Login

कडीकुलूप (भाग:-१)

खाण्याचे पदार्थ कडीकुलूपात ठेवणाऱ्या व अडगळ साचून ठेवणाऱ्या सासूला कसे सून बदलवते ही सांगणारी कथा

शीर्षक :- कडीकुलूप

भाग : -१

" किती कचरा गोळा करून ठेवलं आहे,  अडगळ आहे तर दुसरीकडे ठेवायचे ना, असं दारात कोण मांडून ठेवत? कबाडखाना वाटतोय नुसता! दुसरीकडे ठेवते हे सर्व सामान म्हणजे किती छान मोकळं सुटसुटीत वाटेल ना! " असे स्वतःशीच म्हणत आनंदी पदर कमरेला खोचत व्हरंड्यातील सामान उचणार तोच त्यांच्याकडे काम गडी रामू पळत आला व तिला अडवत म्हणाला," अहो छोट्या मालकीणबाई, हे काय करताय तुम्ही?"

" अहो काका, किती अडगळ आहे इथे, त्यामुळे कचरा वाटतोय, तोच कमी करतेय." ती पुन्हा तेथील सामान उचलत म्हणाली.

" अहो, ठेवा ते खाली. मोठ्या मालकीणबाई रागावतील. कशाला राग ओढवून घेताय? त्यांना हा बदल आवडणार नाही." दाराकडे हळूच वाकून पाहत दबक्या आवाजात पण समजवणीच्या सुरात रामू तिला म्हणाला.

"बरं ठीक आहे, काका. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात तेव्हा प्लीज, मला मालकीणबाई म्हणू नका. फक्त आनंदी म्हणा." ती कमरेचा पदर काढून हात झटकत म्हणाली.

"अहो, असं कसं? मोठ्या मालकीणबाईंना जर कळलं ना तर माझं काही खरं नाही." तो घाबरत दबक्या आवाजात म्हणाला.

"त्यांची काळजी तुम्ही करू नका. मी पाहते ते. तुम्ही मला आनंदी म्हणत अगं तुगं बोलायचे, समजलं." आनंदी पुन्हा रामाला लाडिक दटावत हसत म्हणाली.

"बरं बेटा तू म्हणशील तसं." तो दोन्ही हात वर करत तिला आशीर्वाद देत म्हणाला.

"आता कसं बघा बरं, किती छान वाटलं!" ती हसत म्हणाली.

आनंदीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे तिला या घरातील नियम, अटी, कायदे  जास्त काही माहिती नव्हते. तिची सासू सुषमा थोडी जुन्या विचारांची आणि तिच्या पद्धतीत कोणी बदल केलेले तिला अजिबात आवडत नव्हते. हम करे सो कायदा असंच काहीस होतं तिचं. तिच्या म्हणण्यानुसार सगळं घर चालायचं. त्यात थोडा जरी बदल झाला तरी ती सगळं घरं डोक्यावर घ्यायची. अगदी खाण्या पिण्यातही तिची रोखठोक असायची. ती सांगेल तेच प्रत्येकाने खाल्ले पाहिजे, असा तिचा निग्रह आणि कटाक्ष असायचा. छोट्यातली छोटी वस्तू मग ती वापरात व उपयोगी नसली तरी ते टाकून न देता तशीच ठेवण्यात ती धन्यता मानायची.

रोजच्या प्रमाणे आजही सर्वजण म्हणजे आनंदी, तिचा नवरा पारस, तिचे सासरे शंकर आणि सुषमा रात्रीचे जेवायला बसले.

रामूने जेवायला वाढले आणि तो निघून गेला.

ताटात खिचडी पाहून शंकरने तोंड वाकडे केले.

"काय गं, आज पुन्हा खिचडी? रात्रीच्या जेवणात कोण रोज खिचडी खातात?" ते  तोंड कसंनुस करत म्हणाले.

"जे असेल‌ ते गपचिप खावा. तुमचं काय जातंय बोलायला. घर मला चालवायला लागतं. असंही पचायला हलके असे जेवणं रात्री करावे." सुषमा नेहमीप्रमाणे आपला मुद्दा मांडत म्हणाली.

"वीट आलाय असल्या जेवणाचा? नवीन सून काय विचार करेल याचा तरी विचार कर जरा?" शंकर आनंदीकडे पाहत तिला म्हणाले.

"होईल तिलाही सवय हळूहळू. आताही ती निमूटपणे खातेय. तुम्ही ही खा." ती त्यांनाच दमात घेत म्हणाली.

क्रमशः

आनंदी बदल करू शकेल का?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all