चार दिवस तिला परखण्याची संधी सागरला मिळाली होती. आणि तो तर आता तिच्या परखड स्वभावाच्या प्रेमातच पडला होता.. 


'मला अशीच हीच्यासारखी स्पष्टवक्तती बायको हवी होती.. म्हणजे माझं अर्ध टेन्शन दूर होईल. मला प्रचंड कडक शिस्तीत वाढवलं आईने. सासू म्हणून आई डेंजर असणार... स्वभावाने तशी चांगलीच. पण मोडेन पण वाकणार नाही हा आईचा स्वभाव. बाबांनी ही हात टेकले आईसमोर. आणि मी म्हणजे तर तिचा हुकुमाचा एक्का. तळहाताच्या फोडापरी जपलय तिने मला. चांगल्या संस्कारात वाढवलं. पण काही गोष्टी आहेत ज्या तिच्या तिच्या तिने ठरवलेल्या आहेत. आई आहे म्हणून काय? मला ही पटत नाहीत पण त्यात बदलही अशक्य'


'आईला अशीच या रेवासारखी "जशास तसे" उत्तर देणारी मुलगी सून म्हणून पाहिजे.' रेवाला बघता क्षणी सागर च्या डोक्यात विचार डोकावला. 


मग काय? सागर रेवाच्या मागे हात धुवूनच लागला ना! मदतीला धावून आलेच मित्र मंडळ.... मग काय? सागर ने सगळं व्यवस्थित जुळवून आणलं.


आईबाबांना सांगून, त्यांच्या पसंतीने. प्रॉपर, मागणी घालून रेवा आणि सागरच लग्न ठरलं. रेवा आणि सागर लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेले.

लग्नाला वर्ष झालं न झालं तोच. रेवाला बाळाची चाहूल लागली. 


सुमित्राबाई म्हणजे रेवाच्या सासूबाईंनी, गरोदरपणात रेवाचे खूप लाड पुरवले. आपल्या घरात नातवंडांच्या रुपात मुलगा यावा, त्यांना मनापासून वाटत होतं. पण झालं मात्र उलट. रेवाला मुलगी झाली. पिहूच्या येण्याने सुमित्राबाई थोड्या खट्टू झाल्या पण "पहिली बेटी धनाची पेटी" म्हणत त्यांनी पिहूला आपलंसं केलं खूप प्रेम दिलं. 


पिहूच्या पालनपोषणात रेवाचा दिवस कसा यायचा तिला कळायचं देखील नाही. सहा महिने झाले न झाले तोच सुमित्रा बाईंनी, "एकाला दुसरं असावं" दुसऱ्या बाळासाठी रेवाच्या मागे तकादा लावला.  खरं तर, रेवाला ही दुसरं बाळ हवंच होतं. बहीण भावंडांमधले अनुबंध तिने जगले होते. त्यामुळे पिहूला ही भावंड असावं तिला मनापासून वाटायचं. 


पिहू तीन वर्षाची झाली आणि रेवाला पुन्हा दिवस राहिले. 

"पिहूच्या वेळी, आठवतंय तुला, किती उलट्या व्हायच्या? भाजीचा वास सहन व्हायचा नाही. आता यावेळी नाही ना होत आहे तसं. यावेळी बघ मुलगाच होणार. काळजी घे गं बाई स्वतःची. काही खायची प्यायची इच्छा असेल तर सांगत जा मला. मी पुरवेन तुझे डोहाळे.  बाळ गर्भात असताना, आईच्या इच्छा पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर, बाळ तोंडातून लाळ गाळत म्हणतात."  बोलताना सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर अनामिक आनंद झळकला.


"आई, अहो काय हे? अस काही नसतं. तेव्हा पहिला पहिला अनुभव होता. म्हणून उलट्या होत असेल कदाचित. आता गर्भात बाळ मुलगा की मुलगी. काही का असेना, आमचंच असणार ना ते, "मुलगा म्हणून काळजी घ्यायची" यात काय अर्थ आहे." 


"पोटात बाळ आहे मग काळजी तर घ्यावी लागणारच ना!"

रेवा परखड होती बोलायला. " सासूबाईना तिचं असा तोंडावर बोलणं पटायचं नाही. पण या पाच वर्षात तिला खऱ्या अर्थाने सासू कळली होती. चांगलं  ते चांगल, वाईट ते वाईट.. त्यामुळे चांगल्या वाईटावर ती आता बोलायला लागली होती. आपली मतं परखडपणे मांडायला लागली होती. अनेकदा असं मत मांडण्यावरून दोघींमध्ये बाचाबाची पण व्हायची. पण वेळ या दोघींच्या नात्यावर औषध होतं. लगेच राग निवळला की, दोघींमध्ये काही झालं नसल्यासारखं ही त्या दोघी वागत. माधवराव कधीतरी सुमित्रा बाईना समजवण्याचा प्रयत्न करीत पण बायको आणि आईमध्ये सागर कटाक्षाने बोलायचं टाळायचा कधी रेवाला ह्या गोष्टीचा राग ही येत होता पण आपल्या निर्णयात सागर आपल्या सोबत आहे ही भावना ही रेवाला सुखावणारी होती.
काय होईल पुढे, जाणून घेऊ पुढच्या भागात
धन्यवाद
-©®शुभांगी मस्के...