Login

K हाणी घर GHAR कि.. भाग 2

आधुनिकता आणि परंपरा यांची हलकी फुलकी कहाणी
Kहाणी घर GHAR कि..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

भाग 2:



थोड्या वेळातच त्यांच्या दारासमोर एक व्हॅन येऊन थांबली. त्यातील एक जण उतरून बाहेर आला. वृषाली त्यांचीच वाट पाहत होती. तिने कौस्तुभ ला आवाज दिला,


" कौस्तुभ,येतोस का जरा त्यांच्या टीमला आपण सांगू सगळे काम.'


गॅलरीतील झोपाळ्यावर बसलेल्या चित्राताईंनी हे ऐकून जोरदार प्रतिक्रिया दिली,

" कोण आलंय आता? मला तर वृद्धाश्रमात घेऊन जायला आले नाहीत ना? मी नाही जाणार कुठे. माझा हक्काचं घर आहे हे. "


" आई अग जरा थांब ना, दरवेळी सुतावरून स्वर्ग का गाठतेस? ही माणसे काही तुला घेऊन जायला आली नाहीतर ती आपल्या घराची स्वच्छता करून देणार आहेत. "


" रिलॅक्स काकू, आम्ही फक्त तुमचं घर स्वच्छ करून देणार आहोत. तीन तासांसाठी हे घर आमच्या ताब्यात असणार आहे. "


चित्राताईंच्या परवानगीची वाट न बघता वृषाली त्यांना घरात घेऊन गेली. आता मात्र या ग्रुप कडून काही चूक होण्याची संधीच ताईंना हवी होती. त्या वृषालीला खडे बोल सुनावणार होत्या.


पण त्या माणसांनी स्वयंपाक घर, ट्रॉलीज, टाइल्स,फॅन,भिंती अगदी घरातला कोपरा न कोपरा व्यवस्थितपणे स्वच्छ केला. ही सगळी स्वच्छता पाहून, ' हे माझंच घर आहे ना..'असा विचार चित्रा ताईंच्या मनात येऊन गेला.


" काकू, सगळं ठीक आहे ना अजून काही राहिले असेल तर सांगा. "


" खूप छान काम केलं आहे तुम्ही सर्वांनी. तुमचे मनापासून आभार. ते होऊ शकते याचा कधी मी विचारच केला नव्हता. कौस्तुभ तुझे खूप कौतुक बरं का. "



वृषाली ची कल्पना असतानाही कौतुक मात्र कौस्तुभ चे झाले. ' सुरुवात तर चांगली झाली' असा विचार करून वृषालीने सर्वांसाठी चहा केला.


मनासारखी स्वच्छता झाल्यामुळे चित्राताईंचा मूड चांगला होता. मधल्या दोन दिवसात वृषालीने साड्यांची आणि सजावटीच्या सामानाची खरेदी केली. चित्रा ताईंसाठी मुद्दाम तिने त्यांना आवडणारी चंद्रकोर पैठणीची खरेदी केली. भराभर वेळ जात होता.


वृषाली,कौस्तुभने वेळात वेळ काढून पर्यावरण पूरक मखर तयार केले. ऑपरेशन सिंदूर मधील जवानांच्या प्रतिकृती तयार केल्या, युद्धाचे साहित्य तयार केले. 'ऑपरेशन सिंदूर' चा तिला पाहिजे तसा देखावा पूर्ण झाला होता. सगळी तयारी मनासारखी झाली होती. वृषाली आणि कौस्तुभ दोघेही खूप खुश होते.


आज तर प्रत्यक्ष बाप्पांचं आगमन! वातावरणातच आनंद,उत्साह ओसंडून वाहत होता. दारात सुरेख रांगोळी काढली. मोदक करण्याची जबाबदारी घेतली होती. वृषाली,कौस्तुभ आणि कौस्तुभ चे बाबा तिघांनी मूर्ती शाळेत जाऊन मूर्ती आणली.


मूर्ती पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा भाव उमटला. त्यांना हवी तशी मोठी मूर्ती नव्हती.


' ' इथेही बया कंजूषणा करते आहे.' चित्रा ताईंचे मन संवाद सुरू झाले.


कौस्तुभच्या बाबांनी यावेळी शाडू मातीची गणरायाची मूर्ती घेण्याचा आग्रह धरला होता. ताईंचा नाराज झालेला चेहरा पाहून बाबा म्हणाले,


" सण उत्सव म्हणजे आपल्या थोर संस्कृतीने घालून दिलेल्या परंपरा आहेत. एकत्र येण्यासाठी, एकत्र असण्यासाठी मुख्य म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी.


एकमेकांची सुखदुःखे वाटून घेण्यासाठी. मग जर तूच अशी नाराज असशील तर आम्हाला कसं वाटेल? त्या बुद्धी दाता गणरायाला कसं वाटेल?

सगळं काही माझ्याच मनासारखं व्हावं असा अट्टाहास का? काही नवं काही जुनं याची सांगड असेल तरच खऱ्या अर्थाने उत्सव होतो.

चल बघू हसतमुखाने स्वागत कर बाप्पाचे. "


" पण" या पणने चित्राताईंच्या मनाला पोखरले होते.


'या वर्षी आलेली ही नवी सून आधुनिकतेच्या नावाखाली काय दिवे लावणार आहे? '

हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता.


" बाई बाई... महालक्ष्मी येणार आणि सजावटीची काहीच तयारी नाही. नव्हतं का हे तिला? धरला असेल तो लॅपटॉप डोळ्यासमोर. अशाने होतात का सण साजरे? अग आई.... मेले ग मेले "


चित्राताईंच्या आवाजाने बाबा धावत आले. कौस्तुभ आणि वृषाली ही हातातले काम बाजूला ठेवून बाहेर आले.