Login

K हाणी घर GHAR कि.. अंतिम भाग

आधुनिकता आणि परंपरा यांची हलकी फुलकी कहाणी
Kहाणी घर GHAR कि....

चॅम्पियनन्स ट्रॉफी 2025


अंतिम भाग


अंगणात पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं आणि डॉक्टरांनी चित्राताईला

'अजिबात हालचाल करू नका' असे सांगितले.

' '' आता कसं होणार? वृषाली ला कसं जमेल हे सगळं? महालक्ष्मी देवीचे सर्व काही यथा सांग पार पडायला हवं. कमी जास्त झालं तर?' या विचारांनी त्या हैराण झाल्या.


वृषाली ला आता थोडी भीती वाटत होती. ' जमेल का आपल्याला सगळं? कसं होईल आता ' तिला तर काहीच माहित नव्हते.

पण वृषाली म्हणजे आधुनिक लक्ष्मीचं रूप होती. तंत्रज्ञान, ज्ञान, शिक्षण, सुदृढ विचारशक्ती यांचे ती प्रतीक होती.

तिने तंत्रज्ञानाची मदत घेत फराळाचे जिन्नस तयार केले. कौस्तुभ आणि बाबांनी महालक्ष्मीची सजावट केली. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून महालक्ष्मीना सुंदर तयार केले.

चित्राताई हे सगळं बघत होत्या. खर तर वृषाली बद्दलच त्यांचा मत बदलत होतं. पण ती सर्व गुणसंपन्न आहे हे मान्य करताना त्यांचा 'इगो ' दुखावला जात होता.


थाटामाटात गौराईचं आगमन झालं. वृषालीने अतिशय सुबकतेने गौराईच्या स्वागताची तयारी केली होती. फुलांच्या पायघड्या,दिव्यांची आरास, उत्तम प्रकाश योजना, या सर्वांना साजेशी संगीत स्वागत सोहळ्याची श्रीमंती वाढवत होते.

चित्राताई मनोमन सुखावल्या. गौरीचं देखणं रूप पाहून त्यांचे मन भरून आले. आगमन सोहळ्यातील क्षणांना वृषाली ने तिच्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करून संगीतबद्ध केले होते.

" लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली.. "

या गाण्यासोबत व्हिडिओ बघताना चित्रा ताईंना आपल्या या सॉफ्टवेअर इंजिनियर सुनेचा अभिमान वाटला.


महापुजेच्या दिवशी वृषाली ने सासूबाई च्या ' रीतीप्रमाणे' स्वयंपाक करायला सुरुवात केली.

त्यांच्याच पद्धतीने तिने 16 भाज्या, पुरणपोळ्या साग्र संगीत स्वयंपाक केला.

परत एकदा तंत्रज्ञानाची मदत घेऊन तिने पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक तर केलाच पण नैवेद्याची ताटे देखील अखीव रेखीव पद्धतीने तयार केली. ताटात पुरणपोळ्या वाढणार तेवढ्यात आवाज आला,

" थांब वृषाली मला जरा बोलायचं आहे. "


" आई काही चुकलं का? मी तर सगळं मनापासून आणि तुम्ही म्हणाल तसे केले आहे. "


" थोडं राहीलच आहे वृषाली. यावर्षीपासून आपण नैवेद्यामध्ये थोडा बदल करू. महानैवेद्य साठी 16 - 16 पोळ्यांऐवजी आपण या वेळेस पोळ्यांची संख्या कमी करू. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत हा प्रसाद सगळ्यांमध्ये चुटकीसरशी संपायचा. पण आता बदलत्या काळात आपणही बदल स्वीकारला पाहिजे. तुम्हा तिघांचे म्हणणे पटते आहे मला."


" हो चालेल ना आई... आजच्या जमान्यासारख्या आपल्या गौराई ही डायटिंग करणाऱ्या.. "


" पण मी हा बदल परंपरेला धरूनच करते आहे बरं का. माझ्या सासूबाईंनी सांगितले होते घरात शुभ कार्य झाले की आपण गौराईच्या काही प्रथा बदलू शकतो. त्यानुसारच आज पासून तुला मी हा बदल करण्यासाठी सांगितले आहे. "


" वा!!आई, देवच पावला म्हणायचा आज. छान वाटत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या या परंपरेचा मूळ हेतू होता.
सर्वांना एकत्र आणणे, सकारात्मकता वाढवणे. हे मला आजीने सांगितले होते. न करता आपल्याला जे काही मिळाला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी पूजा . "


" बरोबर बोलतो आहेस कौस्तुभ तू. अरे हे आजचं जग तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. बँकिंग,,ऑनलाईन व्यवहार हे सगळे लक्ष्मीचंच रूप आहे आपणही त्याचा स्वीकार केला पाहिजे. पण तुझी आई म्हणते तसं आपल्या परंपरा सोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आणि आधुनिकतेकडे पाठ फिरवायची नाही."


" पुरे आता चला पटकन नैवेद्य आरती करू. " चित्रा ताईंना नैवेद्याची वेळ चुकवू
द्यायची नव्हती.


" हो आई झालंच आहे सगळं. बघाना !

परंपरा आपल्याला संस्कार मूल्ये स्थैर्य देतात . तर आधुनिकता आपल्याला वेग तंत्रज्ञान सुविधा देते. या दोन्हींचा समतोल साधूनच समृद्ध जीवन जगता येते बरोबर ना!"


तेवढ्यात वृषाली च्या मोबाईल वर तिच्या बॉस चा कॉल आला. ' आता काय मध्येच?' चित्रा ताईंना आता बॉस चाच राग आला.


पण कॉल संपला आणि वृषाली आनंदाने उड्या मारतच आली, " कौस्तुभ, आई, बाबा मला प्रमोशन मिळाले आहे. पगार देखील वाढला आहे. गौराई पावली आपल्याला. "

" हो वृषाली आज गौरी आपल्याला सगळ्याच दृष्टीने पावली आहे बरं का.. " बाबांनी बोलण्याची संधी सोडली नाही!

हसत, लाजत चित्रा ताईंनी बाबांकडे कटाक्ष टाकला.

जशी आधुनिक गौराई वृषाली आणि तिच्या घरच्यांना प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होवो. हिच साठा उत्तराची कहाणी (घर GHAR कि..) पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.