भाग २
"काय बाई.. हेच का संस्कार...!"
"काय बाई.. हेच का संस्कार...!"
"बघितलं कशी, तोंडावर बोलते. उलट उत्तर देते,तुमची सून.
तरी म्हणत होते. नको आपल्याला त्या घरची पोरगी सून म्हणून. पण तुमच्या कुलदिपकाला, लग्न करेन तर तिच्याशीच."
"काय सोन लागलं होत काय माहिती?" सुमित्राबाईंची त्यांच्या यजमानांच्या म्हणजे माधवरावांच्या कानाशी, खुसुरपुसूर सुरू होती.
"अगं... अगं!"
"मोठा बंगला, गाडी घोडी या सगळ्यांवर, कोण भाळलं होतं. तिच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न, थाटामाटात केलं, तेव्हा बरं मिरवलं होत लग्नात"
तुझी कोण एक मैत्रीण म्हणाली होती. मुलीच आहेत दोन.
आज ना उद्या त्यांचंच, सगळं. केवळ शब्दांनी, लाडू फुटले होते कोणाच्या तरी मनात" माधवराव बोलत होते तोच त्यांनी बोलता बोलता थांबवलं.
"अहो काही काय बोलताय.. त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवायला, आपल्या घरी काय कमी आहे का? चार पिढ्या बसून खातील एवढं आहे म्हटल माझ्या घरी."
"त्याच, चार पिढ्या बसून खायला, पिढी तर वाढायला हवी ना!! नातू नको का असायला!" सुमित्राबाई पुन्हा तोच विषय चघळायला लागल्या.
"का? मुली घराण्याच्या वारस नसतात?" माधवरावांनी प्रश्न केला.
"मुली राहतात कुठे आईवडीलांजवळ. आपल्या लेकी, नाही का गेल्या सासरी. वर्षात चार दिवसांसाठी येतात फक्त. येतात जीव लावतात आणि निघून जातात." मुली किती का असेना, घर रिकामं. बोलताना सुमित्राबाईंनी डोळ्यांना पदर लावला.
सुमित्रा बाईंनी, काळजावरच बोट ठेवलं, माधवरावांनी यावर बोलायचं टाळलं. ते गप्पच बसले...
-----
रेवाची दुसऱ्या गर्भारपणात, चांगल्या महागड्या आणि प्रसिद्ध डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती. तिसरा महिना लागला होता आणि आज रेवा सोनोग्राफी करायला जाणार होती...
सुमित्राबाई ने पटापटा आवरून घेतलं. रेवाची तयारी झाली तशा, तिच्या पाठोपाठ त्याही निघाल्या.
"आई, कुठे जाताय?" सोडायचयं का तुम्हाला कुठे? रेवाने सासूबाईंना विचारलं..
"तुझ्यासोबत डॉक्टरांकडेच येतेय. बोलायचं आहे मला त्यांच्याशी थोडं." सुमित्रा बाई पुटपुटल्या
"काय बोलायचं आहे आई" रेवाने विचारलं..
"पोटातलं बाळ कसयं? विचारायचं आहे फक्त." इति सुमित्राबाई
"आई, बाळ सध्या सुरवातीच्या दिवसात आहे. तेच माहिती करून घ्यायला जातोय ना आम्ही. महत्वाचं म्हणजे.... मी करेन मॅनेज तुम्ही नका टेन्शन घेऊ."
"पिहु आहे घरी, दोघी घरी नसू तर उगाच बाबांना त्रास देईल ती. हट्टी झालीय आजकाल. आणि हो, तिला जरा वेळाने. डाळिंबाचे दाणे द्या खायला."
"येतो आम्ही".. रेवाने पायात चप्पल सरकवली आणि घराबाहेर निघाली. रेवाने सासुला काही बोलूच दिलं नव्हतं.
'आजकालच्या सूना स्वतःला फारच हुशार समजतात. त्यांना घरातल्या मोठ्यांची, गरजच नसते. हॉस्पिटलमध्ये गेली असती. थोड डॉक्टरांशी गोड बोलून, विचारपुस केली असती. हाव कुणाला सुटलीय. पैश्याचा मोह सर्वांनाच! दवाखान्यात मजलेच्या मजले असेच नाहीत चढत. छोटासा दवाखाना होता या डॉक्टरांचा. आता केवढं मोठ हॉस्पिटल बांधलयं.' सुमित्राबाई मनातल्या मनात, पुटपुटत होत्या.
-----
"आजी, मम्मा कुठे गेली".... पिहूने आजीला विचारलं.
"मम्मा गेलीय, हॉस्पिटलमध्ये." सुमित्राबाई
"कशाला?" पिहू
"आपल्या शेजारी, तुझी मैत्रीण मैथिली, तिला कसा भाऊ झाला छोटासा. तसा काहीच दिवसात, तुझी मम्मा पण तुझ्यासाठी भाऊ आणणार." एक एक डाळिंबाचा दाणा भरवत सुमित्राबाई बोलत होत्या.
"भाऊ येणार... मला...!" पिहूने उत्सुकतेने विचारलं.
"हो, आईला सांग, तुला भाऊच पाहिजे.. बहीण नको!" आजीच ऐकून, पिहूने हलकेच मान डोलावली.
"आजी झोका, जोरात घे ना गं!"
एरवी सुमित्राबाई, पिहुवर जोरात ओरडायच्या.
