काही अलक शिवरायांच्या चरणी

शिवरायांच्या चरणी दंडवत.

शिवरायांच्या चरणी काही अलक


*******************

रायगड रडू लागला. महाराष्ट्र पोरका झाला. आता काय होईल मावळ्यांचे? कसे समजतील राजांचे विचार?
तितक्यात एका खेड्यात डफावर थाप पडली आणि रायगड पुन्हा हसला.


*********************

गोंधळी पोरं म्हणाल,"आबा मला शिलेदार व्हायचं हाय." तो हसून बोलला," मंग आपून कोण हाय. छातीचा भाता चालतो तवर शिवबा आन त्याच गुणगान गायच." पोरग हसत उठल आणि डफावर थाप देऊन गाऊ लागलं.

********************

ती मुघल सैनिकांना घाबरून पळत होती. अचानक डफावर पडलेली थाप कानी आली. ती गरकन मागे वळली आणि वाघिणीला बघून लांडगे पळाले. तिने शिवबाला मनात मुजरा करून घरची वाट धरली.


***********************

समोर हशम पदराला हात घालत होता. म्हातारा शाहीर.अचानक गरजला आणि शिवबा आठवून त्या वाघिणीने हशमाचा वध केला.

*************************

डफावर थाप पडली आणि हरहर महादेव गर्जना कानी पडली. राजांची मूर्ती आठवली आणि त्याने अडवलेली तिची वाट सोडली.


***************************


राजं गेलं आता स्वराज्य संपणार?
सह्याद्री आशेने पहात होता आणि तेव्हाच एक छोटा मुलगा डफ उचलून शिवबाचा जागर गात होता.


******************************

छातीवर सपकन वार झाला. रक्ताची धार उडाली अन् अचानक त्याने गर्जना केली हर हर महादेव. पुढच्या घावात गनिमाचे मुंडके उडाले आणि त्याने राजांना अखेरचा प्रणाम केला.


*********************************


रायगडावर मशाली विझल्या आणि बादशहा हसला. पण सूर्य मावळला तरी पणती प्रकाश देतेच. त्याने डफ उचलला आणि बारा मावळ शिवबाच्या विचारांनी शहारले.


*****************************


समोरून समशेर उसळली आणि त्याने मोहिमेत उडी घेतली.
अंगातून उष्ण रुधिर वाहताना त्याला फक्त दिसत होते शिवराय.
आपोआपच स्फुरण चढले आणि फत्ते झाली.


**********************************


तो रायगडी पोहोचला आणि राजं गेल्याची खबर आली.
त्यानं डफ घेतला आणि थाप दिली. शाहिरी काव्य सुरू झाले.
पोवाडा संपला आणि त्याला प्रत्यक्ष महाराज मागे उभे असल्याचा भास झाला.
बस आता हीच स्वराज्याची सेवा. शिवरायांच्या विचारांचा प्रसार.
त्याने डफ उचलला आणि चालू लागला.


©® प्रशांत कुंजीर.