"चार पिढ्यांचा वारसा आहे या झोपाळ्याला.... तुझे पणजोबा, तुझे आजोबा, पप्पा... आणि आता तुम्ही"
"ती लोखंडी कडी, ते गज...तो पाटाचा पाळणा, जपलाय जीवापाड! पुढची पिढी, याच झोपाळ्यावर झुलायला हवी. माझी नातवंडं पतवंड झोपाळ्यावर बसून झोके घेतील" सुमित्राबाई सांगायच्या." तिला काहीच कळत नाही त्यांना उमगायचं तेव्हा म्हणायच्या. "पिहु बाळा, जोरात झोका घेतला की.. ती आड्याला टांगलेली कडी घासली जाते!! आपण पडलो म्हणजे" पिहू पडायच्या धाकाने हट्ट सोडायची.
आज, पिहूचा हट्ट त्यांनी मुकाट्याने पुरवला होता....
-----
रेवा हॉस्पिटल मधून घरी आली..
"अगं अगं, अशी उभ्याने काय पाणी पितेस घटाघटा?
बसून पी पाणी." सुमित्राबाई.
रेवा, सोफ्यात ग्लास आणि पाण्याची बॉटल घेऊन बसली...
"काय म्हणाले डॉक्टर"...
"सोनोग्राफी झाली का?"
"थकल्यासारखी दिसतेस जराशी, काय झालं? सुमित्राबाईंनी विचारलं..
"सगळं छान आहे आई." रेवा शांतपणे बोलली.
"काय गं, त्या सोनोग्राफी मध्ये सगळं कळत म्हणे.
पोटात काय आहे ते." सुमित्राबाईंनी, सरळ विषयाला हात घातला.
"काय आहे, म्हणजे?"
"पोटात बाळच असणार ना!"
"माणसाचं असणार. दोन कान, दोन डोळे, हात पाय, डोकं असलेले...!" रेवाने हसत उत्तर दिलं.
"तेवढं कळतं मला. बाईच्या पोटात, माणसाच बाळ असणार, कुत्र्या मांजराच नाही. सुमित्राबाई चिडून बोलल्या. "अग मी म्हणतेय मुलगा की मुलगी.."
"आई अहो, काही काय!!" रेवाने लांब श्वास घेतला. आणि हळूच उसासा सोडला.
ते काही नाही, पुढच्या महिन्यात सोनोग्राफीला जाशील तेव्हा, डॉक्टरांना सरळ सांग. म्हणो, एक मुलगी आहे. आता मुलगा हवाय. तेव्हा स्पष्ट सांगा आम्ही पुढे काय ते बघू?" सुमित्राबाई स्पष्टच बोलल्या.
"आणि जर पोटात मुलगा नसला तर" रेवाने विचारलं.
"मग काय? पाडायचा गर्भ'...
"पुन्हा राहीलच ना! वय च काय आहेत तुमची, चांगले धडधाकट आहात दोघे ही, सुमित्राबाई निर्विकारपणे बोलत होत्या.
"एक स्त्री असून, तुमचे हे असले विचार...
कीव च येते मला तुमच्या विचारांची...
मुलगा.. मुलगा.. मुलगा.. कुणास ठावूक, काय देतो मुलगा!" रेवा चिडून बोलली.
"अगं काय देतो म्हणजे..
सुख देतो!"
"मुलगा असला की घर कसं भरल्या भरल्या सारखं वाटतं. घरात सून येते. अंगणात नातवंडं खेळतात. मुलगा असला की आमच्यासारख्या म्हाताऱ्याच्या वाट्याला एकटेपणा येत नाही. तूच बघ. आपलं घर आणि एक तुझे आईवडील. दोन्ही बहिणींच लग्न झालं. झालं घर रिकामं!
चार दिवस माहेरपणाला जाता.
पुन्हा त्यांच्या वाट्याला, एकटेपणाच!
घराच्या भिंती खायला उठत असतील त्यांना.
तुझी आईच एकदा म्हणाली होती, मुली सासरी गेल्या आणि घर रिकामं झालं म्हणून."
"चार दिवस, माहेरी गेलीस पिहूला घेऊन. करमत नव्हतं आम्हाला अजिबात. घर खायला उठतं होतं. " सुमित्राबाईंनी आपला पक्ष मांडला.
"म्हणजे ह्याचा अर्थ काय? आपण सगळे एकत्र राहतो म्हणून तुमच्या अपेक्षा वाढल्यात, असाच ना!"
"तरीच यांना बाहेर नोकरीची चांगली संधी चालून आली होती. तुम्ही ह्यांना जाऊ दिलं नव्हतंत म्हणे."
"आपल्या प्रेमाच्या बेड्या अडकवल्यात त्यांच्या पायात आणि ठेवलतं इथेच!" शब्दांवर जोर देत रेवाने स्पष्टपणे सुनावलं. आता, इथे ही आमचं चांगल सुरू आहे ती गोष्ट वेगळी पण, असो...."
सॉरी आई, हे लिंग परीक्षण वगैरे, माझ्या मताला पटत नाही. ते माझ्याच्याने होणार नाही. कायद्याने गुन्हा आहेच. आणि तसं केलं तर, गुन्हा दाखल होतो आणि आयुष्य खडी फोडण्यात जातं.. जायचं आहे का तिथे?" रेवा, परखडपणे बोलली. उगाच नका मला भरीस पाडू, मी ऐकणार नाही तुम्हाला माहिती आहे.. मग उगाच कशाला एनर्जी वाया घालवता. रेवा ने पुढे बोलूच दिलं नव्हतं.
काय घडेल पुढे? बघू पुढच्या भागात
धन्यवाद...
-©®शुभांगी मस्के...